चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या ‘साधी माणसं’ या चित्रपटास १५ डिसेंबर रोजी पन्नास वर्षे होत आहेत. त्यानिमित्ते ‘साधी माणसं’च्या स्मृतींना उजाळा..
गेल्या ५० वर्षांत चित्रपटनिर्मितीचं तंत्र खूप बदललं आहे. पण केवळ अत्याधुनिक तंत्रज्ञान हाताशी असल्याने दीर्घकाळ स्मरणात राहतील असे उत्तम चित्रपट बनवता येत नाहीत. त्यासाठी आपण निवडलेल्या माध्यमावर पराकोटीची निष्ठा, परिश्रम घेण्याची जिद्द, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि मूल्यांची जपणूक या गोष्टी आवश्यक असतात. त्यामुळेच अभिजात कलाविष्कार करणारे चित्रपट कधीच कालबाह्य होत नाहीत. तंत्रज्ञान कितीही बदलले तरी कलेची मूलतत्त्वे कायम राहून नवनिर्मितीसाठी ते प्रेरणा देत राहतात. भालजींचा ‘साधी माणसं’ हा अशांपैकी एक चित्रपट.
‘साधी माणसं’ १९६५ मध्ये प्रकाशित झाला. ‘साधी माणसं’ ही साध्या माणसांची साध्या माणसांनी सांगितलेली कहाणी. हा चित्रपट रंगीत नाही. त्यात नृत्ये नाहीत. हिंसाचार नाही. मोहवणारी विलोभनीय दृश्ये नाहीत. चित्रपट हमखास यशस्वी करणाऱ्या या गोष्टी भालजींनी कटाक्षाने दूर ठेवल्या होत्या. खरोखरच ही माणसं साधी दिसावी, खरी असावी, त्यांच्या जीवनातलं नाटय़च अधिक बोलकं व्हावं यासाठी भालजींनी रंगभूषेचा वापरही जाणीवपूर्वक टाळला. वेशभूषा, छायाचित्रण, संगीत, नेपथ्य, संवाद यांतही वास्तवतेचं हे भान भालजींनी ठेवलं होतं. चित्रपटाचं बहुतांशी चित्रण स्टुडिओभोवतालच्या परिसरातच झालं. अरविंद लाड यांची नजर म्हणजे कॅमेऱ्याची नजर. कॅमेऱ्यात काय घ्यायचं, यापेक्षा कॅमेराबाहेर काय ठेवायचं, हे महत्त्वाचं. कमालीचा आत्मविश्वास. दिग्दर्शकाला नेमकं काय हवंय याची पूर्ण जाणीव. स्टुडिओच्या मधल्या चौकात शंकर लोहाराचा भाता लागला. चौकाला लागूनच असलेली लांबलचक उंच भिंत तुरुंगाची भिंत झाली. अभ्यागतांसाठीचं प्रतीक्षालय कैद्यांना भेटण्याची खोली झाली. स्टुडिओच्या परिसरातील आंब्याची झाडं तुरुंग परिसरातील आंब्याची झाडं झाली. ‘जयप्रभा स्टुडिओज्’ ही पाटीवरील अक्षरं कॅमेऱ्याच्या ब्लॉकबाहेर ठेवून स्टुडिओचं फाटक तुरुंगाचं फाटक झालं. त्याच फाटकाच्या दिंडी दरवाजातून तुरुंगातून सुटका झालेला शंकर बाहेर पडणार असतो आणि त्याच वेळी पार्वती आत येणार असते. स्टुडिओच्या परिसरातील शेतात फावडय़ाने बांध घालून ‘मायेची वयनी’ सुलोचनाबाई पाटाचं पाणी शेताकडं वळवू लागल्या. जयश्रीबाई बाभळीची साल काढायला शिकू लागल्या. लोहाराची भूमिका खरी वाटावी म्हणून सूर्यकांत गावातील घिसाडय़ाच्या दुकानात जाऊन तासन् तास त्यांचं चालणं, बोलणं, त्यांची काम करण्याची पद्धत या गोष्टींचं सूक्ष्म अवलोकन करू लागले. साध्या माणसांची भाषाही एकदम साधी. संवादही साधेच. भालजींची खासियत असलेले चुरचुरीत संवाद आणि शब्दांची आतषबाजी इथं चालणार नव्हती. तरीही ते भालजींचेच संवाद होते. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय व्यक्त करणारे. टोकदार. संवादांप्रमाणेच चित्रपटाचं संगीतही साधंच. पारू लोहारीण आगीनफूल- ठिणगी ठिणगी- वाहून ऐरणीच्या देवाची पूजा करते. लोहाराच्या भात्याच्या आवाजात सूर मिसळतो. भाता, ऐरण व हातोडा ही लोहाराची अवजारं संगीताची वाद्यं होतात आणि शब्द येतात..
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी व्हाऊ दे
आबाळागत माया तुजी आमावरी ऱ्हाऊ दे..
पारू देवाजवळ सुख, संपत्ती, समाधान यापैकी काही मागत नाही. गरिबी असली तरी असू दे. तेच आमचं लेणं. संसारातील अडीअडचणींना तोंड देण्यासाठी धनी मात्र वाघावाणी असायला हवा अशी तिची धारणा. तिला याची जाणीव आहे की जीवनात-
सुक थोडं दुक्क भारी दुनिया ही भलीबुरी
घाव बसंल घावावरी सोसायला झुंजायला
अंगी बळ येऊ दे !
तिच्या जीवनात संकटं येणार. ती नकोत किंवा त्यापासून ती सुटका मागत नाही. पण ती संकटं सहन करायची शक्ती ती मागते. सोप्या, सरळ शब्दांत भालजी एखाद्या तत्त्वचिंतकाप्रमाणे मानवी जीवनाचे वर्णन यात सहजपणे करून जातात.
शंकर आणि पार्वती हे लोहार दाम्पत्य हणबरवाडीत दिवसरात्र काबाडकष्ट करून मिळतील त्या चार पैशात आनंदानं संसार करीत असतात. पण या साध्या माणसांच्या जीवनातही अनपेक्षित वळणं येतात. गाडीचा कमानपाटा तुटला म्हणून ट्रक-ड्रायव्हर छक्कडराव शंकर लोहाराकडे जातो. शंकर तो दुरूस्त करून देतो. शंकरच्या कामावर छक्कडराव खूश होऊन शंकरला शहरात चांगली नोकरी मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्याला कोल्हापूरला घेऊन येतो. आपल्या ओळखीनं एका फौंड्रीत नोकरीही मिळवून देतो. पण शहरातलं जीवन साधं नसतं. छक्कडरावचा बेत वेगळाच असतो. छक्कडरावच्या मनात पारूला गटवायचं असतं. छक्कडराव फसवणुकीच्या एका खोटय़ा केसमध्ये शंकरला गोवतो आणि त्याला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा होते. मग एकाकी पारूला अनेक आमिषं दाखवूनही ती वश होत नाही तेव्हा छक्कडराव तिच्यावर हात टाकतो. पारू साधी असली तरी पातिव्रत्य जपणारी, करारी आणि तडफदार आहे. प्रसंगी ती वाघीण होते. ती छक्कडरावच्या डोक्यात लाकूड घालून त्याला ठार मारते. पोलीस तिला पकडून नेतात. कोर्टात रीतसर खटला सुरू होतो. सरकारी वकील तिला या गुन्ह्याबद्दल जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी करतात. पार्वतीचे वकील बचावाच्या युक्तिवादाला उभे राहतात.
‘‘आरोपी पार्वती लोहार हिनं छक्कड ड्रायव्हरच्या डोक्यात लाकूड घालून ठार मारलं असं ती स्वत: कबूल करते. कारण ती बाई खरं बोलणारी आहे. गरीब, श्रमजीवी माणसाची ती बायको आहे. आपला नवरा, आपली अब्रू यापलीकडचं जग तिला माहीत नाही. अशी संसाराच्या उंबरठय़ावर उभी असलेली स्त्री जीव द्यायच्या तयारीनं एखाद्याचा जीव घेते याचा अर्थ काय? चारित्र्याचा बळी गेल्यानंतर अशा स्त्रीला जगात जगण्यासारखं दुसरं काहीच उरत नाही. कायद्याचा मूळ हेतू सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचं निर्दालन करणं हा असेल तर या बाईला शिक्षा देताना हा हेतूच पराभूत होईल. म्हणून या शूर, स्वाभिमानी स्त्रीला संपूर्णपणे निदरेष ठरवून तिला आदरपूर्वक मुक्त करावं अशी मी आपल्याला विनंती करतो..’’ वकिलांनी पार्वतीची अशी बाजू मांडल्यानंतर न्यायाधीश तिला विचारतात, ‘‘तुला काही सांगायचं आहे का?’’
पार्वती म्हणते, ‘‘सरकार, आम्हा गरीबाची दौलत आमची अब्रू. जोवर डोईवर पदर.. गरतीचं जिणं तोवर. त्यालाच कोणी हात घातला तर आमी काय करावं? मी त्याला ठोकला हे खरं; आता तुमी काय बी करा.’’
एवढीच तिची कैफियत! पण त्यामध्ये भालजींच्या जीवनाचं तत्त्वज्ञान सामावलेलं. मग ही कथा केवळ शंकर-पार्वतीपुरती मर्यादित राहत नाही. ही कथा खेडय़ातून शहरात येणाऱ्या, तिथल्या कपटी, स्वार्थी, विश्वासघाती, क्रूर, लांडय़ालबाडय़ांना तोंड देणाऱ्या; तरीही आपलं स्वत्त्व प्राणपणानं जपू पाहणाऱ्या माणसांची होते. देशातच काय, पण परदेशातही ती घडू शकते.
‘साधी माणसं’ला लोकप्रियता तर मिळालीच; त्याबरोबरच केंद्र सरकारचे उत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रपती रौप्यपदक व महाराष्ट्र शासनाची सवरेत्कृष्ट चित्रपट, सवरेत्कृष्ट दिग्दर्शक (भालजी पेंढारकर), सवरेत्कृष्ट अभिनेत्री (जयश्री गडकर), उत्कृष्ट पटकथा (भालजी पेंढारकर), उत्कृष्ट संवाद (भालजी पेंढारकर), उत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (आनंदघन), उत्कृष्ट पाश्र्वगायिका (लता मंगेशकर), उत्कृष्ट कला-दिग्दर्शक (सदाशिव गायकवाड), उत्कृष्ट छायाचित्रकार (अरविंद लाड) अशी तब्बल नऊ पारितोषिके पटकावून राजमान्यताही मिळाली.
‘साधी माणसं’ हा मॉरिशसला जाणारा पहिला मराठी चित्रपट. ‘साधी माणसं’ पाहून प्रभावित झालेल्या पोलंडच्या टोपालिस या चित्रपटतज्ज्ञाने ‘साधी माणसं’ इंग्रजीमध्ये सबटायटलिंग करून संपूर्ण युरोपमध्ये टेलिव्हिजनद्वारे दाखविण्याची इच्छा व्यक्त केली होती. कारण या चित्रपटात भारतातल्या ग्रामीण जीवनाचं जे अस्सल रूप दिसतं ते इतरत्र क्वचितच पाहायला मिळतं.
असं म्हणतात, की आजचा ‘उद्या’ हा परवाचा ‘काल’ होतो. काळाची ही गती कोणीच थांबवू शकत नाही. तो सतत पुढे जात असतो. रूपेरी पडदा हा त्याचा महत्त्वाचा साक्षीदार. ज्यांच्या नावासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी व्हायची अशा अनेक व्यक्ती आता हयात नाहीत. कृष्णधवल चित्रपट आता निघत नाहीत. बदलती परिस्थिती व तंत्र यामुळे जयप्रभा स्टुडिओतली आणि पर्यायाने कोल्हापुरातली चित्रनिर्मिती थंडावली आहे.
‘साधी माणसं’मध्ये सहभाग असणारे सूर्यकांत, जयश्री गडकर, राजशेखर, चंद्रकांत गोखले, मास्टर विठ्ठल, दीनानाथ टाकळकर, बर्चीबहाद्दर, संभा ऐरा, वसंत लाटकर, बाळ दैनी, पडद्यावर प्रतिमा निर्माण करणारे छायालेखक अरविंद लाड, कला-दिग्दर्शक सदाशिव गायकवाड, संकलक बाबुराव भोसले, स्थिर-छायाचित्रणकार शाम सासने, पोस्टर डिझाइन करणारे कलायोगी जी. कांबळे, निर्मिती व्यवस्थापक वसंत सरनाईक, त्यावेळी स्टुडिओत काम करणारे तंत्रज्ञ, दुय्यम साहाय्यक , कामगार आता आपल्यात नाहीत. या सर्वाना एकत्र आणून नवी क्षितिजं निर्माण करणारे भालजी पेंढारकर
नव्या पिढीच्या अस्पष्टशा स्मृतीतच आज अस्तित्वात आहेत.
काळाचे हे क्षण कलाकारांच्या स्मृती जतन करण्यासाठीच असावेत. मागील पिढी पुढच्या पिढीला जो वारसा देते तो मोजायला व्यावहारिक यशाची परिमाणं पुरेशी ठरत नाहीत. हे संचित ‘आज’ उद्याच्या हाती देत असतो. बाबुराव पेंटरांचा ‘सावकारी पाश’, शांतारामबापूंचा ‘दो आंखें बारह हाथ’, सत्यजित रेंचा ‘पथेर पांचाली’, गुरुदत्तचे ‘साहिब बीबी और गुलाम’, ‘कागज के फूल’, ‘प्यासा’, भालजींचे ‘मीठभाकर’ , ‘साधी माणसं’ या कलाकृती त्यांच्या जिवंत स्मृती आहेत.. खरीखुरी स्मारकं आहेत. पुतळे बोलत नाहीत; पण चित्रपट बोलतात, संवाद साधतात. त्यामुळेच ५० र्वष उलटली तरी ‘साधी माणसं’च्या स्मृतींना उजाळा द्यावासा वाटतो.                         n
lokrang@expressindia.com

Ghilli re release box office collection
२० वर्षांनी सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची दमदार कमाई, दोन दिवसांत कमावले तब्बल…
marathi actress smita shewale shares experience about yanda kartavya aahe movie
‘यंदा कर्तव्य आहे’ला १८ वर्षे पूर्ण! नवख्या स्मिता शेवाळेला कशी मिळाली होती भूमिका? तिनेच सांगितला अनुभव
Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
Mukta Barve and Madhugandha Kulkarni worked together Naach ga ghuma film for the first time after 20 years of frendship
२० वर्षांच्या मैत्रीत मुक्ता बर्वे आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी पहिल्यांदाच केलं एकत्र काम; ‘नाच गं घुमा’ चित्रपटामुळे मिळाली संधी