पं. शिवानंद पाटील यांनी १९९२ साली आषाढी एकादशीनिमित्ताने सुरू केलेल्या भक्तिसंगीत मैफिलींच्या २५ वर्षांतील वाटचालीतले अनुभव आणि आठवणींचे दस्तावेजीकरण करणारे आषाढी : भक्तिसंगीताची रौप्यमहोत्सवी वारीहे योजना शिवानंद लिखित पुस्तक ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील लेखाचा संपादित अंश..

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात संगीतसेवा करण्याचा योग आम्हा दोघांना विवाहानंतर अगदी लगेचच जुळून आला होता. पांडुरंगाचं साक्षात दर्शन प्रत्यक्ष गाभाऱ्यातूनच आम्हाला झालं होतं. पुढे या पांडुरंगाची २५ र्वष अखंड संगीतसेवा आमच्याकडून होईल याची पुसटशीही जाणीव तेव्हा नव्हती.

Arti Singh will marry businessman Dipak Chauhan in Iskcon Temple
२५ एप्रिलला मंदिरात लग्न करणार प्रसिद्ध अभिनेत्री, व्यावसायिकाशी ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन
Mukh Darshan Arranged for Devotees on Gudhi Padwa at Pandharpur Temple due to Conservation Work
मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा दिवशी विठ्ठलाचे मुख दर्शन दिवसभर : औसेकर महाराज

आपण काहीही करत नसतो, कर्ताकरविता तो विठ्ठलच आहे. कारण तो आहे ‘देवदयानिधी’! योजना प्रतिष्ठान निर्मित आषाढी एकादशीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या भक्तिसंगीत मैफिलींचा विलक्षण भारावलेला तो काळ डोळ्यांसमोर साक्षात उभा ठाकतो.

‘देवदयानिधी’ हा शिवानंदनं म्हणजेच बुवानं गायलेल्या मराठी अभंगांचा पहिला सोलो आल्बम  संगीतकार पं. प्रभाकर पंडित यांनी पुढाकार घेऊन व्हीनस रेकॉर्ड कंपनीतर्फे ध्वनिमुद्रित केला होता. हा बुवाचा पहिला सोलो अभंग आल्बम असल्यानं ध्वनिमुद्रणापूर्वी त्याच्या भरपूर तालमी झाल्या होत्या. आठही अभंग बुवाच्या गळ्यावर चांगले चढले होते. बुवानंही त्याच्यावर पुष्कळ मेहनत घेतल्यानं ध्वनिमुद्रणही उत्तम प्रकारे पार पडलं होतं.

या आल्बमचं प्रकाशन एखाद्या मंदिरात अभंगवाणी गाऊन करावं अशी बुवाची इच्छा होती. माझ्या मनात आलं, की बुवाच्या आल्बमचं प्रकाशन हा नुसता सोहळा नाही, तर तो एक भक्तिउत्सव आहे. त्यामुळे एखादं सभागृह घेऊन अभंगांची मैफल करून त्यात हा आल्बम प्रकाशित केला तर..? माझी ही कल्पना बुवाला आणि पंडित सरांना आवडली आणि मैफिलीची आखणी सुरू झाली.

शनिवार, ११ जुलै १९९२.

बघता बघता मैफिलीचा दिवस उजाडला. आषाढी एकादशीच्या निमित्तानं भक्तिसंगीताच्या मैफिलीतील योजना प्रतिष्ठाननं टाकलेलं हे नवं पाऊल म्हणजे ‘देवदयानिधी’! या मैफिलीची तारीख होती ११. आज या तारखेकडे पाहताना असं वाटतं, की ११ म्हणजे एकादश.. दहा अधिक एक. तारखेनं ही एकादशी होते. म्हणजे ही तारीख जणू शुभशकुनाची साक्षीदारच!

त्या दिवशी दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सभागृहात आम्ही लवकर पोचलो. सारी रंगमंच व्यवस्था करून आम्ही मैफिलीसाठी सज्ज झालो. रसिकांनी या पहिल्याच मैफिलीला चांगली गर्दी केली होती.

या अभंगवाणीची सुरुवात बुवानं संत ज्ञानेश्वरांच्या ‘ओम नमोजी आद्य’नं केली. पाठोपाठ ‘जय जय रामकृष्ण हरी’च्या गजरानं एक मंगलमय, भक्तिमय असं सुंदर, सुरेल वातावरण निर्माण झालं. अशा आश्वासक वातावरणात बुवानं संत नामदेव रचित ‘देवदयानिधी’ या शीर्षकाच्या अभंगानं सुरुवात केली. पंडित सरांनी हा अभंग अप्रचलित अशा ‘सालगवराळी तोडी’ रागात बांधला होता. त्याची एक कथा आहे..

बुवा आणि त्याचे गुरू पं. जितेंद्र अभिषेकी यांची जी प्रात:कालीन मैफल झाली होती, त्या मैफिलीत बुवा राग सालगवराळी तोडी फार जमून गायला होता. त्या रागाची चोख तालीम त्याला अभिषेकी बुवांनीच दिली होती. त्या मैफिलीला पंडित सर उपस्थित असल्यानं त्या रागाचा प्रभावी ठसा त्यांच्यावर उमटला होता. त्या प्रभावातूनच त्यांनी हा शीर्षकाचा अभंग ‘सालगवराळी तोडी’ या रागात अप्रतिम बांधला होता. पहाटे गायल्या जाणाऱ्या या रागातील या अभंगरचनेनं आमच्या आषाढी एकादशीच्या अभंगवाणीची जणू पहाटच झाली होती.

सालगवराळीची कथा इथेच संपत नाही. या रागाचा बुवावर खूप प्रभाव होता. डॉ. गंगुबाई हनगल यांच्या आदेशानुसार कर्नाटकातल्या एका खेडय़ात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेला बुवा ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकासाठी मुंबईला आला. मात्र, त्या नाटकात काही कारणास्तव बुवा कधीच काम करू शकला नाही. पण त्या नाटकाच्या निमित्तानं त्याची अभिषेकी बुवांकडे गाण्याची तालीम सुरू झाली. त्या नाटकातील ‘घेई छंद मकरंद’ हे नाटय़पद याच सालगवराळी रागात बांधलेलं आहे. हे नाटय़पदही अभिषेकी बुवांनी शिवानंदकडून बसवून घेतलं होतं. त्यामुळेच या रागाशी बुवाचा एक भावनिक अनुबंध जडला होता. साहजिकच तो भाव, ती आर्तता, ती गोडी घेत घेतच ‘देवदयानिधी’ हा मैफिलीतला पहिला अभंग त्याने रंगवला. साथसंगतीला असलेल्या सर्वच कलाकारांच्या सुरेल साथीत बुवाची भावात्मकता अधिकच खुलून आली. मैफिलीचं शीर्षक असलेला हा अभंग गाताना बुवाची भावसमाधी लागलेली होती.

त्यानंतरचा ‘पंढरीचा वास’ हा संत नामदेव महाराजांचा अभंग राग ‘यमन’वर आधारित होता. संध्याकाळी सुरू असलेल्या या मैफिलीत तो अधिकच खुलला. ‘भक्तिप्रेम सुख’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगात विविध रागांच्या छटांचं मिश्रण होतं, ते बुवानं आलापीतून आणि शब्दांतून सुंदर सादर केलं. राग ‘मल्हार’ आणि राग ‘सारंग’चं अंगही त्यात होतं. वर्षांऋतू असल्यानं ते राग-आलाप समर्पक वाटत होते. ‘भीमपलास’ हा बुवाचा आवडता राग असल्यानं त्या रागात बांधलेल्या ज्ञानेश्वरांच्या ‘याती कुळ माझे’ या विराणीनं त्यानं सगळ्यांना व्याकूळ केलं. ‘पाहू द्या रे मज’ या ‘किरवाणी’ रागावर आधारित संत नामदेवांच्या अभंगातील आर्तता बुवांनी तरलपणे गाऊन रसिकांना मंत्रमुग्ध केलं.

संत तुकाराम महाराजांनी ‘पापाची वासना, नको दावू डोळा’ या अभंगातून पंचेंद्रियांना दिलेला बोध बुवानं शुद्ध स्वराच्या ‘बिहाग’ रागामधून रसिकांच्या मनात थेट उतरवला. ‘संतांच्या चरणा द्यावे आलिंगन’मधून ‘मधुकंस’चे सूर आळवताना तीन अंतऱ्यांमध्ये ‘चंद्रकंस’, ‘पटदीप’ आणि ‘किरवाणी’ असा अनोखा स्वरप्रवास बुवानं केला होता! सारे अभंग प्रभाकर पंडित यांनी शास्त्रीय रागांवर आधारित बांधले होते. त्यांच्या रचना प्रासादिक होत्या. त्यामुळे गायकी अंगानं ते सर्व अभंग बुवानं मैफिलीत खुलवून गायले.

मैफिल आता भैरवीच्या टप्प्यावर आली होती. संत तुकारामांच्या ‘विठ्ठल विठ्ठल येणे छंदे’ या भैरवीतून भक्तिरसाची प्रसन्न उधळण करत बुवानं अभंगगायन पूर्ण केलं आणि ‘पसायदाना’नं समारोप केला.

विविध प्रहरांत गायल्या जाणाऱ्या रागरागिण्यांमध्ये या रचना बांधलेल्या असल्यामुळे रागस्वरांची विविधता यांत आली होती. बुवाचा गायनस्वर तेव्हा पांढरी तीन होता. उंच स्वरात, तीन सप्तकात फिरणारा त्याचा सुरेल, सहज, भावस्पर्शी गळा ही त्याला मिळालेली दैवी देणगी होती. त्या स्वरात एक निरागस प्रेम होतं- जे केवळ भक्तिसंगीतालाच नव्हे, तर कोणत्याही गायनप्रकाराला आवश्यक असतं. रागसंगीताची सूक्ष्म समज आणि भक्तिगायनात ती उतरवायची उमज असल्यानं त्याचं हे अभंगगायन प्रभावी झालं. सुरांची मधुरता, खटके, मुरक्या, बहलावे, मींड, सुरांचा दमसास, तार षड्जावरचा दीर्घ ठहराव या गुणांनी युक्त असलेली बुवाची गायकी अभंगांना अधिक सुंदर करून गेली.

संतसाहित्यावर त्याचं मनापासून प्रेम होतं. अभंग ही शब्दप्रधान, भावभक्तिप्रधान गायकी असल्यानं गायकानं शब्दांशी मैत्री करणं, त्यांच्याशी तद्रूप होणं आवश्यक असतं. बुवा अभंग गाताना पूर्ण तल्लीन झाला होता. शब्दांनी अभंग फुलवतानाच तो त्याला गायकीचा डौल देत होता. एक चांगला गायक आपल्या भक्तिसंगीताच्या मंदिराचा जणू भक्कम पाया भरत होता. ‘ओम नमोजी आद्य’ या ज्ञानदेवांच्या आद्य ओवीनं सुरू झालेल्या मैफिलीची सांगता बुवानं त्यांच्याच ‘पसायदान’नं केली. एक प्रकारे आमचा हा भक्तिसंगीताचा यज्ञ अथवा प्रदक्षिणाच पूर्ण झाली.

या मैफिलीच्या यशात भर घातली ती मैफिलीचे निरूपक कवी शंकर वैद्य यांनी. ते निरूपक म्हणून लाभले हे एक मोठं भाग्यच. संत, संतांचे विचार आणि संतांनी केलेलं प्रबोधन याविषयी वैद्य भरभरून बोलले. नव्हे, त्यांनी रसिकांसमोर संतयुगच उभं केलं.

बुवाच्या आल्बमचं प्रकाशन सद्गुरू वामनराव पै यांनी केलं. सोलो आल्बम आणि ही प्रत्यक्ष मैफिल यातून एक नव्या पिढीचा अभंग गायक रसिकांसमोर आला होता.

प्रतिष्ठाननं आषाढीच्या निमित्तानं ‘अभंगवाणी’चा पाया घातला ते वर्ष होतं १९९२. आषाढीच्या निमित्तानं भक्तिसंगीत मैफिल सादर करायला आम्ही सुरुवात केली, हे आज अभिमानानं सांगावंसं वाटतं.

विठ्ठल हे उभ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत. त्याच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या वारीला लाखो भाविक दरवर्षी जात असतात. परंतु इच्छा असूनही सगळ्यांना ते शक्य होतंच असं नाही. मराठी साहित्यातील संत वाङ्मयाचं जे अनमोल दालन आहे ते रसिकांपुढे यावं, संतांचे अभंग ऐकायला मिळावेत, अभंगांतून विठ्ठलाचं दर्शन व्हावं, या विचारानं आम्ही ‘अभंगवाणी’ सुरू केली. प्रत्येक ‘अभंगवाणी’नंतर आम्ही विठ्ठलात अधिकाधिक गुंतत गेलो आणि आधीची आषाढी एकादशी सरण्याआधीच पुढच्या एकादशीचे वेध लागू लागले.