महाराष्ट्राचे विचारविश्व ज्यांच्या सशक्त लेखणीने समृद्ध झाले अशा अग्रणी विचारवंतांमध्ये प्रभाकर वैद्य यांची गणना होते. आधुनिक भारताच्या सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक घडामोडींचे साक्षेपी भाष्यकार म्हणून ते परिचित आहेत. त्यांचे लेखन आजही तितकेच समयोचित आणि ताजेतवाने वाटते- जसे ते त्यांच्या काळात होते. याची साक्ष लोकवाङ्मय गृहाच्या ‘महात्मा फुले आणि त्यांची परंपरा’ या ग्रंथात मिळते. हा ग्रंथ म्हणजे म. फुलेंचे जीवनचरित्र किंवा त्यांच्या कार्यकर्तृत्व व लेखनाचा धांडोळा नसून त्यात फुले परंपरेच्या संदर्भात एकंदरीतच महाराष्ट्राच्या वैचारिक इतिहासाची अतिशय उद्बोधक चिकित्सा वाचावयास मिळते. महाराष्ट्राचे सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक विश्व, मुक्तिगामी जनचळवळींचा अवकाश आणि त्यासंबंधीचे चर्चाविश्व फुले परंपरेद्वारा कसे प्रभावीत होत राहिले याची तर्कसंगत मीमांसा यात आढळते.

ग्रंथाच्या पूर्वार्धात फुल्यांची मूलभूत प्रेरणा आणि शिकवण नेमकी काय होती, ते लेखकाने मांडले आहे. ते म्हणतात, ‘फुले जन्मजात उच्च-नीचतेच्या व चातुर्वण्र्याच्या विरुद्ध होते. ते धर्म-संस्कृती व ज्ञानक्षेत्रातील मक्तेदारीचे समर्थक असलेल्या ब्राह्मणांच्या विरुद्ध होते. स्त्री-शूद्र-अतिशूद्रांवर लादण्यात आलेल्या गुलामगिरीच्या विरुद्ध त्यांनी र्सवकष युद्ध पुकारले होते. ते सुधारणावादी नव्हे, तर र्सवकष क्रांतीवादी होते. तसेच फुले मूलत: र्सवकष मानवतावादी होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा स्वजात्याभिमान, वर्णाभिमान व इतरांबद्दलचा तिरस्कार, जातिद्वेष यास फुल्यांच्या मूळ प्रेरणेत-शिकवणीत यित्कचितही अवसर नव्हता. त्यांची प्रेरणा व शिकवण समतेची, बंधुभावाची, मानवतेची, विश्वकुटुंबवादाची होती. त्यात वर्ण-जात-देश-धर्म-वंश यांसारख्या भेदांना, त्यांच्या वृथा अभिमानाला यित्कचितही वाव नव्हता. तसेच त्यांना जे मूलगामी परिवर्तन हवे होते ते प्रयत्नपूर्वक घडवून आणावे लागते यावर त्यांची निष्ठा होती. ते उच्चवर्णीयांच्या कृपेने, दयेने केव्हाही होणार नाही. म्हणून स्त्री-शूद्र-अतिशूद्रांना उद्देशून त्यांनी र्सवकष मुक्तीच्या संघर्षांचे आवाहन केले होते.’

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

ग्रंथाच्या उत्तरार्धात फुल्यांच्या मृत्योपरांत त्यांचा वारसा अनेक दिशांनी विस्तारत जाऊन तो कसा इथल्या शोषितांच्या चळवळींकरता प्रेरणास्रोत बनून राहिला याकडे लेखकाने लक्ष वेधले आहे. पुढील काळात फुले प्रेरणा कशा रीतीने नारायण मेघाजी लोखंडे, छ. शाहूमहाराज, जेधे-जवळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यातून प्रवाहित होत गेली; तिने स्त्रीमुक्ती आंदोलनास, दलित व पुरोगामी साहित्य चळवळीस, तसेच दलित पँथर, एक गाव एक पाणवठा, युवक क्रांती दल यांसारख्या पुरोगामी आंदोलनांस प्रेरित केले, याचा चिकित्सक लेखाजोखा लेखकाने मांडला आहे. फुल्यांच्या मूलभूत प्रेरणेचे जे विपर्यास बघावयास मिळतात त्याचीही सडेतोड चिकित्सा केली आहे.

पुढील काळात ब्राह्मणेतर- सत्यशोधक चळवळीने फुल्यांच्या मूळ प्रेरणांपासून फारकत घेतली. स्त्री-शूद्र-अतिशूद्रांशी इमानदारी न राखल्याने महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. सत्तेची चटक लागलेल्या बहुजन पुढाऱ्यांनी फुले प्रेरणेचा मूळ गाभा दुर्लक्षित ठेवून स्वार्थ साधला. त्यामुळे उच्चवर्णीय, उच्चवर्गीय सत्तागटांनाही आपल्या जात-वर्गीय स्वार्थाखातर फुल्यांच्या नावाचा, प्रतिष्ठेचा, परंपरेचा उपयोग सर्रासपणे कसा करता आला याविषयी त्यांनी केलेले भाष्य समकालीन वास्तव समजून घेताना साहाय्यक ठरते. सत्तांतराची प्रक्रिया सुरू होत असतानाच्या काळातच दलित-शोषित-श्रमिक वर्गाशी असलेले इमान सोडून प्रस्थापित बहुजनांनी फुले प्रेरणेच्या रूपात त्यांच्या हाती असलेले मुख्य शस्त्र म्यान केले. परिणामी भांडवलदार-जमीनदार-उच्चवर्णीय-सरंजामी शोषक समूहांनी सत्ता हडप केली आणि थोडय़ाच काळात ते बहुजन समाजाच्या मानगुटीवर भूतासारखे बसले. हे त्यांचे विवेचन आज आपल्या पुढय़ात आलेल्या विदारक वास्तवाची उकल करणारे आहे. स्वातंत्र्योत्तर कालखंडात स्वत:ला फुले अनुयायी म्हणवणाऱ्यांनी जो ब्राह्मणेतर जातीयवाद पुढे दामटला त्यातूनच या भ्रष्ट व उन्मत्त नवब्राह्मणी प्रवृत्ती ब्राह्मणेतर समूहांत जन्माला आल्या. त्याचे सर्वाधिक चटके श्रमिक-दलित-शोषित-ग्रामीण बहुजनांना आणि स्त्रियांनाच जास्त बसू लागले, हे त्यांचे निरीक्षण आहे.

फुले प्रेरणेचा वारसा खऱ्या अर्थाने आत्मसात करण्याचे श्रेय लेखकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले आहे. तथापि पुढे आंबेडकरी चळवळीचा जो अध:पात होत गेला त्याची कार्यकारण संगतीही त्यांनी लावली आहे. ते म्हणतात, ‘पुढे आंबेडकरी चळवळीनेही बाबासाहेबांची तेजस्वी शिकवण, स्वाभिमानी परंपरा, स्वतंत्र लढाऊ अस्तित्व, उज्ज्वल ध्येयवाद आणि नव्याने दिलेले रिपब्लिकन पक्षाचे हत्यार सर्वच गमावले. लक्षावधी निष्ठावंत लढाऊ अनुयायांना वाऱ्यावर सोडून लहान-मोठी सर्वच पुढारी मंडळी बाजारात बसली! याची लज्जास्पद परिणती म्हणजे बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षातील कार्यकत्रे चातुर्वण्र्यवादी जनसंघात किंवा िहदू फॅसिस्ट शिवसेनेतसुद्धा खुशाल दिसू लागले! आणि मतदार तर कोठेही कोणाच्याही दारात!’

अतिशय टोकदार राजकीय आशयसूत्र हे या ग्रंथाचे वैशिष्टय़ म्हटले पाहिजे. जात-वर्ग आणि पुरुषवर्चस्ववादी शक्तींकडून म. फुलेंची प्रेरणा-शिकवण गिळंकृत करण्याचे जे प्रयत्न होतायेत ते कसे फुले परंपरेचा विपर्यास करणारे आहेत त्याचे साधार विवेचन या ग्रंथात आहे. कम्युनिस्ट पक्षांनी फुले-आंबेडकरी परंपरेची कास धरण्याचे टाळले म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतळापर्यंत पोहचून खऱ्या शोषित वर्ग-जातीसमूहांत आपला जनाधार विस्तारण्यात त्यांना अपयश आले, हे त्यांचे विश्लेषण देशातील वर्गीय चळवळीकरिता मार्गदर्शक ठरणारे आहे. याच मुद्दय़ावरून कम्युनिस्ट पक्षाने कॉ. शरद पाटील यांना निष्कासित केले होते. तसेच त्यांनी प्रभाकर वैद्यांच्या मांडणीकडेही दुर्लक्षच केले. वर्गीय चळवळीला तिच्या दीर्घकालीन कुंठितावस्थेतून बाहेर पडायचे असेल तर अट एवढीच आहे, की किमान त्यांनी वैद्यांचे हे विश्लेषण पुरेशा गांभीर्याने समजून घ्यायला हवे. मार्क्‍सने द्वंद्वात्मक भौतिकवादाचे आणि वर्गलढय़ाचे जे मूलभूत सिद्धांत सांगितलेत ते प्रत्येक देशाच्या स्थळ-काल-परिस्थितीच्या संदर्भात शोधून वर्गलढय़ाची विशिष्ट आणि विविध रूपे ओळखण्याची गरज असते आणि हीच विकासशील मार्क्‍सवादाची खरी कसोटी आहे. भारतातील कम्युनिस्ट चळवळीत अद्यापपावेतो या प्रश्नाचा पुरेसा विचार होऊ शकला नाही, ही वैद्य यांची टीका भारतातील कम्युनिस्ट चळवळीसाठी प्रेरक ठरो, ही अपेक्षा गरवाजवी ठरणार नाही.

प्रभाकर वैद्य हे स्वत: जुन्या पिढीतील कॉम्रेड होते. त्यांची वैचारिक बठक अशा साम्यवादी धुरीणांच्या तालमीत तयार झाली होती- जे राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वाखाली चाललेल्या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाविषयी आशावाद बाळगून होते. त्या सुमारास फुले-आंबेडकरी परंपरेने अभिजनकेंद्री राष्ट्रकल्पनेचा धिक्कार करतानाच शोषणमुक्त, समताधिष्ठित समाजनिर्मितीचा क्रांतदर्शी ध्येयवाद बाळगणाऱ्या वर्ग-जात-स्त्रीदास्यांतक राष्ट्रकल्पनेचा पुरस्कार केला होता. ही राष्ट्रकल्पना वैश्विक मानवी नीतीला अनुसरणारी होती. संघ-भाजप पुरस्कृत पुनरुज्जीवनवादी राष्ट्रकल्पना उच्चवर्णीयांचे स्वप्नरंजन आहे. फुल्यांची राष्ट्रकल्पना हीच खऱ्या अर्थाने समस्त बहुजन-शोषित-श्रमिक-दलित-स्त्री-शूद्रांच्या मुक्तीची मागणी करणारी आहे, असा अन्वयार्थ लेखकाच्या मांडणीतून समोर येतो.

सत्तर-ऐंशीच्या दशकात सर्व स्तरांतून वाखाणला गेलेला हा ग्रंथ अलीकडच्या काळात अप्राप्य बनला होता. नुकतीच आलेली ही नवी आवृत्ती अभ्यासक व सामान्य वाचकांची प्रतीक्षा फळाला आणणारी आहे. या आवृत्तीस उमेश बगाडे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली असून ती ग्रंथाच्या पूर्वलौकिकास साजेशी आणि ग्रंथाची मौलिकता वाढविणारी आहे. वर्गीय चळवळीसमोरील ज्या सद्धांतिक आणि व्यावहारिक पेचांची चर्चा प्रभाकर वैद्य यांनी केली आहे ते पेच सोडविण्यासंदर्भात ही प्रस्तावना पथदर्शक ठरू शकते.

 ‘महात्मा फुले आणि त्यांची परंपरा : प्रेरणा-शिकवण-विपर्यास’- प्रभाकर वैद्य,

 लोकवाङ्मय गृह, 

पृष्ठे- ३८३, मूल्य- ३५० रुपये.