रायगड आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमारेषेजवळ असणारे हर्णे हे बंदर तेथील सागरकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. याबरोबरच या बंदराचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे येथील कोळी समाजाचा मासेमारीचा व्यवसाय. गेल्या अनेक पिढय़ा समुद्रात जाऊन मासेमारी करणारा येथील कोळी समाज पिढय़ान्पिढय़ा समुद्राशी बांधील राहिलेला आहे. त्यांचा जीवनव्यवहार हा समुद्रावरच अवलंबून आहे. त्यात जितकी उत्कटता आहे, तितकेच जिवावर उदार होऊन केलेले धाडसही आहे. कोळी समाजाच्या जीवनाचे हे दर्शन ‘सुनिधी पब्लिशर्स’ने प्रकाशित केलेल्या व श्रीराम विष्णू साठय़े यांनी लिहिलेल्या ‘हर्णेचा सागरपुत्र – शिवा तांडेल’ या कांदबरीतून होते. कोळीगीते व लोकव्यवहार यांच्या प्रत्यक्ष अभ्यासातून रचलेल्या कथानकातून या समाजाच्या जीवनव्यवहाराची माहिती मिळते. याशिवाय तंत्रज्ञान, जागतिकीकरणामुळे भवतालात होत असलेल्या बदलांना हा समाज कसा प्रतिसाद देत आहे, याचेही चित्रण कादंबरीतून झाले आहे. सहसा शहरी तसेच ग्रामीण जाणिवेच्याही परिघात न येणारा हा आपल्याच भवतालातील नितळ जीवनव्यवहार जाणून घेण्यासाठी ही कादंबरी आवर्जून वाचावी अशी आहे.
‘हर्णेचा सागरपुत्र – शिवा तांडेल’
श्रीराम विष्णू साठय़े,
सुनिधी पब्लिशर्स, पुणे,
पृष्ठे- १४०, मूल्य – १५० रुपये