लहान मुलांचा वावर असलेल्या, त्यांच्या आकलनानुसार बेतलेल्या मराठीतल्या मान्यवर लेखकांच्या गोष्टींचे संकलन म्हणजे ‘अचंब्याच्या गोष्टी’ हे पुस्तक. मॅजेस्टिक प्रकाशनाचे हे पुस्तक सुबोध जावडेकर व मधुकर धर्मापुरीकर यांनी संपादित केले आहे. त्यानिमित्ताने
मधुकर धर्मापुरीकर यांचे मनोगत..
नववी-दहावीत असताना, पुलंच्या ‘गोळाबेरीज’ मधल्या ‘माझी कु. संपादकीय कारकीर्द’ या प्रकरणामध्ये मी फार रमायचो. लहान मुलांनी संपादित केलेल्या शाळेच्या मासिकाचे हे प्रकरण. या प्रकरणात, ‘लाडकेश्वरची सहल’ हा इयत्ता सहावी ‘क’मधल्या विद्यार्थ्यांने लिहिलेला एक निबंध आहे. सहलीदरम्यान डबे खाण्याच्या प्रसंगाचे वर्णन करताना त्याने लिहिले- प्रत्येकाच्या डब्यातला पदार्थ घेता घेता टेंभूर्णीकर सरांची तर गंमतच उडाली. हे वाक्य मला त्या वेळी एवढं आवडलेलं होतं, की हसू आवरायचंच नाही. लहान पोरांमध्ये बसलेला तो मोठा शिक्षक- त्याची डब्याडब्यांतून फिरणारी हावरी नजर, पोरांना काही कळणार नाही अशा समजुतीने लाडीगोडी लावून डब्यातलं खाणारा तो धांदरट शिक्षक चक्क डोळ्यांसमोर दिसायचा अन् हसू आवरायचं नाही.
हे प्रकरण मला आजही आवडतं. तरूणपणात कथा लिहायला लागलो तेव्हा लक्षात आलं, की मोठय़ा माणसातली ही हावरी वृत्ती कथेत सांगायची असेल, तर ती कशी सांगितली पाहिजे.. सांगता येईल का नाही नेमकेपणाने.. नाही बुवा. कशीही सांगायला गेलं तरी ती पुलंसारखी मजा येणार नाही. सहावीच्या मुलाच्या दृष्टिकोनातून- त्याच्या आकलनातून ते वर्णन आल्याने उपरोध साधला गेला आहे. मिर्जा गालिबने एका शेरमध्ये, ‘ही दुनिया म्हणजे माझ्यासाठी एक पोरांचा खेळ आहे’ असं म्हटलं आहे; त्या नजरेनं पाहिलं तर मानवी स्वभावाचा तो कोपरा नजरेत येईल.
असंच, एकदा दिल्ली दूरदर्शनवर एका मोठय़ा लेखकाच्या कथेचं (का नाटकाचं?) रूपांतर पाहायला मिळालं. लहान मुलंमुली भातुकली खेळतात. त्यात बाहुला-बाहुलीचं लग्न असतं. पोरं त्या खेळण्यात एवढे तल्लीन होतात, की नकळत मोठय़ा माणसांचं अनुकरण, मोठय़ांचे हावभाव, मोठय़ांची भाषा आणि मोठय़ांचे सगळे रीतिरिवाज या पोरांच्या वर्तनातून उलगडत जातात. विलक्षण सुन्नपणा आपल्या मनात भरून राहतो. जीवन अनुभवांकडे पाहण्याचा आपला नेहमीचा- आपल्या वयाचा- दृष्टिकोन सोडून कुतूहलाची, निष्कर्षांची घाई न करणारी अशी भावना ठेवून आपण जेव्हा पाहू लागतो, त्या वेळी मानवी संवेदनांचं एक गूढ असे वातावरण मनात तयार होऊन जाते.
माणूस मोठा होत जातो तसतसे त्याच्या स्तरावरून सभोवतालाचे आकलन त्याला होत जाते, तो अर्थ लावीत जातो. पण त्या त्या टप्प्यावरून दिसणारे अनुभव हे त्या टप्प्यावरूनच दिसत असतात. ते समजून घेण्यासाठी त्याचा मोठेपणा कामाला येतोच असे नाही. परत मागे येऊन- त्या टप्प्यावर येऊन पाहायचा प्रयत्न केला, तर आकलन झालेल्या अनुभवांना वेगळेपणाने समजून घेता येते किंवा आपल्या समजूतींची पुनर्रचना करता येते. प्रश्न पडतात, प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता हे प्रश्न सुटणार नाहीत- आपल्याला न कळणारं असं काही आहे- असं असतं, हे जेव्हा कळतं तेव्हा आपली मर्यादाही लक्षात येते. आपण लहान होऊन जातो आणि मग या लहानपणाच्या वृत्तीतूनच पुन्हा आपण त्या प्रश्नांशी झोंबत राहतो. काही गवसतं, काही निसटतं. पण हा शोध खूप काही देऊनही जातो.
असा शोध घेणारी कथा ही कथेचं मूलभूत असं गोष्टीचं रूप घेतलेली असते. अशा कथेत कथालेखकाने त्या अनुभवाकडे वेगळ्या नजरेने पाहिलेले असते, वेगळ्या भूमिकेतून पाहिलेले असते. किशोरवयीन मानसिकतेच्या नजरेने मोठय़ा माणसांकडे पाहायचा जेव्हा एखाद्या कथेत प्रयत्न होतो, तेव्हा त्याच्या बारक्या नजरेतल्या आवाक्यात जे भरतं त्याचं मोल वेगळं असं जाणवतं.
लहान मुलाच्या अनुषंगाने म्हणजे, त्याच्या दृष्टीच्या टप्प्यात आलेल्या अनुभवांच्या कथा वाचताना असा अनुभव येतो. मोठय़ा माणसांचा वावर, मोठय़ा माणसांचे संवाद अन् त्या सगळ्याचा साक्षीदार हा मुलगा. त्याला त्याच्या आकलनानुसार वाटणारा आनंद, राग, लोभ, कुतूहल हे सगळं कथेतून अनुभवताना मोठय़ा माणसाच्या जीवनातली अपरिहार्यता, त्याची मर्यादा वेगळ्या स्तरावरून जाणवत राहते आणि पुन्हा गालिबची आठवण होते- ‘होता है शबो-रोज, तमाशा मेरे आगे..’
ज्येष्ठ कथालेखक यशवंत कर्णिक यांची ‘डोलकाठी’ आणि सत्यकथेचे लेखक विलास मोहिते यांची ‘धग’ या कथा सलग वाचण्यात आल्या आणि सुबोध जावडेकरांना ही कल्पना सुचली- लहान मुलांचा वावर असलेल्या, त्यांच्या आकलनानुसार बेतलेल्या अशा कथा वेगळ्या काढून पाहिल्या तर, एकत्रित केल्या तर.. जावडेकरांनी कल्पना मांडली आणि मलाही तशा चार कथा आठवल्या. त्यांनाही आठवल्या. पाहता पाहता कल्पना रुजली, मोड फुटले, रोपटंही वाढलं. अशा कथांचं संकलन करावं, संपादन करावं असं ठरलं आणि दोघंही कामाला लागलो. नांदेडचे प्रा. माधव कृष्ण हे मराठीचे विभाग प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेले माझे सुहृद. मराठी साहित्याचे प्राध्यापक-समीक्षक-अभ्यासक यांच्या चच्रेत सहसा संदर्भ येतात ते कवितांचे, कादंबऱ्यांचे. मात्र माधव कृष्ण सरांचे वैशिष्टय़ असे, की गप्पांच्या ओघात ते सहजच कथांचे संदर्भ देऊन जातात. मी अशा कथांची कल्पना त्यांच्याकडे मांडली आणि त्याच वेळेस त्यांनी दोन कथा मला सांगितल्या- चिं. त्र्यं. खानोलकर यांची ‘सनई’ आणि व्यंकटेश माडगूळकर यांची ‘बावा’ ही कथा. ‘सनई’ माझ्या माहितीतली होती (वाचलेली नव्हती), मात्र माडगूळकर एवढे आवडीचे कथालेखक, पण त्यांची कथा तर वाचण्यात- ऐकण्यातही नव्हती. माडगूळकरांच्या ‘रानमेवा’ संग्रहात ती कथा मिळाली. या कथेच्या प्रसिद्धीचा संदर्भ होता-विवेक, विजयादशमी १९५०! कथा या साहित्यप्रकाराचा माधव कृष्ण सरांचा असा जिव्हाळा पाहिला आणि माझा उत्साह दुप्पट झाला. सुबोध जावडेकरही उत्साहाने कामाला लागले.
लहान मुलांच्या दृष्टिकोनातली कथा म्हणजे नेमकी कशा प्रकारची कथा आपल्याला हवी आहे, नेमकं काय हवं आहे याबद्दल सुबोध आणि माझी भरपूर चर्चा झाली. अमुक कथा कशी आपल्या निकषात बसते, अमुक कशी बसत नाही अशी ती चर्चा. कधी फोनवर, कधी मेलने. एकदा हे प्रकरण समजावून घेताना मी सुबोधना एक टिपण पाठविलं; त्यात लिहिलं-
‘कथालेखक कथालेखनाच्या दोन पद्धतींतून अनुभव समजावून घेत असावा. एक म्हणजे, प्रथम पुरुषी निवेदनातल्या कथेतून आणि दुसरी म्हणजे, अनुभवाला आणखी दूरच्या अंतरावर ठेवून, म्हणजेच तिऱ्हाईत निवेदनातून कथा लिहून. मुलांच्या दृष्टिकोनातली कथा ही दुसऱ्या पद्धतीतली असते. मग या पद्धतीत अडचण अशी, की मुलाची समज तर कमी असते- अपुरी असते, ती मोठय़ांचे अनुभव समजावून कसे घेणार? त्याला कसे समजणार? त्याला कसे कळणार? या प्रश्नांतून मला त्याचं उत्तर असं दिसलं, की त्याच्या या न कळण्याच्या कक्षेत जेवढं येतं ते कसं असतं- छायाप्रकाशाचा उत्तम उपयोग करून छायाचित्रण केलेल्या एखाद्याचा चेहरा जसा, तसं. चेहऱ्यावर अंधार-उजेड असलेलं ते व्यक्तिमत्त्व. तसंच हवं. लहान मुलाच्या दृष्टिकोनाच्या कथेत त्याची जी समज असते, लहान्या मुलाची- जी मर्यादित असते हे मान्य, त्यापलीकडचं त्याला कळत नसतं, दिसत नसतं हेही मान्य; पण या दोहोंच्या संयोगामुळे आपल्या डोळ्यांसमोर जे उभं राहतं, ते मानवी व्यवहाराचं कळणारं- न कळणारं असं गूढ रूप आणि गोष्ट अशी असली तरच ती गुंतवून ठेवते. कथा ही ‘सुफळ संपूर्ण’ किंवा ‘..आणि ते सुखाने राहू लागले’ असं सांगणारी अशी थोडीच असते. आणखी उदाहरण द्यायचे असेल तर संप्रेरकाचं देता येईल. रासायनिक प्रक्रियेत संप्रेरक प्रत्यक्ष प्रक्रियेत भाग घेत नसलं तरी त्याशिवाय प्रक्रिया होऊ शकत नाही. मानवी भावभावनांची प्रक्रिया समजून घेण्यासाठी न समजणारे वय हिशोबात घेतले, तर तो शोध आपल्याला बरंच काही सांगून जातो. अचंब्याच्या गोष्टी अशाच.’
कथा या साहित्य प्रकाराची चर्चा करणाऱ्या ‘स्टडीज इन शॉर्ट स्टोरीज’ या पुस्तकातल्या काही पृष्ठांची छायांकित प्रत मी काढून ठेवलेली होती. त्याला आता पंधरा र्वष झालेली. अधूनमधून वाचायचो. काही समजायचं, काही समजायचं नाही. काही समजल्यासारखं वाटायचं. मात्र ते वाचलं की कथा या साहित्य प्रकाराबद्दल आवड कायम व्हायची, एवढं नक्की. हे संपादनाचं काम सुरू केलं आणि त्यातील एक प्रकरण- ‘पॉइंट ऑफ व्हय़ू’अधिक काळजीपूर्वक वाचलं. या प्रकरणातला एक भाग अचंब्याच्या गोष्टीसाठी महत्त्वाचा वाटला, तो माझ्या शब्दांत मांडतो-
‘कथा ही सांगितली (लिहिली) जाते, ती कुणाची कथा आहे, कशी कथा आहे या मुद्दय़ांइतकीच, किंबहुना अधिक महत्त्वाची बाब असते ती म्हणजे, ही कथा कोणत्या दृष्टििबदूतून (पॉइंट ऑफ व्हय़ू) सांगितलेली आहे. कथा ही प्रथमपुरुषी निवेदनातून सांगितली आहे का- असल्यास ते पात्र कथेतलं मुख्य पात्र आहे का दुय्यम, तिऱ्हाईताच्या (बाहय़) दृष्टीतून सांगितली आहे की कथेतल्या मुख्य पात्राच्या अनुषंगाने ती हकिकत सांगितली गेली आहे, की कोणत्याही पात्राच्या मनात न डोकावता (खुर्चीवर बसून नाटक पाहावे तशी) सांगितली आहे?’
हा दृष्टिबिंदू कथेचा नियोजित आशय परिणामकारक होण्यासाठी गरजेचा असतो. कथेच्या मुख्य पात्राला हिशोबात घेऊन त्याच्या मनातली आंदोलनं, चढ-उतार दाखवीत त्याच्यात होणारा बदल-अशा दृष्टिबिंदूतूनच सहसा बऱ्याच कथा लिहिल्या जातात; तथापि कथेतल्या दुय्यम पात्राच्या अनुषंगाने कथा जेव्हा सांगितली जाते (म्हणजेच परिघावरच्या दृष्टिबिंदूतून) तेव्हा अशा कथेतून उपरोधिक परिणाम तीव्र होतो.
‘अचंब्याच्या गोष्टी’तल्या कथा या दृष्टीने परिघावरच्या दृष्टिबिंदूच्या कथा म्हणता येतील. या कथांतल्या घटना-प्रसंग-पात्रं ही निराळी आहेत. ज्याच्या दृष्टिबिंदूतून या कथा सांगितल्या, ती पात्रं कथेतली दुय्यम पात्रं आहेत. ती प्रत्यक्षात त्या घटनांशी-प्रसंगाशी तेवढे संबंधित नाहीत, अंतरावर राहूनच त्यांनी ते सगळं पाहिलेलं आहे. शिवाय ही दुय्यम पात्रं लहान असल्याने त्यांची समज कमी आहे आणि त्यामुळेच कथालेखकाला कसलंही अधिकचं स्पष्टीकरण न देता, समर्थन न करता मोठय़ांची वागणूक मांडता येते आणि त्यामुळे कथेला एक स्वाभाविक असा गूढतेचा स्पर्श होतो. मोठय़ांच्या दृष्टिकोनातून कथा लिहिली तर हे साधता येत नाही.
सर्वसाधारणपणे कोणतीही कथा वाचताना आपल्याला एक मुद्दा नेहमीच जाणवत असतो- कथेतलं पात्र, त्याच्या नेहमीच्या प्रकृतीनुसार जेव्हा वागत-बोलत नाही, तेव्हा त्यावेळी ती कथा आपल्याला तिथे खटकून जाते. ग्रामीण कथेतल्या एखाद्या पात्राच्या तोंडी शहरी भाषा येणं, पात्र निरक्षर अन् त्याच्या तोंडी सुशिक्षिताची भाषा, साधा माणूस मात्र त्याच्या तोंडी तत्त्वाची भाषा, पात्रांच्या स्वभावाशी विसंगत असणाऱ्या उपमा-प्रतिमा.. अशा त्या खटकणाऱ्या बाबी. लेखकाच्या प्रकृतीबाहेरचं पात्र असेल तर ही जोखीम अधिक. शिवाय, लेखकाला स्वत:ला जे वाटतं, ते पात्राच्या वतीने कथेत येऊ लागलं, की कथा प्रचाराची, पूर्वग्रह बाळगलेली होते. परिणामी तिचं गोष्टीरूप हरवतं. किशोरवयीन मुलाची मानसिकता घेऊन कथा लिहिताना तर दुहेरी जोखीम- जे जाणवलेलं असतं, सांगायचं असतं ते आपलं वय विसरून सांगावं लागणं ही कसरत असते. (यातून ‘सनई’ कथेत लेखकाने छान मार्ग काढला आहे.) आणि अशी कथा जर मोठी असेल (‘सनई’, ‘भातुकली’, ‘गुप्तधन’) तर निवेदनाचा तोल सुटायची शक्यता अधिक. अशा कथांमध्ये वयाचं भान सुटून काही वेळा लेखक ‘मोठा’ होतोही, पण तिथेही गंमत होते- विशेषत: लंपनच्या बाबतीत. मुलांना एकाच वयाची फुटपट्टी लावता येईल, पण त्यांच्या संवेदना-भावनांचा जो कल्लोळ असतो, त्यासाठी त्याच्या वयाच्या मागेपुढे आपल्याला थोडा कोस ठेवावा लागतो. हे जसं खरं, तसं कथेत भाषेचा-संवेदनांचा तोल ढळत असतो हेही खरं.
असं असलं तरी, किशोरवयीन मानसिकता बाळगून कथा लिहिणं ही काय जादू असते, या दृष्टीनं या संग्रहातल्या कथा पाहाव्यात. कथेतला आशय गूढ चित्रपटातल्या रहस्यासारखा प्रत्येक कथेत वावरला आहे. धूसर झालेला आहे. त्यामुळे या कथा खूप काही सांगणाऱ्या-सुचविणाऱ्या अशा झालेल्या आहेत.
मधुकर धर्मापुरीकर 

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग
loksatta kutuhal artificial intelligence introduction of computer vision
कुतूहल : संगणकीय दृष्टी म्हणजे काय?