नीलिमा बोरवणकर

वाचकांना कथा वाचायला आवडते. समीक्षक भले कथेला कादंबरीच्या नंतरचा- दुय्यम- दर्जा देवोत! कथेत कथाबीज महत्त्वाचं असतंच, पण त्याबरोबर त्यातल्या व्यक्तिरेखा, कथांतर्गत काळ, परिसर, वातावरणनिर्मिती यांची मांडणीसुद्धा!

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र
Controversy on Ramayana
सीतेच्या हातून रावणाला गोमांस, हनुमानाचं विकृत चित्रण, विद्यापीठातील नाटकाचा वाद आहे काय?
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

अशाच काही वेगळय़ा, परकीय वातावरणात घडणाऱ्या कथा एकत्रितपणे ‘कथांतर’ या संग्रहात वाचायला मिळतात. सहसा फ्रेंच, जर्मन, रशियन अशा परकीय भाषांतून कथा इंग्रजीत आणि नंतर त्याचं मराठीत भाषांतर केलं जातं. या संग्रहाचं वैशिष्टय़ म्हणजे यातल्या कथा थेट त्या-त्या भाषेतून मराठीत भाषांतरित केलेल्या आहेत.

एका भाषेतील साहित्य दुसऱ्या भाषेत आल्यामुळे जगप्रसिद्ध साहित्याची ओळख आपल्याला होऊ शकते. जपानी, स्पॅनिश, पोलिश, जर्मन, फ्रेंच, रशियन अशा भाषांच्या साहित्यात नेमकं काय व्यक्त होतंय? तिथल्या लेखकांना काय आणि कसं अभिव्यक्त व्हावं वाटतं? त्यांच्या समाजात जी काही स्थित्यंतरं घडताहेत (पूर्व-पश्चिम जर्मनीला विलग करणारी भिंत पाडली जाणं असो वा रशियाचं विघटन) त्याचे पडसाद त्यांच्या लेखनात उतरताहेत का? त्यांचे लेखक कुठल्या प्रश्नांनी अस्वस्थ होतात? त्यांची सुखं ते कशात मोजतात, दु:खाची प्रतवारी करता येते का? माणूस इथूनतिथून काम-क्रोध-मद-मोह-माया-मत्सर या षड्रिपूंमध्येच अडकलेला असतो, असं म्हटलं जातं; तरीही मुळात जगणं वेगळं असेल तर त्या रिपूंचं माणसावर आदळणं निराळं असतं का? या आणि अशा असंख्य प्रश्नांना या कथांमधून उत्तरं सापडतात.

या संग्रहात गेल्या ५० वर्षांत प्रकाशित झालेल्या विविध परकीय भाषांमधल्या कथा निवडलेल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपीय कथांमध्ये प्रत्यक्ष युद्ध, त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या, सामाजिक-राजकीय परिस्थिती, युद्धकाळात घडलेल्या चुका आणि त्याचं परिमार्जन करण्याचा खटाटोप या विषयांवर विपुल लेखन प्रसिद्ध झालं. ते वेगवेगळय़ा माध्यमातून आपल्यापर्यंत याआधी पोचलं असल्यानं त्याची पुनरुक्ती या संग्रहात टाळली असल्याचं संपादकांनी मनोगतात स्पष्ट केलं आहे.

युद्धातून सावरल्यावर या देशांनी मोठी भरारी घेतली. राजकीय स्थिरतेसोबत आर्थिक सुबत्ता येऊ लागली. परंतु याच काळात माणसांनी आदर्शाचा ऱ्हास होताना पाहिलं. सामाजिक बांधिलकीच्या मूल्यांच्या घसरणीचा प्रामुख्यानं रशियातल्या नागरिकांना अनुभव येऊ लागला. त्यातच विस्कटत जाणारे नातेसंबंध, एकाकीपणा, भ्रष्टाचार, साम्यवादी आदर्शाच्या पराभवाचं ठळकपणे दिसणारं चित्र, स्त्रीप्रश्न, पर्यावरणाचा बिघडणारा तोल, बदलते लैंगिक दृष्टिकोन, जागतिकीकरणाचा वेढा या साऱ्याचे पडसाद साहित्यात उमटू लागले.

गेल्या पाच दशकांतल्या या परकीय कथांमुळे मराठी वाचकांना किमान काही देशांमधले लेखनप्रवाह कळायला मदत होईल.

या संग्रहात सहा भाषांतल्या एकूण २० कथा आहेत. पण जर्मन भाषा जर्मनीबरोबरच ऑस्ट्रिया आणि स्वित्र्झलडमध्येसुद्धा बोलली जाते, तसंच स्पॅनिश अर्जेटिना, मेक्सिको आणि इतर काही देशांत बोलली जात असल्यानं त्या-त्या देशांमध्ये वाचकांना डोकावून बघण्याची संधी या कथा देतात. संग्रहातल्या काही कथा तत्कालीन राजकीय- सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या, काही माणसाच्या दांभिकपणावर टीका करणाऱ्या, तर काही कथांमध्ये आदर्शाचं मोल नाहीसं होताना बघून आलेलं वैफल्य दिसतं.

‘उजवा हात’ या कथेत रशियन क्रांतीत सहभागी झालेला एक कार्यकर्ता अतिशय विकलांग अवस्थेत आणि दारिद्रय़ात रुग्णालयामध्ये भरती व्हायला आला आहे. पण तिथली व्यवस्था इतकी माणुसकीशून्य झालीय, की ती त्याची दखलही घेत नाही. त्यानं आयुष्य समर्पित केलं, पण आज त्याच्या वाटय़ाला उपेक्षा आली आहे. ही कथा फक्त रशियात नव्हे, तर जगात कुठेही घडू शकते अशी आहे.

‘डिसेंबरात दोघेजण’ या रशियन कथेत दोन तरुण माणसं नातं जुळताना-तुटताना नेमकं काय होतंय, हे न समजल्यानं भांबावून गेली आहेत. ‘चामखिळीबद्दलचं पत्र’ या जपानी कथेत आपल्या नाजूक भावविश्वाची जपणूक करणारी एक तरुणी नवीन नातं जुळवताना करायला लागलेल्या तडजोडीविषयी चामखिळीच्या रूपकातून बोलताना दिसते.

‘तुला नूडल्स हवेत?’ ही जर्मन कथा एकाकीपणाचा सुन्न करणारा अनुभव देते. आजारी नवऱ्याच्या सेवेनं नराश्यात गेलेल्या आणि त्यामुळे सतत सिगारेट ओढत राहणाऱ्या एका स्त्रीची ही कहाणी. तिच्या नवऱ्याचा मृत्यू झालाय, ही बातमी ऐकून तिची बहीण तिच्याकडे यायला निघालीय. ती पोचेपर्यंत नवऱ्याच्या शवासोबत ही एकटीच घरात. नेमका त्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी आलेला कामगार घरात येतो. काम करताना होणाऱ्या बोलण्यातून त्याला कळतं, की घरात हिच्या नवऱ्याचं प्रेत पडलंय. तो तिचा एकाकीपणा समजून घेऊन तिला विचारतो, ‘तुला भूक लागली असेल गं. मी तुला काहीतरी बनवून देतो, ते खाऊन घे. उभं राहायचंय नं? तुला नूडल्स हवेत?’ अक्षरश: सुन्न व्हायला होतं ही कथा वाचून.

पूर्वी आपल्याला वाटायचं, हे असलं एकाकीपण फक्त परदेशात असतं; पण आता आपल्या समाजातही ‘बाहेर वास आला म्हणून शेजाऱ्यांनी पोलिसात कळवल्यामुळे दार फोडलं असता आत वृद्धांची शवं सापडल्याच्या’ बातम्या आपण वाचतो. भाषांतरित साहित्य वाचताना नकळत त्याची तुलना आपण आपल्या साहित्याशी करत राहतो. त्यातलं साम्य आणि फरक शोधत राहतो. काही विचार, भावना वैश्विक असतात, तशाच त्या खूप वेगळय़ाही असतात. साहित्य हे समाजाचा आरसा असतं, हे अशा घटनांमधून लख्खपणे लक्षात येतं.

भ्रष्ट अथवा ढासळत चाललेल्या राजकीय परिस्थितीचे नागरिकांना अपरिहार्यपणे जे चटके बसतात ते दाखवणाऱ्या काही कथा आहेत. एका मेक्सिकन लेखकाच्या ‘स्विचमॅन’ या शीर्षकाच्या कथेची जातकुळी वेगळीच आहे. रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतुकीची, म्हणजे मोठा आवाका असलेली व्यवस्था लेखक उपहासात्मक पद्धतीनं, उपरोधानं उघडी पाडतो. व्यवस्थेची वाट लावणाऱ्या माणसांची तो खिल्ली उडवतो. कल्पना आणि वास्तव यांच्या सीमारेषेवर कथावस्तूशी खेळ करत तो कथेत रंगत आणतो.

संग्रहातल्या सर्व वीस कथांविषयी लिहिणं शक्य नाही. विविध मासिकांमधून आणि ‘केल्यानं भाषांतर’ या त्रमासिकातून वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या कथांचं संपादन सुनंदा महाजन आणि अनघा भट यांनी केलेलं आहे.

कथांची मांडणी करताना ‘एका कालखंडाची एक एकसंध, अधिकाधिक पलूंना स्पर्श करणारी प्रतिमा या कथांद्वारे वाचकापुढे उभी राहील असा प्रयत्न’ केल्याचं, तसंच ‘लोकप्रिय, अनवट, अभिजात असे सर्व प्रकारचे लेखक कथांची निवड करताना विचारात घेतलेले आहेत’ असं संपादकद्वयींनी त्यांच्या मनोगतात सांगितले आहे.

परकीय व अनोळखी भाषिक पर्यावरणातील आणि विविध देशांतील या कथा मानवी आयुष्यातील चढ-उतारांचे, सुख-दु:खाच्या आवर्तनाचे, तसंच आजूबाजूच्या बदलांना तोंड देताना होणाऱ्या मनोवस्थांचे चित्रण करताना दिसतात. म्हणूनच मराठी वाचकांनाही त्या परक्या, तरी ‘आपल्या’ वाटतील. त्यात मांडलेल्या विषयांना, शैलीला वाचक नक्की चांगला प्रतिसाद देतील.

गेल्या काही वर्षांत मराठीत परदेशी भाषांमधलं अभिजात साहित्य मोठय़ा प्रमाणात आलेलं आहे. वाचकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाचनालयांत अनुवादित पुस्तकांना कायम चांगली मागणी असल्याचं मत मध्यंतरी एका चर्चासत्रात ऐकायला मिळालं होतं. एक अपेक्षा अशी की, जसं परकीय भाषांतल्या लेखनाला मराठीत आणण्याचं काम मोठय़ा प्रमाणावर केलं जातंय, तसंच मराठीतीलही उत्तम लेखनाचे अनुवाद परकीय भाषांत केले जावेत. तिथल्या वाचकांना मराठीतल्या दर्जेदार साहित्याचा परिचय करून द्यावा आणि मराठी लेखकांनासुद्धा अटकेपार लेखन जाऊ द्यायची संधी मिळवून द्यावी.

‘कथांतर : समकालीन जागतिक कथा’

संपादन- सुनंदा महाजन / अनघा भट,

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि

संस्कृती मंडळ,

मूल्य- १५९ रुपये.