हायफाय शाळा-कॉलेजे.. तिथल्या पंचतारांकित सोयीसुविधा.. खर्चीक शैक्षणिक- बिगर शैक्षणिक उपक्रम.. विद्यार्थ्यांच्या लाखो रुपये खर्चाच्या विदेशी सहली.. आणि या सगळ्यासाठी पालकांचे खिसे खाली करणारी लाखोंची फी.. हा आजच्या शिक्षणाचा फंडा झाला आहे. पालकांना परवडो वा न परवडो; मुलांच्या तथाकथित उज्ज्वल भवितव्यासाठी ते या मृगजळामागे धावत सुटले आहेत.. 
त्याचा हा लालित्यमय धांडोळा..!

नवं शैक्षणिक वर्ष सुरू झालं आणि एकेका शाळा-कॉलेजमधील पंचतारांकित सोयीसुविधांची वर्णनं, त्यांच्या फीचे आकडे कानावर पडायला लागले की आमच्यासारख्यांचा जीव दडपतो. वाटतं, आपलं इथवर जगून झालं ते बरंच झालं; नाहीतर सध्याच्या व्यापारी विद्यार्थीपेठेत आपल्या पोरांसाठी कोणतं शिक्षण कोणत्या किमतीला विकत घ्यावं, हे कळलंच नसतं आपल्याला. ‘बाबा रे ऽऽ तुझं पुढचं शिक्षण आम्हाला परवडत नाही,’ असं म्हणत कुठे सहावीत, नववीत, अर्धपदवीत पोरांना घरी बसवायची नामुष्की आली असती. या संकोचातून बिचकत बिचकत काही लोकांशी केलेल्या संवादाचे हे तुकडे सादर करीत आहे. यद् रोच्यते तद् ग्राह्य़म्.

एक संवाद.. आजीशी!

झाली का चारधाम यात्रा यंदा तरी?

– नाही ना! मुलगा म्हणाला, नातवाला मोठय़ा शाळेत टाकायचंय. तो खर्च कसा भागवू? दरवर्षी चढा दर लागतो.

फिया काय असतात सध्या?

– काही तरी लाख- दीड लाख असतात वाटतं.

संपूर्ण शिक्षणाच्या?

– नाही. एकेका इयत्तेच्या.

काय सांगताय? एवढय़ात  तुमची-आमची, घरातल्या तीन-चार भावंडांची ग्रॅज्युएशनपर्यंतची शिक्षणं झाली असती की!

– ते सोडा हो. पोळी-भाजीचा डबा घेऊन पळत पळत कोपऱ्यावरच्या शाळा-कॉलेजात जाण्याचं आता काय सांगायचं? तसलं स्वस्तातलं शिक्षण आता नकोय कोणालाच.

अच्छा..! म्हणजे शिक्षण जेवढं महाग, तेवढं चांगलं का?

– कोण जाणे? तुम्ही नस्ते प्रश्न विचारू नका बाई!

 

एक संवाद.. ममाशी!

अलीकडे बऱ्याच दिवसांत दिसली नाहीस गं?

– नवा जॉब धरलाय.. पिट्टय़ा पडतोय.. पण पर्याय नाही.

मुलांकडे बघण्यासाठी नोकरी सोडली होतीस ना मागे?

– हो. पण आता त्यांनाच शिकवण्यासाठी दुसरी धरावी लागलीये. एकाच्या पगारात दोघांची शिक्षणं शक्य नाहीत आता.

असं? मग एवढे डोईजड कोर्सेस आपण निवडू नयेत ना!

– तसं नसतं. कॉलनीतली सगळी मुलं जिथे जातात तिथेच आपल्यालाही पाठवावं लागतं. कीपिंग अप विथ जोन्सेस म्हणतात तसं.. इतपत इंग्रजी कळतं ना तुम्हाला?

इंग्रजी कळतं, पण तुम्हा पालकांची अगतिकता कळत नाही..

– आम्हाला आमच्या मुलांना ‘बेस्ट’ ते सगळं द्यायचंय. ओके?

‘बेस्ट’ म्हणजे?

– प्रत्येकाला स्वतंत्र बेंच. प्रत्येकाला वापरायला एकेक टॅब. ब्रेकफास्टला रोज वेगळं. लंचला फोर स्क्वेअर मील.

हं.. हं.. म्हणजे आमच्या वेळी चारीठाव गिळायला म्हणायचे तसं का?

– जाऊ दे. एक्सक्लुझिव्हिटी कशाशी खातात, हे तुम्हाला नाहीच कळणार.

शक्य आहे. पण एक सांगा. प्रत्येक गोष्ट माझी स्वत:ची, स्वतंत्र, एक्सक्ल्युझिव्ह म्हणता म्हणता कोणाशीही काहीही वाटून घेण्याचं शिक्षण हुकेल- असं नाही वाटत? वाटून घेणं म्हणजेच ‘शेअरिंग’ हा शिक्षणाचा भाग असावा की नसावा?

– कोण जाणे! तुम्ही नस्ते प्रश्न उपस्थित करू नका बाई.

 

एक संवाद.. पपाशी!

काय? आज निवांत?

– थकून बसलोय जरासा. मुलाला सोडून आलो आताच एअरपोर्टवर. निम्मी रात्र जागरण झालं.

अरे वा! कुठे दौरा?

– एज्युकेशन टूर आहे त्यांच्या कॉलेजची. ‘नासा’ला जात्येय.

बाप रेऽ..! ‘नासा’ला..? सहलीला?

– आमची इन्स्टिटय़ूट अशाच सहली नेते. सायन्सच्या मुलांना ‘नासा’ला. जर्नलिझमवाल्यांना ‘रॉयटर’च्या हेडऑफिसला. छोटय़ा वर्गाना ‘डिस्ने वर्ल्ड’ला.. काय आहे- शेवटी ही मंडळी कुठे ना कुठे परदेशातच सेटल होणार ना? म्हणून आपण त्यांना ते एक्स्पोजर द्यायला पाहिजे. राईट?

बऽऽऽ रं.. म्हणजे लॉर्ड मेकॉलेने ब्रिटिशांना इमानी कारकून बनवून देण्याचं शिक्षण योजलं म्हणतात, तसे आताचे आपले गावठी लॉर्ड परदेशांसाठी झकास एन. आर. आय. बनवण्याचं शिक्षण तयार करताहेत की काय?

– जाऊ द्या.. तुम्ही भलतेच प्रश्न उपस्थित करता बुवा!

 

एक संवाद.. शिक्षकांशी ऊर्फ सरांशी!

काय हो सर? एवढे लाल कशाने झालात?

– मुलांना वीटभट्टीवर नेलं होतं. तिथे हातांना माती लागली वाटतं.

थेट वीटभट्टी?

– दरवेळी वेगवेगळ्या आयडियाज् असतात आमच्याकडे. कधी शेतावर.. कधी साखर कारखान्यात.. कधी तर दगडाच्या खाणीत वगैरेही..

मुलांना नेता? दगड फोडायला?

– छे छे! एवढी काय आमची मजाल? आताच्या पोरांना जरा नखाला धक्का लागून चालत नाही. ही वीटभट्टीतली मातीही मी हातात घेऊन विद्यार्थ्यांना दाखवली. पोरं कडक कपडय़ांत असतात आपली..हा ऽऽ..

म्हणजे प्रवासाची दगदग होईल, तेवढीच.

– नाव नको. ए. सी. व्होल्वोने ट्रॅव्हल. निदान थ्री- स्टारवाला नाश्ता, जेवण. मग कुठे साईट व्हिजिट. सगळे फटाफटा मोबाईलवर शेताचे, खाणीचे, विटांचे फोटो घेणार.. की लगेच घरी सहलीचे पुरावे द्यायला तयार!

पण ट्रीपा न्यायच्या त्या न्यायच्याच..

– मग? कार्यानुभव नको? आपले बांधव कसे राहतात, काय करून जगतात, हे कळायला नको मुलांना? दुर्बिणीतून, जवळून सग्गळं दाखवतो त्यांना. ट्रीपच्या फीमध्ये दुर्बिणीचा खर्चपण धरलेला असतो.

कमाल आहे तुमच्या दूरदृष्टीची!

– उपहासाने म्हणताय ना?

नाही, कुतूहलाने. आपल्याच माणसांना, त्यांच्या कामांना असं ‘झू’मधल्या प्राण्यासारखं बघायचं, हे विचित्र नाही वाटत? त्यांच्यात मिसळणं, त्यांच्या सुख-दु:खाशी एकरूप होणं, अशा खऱ्याखुऱ्या सामाजिकीकरणाची गरज नाही वाटत तुम्हाला चांगल्या शिक्षणात?

– तुम्ही उगाच बिनबुडाचे सवाल करू नका मॅडम. आधीच यंदा आमच्या तीस टक्के सीट्स भरल्या नाहीयेत. महिन्याचा पगार तरी पुरता पदरात पडतो की नाही, शंका आहे. त्यात तुम्ही कशाला भर घालताय आमच्या तापात?

 

एक संवाद.. संस्थाचालकांशी!

नमस्कार सर. आज पेपरला मोठी जाहिरात पाहिली तुमची.

– ती बी. बी. सी. ए.ची ना? त्याच गडबडीत आहे बघा. कालच त्या युनिव्हर्सिटीशी करार करून आलो. दोन्ही देशांच्या सरकारांचे कायदे पाळता पाळता दम निघाला नुसता. पण ठरवलंच होतं- यंदा बी. बी. सी. ए. सुरू करायचंच.

बी. बी. सी. ए. असलं काही ऐकलं नव्हतं पूर्वी.

– कसं ऐकणार? इंडियात पहिल्यांदा आपणच देतोय ही डिग्री. पायोनियर.. अ‍ॅज ऑल्वेज.

ते ठीक आहे. पण शिकवणार काय यात?

– बॅचलर ऑफ बेकरी अ‍ॅण्ड कन्फेक्शनरी आर्ट (बी. बी. सी. ए.)! पापुआ न्यू गिनियातल्या टॉप युनिव्हर्सिटीची डिग्री आहे. इथे बसून मिळणार.. फक्त आपल्याकडे हं.

तेही ठीक. पण लोक घेतील?

– दुसऱ्या वर्षी प्रतीक्षायादी लागेल स्टुडंट्सच्या नावांची. अनुभव आहे आपला. प्रचंड फी.. न ऐकलेली पदवी.. कोणतातरी परदेश.. सुपरहिट्! फॉम्र्युलाच आहे तसा. पाव भाजा, पण एअरकंडिशन्ड लॅबमध्ये.. आणि फॅन्सी नावाने.. असले प्रॉडक्ट पाहिजेत बघा आता कस्टमर लोकांना.

पाव हा प्रॉडक्ट? की ती डिग्री- हा?

– तुम्ही उगाच कीस पाडत बसू नका हो. एज्युकेशनबाबत शंभर कोटेशनं, अवतरणं आम्हाला पण येतात राव. आमच्या नव्या कॉम्प्लेक्सच्या भिंतीभिंतींवर पेन्टच केलीयेत ती. पण असलं पुस्तकी पांडित्य दुकान चालवणाऱ्याला परवडत नाही.

पण पालकांना परवडतं?

– त्यांना विचार करायला टायमच द्यायचं नाही हो. बम्बार्डिग करायचं. दरसाल नवा कोर्स. नव्या झ्याक जाहिराती. प्लेसमेंट प्रॉमिसेस. फीला इन्स्टॉलमेंट्स. शंभर स्किमा. सगळे झुकतात. झुकानेवाला व्हायला शिकणं हे खरं शिक्षण. बराबर?

 

एक संवाद.. विद्यार्थ्यांशी!

बाबा रे, हे एवढं सगळं तुझ्यावरून, तुझ्यासाठी चाललंय. तर एकदा सांग तरी तुला काय हवं?

– काय पण चालेल. फास्ट हवं. ईझी हवं. रेडी हवं. आपणापाशी टायम नाय.

फास्ट म्हणजे किती फास्ट?

– ते माहीत नाही. फास्टेस्ट जॉब लागला पाहिजे.

कबूल आहे. पण कसला जॉब? कष्टाचा? बुद्धीचा?

– ते माहिती नाही. हां.. आता जास्त घासायला आपल्याला टायम नाय. आणि बुद्धी म्हणलात तर ती खूप चालवतो कुठे कुठे.

चांगलं आहे. पण त्यातपण तुझी आवड, कल असेल ना?

– फास्टेट अ‍ॅब्रॉड जायला मिळायला पाहिजे, म्हणजे झालं!

असं का म्हणतोस? या देशात तू जन्मलास, वाढलास, इथेच शिकलास. तुझ्या आई-वडिलांनी खस्ता काढल्या त्यासाठी..

– ओ बाई, जास्त लांबण लावू नका. पहिले झूट सांगितलंय. आपल्याला घाई आहे. देशबीश तर मुळी सांगायचंच नाही. ए. सी. ऑफिसात खुर्चीवर बसायचा जॉब फास्टात द्या- की झालं! वाटल्यास असेल तिथून डॉलर, पौण्ड पाठवू आपण. काय?

पैसे पाठवले की झालं का तुझ्या मते?

– कशाला नाही ते प्रश्न विचारून पकवताय? प्रश्नच काय, आख्खा पेपर, आख्खी परीक्षापण ऑप्शनल टाकतो हं आपण!

 

आता सर्वानाच आपले प्रश्न बोअर.. मन:स्तापाचे, पकवणारे वगैरे वाटताहेत म्हटल्यावर स्वत:शी बोलणंच उरणार ना..  म्हणून हा-

एक संवाद.. स्वत:शी!

एका आयुष्यात केवढे वेगाने पुढे आलो आपण! विद्यादान : पवित्र ज्ञान, गुरुब्र्रह्मा, विद्येने येणारी नम्रता असं काहीबाही मानता मानता थेट झुकानेवालापर्यंत आलो तरी कधी आणि कसे आपण?

सालोसाल ही विद्यार्थीपेठ भरते आहे. भरून वाहते आहे. फुटते आहे. लुटते आहे. तरी कर्ते हात हे कुठेच थांबवू शकत नाहीत. हे कसं?

जाऊ दे. आपल्याला आता ना काही शिकायचंय, ना विकायचंय, ना शिकवायचंय, ना खरीदायचंय. ज्या दुकानी जायचंच नाही, त्याच्या बाजारूपणाचा मन:स्ताप तरी कशाला करून घ्या?

एक मात्र होतंय..

‘हा भरे बाजार येथे, बापहो, काहीही विका’

ही कवीची सुप्रसिद्ध ओळ शिक्षणाच्या दारातही ऐकू यावी, हे जरासं बोचतंय. इतकी बोच तुला रगड.. माझ्या मना.. बन दगड!

मंगला गोडबोले mangalagodbole@gmail.com