आजवर संतसाहित्याचा अभ्यास पुष्कळ झाला, पण त्यात ग्रह-पूर्वग्रह आणि एकारलेपणाही बराच दिसतो. संतवाणी बहुआयामी आहे. संतांच्या काव्यापेक्षा त्यांचे कार्य अधिक महत्त्वाचे आहे, म्हणूनच आजही संत टिकले आहेत. संतांनी पलायनवाद आचरला, ते निवृत्तीवादी आणि देशबुडव्या वृत्तीचे होते- इथपासून ते संतांनीच सारी मराठी संस्कृती घडवली इथपर्यंत मते व्यक्त होत राहिली. डॉ. दिलीप धोंडगे यांनी हे सारे वास्तव ध्यानी घेऊन साहित्यकृतीकेंद्री शैलीवैज्ञानिक अभ्यासपद्धती स्वीकारून तुकारामगाथेची कलात्मक वैशिष्टय़े सुस्पष्ट केली आहेत.
महाराष्ट्रात संतसाहित्याच्या अभ्यासाची, त्यातही तुकारामगाथेच्या अध्ययनाची एक सबळ परंपरा आहे. सनदी अधिकारी पुरुषोत्तम मंगेश लाड हे या अभ्यासक परंपरेचे अग्रणी. त्याआधी शं. पां. आणि वि.प. पंडित द्वय आणि अनेक विदेशी अभ्यासकही झाले. प्रार्थना समाजातील अनेक विद्वानांनी तुकाराम गाथेतील अभंगांची चर्चा केली आहे. तसेच ‘पंडित गाथा’ ब्रिटिश शासनाने, तर पु. मं. लाड यांनी श्रमपूर्वक सुसंपादित केलेली ‘तुकाराम गाथा’ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केली आहे.
नंतरच्या काळात व अगदी अलीकडे प्रा. वा. ब. पटवर्धन, वा. सी. बेंद्रे, दिलीप चित्रे, म. सु. पाटील आणि डॉ. सदानंद मोरे असे नवे अभ्यासक आहेत. त्यात प्रस्तुत प्रबंधाचे लेखक डॉ. दिलीप धोंडगे हे एक चांगले नाव दाखल करायला हवे.
‘शैलीविज्ञान’ ही अलीकडे बहुचर्चित ठरलेली पाश्चात्त्य टीकापद्धती. आपल्याकडेही आचार्य-पंडितांनी शैली विचार केला, पण संतवाङ्मयाचा आविष्काराच्या अंगाने आणि नव्या शैलीविज्ञानाचा आधार घेत अभ्यास करण्याचा प्रयत्न फारसा केला गेला नाही. एक तर अनेक मध्ययुगीन संतांच्या साहित्याच्या मूळ संहिता मिळणे दुरापास्त. शिवाय आशयाचाच अभ्यास अधिक करण्याची आपली वृत्ती. कलात्मक अभिव्यक्तीकडे त्यामानाने आपले लक्ष कमी गेले.
‘भाव अनुठो चाहिए भाषा कैसीहू होय!’ हे आशय आणि अभिव्यक्ती अशा दोन्ही दृष्टींनी उत्तम काव्यरचना करणाऱ्या कबीरदासांचेच मत होते. इतके सांगितले तरी याबाबतची आपली मर्यादा अथवा आपले वैशिष्टय़ स्पष्ट होईल.
आरंभी एका विस्तृत प्रकरणात डॉ. धोंडगे यांनी पाश्चात्त्य शैली विचारांची मीमांसा केलेली आहे. पुढे वारकरी संतांची अभंगरचनाशैली चर्चिली आहे. नंतर तुकोबांच्या अभंगवाणीतील रूपसौंदर्य, नादमयता, काव्यात्मक प्रतिपादन, प्रतिमासृष्टी, सुभाषितात्मकता इत्यादींची सोदाहरण ओळख करून दिलेली आहे.
ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. सदानंद मोरे यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘वारकरी शैलीचे विवेचन करताना ते साहित्यबाह्य़ घटकांचा विचार करायला विसरत नाहीत. मुळात साहित्याचे स्वतंत्र व स्वायत्त तीव्र नसतेच, साहित्य आणि साहित्यबाह्य़ घटक या दोघांना तत्त्वज्ञानाने जोडले जाते. ही डॉ. धोंडगे यांची मर्मदृष्टी वाखाणण्यासारखी आहे.’
तुकोबांच्या वाणीत एक मंत्रशक्ती आहे. दैवी वाणीसारखी प्रेरकता या कवितेत आहे. ‘कोण सांगायास। गेले होते देशोदेश। नेले वाऱ्या हाती माप। समर्थ तो माझा बाप।।’ या न्यायाने ती सर्वतोमुखी झाली आहे.
तुकोबांच्या गाथेतील ‘असाध्य ते साध्य करिता सायास’, ‘मन करा ते प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण’ अशा शंभरांवर अवतरणक्षम वचनांच्या आधारे डॉ. धोंडगे यांनी तुकोबांची अलौकिक अनुभवाभिव्यक्ती स्पष्ट करीत त्यांची ही वाणी वापरून मराठी समाजाने आपली भाषा कशी श्रीमंत केली ते दाखवून दिले आहे.
हा ग्रंथ संत तुकारामविषयक अभ्यासाला चांगली चालना देईलच, परंतु एकूणच संतवाङ्मयामुळे मराठीचे अभिजात सामथ्र्य कसे निर्माण झाले याची प्रचीतीही आणून देईल.
‘तुकोबांच्या अभंगांची शैली मीमांसा’,
डॉ. दिलीप धोंडगे,
राजहंस प्रकाशन,
पृष्ठे- २१ + ३०७, मूल्य- ३५० रुपये
डॉ. अशोक कामत

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
ग्रामविकासाची कहाणी
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!