निळेशार झरे, घनदाट जंगले, बर्फाच्छादित डोंगर, हिरवी-पिवळी कुरणे आणि त्यावर पसरलेले बर्फाचे शुभ्र गोळे.. ‘दक्षिण गोलार्धातील स्वर्ग’ असा ज्या प्रदेशाचा उल्लेख केला जातो त्या न्यूझीलंडला निसर्गाने असे भरभरून दिले आहे. शिवाय निसर्गत: जे लाभलेय ते जतन करण्यासाठी जे जे म्हणून काही करायला पाहिजे, ते ते सर्व करताना इथली माणसे दिसतात. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून या देशाचा क्रमांक एकचा उद्योग म्हणून पर्यटनाने स्थान पटकावले आहे. एकेकाळी या देशात लोकर, दुग्धजन्य पदार्थ, मधनिर्मितीचा उद्योग अग्रक्रमी होता.. आताही आहे. या उद्योगांबरोबरच आता पर्यटन व्यवसायही इथे जोम धरू लागला आहे. युरोपातील अनेक देशांमधील राजकीय आणि आर्थिक परिस्थिती अलीकडे दोलायमान झालेली दिसते. फ्रान्स, ब्रिटनसारख्या देशांना अतिरेकी हल्ल्यांना सामोरे जावे लागले आहे. आणि नेमकी हीच गोष्ट न्यूझीलंडच्या पथ्यावर पडू लागली आहे. निसर्गरम्यतेच्या दृष्टीने युरोपातील कोणत्याही देशाच्या तोडीस तोड असा हा देश आहे. त्यामुळे जगभरातील पर्यटकांना न्यूझीलंड हा देश सुरक्षित आणि तितकाच आपलासा वाटू लागला आहे. दरवर्षी लाखोच्या संख्येने पर्यटक न्यूझीलंडमध्ये येऊ लागले आहेत. आणि तेथील सरकारही पर्यटकांसाठी आवश्यक अशा पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खोऱ्याने पैसा खर्च करत आहे. न्यूझीलंडमधील पर्यटनाची ही गंमत उमगल्याने अलीकडच्या काळात अमेरिका आणि चीन या महासत्ता म्हणविणाऱ्या देशांतील सर्वाधिक नागरिक पर्यटनासाठी येथे येऊ लागले आहेत. न्यूझीलंडच्या पर्यटन विभागानुसार, ४० लाख लोकसंख्या असलेल्या या देशात वर्षांला सात ते दहा लाख पर्यटक हजेरी लावतात. यात भारतीय पर्यटकांचा आकडा जेमतेम ५५ हजारांच्या आसपास आहे. न्यूझीलंड टुरिझमच्या दक्षिण आशियाई विभागाच्या प्रमुख कॅरोल ट्रेडिया यांच्या म्हणण्यानुसार, भारतीयांना न्यूझीलंडमध्ये येण्यासाठी थेट विमानाची सेवा उपलब्ध नसल्याचा हा परिणाम असावा. सद्य:स्थितीत भारतातून न्यूझीलंडला येण्यासाठी सिंगापूर वा मलेशियामार्गे विमानसेवा उपलब्ध आहे. भारतीय लोकही कमालीचे पर्यटनोत्सुक आहेत. त्यामुळे चीनच्या धर्तीवर भारतातील दिल्ली वा मुंबईहून येथे थेट विमानसेवा सुरू व्हावी असा न्यूझीलंड सरकारचा प्रयत्न आहे. तशी बोलणीही सुरू आहेत. थेट विमानसेवा नसली तरीही अलीकडे भारतीय पर्यटकांची संख्या वाढत असल्याचा कॅरोल यांचा दावा आहे. हे खरे असले तरी दक्षिण गोलार्धात अगदी टोकावर असलेली न्यूझीलंडची मनमोहक भूमी भारतीय पर्यटकांना  अजूनही तितकीशी उमगलेली नाही, हेही सत्य.

न्यूझीलंडच्या पर्यटन विभागाने भारतीय पत्रकारांसाठी नुकताच एक दौरा आयोजित केला होता. दक्षिण व उत्तर अशा दोन बेटांमध्ये विभागलेल्या या देशाच्या दक्षिण-पश्चिम किनारपट्टीचे अनोखे दर्शन यानिमित्ताने घडले. न्यूझीलंडच्या उत्तर व दक्षिण बेटांची स्वत:ची अशी ठळक वैशिष्टय़े आहेत. दक्षिण बेटावरील पश्चिम किनारपट्टी सध्या जगभरातील पर्यटकांना खुणावू लागली आहे. ख्राईस्टचर्च, ग्रेमाउथ, क्रोमवेल, क्वीन्स टाऊन, डनिडन ही वैशिष्टय़पूर्ण शहरे आणि त्यालगत वसलेल्या लहान-मोठय़ा खेडय़ांमधला प्रवास हा अवर्णनीय असाच अनुभव! एकाच वेळी बर्फाळलेले डोंगर, निळ्याशार नद्या, घनदाट हिरवीगार जंगले, ऐतिहासिक वास्तू आणि विस्तीर्ण पसरलेल्या तस्मान समुद्राच्या किनारी डॉल्फिन- पेंग्विनसारख्या दुर्लभ समुद्री प्राण्यांची संगत.. हे इथवरच थांबत नाही. जोडीला स्काय डायव्हिंग, बंजी जम्पिंग, रिव्हर राफ्टिंग, स्पीड बोटिंग असे साहसी गेम्सही! खिशात पैसा आणि अंगात रग असेल तर एकाच वेळी काही दिवसांच्या न्यूझीलंड दौऱ्यात हे सारे अनुभवता येऊ शकते.

nagpur wedding ceremony marathi news
आगळा वेगळा विवाह सोहळा! वर- वधूकडून एक हजारांवर औषधी वनस्पतींचे पाहुण्यांना वाटप
Rainy Weather, unseasonal rain, Delights Wildlife, Tadoba Andhari Tiger Project, Bears Spotted Carrying Cubs, Bears Spotted Carrying Cubs on Their Backs, marathi news, tadoba news, andhari news, viral video,
VIDEO: अस्वलाने पिल्लाला बसवले पाठीवर आणि घडवली जंगलाची सैर…हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा बघाच….
Pune records highest temperature in April in eleven years
पुण्यात अकरा वर्षांतील एप्रिलमधील सर्वाधिक तापमानाची नोंद; तापमानाचा आलेख कसा चढा राहिला?
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?

भारतातून सिंगापूर आणि तिथून पुढे थेट न्यूझीलंड या तब्बल १६ तासांच्या दीर्घ प्रवासाचा शीण ख्राईस्टचर्चच्या नीटनेटक्या, शिस्तबद्ध आणि तितक्याच मोकळ्या वातावरणात चुटकीसरशी दूर होतो. कँटबेरी मैदानाच्या पूर्वेकडे स्थित असलेल्या ख्राईस्टचर्चचा फेरफटका मारताना प्रशांत महासागराच्या विस्तृत क्षेत्रात, दक्षिणी आल्प्सच्या भव्यतेकडे पाहत हे शहर उभे असल्याचा सतत भास होत राहतो. अन्टाक्र्टिकाला जाण्याचे प्रवेशद्वार असलेले हे शहर ‘दक्षिण गेट’ म्हणून ओळखले जाते. येथील गोथिक शैलीतील वास्तू ब्रिटिशराजची आठवण करून देतात. १८१५ साली युरोपिअन येथे स्थित होण्यापूर्वी काही हजार वर्षे आधी नागी ताहू जमातीचे लोक येथे वास्तव्य करून होते, असे  स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या शहराला न्यूझीलंडचे मूळ रहिवासी असलेले माओरी आणि युरोपिअन यांचा संमिश्र इतिहास लाभला आहे. इंग्रजांनी आपल्या वसाहतीच्या काळात १८६३ साली या ठिकाणी २१ हेक्टरच्या क्षेत्रात विविध प्रकारच्या इंग्रजी ओक झाडांचे रोपण केले. दहा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या प्रजातींनी बहरलेले असे हे उद्यान येथील वन आणि पर्यावरण विभागाने उत्तम पद्धतीने जतन केले आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमध्ये हे उद्यान अत्यंत लोकप्रिय आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडे, चहूबाजूला फुलांच्या बागा आणि बगीच्यामधील मूळ झाडे या सर्वामुळे ही बाग अधिकच नितांतसुंदर भासते. विजेवर चालणाऱ्या गाडीतून पर्यटकांना या भागाची भ्रमंती करता येते.

२२ फेब्रुवारी २०११ रोजी ख्राईस्टचर्च येथे झालेल्या प्रलयंकारी भूकंपात १८५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यांच्या स्मरणार्थ येथील प्राधिकरणाने ‘कॅन्टलबेरी अर्थक्वेक नॅशनल मेमोरिअल’ उभारले आहे. शहरातून वाहणाऱ्या नदीच्या दुतर्फा बांधण्यात आलेल्या संगमरवरी भिंतीवर भूकंपात जीव गमावलेल्या १८५ जणांची नावे कोरण्यात आली आहेत. मेपलच्या झाडांनी वेढलेल्या या ठिकाणाला असंख्य पर्यटक भेट देतात आणि भूकंपात बळी गेलेल्यांना आदरांजली वाहतात. या भूकंपानंतर शहरातील एकही इमारत सात मजल्यांपेक्षा अधिक उंच नसावी असा कायदाच येथील प्राधिकरणाने केला आहे. न्यूझीलंडच्या प्रमुख शहरांपैकी एक असूनही ख्राईस्टचर्चचे हे गगनचुंबी नसणे वैशिष्टय़पूर्ण ठरते.

न्यूझीलंडच्या पश्चिम किनारपट्टीला लागून असलेल्या लहान-मोठय़ा शहरांना पर्यटकांनी कवेत घेऊनही न्यूझीलंडचे मूळचे ‘गाव’पण कायम असल्याचे आपणास सतत जाणवत राहते. अपवाद क्वीन्स टाऊनचा. पर्यटकांनी सतत गजबजलेले क्वीन्स टाऊन हे शहर खऱ्या अर्थाने ‘ग्लोबल’ होऊ पाहते आहे. जगातल्या लोकप्रिय पर्यटन- स्थळांपैकी एक असलेले हे शहर साहसी खेळांचे माहेरघर ठरले आहे. त्यामुळे ते गर्दीने कायम गजबजलेले असते. आगळेवेगळे खाद्यपदार्थ, उत्तमोत्तम वाइन, तळी, स्पाचे उपचार, बुटिक्स आणि गोल्फसारखे फुरसतीचे खेळ यांसाठी हे शहर प्रसिद्ध आहे. या प्रदेशाचा इतिहास हा सोन्याशी निगडित आहे. सोन्याच्या खाणीचा शोध लागल्यानंतर १८६३ साली येथे आलेल्या परदेशी लोकांनी, विशेषत: चिनी कामगारांनी पश्चिम किनारपट्टीलगतच्या अनेक गावांमध्ये तळ ठोकला. त्यापैकी अनेकांनी क्वीन्स टाऊनमध्ये वास्तव्य केले. निसर्गरम्य पर्वतशिखरे आणि नद्यांच्या अप्रतिम सौंदर्याने वेढलेल्या या प्रदेशाला ‘क्वीन्स टाऊन- राणीसाठी योग्य’ हे नाव देण्यात आले.

क्वीन्स टाऊनला येऊन जर तुम्ही फर्गबर्गर येथील बर्गर नाही खाल्ला तर तुमचे इथे येणे व्यर्थ ठरेल. मिरची, आले, कोथिंबीर आणि दह्य़ाचे मिश्रण असलेले चिकन, काकडीची कोशिंबीर, टॉमेटो, लाल कांदा, आंब्याची चटणी यांसारखे अनेक पदार्थ एकत्र करून हे चविष्ट बर्गर तयार केले जातात. येथे येणारा पर्यटक फर्गबर्गरमधील बर्गरवर ताव मारल्याशिवाय राहत नाही.

क्वीन्स टाऊनमधील गोंडोला, फ्लाइंग फॉक्स, पॅराग्लायडिंग, बंजी जम्पिंग, वॉकिंग आणि बायकिंग ट्रॅक्स या सगळ्यामुळे या शहराला पर्यटकांनी उत्तम पसंती दिली आहे. गोंडोलामध्ये बसून आकाशात झेप घेणे हा इथल्या प्रवासातला चित्तथरारक अनुभव. उंचावरून क्वीन्स टाऊन, वाकातीपु लेक, सिसील, वॉल्टर, कोरोनेट पिक्स या प्रदेशाचा मिळणारा ‘३६० डिग्री व्ह्य़ू’ अतिशय मनमोहक आहे.

नोमॅड सफारीत ‘रिव्हर क्रॉसिंग’ आणि ‘पॅनिंग फॉर गोल्ड’ आदी अनेक उपक्रम समाविष्ट आहेत. हॉलीवूडच्या ‘दि लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ या प्रसिद्ध सिनेमाचे चित्रीकरण झालेले अनेक भाग या सफारीत पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे मिनीज टिरीथ, दि मिस्टी माऊंटन, दि पिलर ऑफ दि किंग, दि फोर्ड ऑफ ब्रुनेन ही ठिकाणेही इथे पाहायला मिळतात.

क्वीन्स टाऊनच्या दिशेने येताना क्रॉमवेल या शहरालगत असलेले हायलँड हे जगविख्यात मोटर स्पोर्टस् पार्क कौटुंबिक सहलीसाठी उत्तम ठिकाण आहे. येथील रेसकोर्सवर फेरारी ते पोर्शापर्यंत सगळ्या गाडय़ा भरधाव वेगाने धावताना दिसतात आणि वाहनप्रेमी पर्यटकांना वेड लावतात. येथे करमणुकीसाठी उभारलेला बगीचा आणि पर्यटकांना अवाक् करणारी डायनासॉरची भव्य प्रतिकृती वेगवान गाडय़ांच्या सफारीसोबत एक आगळावेगळा अनुभव देते. या ठिकाणचे नवे कॅफे, त्यासोबत वेगवेगळ्या चवींचे खास ‘वाइन अ‍ॅडव्हेंचर’, फेरारीमधील सुसाट सफर इथल्या साहसी अनुभवास पूरक ठरते.

क्रॉमवेलपासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर असलेले आणि दुस्तान तलावाच्या किनाऱ्यावर वसलेले हेरिटेज बुटिक लेक रिसॉर्ट हे सर्व सुविधांनी युक्त अद्वितीय रिसॉर्ट आहे. इथली नौकाविहाराची मौज प्रत्यक्ष अनुभवावी अशीच. नौकाविहारासाठी तयार केलेल्या बंदरावर हे रिसॉर्ट बांधण्यात आले आहे.

क्रॉमवेलजवळील कॅमराओ नदीच्या किनाऱ्यावर वसलेले गोल्डफिल्ड मायनिंग केंद्र हे सोन्याच्या खाणीचे केंद्र येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला न्यूझीलंडमधील प्रसिद्ध अशा खाणींच्या प्रदेशात घेऊन जाते. आजूबाजूला असलेल्या खाणी, बोगदे, चिनी कामगारांची जुनी गावे, घरे आणि अनेक ऐतिहासिक गोष्टी इथे पाहायला मिळतात. दगड फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्टॅम्पर बॅटरी आणि कॅलिफोर्निया स्लुस गनच्या साहाय्याने हे ऐतिहासिक बांधकाम करण्यात आले आहे.

याच भागात असलेले एम. टी. डिफिकल्टी वायनरी विश्रांतिगृह हे २० वर्षांपूर्वी बांधण्यात आले आहे. हे ठिकाण मध्य ओटागो येथील बॅनेकबर्न येथे असून येथे अनेक जुने वाइन यार्ड पाहायला मिळतात. न्यूझीलंडची वाइन आणि तेथील ठरावीक ब्रॅण्ड जगप्रसिद्ध आहेत. पश्चिम किनारपट्टीची ही सफर येथील वाइन यार्डना भेट दिल्याशिवाय अधुरीच राहते.

क्रॉमवेल शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेले क्लॉइड हे जेमतेम ४०० लोकसंख्या असलेले सर्व सुविधांनी युक्त लहानसे खेडे वेस्ट कोस्टच्या प्रवासात अवर्णनीय असा आनंद देते. छोटय़ा, टुमदार घरांच्या हिरव्याकंच डोंगरांच्या पायथ्याशी वसलेल्या या खेडय़ात पायी भटकंती करण्याची मजा काही औरच! या ठिकाणी सायकलवेडय़ांसाठी खास साहसी मार्ग तयार करण्यात आले आहेत. असे मार्ग वेस्ट कोस्टच्या इतर भागांतही आढळतात. मात्र, निसर्गाने नटलेल्या क्लॉइडच्या सौंदर्याला हे सायकल मार्ग एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात. सेंट्रल ओटागोचा महत्त्वाचा भाग असलेल्या या ठिकाणी आपल्या मर्जीप्रमाणे सायकलविहार करण्याची संधी मिळते. दोन दिवसांपासून अगदी दहा दिवसांपर्यंत सायकलच्या प्रवासाची योजना येथे आखता येते.

१८६९ साली मर्चन्ट बेंजामिन नेयर यांनी ‘ऑलिवर्स’ या वास्तूची स्थापना केली. या महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूचा न्यूझीलँड हिस्टोरिक प्लेसेस ट्रस्टकडून जीर्णोद्धार करण्यात आला आहे. आता या वास्तूचे सर्व सुविधांनी युक्त अशा निवासी जागेत रूपांतर करण्यात आले आहे. येथे असलेली पाच टेबलांची खोली, रमणीय निसर्गाचे दर्शन घडविणारे अंगण या साऱ्यात ओटागो प्रदेशाचा अंश दिसतो. काही खोल्या जुन्या, पारंपरिक, तर काही आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आल्या आहेत. ११५ वर्षे जुन्या स्किस्टच्या भिंतीच्या खोलीमध्ये सकाळी गरमागरम नाश्ता दिला जातो.

एकूणच न्यूझीलंडची ही सफर पर्यटनाचा अविस्मरणीय.. अवर्णनीय आनंद देणारी ठरते, यात तीळमात्र शंका नाही.

जयेश सामंत

jayesh.samant@expressindia.com