शिवाजीराजांनी सुरतेवर १६७० साली दुसरी स्वारी केली व प्रचंड संपत्ती लुटून आणली. ही संपत्ती रायगडावर न्यायची होती. परंतु वाटेत राजांना मुघल सरदारांशी लढाई करावी लागली व संपूर्ण खजिना रायगडावर नेणे धोक्याचे वाटले. म्हणून त्यांनी त्या ऐवजाचे दोन भाग केले. एक भाग निम्म्या सैन्याबरोबर कोकणातून रायगडाकडे पाठवला. दुसरा भाग गोंदाजी नारायण या सरदाराकडे देऊन तो नाशिक जिल्हय़ातील साल्हेरच्या मार्गाने रायगडावर पोचवावा अशी योजना केली. परंतु गोंदाजी नारायण आणि लुटीचा निम्मा भाग कोठे नाहीसे झाले ते कुणालाच कळले नाही. मात्र खजिना हरवल्याची हकिकत ज्यांना माहीत होती त्यांनी वेळोवेळी या संपत्तीचा शोध नाशिक जिल्हय़ाच्या उत्तरेकडे डोंगरातून घेण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर जवळजवळ साडेतीनशे वर्षांनी ३० नोव्हेंबरपासून ४ डिसेंबपर्यंत या पाच दिवसांत या हरवलेल्या खजिन्याच्या ‘शोधा’बाबत अतिशय निकराचे प्रयत्न दोन स्पर्धाळू गटांत झाले. त्या शोधाची गोष्ट मुरलीधर खैरनार यांनी या चारशे सत्त्याण्णव पानांच्या बडय़ा कादंबरीत सांगितली आहे.
गोंदाजी नारायण याला मुघलांनी कैद करून औरंगाबादला तुरुंगात ठेवले होते. त्याच्या कोठडीत रिचर्ड ग्रेंजर नावाचा ब्रिटिश मनुष्य होता. गोंदाजीने या रिचर्डला एक गुप्त संदेश चिंधीवर लिहून दिला होता व तो त्याने शिवाजीराजांना द्यावा असे सांगितले होते. गोंदाजी लढाईतील जखमांमुळे तुरुंगातच मेला. रिचर्ड ग्रेंजर मात्र सुटला. पण गोंदाजीचा निरोप तो शिवाजीराजांकडे पोचवू शकला नाही. निरोपाची चिंधी घेऊन तो इंग्लंडला परत गेला. त्याच्या वंशातील भारताच्या इतिहासात रस घेणारी मुलगी क्लारा ग्रेंजर हिच्या हाती ती चिंधी लागली.
नाशिकचा शौनक शिंगणे हा इतिहासाचा अभ्यासक आणि डोंगरदऱ्यांतून हिंडणारा कणखर शरीराचा तरुण यालाही खजिन्याच्या शोधाची आस लागली होती. त्याची मैत्रीण केतकी देशपांडे हिचा तर खजिन्याचा शोध हा ध्यासच होता. क्लारा आणि शौनक या दोघांची फेसबुकवरून मैत्री झाली होती. क्लाराला हा महत्त्वाचा दस्तऐवज सापडल्याबरोबर क्लारा आणि शौनक यांनी ठरवले, की क्लाराने हिंदुस्थानात यावे व त्या गुप्त संदेशाचा अभ्यास दोघांनी मिळून करावा.
क्लारा मुंबईला आल्यावर तिने एका हॉटेलात खोली घेतली. त्या हॉटेलात शौनक व केतकी क्लाराला भेटले आणि क्लाराने गोंदाजीच्या संदेशाची चिंधी दोघांसमोर उलगडून ठेवली. त्यांनी त्या मजकुराचे लागलीच फोटो काढले. चिंधीवरील मजकूर मोडी लिपीत होता. शौनकला मोडी लिपी वाचण्याची सवय असल्याने त्याने ताबडतोब त्या मजकुराची देवनागरीत आवृत्ती केली. इथून खजिन्याच्या शोधाला मोठी गती मिळाली.
क्लारा चिंधी घेऊन आपल्या खोलीत गेली. त्या खोलीत तिचा खून झाला व तिच्या सामानातील ती चिंधी खुनी माणसाने काढून घेतली आणि तो तिथून निघून गेला. हा खुनी मनुष्य आबाजी नावाच्या एका धनवान आणि कारस्थानी माणसाचा हस्तक होता. ती चिंधी अर्थातच आबाजींकडे पोचली. त्यांनीही त्या चिंधीवरील संदेशाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. शौनक आणि आबाजी दोघेही त्या मजकुरावरून एकाच निष्कर्षांवर पोचले.
लेखकाचे म्हणणे असे आहे, की छत्रपतींच्या काळापासून छत्रपतींच्या कार्याचे आकलन करणारे दोन गट किंवा परंपरा महाराष्ट्रात होत्या. त्यापैकी ‘उद्धारक’ गटाचा आताचा वारसदार म्हणजे आबाजी. दुसरा गट स्वत:ला ‘नागरिक’ गट म्हणवून घेत असे. शौनकला ज्यांनी इतिहासाचे धडे दिले ते प्रा. गायधनी व प्रा. अभोणकर हे ‘नागरिक’ परंपरेतले होते. ‘उद्धारक’ गटाला महाराजांची संपत्ती ताब्यात घेऊन ‘उद्धारक’ गटाच्या नीतीला धरून भारताची आर्थिक व सामाजिक शक्ती वाढवावयाची होती, तर शौनकची इच्छा ती संपत्ती शोधून काढून सरकारकडे देण्याची होती. केतकी देशपांडे ही खरे तर देशपांडे नव्हतीच. ती मूळची गुजराथी होती. शिवाजीराजांनी सुरत लुटताना केतकीच्या पूर्वजांचा सर्व पैसा व चीजवस्तू लुटली होती. त्यानंतर त्या सावकार घराण्यात दर पिढीला या लुटलेल्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी एक माणूस नेमण्यात येई. त्याला ‘खोजनार’ असे म्हणत. केतकी या पिढीतील ‘खोजनार’ होती.
आबाजींनी खजिन्याच्या शोधासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर चालवला होता. धातुशोधक यंत्र घेऊन त्यांचे हस्तक नाशिक जिल्हय़ातील डोंगरातून हिंडत होते. जलद हालचाली करण्यासाठी त्यांनी एक हेलिकॉप्टर बाळगले होते. खेरीज दोन ड्रोन विमाने त्यांच्या हाती होती. ड्रोनमध्ये धातुशोधक यंत्रे बसवून ते ड्रोन डोंगरावर फेऱ्या मारत असताना डोंगराच्या पोटात कुठे सोन्या-चांदीसारखे किंवा शिशालोखंडासारखे धातू असतील तर ताबडतोब त्यांची सूचना धातुशोधक यंत्राकडे यायची. परंतु आबाजींच्या या सर्व साधनांचा आतापर्यंत काहीच उपयोग झाला नव्हता. खजिना काही सापडत नव्हता.
एका बाजूला शौनक व केतकी आणि दुसऱ्या बाजूला आबाजी व त्यांचे मित्र यांना क्लाराने आणलेल्या गोंदाजीच्या चिंधीवरून खजिन्याचे वेगवेगळे, पण एकाच ठिकाणी पोचणारे माग मिळत गेले. ही सर्व घडामोड अतिशय गुंतागुंतीची असून, ती खैरनार यांनी चांगलीच रंगवली आहे. आबाजींनी क्लाराच्या खुनाचा आरोप शौनक व केतकी या जोडीवर टाकला आणि पोलिसांनी दोघांचा पाठलाग चालवला. पण पोलिसांना गुंगारा देऊन ते दोघेही नाशिक जिल्हय़ातील त्याच डोंगररांगेपर्यंत पोचले. पोलिसांचा हा पाठलाग मुंबई शहर, कसारा घाट, नाशिक शहर आणि हा डोंगरी भाग या सर्व ठिकाणी चाललाच होता. एकंदरीतच पाठलागाचे हे वर्णन जरा लांबले असून, बराच रसभंग करते. नाशिक शहरातील गल्ल्याबोळांची वर्णने, डोंगरी भागातील आदिवासींचा ‘भाया’ नावाचा उत्सव, डोंगरातील गुहांचे चक्रव्यूह व त्यातून घुसमटत पळणारे शौनक आणि केतकी ही सर्व हकिकत वाजवीपेक्षा जास्त लांबली आहे. वाचकाला हे सर्व काय चालले आहे याचा उलगडा होत नाही. अखेरीस आपल्या अपेक्षेप्रमाणेच शौनक व केतकी हे खजिन्यापाशी आपल्या स्पर्धकांच्या अगोदर पोचले. हजारो थैल्यांत भरलेला व आजच्या दराने २५ लाख कोटी रुपये किमतीचा प्रचंड धनसंग्रह त्यांना सापडला. एका थैलीत तर केतकीला तिचे कुलदैवत ‘शिवमंथक’ नावाचे रत्न मिळाले. तेवढय़ावरच ती संतुष्ट होते.
आम्ही मुद्दामच या दीर्घकथेला मिळणारी वाकणे व वळणे सांगितलेली नाहीत. तथापि, या चकव्यामुळे वाचकाची उत्कंठा वाढते असे वाटत नाही. अशाप्रकारच्या ‘थरार’कथांत मुद्दामच उत्कंठा वाढवण्यासाठी चकवे घालतात. परंतु मूळच्या कथेला इतकी चक्रावणारी गती असते, की या चकव्यांमुळे उत्कंठा वाढतच जाते आणि पुस्तक खाली ठेववत नाही. पुस्तकाच्या मागील वेष्टणावर ‘अनपुट डाऊनेबल’ असे कौतुक छापले आहे. परंतु ‘शोध’ वाचताना तशी आतुरता वाटत नाही.
पुस्तकाची भाषा हीदेखील चमत्कारिक आहे. कॉम्प्युटर, स्मार्टफोन्स, आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा सततचा उल्लेख येत असल्यामुळे इंग्रजी संज्ञा जशाच्या तशा मराठीत वापरल्या आहेत. यात फारसे खटकण्यासारखे नाही. परंतु हे शब्द मराठी वाक्यात वापरताना त्याला कोणते लिंग, वचन व विभक्ती वापरायची याचा ताळमेळ राहिला पाहिजे. उदा., ‘क्लाराने आपली हँडबॅग उघडून टॅब बाहेर काढला. ट्रेनमधल्या वायफायवरून तिने आपलं फेसबुक अकाऊंट अ‍ॅक्सेस केले. ईस्ट कोस्टच्या या ट्रेनमध्ये प्रत्येक पॅसेंजरला १५ मिनिटे इंटरनेट मोफत होतं.’ इथे ‘टॅब’ हा पुल्लिंगी का? ‘फेसबुक’ अकाऊंट किंवा ‘इंटरनेट’ हे शब्द नपुसकलिंगी का? हा प्रश्न केवळ या कादंबरीपुरता नाही. एकूणच या संज्ञा मराठीत आणताना त्यांची काय व्यवस्था लावायची हे ठरवावे लागेल. पण सध्या तरी ही कादंबरी वाचताना अशा चमत्कारिक वाक्यांमुळे अडखळायला होते आणि भाषेचा डौल एकसारखा रहात नाही.
अशा रहस्यमय, साहसी कथांमध्ये व्यक्तिचित्रणाला वाव नसतो व माणसे अशी का वागतात याची छाननी करण्यास वाचकाला सवड मिळत नाही. तथापि, इंग्रजी थरारकथांतून स्त्री पुरुषांच्या जवळ येण्याची मादक वर्णने काही संबंध नसताना घातलेली असतात. या कादंबरीतही खैरनारांनी तशी वर्णने थोडक्यात का होईना पेरली आहेतच. जर पुस्तकातील उत्कंठा कायम ठेवता आली असती तर या भाषेकडे किंवा या वर्णनांकडे इतके लक्षही गेले नसते.
‘शोध’- मुरलीधर खरनार,
राजहंस प्रकाशन,
पृष्ठे-४९७ , किंमत- ५०० रुपये.
श्री. मा. भावे

विडंबनगीते पाठवा..
होळीनिमित्ताने राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक जगतातील विसंगती आणि विरोधाभासांची खिल्ली उडविणारी विडंबनगीते ‘लोकरंग’ पुरवणीत प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तरी मूळ गाण्यांचा संदर्भ देऊन स्व-रचित विडंबनगीते पाठवावीत. विडंबनगीते १२ मार्चपर्यंत- ‘लोकरंग’ पुरवणी, लोकसत्ता संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल- १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई- ४००७१० येथे किंवा lokrang@expressindia.com या ई-मेलवर पाठवावीत.

Chhatrapati Shivaji Maharajs chiefs in the field in support of Udayanaraje bhosle
उदयनराजेंच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा सरदारांचे थेट वंशज मैदानात
Heartfelt sorrow by Chhatrapati Shahu Maharaj, Rajavardhan Kadambande , Rajavardhan Kadambande calls himself Rajarshi Shahu s heir, Chhatrapati Shahu Maharaj give reply to Rajavardhan Kadambande, Kolhapur news, marathi news, rajashri shahu maharaj news, lok sabha 2024,
राजवर्धन कदमबांडे राजर्षी शाहूंचे वारसदार म्हणवतात याचे मनस्वी दु:ख; छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिउत्तर
lakdi pool in Pune
VIDEO : पानिपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तातडीने ‘लकडी पूल’ का बांधून घेतला? वाचा रंजक गोष्ट
Geographical mind Geographical knowledge about the battlefield
भूगोलाचा इतिहास: भौगोलिक बुद्धिबळ