26 May 2020

News Flash

भय अन् तणावग्रस्त काश्मिरी पत्रकारिता!

असे म्हणतात की, ‘ट्रॅक टू डिप्लोमसी’मध्ये त्यांचा सहभाग असायचा.   

|| मिथिला बिनीवाले, नितीन ब्राम्हे

‘रायझिंग काश्मीर’चे संस्थापक-संपादक शुजात बुखारी यांची गेल्या आठवडय़ात श्रीनगर येथे प्रेस एन्क्लेव्हमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. प्रेस एन्क्लेव्ह लाल चौकाला लागूनच आहे. शुजात ज्येष्ठ पत्रकार होते. त्यांनी १५ वर्षे ‘द हिंदू’चे ब्युरो चीफ म्हणून श्रीनगरमध्ये काम केले होते. ते लेखकही होते. काश्मिरी आणि उर्दूमधून ते लिहायचे. काश्मीरमधील ‘आदबी मर्काझ कामराझ’ या जुन्या साहित्य-कलाविषयक संस्थेचे ते अध्यक्ष होते. भारत आणि पाकिस्तानदरम्यान चर्चा सुरू राहावी, या मताचे ते होते. काश्मीर खोऱ्यामध्ये शांतता राहावी यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. असे म्हणतात की, ‘ट्रॅक टू डिप्लोमसी’मध्ये त्यांचा सहभाग असायचा.

पुलवामा जिल्ह्यतील तहाब या गावामध्ये आपल्या आईबरोबर राहणाऱ्या २३ वर्षांच्या कामरान या फोटो जर्नालिस्टला गेल्या वर्षी ४ सप्टेंबरला ‘एनआयए’ने अटक केली होती. त्याची आई रुबिना एका खासगी शाळेत लिपिक म्हणून काम करते. कामरान ‘ग्रेटर काश्मीर’ या मोठय़ा वृत्तपत्रासाठी काम करीत होता. गेल्या वर्षी दक्षिण काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना सुरू असताना त्यांचे वृत्तछायांकन करणाऱ्या कामरानला पोलिसांनी मारहाण केल्याची बातमी ‘ग्रेटर काश्मीर’च्या संकेतस्थळावर देण्यात आली होती. त्यानंतर ४ सप्टेंबरला स्थानिक पोलिसांनी कामरानला बोलावून घेतले आणि नंतर त्याला ‘एनआयए’ने अटक केल्याची बातमी आली. दगडफेक करणाऱ्या युवकांना संघटित करण्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर पत्रकारांनी श्रीनगरमध्ये निदर्शने केली. ‘कश्मीर एडिटर्स गिल्ड’ या मोठय़ा वृत्तपत्रांच्या संपादकांच्या संघटनेने, फोटो जर्नालिस्ट असोसिएशनने कामरानला सोडण्याची मागणी केली. नंतर प्रेस कौन्सिल ऑफ इंडियानेही ‘एनआयए’ला नोटीस बजावली आणि वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली. राष्ट्रीय म्हणवल्या जाणाऱ्या एका वृत्तपत्राने ‘एनआयए’ सूत्राच्या हवाल्याने बातमी छापली- की कामरान हा दगडफेकीच्या घटना संघटित करीत होता. ६ सप्टेंबरला एका मोठा टीआरपी असणाऱ्या वाहिनीने बातमी दिली, की कामरान हा दगडफेक करणाऱ्यांचा म्होरक्या होता आणि त्याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी- म्हणजे ११ मार्च २०१८ रोजी विशेष न्यायालयाने कामरानला जामीन दिला.

त्यापूर्वी २०१६ मध्ये ४ सप्टेंबरला जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर शहराच्या जुन्या भागात उसळलेल्या दंगलीचे वृत्तछायांकन करताना पोलिसांच्या ‘पॅलेट गन’मुळे फोटो जर्नालिस्ट झुहेब मकबूल हमझा आणि मुझ्झमील रशीद हे जखमी झाले होते. श्रीनगरच्या जुन्या भागामध्ये काही तरुण सुरक्षा दलांवर दगडफेक करत होते. त्यांच्यावर राज्य पोलिसांनी ‘पॅलेट गन’चा वापर केला. त्यात झुहेब आणि त्याचा साथीदार रशीद गंभीर जखमी झाले. त्यात झुहेबचा डावा डोळा निकामी झाला आहे. श्रीनगरमध्ये पत्रकारांच्या बाबतीत अशा घटना सतत घडत असतात. काही महिन्यांपूर्वी आम्ही श्रीनगरमध्ये अनेक पत्रकारांच्या गाठीभेटी घेतल्या आणि काश्मीरमध्ये पत्रकारांसाठी वातावरण कसे आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

श्रीनगरमधला लाल चौक प्रसिद्ध आहे. बऱ्याचदा काश्मीरमध्ये घडणाऱ्या घटनांच्या प्रतिक्रिया या चौकात उमटताना दिसतात. या चौकाला लागूनच प्रेस एन्क्लेव्हची गल्ली आहे. या प्रेस गल्लीमध्ये काश्मीरच्या बहुतेक सगळ्या वृत्तपत्रांची कार्यालये आहेत. एका सलग इमारतीमध्ये पुढच्या रस्त्याकडील भागामध्ये खाली विविध प्रकारची दुकाने आणि मागच्या बाजूने वृत्तपत्रांची कार्यालये आहेत.

या गल्लीमध्ये ‘सीएनएस मीडिया’, ‘करंट न्यूज’, ‘कश्मीर मॉनिटर’, ‘कश्मीर हेडलाइन’ अशा वृत्तपत्रांच्या नावाच्या पाटय़ा लावलेल्या आहेत. एक पाटी आहे- ‘जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर मीडिया असोसिएशन’ या छोटय़ा वृत्तपत्रांच्या संपादकांच्या संघटनेची. तिथे काही पोस्टर्स आमचे लक्ष वेधून घेत होती : ‘कामरान युसुफ हा पत्रकार आहे, दगडफेक्या नाही’, ‘कामरानला मुक्त करा’, ‘एनआयएकडून सच्च्या पत्रकारितेची छळवणूक सुरू आहे.’ आणि पोस्टरवर दिसते- हातात कॅमेरा धरलेल्या आणि छातीवर ‘प्रेस’ लिहिलेल्या, जीन्स आणि जॅकेट घातलेल्या कामरान युसुफचे छायाचित्र!

या प्रेस एन्क्लेव्हमध्ये संध्याकाळी छायाचित्रे घेताना एका उंचपुऱ्या व्यक्तीने आमच्या जवळ येऊन चौकशी केली. आम्ही कोण आहोत, कुठून आलो आहोत, श्रीनगरमध्ये कुठे राहतो आहोत.. अशी एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. त्यावर आम्ही त्याला सरळच विचारले, ‘तू पोलीस आहेस का?’ त्याने आढेवेढे घेत ‘हो’ म्हटले. नंतर काही पत्रकार आल्याने आमची सुटका झाली.

समोरच्या कॅफेमध्ये बसल्यावर ‘कश्मीर मॉनिटर’चा तरुण पत्रकार मुदस्सर कल्लू म्हणाला की, ‘‘वृत्तपत्रांच्या कार्यालयाबाहेर पोलीस किंवा कोणत्या ना कोणत्या इंटेलिजन्स एजन्सीची माणसे सतत पाळत ठेवून असतात. वृत्तपत्रांना संरक्षण दिले जात असल्याचा भास निर्माण केला जातो.’’ तो सांगत होता, ‘‘इथे सतत कोणाच्या ना कोणाच्या दबावाखाली काम करावे लागते. कधी राज्य सरकारचा दबाव (इथे राज्य सरकारला काही अर्थ नाही. कारण सगळे काही केंद्र सरकारच चालवते.), कधी केंद्राचा दबाव, शिवाय पोलीस, एनआयए, आयबी अशा अनेक संस्थांचा दबाव, स्वतंत्रतावादी, हुरियत, विविध पक्ष अशा सगळ्यांच्या एकाच वेळी येणाऱ्या दबावामध्ये काम करावे लागते. कधी याचे म्हणणे छापले तर दुसरा रागावतो. असे नेहमीच चालते. शिवाय सीमेपलीकडून विविध प्रकारे येणारा दबाव असतोच. अशा परिस्थितीत वस्तुनिष्ठपणे काम कसे होणार? कोणाचीही बाजू न घेता काम करणे अवघड असते.’’

कामरानचा विषय निघाल्यावर मुदस्सर म्हणाला, ‘‘पॅलेट गन, दगडफेक असे विषय हाताळणे अवघड असते. तुम्हाला कोणतेही संरक्षण नसते. उलट, तुमच्यावरच काहीही बेतू शकते. आरोप ठेवला जाऊन अटक होऊ  शकते. चौकशीला सामोरे जावे लागू शकते.’’

वृत्तपत्रांची कार्यपद्धती, लेआऊट, काम करण्याचे तास अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. त्यासंदर्भात मुदस्सर म्हणाला, ‘‘इथे पत्रकारांना वेतन कमी आहे. हवामान आणि अस्वस्थ परिस्थिती यामुळे डेडलाइन कमी वेळेची असते. राष्ट्रीय वृत्तपत्रांशी स्पर्धा करू शकेल असा इथल्या वृत्तपत्रांचा लेआऊट नसतो. त्यामुळे वृत्तपत्रे दिसायलाही तितकी चांगली वाटत नाहीत.’’

८ जुलै २०१६ रोजी कोकरनाग येथे हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वाणी याला चकमकीमध्ये मारल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती चिघळली आणि ठिकठिकाणी सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू झाली. दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्याचा अनेक पत्रकारांनाही या ना त्या प्रकारे फटका बसला.

‘द काश्मीर सिनॅरिओ’ने एक बातमीपत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, ५ ऑगस्ट २०१६ रोजी कुपवाडा जिल्ह्यत जावीद मीर या पत्रकारावर पॅलेट गनचा मारा झाल्याचा आरोप आहे. त्यात त्याचा डावा डोळा निकामी झाला. ३ सप्टेंबर २०१६ रोजी बातमालूमध्ये फोटो जर्नालिस्टना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ‘एसएमएचएस’ रुग्णालयात जखमींचे फोटो काढताना नातेवाईक आणि पत्रकार-फोटोग्राफर यांच्यामध्ये हमरीतुमरी झाली होती.

काही मागच्या गोष्टीही अनेक पत्रकारांनी सांगितल्या. १९९० पासून इथे पत्रकारांवर हल्ले होत आहेत. नव्वदीचा काळ अतिशय कठीण होता. तेव्हा अनेक बाजूंनी हल्ले होत होते. दहशतवाद्यांनीही हल्ले केले. तेव्हा पत्रकार हबीब नकाश यांच्यावर हल्ला झाला होता. १९९५ मध्ये एका पार्सल बॉम्बच्या स्फोटात ते जखमी झाले होते आणि मुश्ताक अली यांचा मृत्यू झाला होता. २०१४ ते २०१७ पर्यंत पत्रकारांना आणि छायाचित्रकारांना पोलिसांनी मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

१६ जुलै २०१६ रोजी ‘ग्रेटर काश्मीर’, ‘रायझिंग काश्मीर’, ‘डेली काश्मीर इमेजेस’, ‘काश्मीर ऑब्झव्‍‌र्हर’ आणि ‘काश्मीर रीडर’ या वृत्तपत्रांचे प्रकाशन थांबवण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. सगळे साहित्य जप्त करण्यात आले होते. सहा दिवस प्रकाशन बंद होते. ३० ऑक्टोबरला ‘काश्मीर रीडर’चे प्रकाशन बंद करण्याचा आदेश देण्यात आला. चार महिने हे वृत्तपत्र बंद होते.

या पाश्र्वभूमीवर वरिष्ठ पत्रकार सईद नशीर अली गिलानी यांची भेट झाली. ते ‘काश्मीर मॉनिटर’बरोबरच ‘अल झजीरा’साठीही काम करतात. आम्ही कोण आहोत, सरकारी एजंट तर नाही ना, आमचा काय उद्देश आहे, हे जोखत अखेरीस ते बोलू लागले. म्हणाले, ‘तथाकथित राष्ट्रीय माध्यमे काश्मीरची प्रतिमा बिघडवत आहेत. सतत विपर्यस्त बातम्या दिल्या जातात आणि त्याचा दबाव इथे तयार होतो. राष्ट्रीय माध्यमांच्या प्रतिनिधींना वरिष्ठांचे नाव सांगून त्यांच्यावर जबाबदारी ढकलता येते. पण इथे आम्हाला स्थानिक पातळीवर ती सोय नाही. तुम्हाला सतत धमक्या मिळतात. पाकिस्तानातून  फोन येऊ  शकतात. त्यामुळे पत्रकार सतत घाबरलेले असतात. इथल्या सरकारला (राज्य सरकार) काहीच अधिकार नसल्याने त्यांच्याकडे दाद मागून उपयोग नाही आणि केंद्र सरकारला काही हा प्रश्न सोडवायचाच नाही. मग पत्रकारांनी जायचे कुठे? सगळेच प्रश्न अवघड झाले आहेत. अनेक संस्था, अनेक एजन्सीज असल्याने नेमके काय चालले आहे, हे समजणे अवघड होते. मुख्य म्हणजे त्याचा बातमीदारीवर परिणाम होतो.’’

पत्रकार भेटल्यावर राजकारणाचा विषय हमखास निघतो. यासीन मलिक, मिरवाईज, गिलानी, हुरियत, केंद्र सरकार, मध्यस्त, दरबार मूव्ह, पीडीपी, मेहबूबा मुफ्ती, अब्दुल्ला पिता-पुत्र अशा काश्मीरच्या सगळीकडे चर्चिल्या जाणाऱ्या विषयांचाही ऊहापोह झाला आणि वेगवेगळ्या थिअरिजवर चर्चा झाली. मात्र, अखेरीस ते म्हणाले की, ‘‘भारत सरकारने इथे विश्वास गमावला आहे.’’

अनंतनाग (स्थानिक लोक त्याला ‘इस्लामाबाद’ही म्हणतात.) या अतिशय संवेदनशील भागामधून जाताना ‘इंटरनेट कर्फ्यू’ हा शब्द वारंवार   कानावर पडत होता. त्याचा आम्हीही अनुभव घेतला. असा कर्फ्यू लागला की सगळे नेट बंद होते. समाजमाध्यमांचा वापर अशक्य होतो. पण केवळ इंटरनेटवरच अवलंबून असणाऱ्या ‘इंडियन न्यूज सव्‍‌र्हिस’ (आयएनएस)च्या इश्तियाक काझी या तरुण संपादकाशी त्यांच्या दलगेट भागातील कार्यालयात भेट झाली तेव्हा या नेट कर्फ्यूचे महत्त्व समजले. भारताच्या इतर भागांमध्ये इंटरनेटची चंगळ आहे. दर दोन मिनिटांनी व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक बघितल्याशिवाय लोकांना चैन पडत नाही. पण इंटरनेट बंद असेल तर? काश्मीरमध्ये चकमकी, दंगल, दगडफेक झाली की पहिले इंटरनेट बंद केले जाते. मग पत्रकारांना माहिती मिळत नाही. बाहेर बातम्या पाठवता येत नाहीत. वृत्तसंस्थांच्या इंटरनेट आवृत्तीवर परिणाम होतो. अशा वेळी इंटरनेट किती महत्त्वाचे आहे याची प्रचीती येते.

आम्ही काझी यांना भेटलो तेव्हा ते चर्चा करण्यासाठी अतिशय उत्सुक दिसले. ते म्हणाले, ‘‘जेव्हा दगडफेक सुरू असते तेव्हा पोलीस पत्रकारांशी कसे वागतात, हे तुम्ही प्रत्यक्षच बघायला हवे. तुमच्याकडे प्रेसचे अधिकृत कार्ड असले तरी ते चालत नाही. तुम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न केला तर पोलीस तुम्हाला सरळ ठोकून काढतात. अचानक तुमच्यावरच पॅलेट गनचा मारा होऊ  शकतो. तुमचे डोळे जाऊ  शकतात. काहीही होऊ  शकते.’’

काझी श्रीनगरच्या डाऊन टाऊनमध्ये राहतात. तिथे जवळच प्रसिद्ध जामा मशीद आहे. याच ठिकाणी भारतविरोधी भावना तीव्र आहेत.  अख्ख्या श्रीनगरमध्ये तुम्ही कुठेही गेलात तरी लोक विचारतात, ‘कहाँ से आये हो? इंडिया से?’ या जामा मशिदीत दर शुक्रवारी जुम्म्याचा नमाज अदा करण्यात आला की तरुणांची सुरक्षा दलांवर दगडफेक सुरू होते आणि त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांचे प्रयत्न. मग अश्रुधूर, लाठीचार्ज.. सगळेच अस्ताव्यस्त होते. काझी सांगतात, ‘‘इथे भारतविरोधी भावना इतकी तीव्र आहे, की मी माझ्या पोर्टलचे नाव ‘इंडियन न्यूज सव्‍‌र्हिस’ आहे असे सांगितले तर माझ्यावरच दगडफेक होईल.’’

‘अशांत क्षेत्रामध्ये पत्रकारिता करणे म्हणजे काय, याचा अनुभव श्रीनगरमध्ये येतो,’ असे काझी यांचे म्हणणे आहे. धमकीचे फोन, दमदाटी, पोलिसांची अरेरावी असे सगळे प्रकार नित्य अनुभवायला मिळतात. जाहिरातींच्या बळावर राज्य शासन आणि केंद्र शासन वृत्तपत्रांना दाबण्याचा प्रयत्न करतात. हवे ते छापून आणण्यासाठी दबाव आणला जातो. ‘ग्रेटर कश्मीर’ या मोठय़ा वृत्तपत्राला गेली अनेक वर्षे सरकारी जाहिराती बंद करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

काझी यांचे पोर्टल हे केवळ इंटरनेट असेल तरच चालू शकते. जेव्हा नेट कर्फ्यू लागतो तेव्हा एक तर ते बंद असते किंवा त्यांना इंटरनेट मिळाले तरी ते वाचकांना उपलब्ध नसते. मग त्याचा उपयोग श्रीनगर सोडून केवळ इतर जगासाठीच! काझी यांच्या बोलण्यात अजून एक मुद्दा आला. तो म्हणजे इथे प्रत्येकाचा प्रत्येकावर संशय आहे. अशांत क्षेत्रामध्ये हा मुद्दा नेहमी दिसतोच. एका पत्रकाराला वाटते, की हा भारताच्या बाजूचा आहे. दुसऱ्याला वाटते, की हा तर पाकिस्तानचा एजंट आहे. पैसे घेतल्याचा संशय सतत घेतला जातो आणि त्यातून परस्पर विश्वासाचे वातावरण गढूळ होते. पत्रकारांची एकी दुभंगते. कामरान युसुफला अटक झाल्यावर हा आपल्याशी संबंधित नसल्याचे ‘ग्रेटर कश्मीर’ने जाहीर केले. अशाही घटना पत्रकारांना धक्का देतात.

‘कश्मीर टाइम्स’ या वृत्तपत्राच्या संपादिका अनुराधा भसीन म्हणाल्या की, ‘‘संपादक आणि मालकांवर येणारे दबाव वेगळ्या प्रकारचे आहेत. पण पत्रकारांवर येणारे दबाव मोठे असतात, कारण ते घटनास्थळावर असतात. त्यांनाच प्रथम व सतत अडचणींचा सामना करावा लागतो.’’

‘यंग जर्नालिस्ट असोसिएशन’ या तरुण पत्रकारांच्या संघटनेचा अध्यक्ष आणि राज्य सरकारच्या आदेशाने गेल्या वर्षी चार महिने बंद झालेल्या ‘कश्मीर रीडर’चा पत्रकार मोअज्जम म्हणाला, ‘‘घटना घडतात तेव्हा पत्रकार, छायाचित्रकार यांना घटनास्थळावर पोहोचणे आवश्यक असते. पण तिथे गेल्यावर सुरक्षा दलांचा सामना करावा लागतो. त्यांचीही एक बाजू आहे. त्यांना वाटते, की या बातम्या आल्याने परिस्थिती चिघळू शकते. त्यामुळे ते अटकाव करतात. त्यातून संघर्ष उद्भवतो. अगदी कर्फ्यू पास असूनसुद्धा पत्रकारांना नाइट कर्फ्यूचा सामना करावा लागतो. घरी जातानाही त्रास होतो.  काश्मीरमध्ये इतर उद्योगधंदे नसल्याने वृत्तपत्रांना सरकारी जाहिरातींवरच अवलंबून राहावे लागते आणि त्याचाच वृत्तपत्रांना दाबण्यासाठी हत्यार म्हणून वापर केला जातो. किंवा मग धमक्या मिळतात. नेट कर्फ्यू, एरिया कर्फ्यू असल्यावर घटनास्थळी जाता येत नाही. मग ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’वर अवलंबून राहावे लागते. तिथेही जायला त्रास दिला जातो. आणि या सगळ्यातही आमच्याकडून स्वतंत्र पत्रकारितेची अपेक्षा केली जाते.. जी अवघड आहे.’’

अशा परिस्थितीतही श्रीनगरमध्ये आज अनेक पत्रकार काम करताहेत. सतत भय, ताण आणि मृत्यूची भीती असे वातावरण असताना जीवावर उदार होऊन ते काम करतात, याचा प्रत्यय त्यांच्याशी बोलताना येतो. देशाच्या इतर भागांमध्ये पत्रकारिता करणाऱ्यांनी काश्मीरचे वार्ताकन करताना किमान तिथल्या परिस्थितीचे भान ठेवले तरी खूप फरक पडेल, ही तिथल्या पत्रकारांची अपेक्षा रास्तच आहे.

brahmenitin@gmail.com

(लेखकद्वय माध्यम विषयाचे अभ्यासक आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2018 4:13 am

Web Title: loksatta lokrang marathi articles 1
Next Stories
1 बेडकांचे डबके!
2 संपूर्ण क्रांतीचे प्रणेते
3 माणूस बोलू का लागला?
Just Now!
X