जयंत टिळक

जुन्या हिंदी चित्रपटांचा नायक नेहमी सर्वगुणसंपन्न असे. नायक-नायिका उत्तम गायक-गायिका असणार, हा तर अलिखित नियमच. चित्रपटाचा विषय कोणताही असो, त्यात गाणी असणारच. चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळात अनेक चित्रपटांतून नायक-नायिका पियानो, गिटार, अ‍ॅकॉíडयन, सतार, शहनाई, बासरी अशी वाद्ये वाजवताना दिसतात. अगदी हल्लीच्या अक्षयकुमार निर्मित ‘पॅडमॅन’मध्येही सोनम कपूर एका संगीत समारोहात सफाईदारपणे तबला वाजवताना दिसते. तिने तबलावादनाचे धडे गिरवले असावेत हे तिच्या बोटांच्या हालचालींवरून सहज दिसून येतं. भूमिकेची अपरिहार्यता म्हणून ते आवश्यकच आहे. अन्यथा ते वादन हास्यास्पद ठरतं.

‘पॅडमॅन’मधील हा प्रसंग पाहताना ‘कोहिनूर’  चत्रपटातील ‘मधुबन में राधिका नाचे रे’ या गाण्याची आठवण आली. ‘हमीर’ रागातील या गाण्याच्या उत्तरार्धात दिलीपकुमार हातात सतार घेऊन ती आत्मविश्वासाने वाजवतो. उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँसाहेबांनी वाजविलेली सतार दिलीपकुमार जेव्हा पडद्यावर साकारतो तेव्हा त्याच्या बोटांची हालचाल कुठेही खटकत नाही. या चित्रपटात त्याला सतार वाजवायची आहे हे समजल्यावर त्याने सतारवादनाचे धडे घेतले होते असे कळते.

नूतन ही अशीच गुणी कलावती. ‘मनमोहना बडे झूठे’ हे ‘सीमा’ चित्रपटातील शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेले अप्रतिम गाणे पडद्यावर तितक्याच ताकदीने तिने तानपुऱ्याच्या साथीने साकारले आहे. तानपुरा हे साथीचे वाद्य आहे. तो छेडण्याचेही तंत्र आहे. तिने याचे भान ठेवून एखादी पट्टीची गायिका जसा छेडेल तसाच तानपुरा छेडला आहे.

ही झाली चांगल्या अदाकारीची उदाहरणे. पण बहुतेक वेळा याबाबतीत आनंदी आनंदच दिसून येतो. ‘परदेस’- मधील ‘रात हैं तारों भरी’ या गाण्यात रेहमानच्या हाती मेंडोलिन आहे. पण ते तो तुणतुण्यासारखं वाजवतो. गंमत म्हणजे त्याला तो ‘बाजा’ संबोधतो. त्याची नायिका चंचल हिने मेंडोलिन लपवून ठेवलेलं असतं आणि तो तिला पुन्हा पुन्हा ‘मेरा बाजा कहॉं छुपाया है?’ असं विचारतो.

‘दो आंखे बारह हाथ’ हा शांतारामबापूंचा कैद्यांचे मनपरिवर्तन या वेगळ्या विषयावरचा चित्रपट. यात खरं तर गाण्यांना स्कोपच नाही. पण रिलीफ म्हणून ‘संया झूठों का बडा सरताज निकला’ हे गाणं खेळणी विकणाऱ्या संध्यावर चित्रित करण्यात आलंय. या गाण्यात तिच्या हातात कोका हे जत्रेत मिळणारं वाद्य आहे. स्त्रिया सहसा गिटार वाजवताना दिसत नाहीत, पण ‘यादों की बारात’मध्ये झीनत अमान ‘चुरा लिया जो तुमने जो दिल को’ या गाण्यात गिटार वाजवताना दिसते. ‘काजल’मधील ‘तोरा मन दर्पण कहलाये रे’ या गाण्यात मीनाकुमारी, तर ‘ब्लफमास्टर’मधील ‘बेदर्दी दगाबाज..’ या गाण्यात सायरा बानो आपल्याला सतार वाजवताना दिसते. ‘पतझड सावन बसंत बहार’ या ‘सिंदूर’मधील गाण्यातही जयाप्रदाने हाती सतार धरली आहे.

ओ. पी. नय्यर यांनी संगीत दिलेला ‘किस्मत’ हाही एक म्युझिकल चित्रपट. यात नायक विश्वजीत गिटार वाजवत ‘लाखों है यहाँ दिलवाले’ हे गाणे म्हणतो. तर ‘कजरा मुहब्बतवाला’ या गाण्यात तो हार्मोनियम वाजवताना दिसतो. पडद्यावर सर्वात बहारदार हार्मोनियम वाजली आहे नय्यर यांच्याच संगीतातील ‘एक मुसाफिर एक हसीना’ चित्रपटातील ‘बहोत शुक्रिया..’ या जॉय मुखर्जीवर चित्रित करण्यात आलेल्या गाण्यात! याच चित्रपटातील ‘हमको तुम्हारे इश्क ने क्या क्या..’ या गाण्यातही तो हार्मोनियम वाजवताना दिसतो.

माऊथ ऑर्गन हे खिशात मावेल एवढे छोटे, पण वाजवायला कठीण असे वाद्य अनेक चित्रपटांतून दिसते. ‘सोलवा साल’मध्ये देव आनंद ‘है अपना दिल तो आवारा..’ गाणं ट्रेनमध्ये वहिदासाठी गातो तेव्हा त्याचा मित्र (सुंदर) माऊथ ऑर्गन वाजवताना दिसतो. १९६४ मध्ये रुपेरी पडद्यावर आलेल्या ‘दोस्ती’ चित्रपटात एक अंध आणि एक अपंग (सुधीरकुमार व सुशीलकुमार) हे चित्रपटाचे नायक असूनही ‘दोस्ती’ला सर्वोत्कृष्ट गीत (मजरुह), संगीत (लक्ष्मीकांत-प्यारेलाल), गायक (मोहम्मद रफी) आणि अन्य तीन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. या चित्रपटात सुशीलकुमारच्या हातात माऊथ ऑर्गन आहे आणि तो ‘राही मनवा दुख की चिंता’, ‘जानेवालों जरा मूड के देखो’ या गाण्यांत वाजवतो. प्रत्यक्षात तो वाजवला आहे आर. डी. बर्मन या हरहुन्नरी संगीतकाराने. ‘सन ऑफ इंडिया’मधील ‘नन्हा मुन्ना राही हूँ’ या नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यात मा. साजिद माऊथ ऑर्गन वाजवताना दिसतो. ‘आराधना’मधील ‘मेरे सपनों की रानी’ या गाण्यातही सुजितकुमार तो वाजवताना दिसतो. ‘एक दूजे के लिए’मधील तेरे मेरे बीच में’ या गाण्याची सुरुवातच माऊथ ऑर्गनच्या करुण स्वरांनी होते. ‘कश्मीर की कली’तल्या ‘किसीने किसीसे कभी ना कभी’ या गाण्यातही शम्मी कपूर माऊथ ऑर्गन वाजवतो. सुपरहिट ‘शोले’मधील ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’ या गाण्यात अभिताभ बच्चन, तर ‘आती रहेंगी बहारें’ (कसमें वादें) मध्ये रणधीर कपूर तो वाजवताना दिसतो. याच गाण्यात अमिताभ गमतीदारपणे पियानोवर बोटे फिरवताना दिसतो.

िहदी चित्रपटांमध्ये सर्वाधिक वेळा वादकाच्या भूमिकेत दिसला आहे- ग्रेटेस्ट शोमन राज कपूर. त्याने पडद्यावर १४ विविध वाद्य्ो वाजवली आहेत. ‘अनहोनी’तल्या ‘मं दिल हूँ इक अरमान भरा’ या गाण्यात त्याने पियानो, तर ‘बरसात’ या म्युझिकल हिटमधील ‘मुझे किसीसे प्यार हो गया..’मध्ये व्हायोलिन वाजवले आहे. ‘बावरे नन’मधील ‘सुन बरी बालम सच बोल’ या गाण्यात तो फ्लूट वाजवताना दिसतो. ‘संगम’मध्ये त्याने ‘बोल राधा बोल’ या गाण्यात बॅगपायपर, ‘हर दिल जो प्यार करेगा’मध्ये अ‍ॅकॉíडयन आणि ‘दोस्त दोस्त ना रहा’मध्ये पियानो वाजवला आहे. ‘श्री ४२०’मध्ये ‘मुड मुड के ना देख’ या गाण्यात त्याने ट्रंपेट वाजवला आहे. ‘प्यार हुआ इकरार हुआ..’त त्याच्या हातात खिशात मावेल एवढे व्हिसल हे बासरीसारखे छोटे वाद्य आहे. याच चित्रपटातील ‘दिल का हाल सुने..’मध्ये त्याने डफ वाजवला आहे. ‘परवरीश’मधील ‘आंसू भरी है ये जीवन की राहें’मध्ये त्याने सारंगी वाजवली आहे. ‘जिस देश में गंगा बहती है’ चित्रपटातील ‘हम भी है, तुम भी हो’ या गाण्यात त्याचा डफ आणि प्राणचा ढोल यांची जुगलबंदीच आहे.   ‘मेरा नाम जोकर’मधील ‘कहता है जोकर..’ या गाण्यात त्याच्या हातात डफ-खंजिरी आहे, तर ‘दाग न लग जाये..’ या गाण्यात तो शहनाई वाजवतो. ‘आशिक’मधल्या ‘ये तो कहो कौन हो तुम’मध्ये तो ढोलक वाजवतो आणि ‘दो उस्ताद’मधील ‘तेरे दिल का मकान संया’ या गाण्यात तो मधुबालाबरोबर नाचता नाचता बीन वाजवतो.

राज कपूरखालोखाल पडद्यावर जास्त वाद्य्ो वाजवण्याचा मान त्याचा छोटा भाऊ शम्मी कपूरकडे जातो. ‘चायना टाऊन’मधील ‘बार बार देखो’ हे सदाबहार गाणे तो हातात गिटार घेऊन गातो. ‘ब्लफमास्टर’मधील ‘बेदर्दी दगाबाज..’ या गाण्यातही त्याच्या हातात गिटार आहे. तर ‘छम छमा छम पायल बाजे’ या ‘रेल का डिब्बा’ चित्रपटातील गाण्यात त्याच्या हाती मेंडोलिन आहे. पण ही सगळी वाद्य्ो त्याने खेळणी वाजवावीत तशी हाताळली आहेत.

‘तीसरी मंझिल’ हा आर. डी. बर्मनच्या करिअरला वेगळ्या उंचीवर नेणारा चित्रपट. यातला शम्मीचा रॉकी ड्रमर भाव खाऊन गेला. पण गंमत म्हणजे फक्त ‘ओ हसीना जुल्फोंवाली जाने जहाँ..’ या गाण्याच्या आधी तो ड्रम्स वाजवताना दिसतो. या गाण्याच्या पहिल्या कडव्याआधीचा म्युझिक पीस तो सॅक्सोफोनवर, तर दुसऱ्या कडव्याच्या आधीचा म्युझिक पीस तो ट्रोंबोनवर वाजवताना दिसतो. शम्मी कपूरचं वादक म्हणून पडद्यावर शेवटचं दर्शन घडलं ‘रॉकस्टार’ या चित्रपटात. यात तो शहनाईवादकाच्या रूपात दिसतो. त्याचा पुतण्या रणबीर यात रॉकस्टार गिटारिस्ट आहे.

राज आणि शम्मी यांचा धाकटा भाऊ शशी याने तरी का मागे राहावे? तो ‘दिल ने पुकारा’मधील ‘वक्त करता जो वफा..’ हे गाणं गाताना पियानो वाजवताना दिसतो. ‘प्यार का मौसम’मध्ये ‘मेरी नज़्‍ार में तो सिर्फ तुम हो’ या गाण्यात तो पियानो आणि ‘तुम बिन जाऊं कहाँ’ या गाण्यात मेंडोलिन वाजवताना दिसतो. ‘मुक्ती’ या चित्रपटात ‘सुहानी चांदनी रातें’ या गाण्यात शशी कपूर पियानो वाजवताना दिसतो. या चित्रपटात संजीवकुमारही हे गाणं पियानोवर बसून वाजवू पाहतो, पण विद्या सिन्हा त्याला त्यापासून परावृत्त करते. ‘आमने सामने’ चित्रपटातील ‘नन मिलाकर चन चुराना’ या फिल्मी गाण्यात शशी कपूर एका कडव्यात ट्रंपेट, तर शेवटच्या कडव्यात ड्रम्स (तेही उभ्या उभ्या) वाजवतानाही दिसतो.

राज कपूरचा पुत्र ऋषी कपूर. ‘हम किसी से कम नहीं’ हा पंचमचा म्युझिकल हिट. यातील ‘तुम क्या जानो’ गाण्यात तो ट्रंपेट वाजवताना दिसतो. ‘सरगम’मध्ये तर तो डफलीवालाच आहे. त्यामुळे तो ‘डफलीवाले डफली बजा’, ‘पर्बत के उस पार’, ‘रामजी की निकली सवारी’ आदी गाण्यांत तो डफ वाजवताना दिसतो. मनमोहन देसाई यांचा ‘अमर अकबर अँथनी’ हा तद्दन मसालापट. या चित्रपटाच्या टायटल साँगमध्ये विनोद खन्ना अ‍ॅकॉíडयन व बोंगो आणि ऋषी कपूर ट्रंपेट वाजवताना दिसतो. डिम्पल कपाडियाने ज्या चित्रपटातून पुनरागमन केले त्या ‘सागर’मध्ये ‘चेहरा है या चाँद खिला है’ या गाण्यात ऋषी गिटार वाजवताना दिसतो. ‘कर्ज’मधील ‘इक हसीना थी, इक दीवाना था’ गाण्यातही तो गिटार वाजवतो. याच चित्रपटात ‘दर्दे दिल दर्दे जिगर’ गाण्यात तो व्हायोलिन वाजवताना दिसतो.

‘नीलकमल’मधील ‘हे रोम रोम में बसने वाले राम’ या गाण्यात वहिदा रहमान, तर ‘जॉनी मेरा नाम’मध्ये हेमामालिनी एकतारी घेऊन ‘गोिवद बोलो हरी गोपाल बोलो’ हे गाणे म्हणताना दिसते. ‘यशोमती मय्या से बोले नंदलाला’ या ‘सत्यम शिवम् सुंदरम्’मधील गाण्यातही हातात एकतारी घेऊन वडिलांबरोबर गाणं म्हणणारी पद्मिनी कोल्हापुरे दिसते.

‘गीत’ या चित्रपटाचा नायक राजेन्द्रकुमार बासरीवादक आहे. त्यामुळे त्याच्या हातात कायम बासरी दिसते. यातील ‘तेरे नना क्यूं भर आये’ या लतादीदींनी गायलेल्या गाण्यात माला सिन्हाच्या हाती सतार आहे. पण ती सुरुवातीच्या म्युझिकपुरतीच आहे. गाण्यातील दोन्ही इंटरल्यूडस् मात्र फ्लूटवरच ऐकू येतात. ‘आजा तुझ को पुकारे मेरे गीत.’ या गाण्यात पहिल्या कडव्याआधी बासरीचा पीस आल्यावर तो नायिकेचा हात घाईघाईने सोडवत बासरी वाजवू लागतो ते फारच गमतीदार वाटतं. ‘गीत गाता चल’चा नायक सचिन हासुद्धा बासरीवादक आहे.

‘मेहबूबा’चा नायक राजेश खन्ना हा पॉप सिंगर आहे. ‘मेरे नना सावन भादो’ हे गाणं गिटारच्या साथीने म्हणताना तो शोभून दिसतो. ‘साजन बिना सुहागन’मध्येही ‘मधुबन खुशबू देता है..’ याही गाण्याच्या तीन व्हर्जन्स आहेत. पण नूतन आणि पियानो अर्थातच कॉमन.

एकूणात कलाकारांच्या पडद्यावरील वादनाचा मागोवा घेतला तर असं दिसून येतं की, दिलीपकुमार, नूतनसारखे सन्मान्य अपवाद सोडले तर बहुतेक कलाकारांनी त्यांच्या वादनाच्या अभिनयाला फारसा न्याय दिलेला नाही.

jayant.tilak@gmail.com