प्रसंग एक : भकास माळरानावर जी. एं.च्या कथेतली एक झोपडी. झोपडीपुढेच छोटं दुकान चालवणारा कोणी एक चोवीसबोट बाळू. एखादी मोटरसायकल वाकडी. अन् मोबाइल खेळवीत गुटख्याच्या पिचकाऱ्या उडवणारी चार-दोन तरुण पोरं. फरारा फुफाटा उडवत एष्टी येते. उमासा आल्यागत विचित्र आवाज करीत थांबते. एक पॅशेंजर उतरतो आणि पोरांत मिसळतो. हा कवी आहे. त्याची कविता कुणा टुकार मासिकात छापून आलीय. पोरं आग्रह करतात म्हणून तो लाजत ती म्हणतो..

‘म्हटलंय बरं का,

भागामागून भाग संपती, शिरीयलींचे बाई,

फट्टं पांढरे वरी पसरले टिपूस गाळत नाही.

हंडय़ामागून हंडे आणते वैनी,

माज्या पुतन्याची आई

अनिकेत उरला कवितेपुरता त्या गावी

अन् कसले कामच उरले नाही..’

पोरं ‘शाब्बास पोयटय़ा!’ म्हणून कल्लोळ करतात.

होय. ‘देऊळ’ चित्रपटात होता हा प्रसंग.

मला ‘तुफान आलंया’ या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याचं मुख्य कारण बहुधा माझं मराठवाडय़ाशी असलेलं नातं हे होतं. नातं नक्की काय, याची नेमकी माहिती कोणालाच नव्हती. पण आहे, असा विश्वास होता. आणि त्यामुळे ‘मराठवाडा वीर’ म्हणून माझी वर्णी लागली होती. मी अन् प्रतीक्षा लोणकर अशी जोडी. ‘मेंटॉर’ असं नामाभिधान होतं आमचं. आणि आठवडय़ातून एकदा पुण्याहून गाडी हाणत मी गोरेगाव की कुठलं उपनगर गाठी शूटिंगसाठी.

सत्यजीत, आमीर, डॉ. अविनाश पोळ भेटत. कामासंबंधीच्या घडत असलेल्या अनेक नवलकथा सांगत. एकदम तीनवरून तीस तालुक्यांत करायला घेतलेल्या कामाचं आकारमान त्यांनाही दडपण आणीत असे. तेराशे गावं होती स्पध्रेत. गावोगाव नव्या श्रमकथा जन्म घेत होत्या. अन् त्या सर्वाची समन्यायी वर्णी कार्यक्रमात लावताना ओढाताण होत होती.

गुरुवारी दिवसभर शूटिंग करून रात्रभर सत्यजीत ते संकलित करत असे. शुक्रवारी ते वाहिन्यांकडे जाई. अन् शनिवार-रविवार मराठीमधल्या सर्व वाहिन्या ‘तुफान आलंया’ हा कार्यक्रम सादर करीत. पाहिला असेल तुम्ही.

तर बरं का, त्यात आम्ही अभिनिवेशानं भांडायचो एकमेकांशी. म्हणजे भारत गणेशपुरे विदर्भाचे गोडवे गायचा अन् मी ‘मराठवाडा किती भारी!’ म्हणायचो. मला वाटायचं.. खरंच, काय नातं आहे माझं या प्रदेशाशी? किंबहुना, असलेलं न सांगण्याकडेच कल. उगाच मागास वगरे ठरलो तर..? काय माहिती आहे मला मराठवाडय़ाबद्दल? खरी गोष्ट अशी की- माझं आजोळ अंबाजोगाईचं. कोकणस्थांची देवी आहे तिथे.. योगेश्वरी! तर ती म्हणे मूळची कोकणातली. वैजनाथाशी विवाह जमल्याने ती कोकणातून अंबाजोगाईस आली. परळीहून वैजनाथ आले. कोंबडा आरवण्याआधी विवाह होण्याची ऋषींची अट पाळली न गेल्यानं ही कोकण-मराठवाडा सोयरीक जमली नाही. वैजनाथ भुयारातून निघून गेले म्हणे.. अशी आख्यायिका आहे. मराठीतले आद्यकवी मुकुंदराज स्वामींची घोडदरीत समाधी आहे. मूळचे विदर्भातले कविराय प्रवास करीत इकडे आले. दरीत घोडा उधळल्यानं त्यांचा अंत झाला. मुख्य म्हणजे माझ्या मामाचं ते गाव. पाच मामा असणारं माझं देशपांडे गल्लीत आजोळ आहे. आठवणीत घट्ट रुतलेल्या लहानपणीच्या उन्हाळी सुट्टय़ा आहेत. अन् आता तिथे पाणी फाऊंडेशनचं प्रशिक्षण केंद्र आहे. मराठवाडय़ाशी माझं नातं हे असं. पण ना कधी मुकुंदराजांचा ‘विवेकसिंधू’ वाचला, ना कधी बालपण सरता तिकडे फिरकलो. अन् मी मराठवाडय़ाचा प्रतिनिधी! पण टीव्हीवर चालतं. किंबहुना, टीव्हीवर कपोलकल्पित किंवा असत्यच जास्त चालतं.

अशात ‘सत्यमेव जयते’सारख्या कार्यक्रमातून सत्य दाखविण्याचा अत्यंत अभिनव प्रयोग करणारे सत्यजीत आणि आमीर यावेळीही ‘तुफान आलंया’मधून सत्यच मांडत होते. गावोगावी घडणाऱ्या कहाण्या जशाच्या तशा दाखवीत एकीकडे शहरी माणसांना वास्तवाची धग देऊन जाग आणत होते, तर दुसरीकडे गावकऱ्यांच्या कर्तृत्वाला सलाम करीत होते.

माणसांना गोष्ट आवडते. सांगायला. ऐकायला. पाहायला. अन् माझ्यागत काहींना अनुभवायलाही. कार्यक्रमात दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी अशाच होत्या. प्रत्यक्ष अनुभवण्याच्या! मी मराठवाडय़ात फिरण्याचा हट्ट केला. किंबहुना, पहिल्या-दुसऱ्या भेटीतच ‘असे कसे मेंटॉर? प्रत्यक्ष कामातही सहभागी होऊ द्या ना!’ असं आम्ही सगळेच म्हणालो होतो. जितू, भारत थोडं फिरूनही आले. भरभरून बोलायचे त्यांच्या अनुभवांबद्दल. भारतच्या विदर्भप्रेमाला खऱ्या कळकळीची धार चढू लागली नं राजेहो. मंग त्याले उत्तर द्यायचं तर आजोळी जावंच लागते. मी निश्चय केला.

एका परीनं हे त्या कार्यक्रमाचंही यश होतं. आम्ही टेलिव्हिजन आणि टेलिफोन गावागावांत नेला. अन् काय केला उपयोग त्याचा? चालती, फिरती, राबती माणसं कैद करून बसवून ठेवली. कधी शहरी सुखोपभोगाची मोहमयी चित्रं दाखवीत अन् बादलीत चेंडू टाकायला लावीत साडय़ा वाटीत मायमाऊलींची स्वप्नं खुरटवली. ‘तुफान आलंया’ नावाच्या कार्यक्रमातून माणसांना कृतिशील करण्याचा प्रयत्न होता. नाय तर शिरीयलींचे भागामागून भाग पाहत वैनी हंडय़ामागून हंडे आन्तेचे आपली कवाची.

प्रसंग दोन : स्थळ : कळंब, जि. उस्मानाबाद.

काकू : तर बरं का, आम्ही सगळ्या पोरीच. एखाद् दुसरी मोठ्ठी बाई. आणि आमच्या दादानं आम्हाला कामं सांगायची अन् आम्ही ती करायची. कामं म्हणजे काय? तर बॉम्ब इकडून तिकडे नेऊन द्यायचे, पत्रकं वाटायची.. असली कामं. सगळं छुपेपणानी. एकदा तर आम्ही पोरींनी घोडय़ावर जाऊन बँकच लुटली होती.

मी : काय? काय सांगता?

काकू : अरे, होय तर! तुला कहाणी सांगितली तर काढ मग सिनेमा त्याच्यावर.

गुढीपाडव्याचा दिवस. पुरणपोळीवर तूप आणि ताव मारीत खिदळत चाललेल्या या गप्पा.

काकूच म्हणायचे सगळे त्यांना. ‘शकुंतला प्रभाकर देशपांडे- मांडवेकर’ असं त्यांचं खरं नाव. पण त्या सगळ्यांच्या ‘काकू’च! कपाळी मोठ्ठं कुंकू अन् चेहऱ्यावर एक अतिप्रसन्न हसू. तरुणपणी हैदराबादच्या मुक्तिसंग्रामात घोडा फेकत बँक लुटणारी ही प्रेमळ आज्जी सहजपणानं मला चकित करणाऱ्या कथा सांगत होती. मी थक्क होऊन ऐकत होतो.

‘‘तेव्हा टीव्ही नव्हता काकू..’’ मी हसत म्हणालो, ‘‘म्हणून जमलं.’’

काकू हसल्या मोठय़ानं. ‘‘तर काय रे..’’ म्हणत.

बाहेर ऊन कडकून तापलेलं असतानाही काकूंच्या जिव्हाळ्याचा, मायेचा गारवा सर्वत्र भरून राहिलेला.

‘‘तर बरं का, काळोखात आसं एक भिताड होतं. तिथं घोडी नेली. घोडीवर चढून भिताडापलीकडं दोन-चार जणींनी उडय़ा मारल्या. आत दोन शिपुर्डी होती. त्यांच्या हेऽऽऽ मुसक्या आवळल्या न् दरवाजा तोडून सगळा पसाअडका घ्यून घोडय़ावर बसून पसाऽऽऽर.’’ काकूंच्या चेहऱ्यावर खटय़ाळ हसू.

मला खरंच वाटेना. अशा पोरी मराठवाडय़ात होत्या? न मग कुठे गेल्या?

दरम्यान माझा दौरा ठरला. इरफानबद्दल जितूकडून, सत्याकडून ऐकलं होतं बरंच. तोच माझा मार्गदर्शक असणार होता. लातूरपासून सुरुवात करायची होती. मग आमचा कॉलेजातला एक उद्योजक मित्र चेतन म्हणाला, मी येतो. आनंद पंडितही म्हणाला येतो. निघालो रात्री चेतनच्या गाडीतून. टेंभुर्णी ओलांडली तसा रस्ता बदलला. पश्चिम महाराष्ट्राची गुळगुळीत चकाकी मागे पडून खाचखळग्यांनी आणि बाभळींनी सोबत धरली. चांदण्यातही उजाड माळ रखरखी टिकवून होता. दख्खनी विस्तीर्ण पठार कापीत पळणारा रस्ता! सोबत जुने जिवलग अन् आठवणींच्या लडी उलगडणारी रात्र. आजोळी निघालो होतो. मनात अपार उत्सुकता अन् हुरहुर. अनेक प्रश्नही.

मराठवाडय़ात पाण्याचा प्रश्न बिकट झालाय हे सत्य एव्हाना चव्हाटय़ावर आलंच होतं. माझ्या आठवणीतल्या मराठवाडय़ात पाणी होतं. अर्थात चाहुल लागायला सुरुवात झालीच होती. असं कशानं झालं असावं? येडशीला चहा पीत आम्ही बोलत होतो. आनंद पुण्याचाच. चेतन मात्र लातूरकडला. आता पुण्यात स्थायिक. माझ्या लातूरच्या कॉलेजातले बरेच मराठवाडी मित्र आता पुण्यातच असतात. जवळजवळ सगळे यशस्वी उद्योजक वा उच्चाधिकारी अभियंते आहेत. बहुतेकांच्या कहाण्या कष्टार्जित यशाच्या आहेत. बऱ्याचजणांची पाश्र्वभूमी शेतीची. अतुल कुलकर्णीला तर मी ‘कृषिवला’ अशीच हाक मारत असे. अन् माझं ते पुणेरी उच्चारण ऐकून ‘‘लईच गुळमट बोलतंय लेका हे..’’ असं म्हणत पोरं कौतुकानं हसत. तर त्याचे बाबा सायकल मारत माळेगाव नावाच्या गावाहून शेतातला वानवळा घेऊन पोरांचं क्षेम विचारायला येत. त्यांनी आणलेल्या खोबरी आंब्यावर मी डोळा ठेवून असे. आता अतल्या पुण्यात यशस्वी कारखानदार आहे. खोबरी आंबे इथंही मिळत होते त्याला काही वर्षांपर्यंत. असो.

‘‘पाणीच नाही रे! कसं जमावं मग तसं?’’ चेतननं उत्तर दिलं.

‘‘तेच की. पण पाणी का नाही?’’

‘‘पाऊस नाही.. जमिनीतलं उपसु उपसु काढलं. येनार कुठून पानी?’’

चेत्याचे ‘न’ गोड लागतात कानाला. पुण्यात येऊनही भाषेतला ‘न’ त्यानं जपलाय. तीच एक गावाकडची खूण.

‘‘गोदेच्या कुशीतला हा प्रदेश. तिचा आवाका गंगेसमान. म्हणून तीस ‘दक्षिण गंगा’ म्हणण्याचा प्रघात. तर अशा गोदेची माया आटली. तिच्या बांधबंदिस्तीनं जिल्ह्य-जिल्ह्यंत भांडणं मात्र लावलीत. पाण्यावरून भांडणाचा काळ आला. अहो, गावा-गावांत वाद पेटलेत.’’

‘‘टेम्परेचर यंदा बेचाळीसच्या वराय म्हणतात.’’ आनंदनं भाग घेत म्हटलं.

‘‘तुला सांगतो, हे जर पाणी तुम्ही लोकांनी आणलं ना- फार बरं होईल यार..’’ त्याच्या स्वरात विनंतीवजा अपेक्षा होती. मला उगाच फार जबाबदार वाटलं. क्षणभर. पण ते गाडीखालच्या कुत्र्यास वाटावं तसंच आहे हे जाणवून मी म्हटलं, ‘‘मी मदत करतोय रे. बास.’’

‘‘आम्ही निमित्तमात्र आहोत. गावकरी स्वत:च स्वत:साठी काम करताहेत.’’ सत्यजित, आमीर अन् डॉक्टर सतत सांगताना ऐकलं होतं.

खरंच, करत असतील? म्हणजे काही ठिकाणी असतात उत्साही गट. पण संपूर्ण गावंच्या गावं येतील श्रमदान करायला? बरं, आमिषही नाही कसलं. पाणी फाऊंडेशन ना पसे देणार, ना घेणार. ज्ञान द्यायचं आणि श्रम मागायचे असा हा व्यवहार. मग आपापली कुदळ-फावडी घेऊन राबतील का मंडळी दीड महिना?

आता कुठे या कामातल्या संघर्षांची जाणीव होऊ लागली. अनेक शंका मनात येऊ लागल्या. ‘देऊळ’मधला तो प्रसंग उद्या परत पाहायला मिळेल की काय अशीही भीती वाटून गेली. पण मग आमीर, सत्यजीतनं पहिल्या वर्षीच्या यशस्वी काम करणाऱ्या गावांच्या सांगितलेल्या कथा आठवल्या. त्यांचा शांत आत्मविश्वास आठवला. सत्यजीतनं गावोगावी जाऊन लोकांना एकत्र करून स्पध्रेत भाग घ्यायला प्रेरित केलं होतं. त्यांच्या एकेक अडचणी सोडवत गावांचे कायापालट घडवून आणले होते. स्पर्धा पार पडल्यानंतर परत गावागावात जाऊन ‘तुमचा अनुभव कसा होता? आमचं काही चुकलं असं वाटलं का?’ असा एक पडताळाही घेतला होता. अनुभवांतीची अनुमानं अभ्यास करून काढलेली होती. ध्यानी आलेल्या चुका टाळून यावर्षीची आखणी केली होती.

विश्वास ठेवूनच तर आलो होतो! मग तो डळमळीत करण्याचं ‘भय’ हे कारण योग्य नव्हतं. नव्हे, अशा कुठल्याच कामाचा अनुभव हाती नसताना अविश्वास दाखवण्याचा मला मुळी अधिकारच नव्हता.

शांत उत्तररात्री शहरात प्रवेश केला. मुक्कामी इरफान वाट पाहत थांबला होता. लहानखुऱ्या चणीचा इरफान सगळ्यांना का आवडतो, हे कोडं लगेचच उलगडलं. चेहऱ्यावर प्रसन्न हसू. डोळ्यांत तोच काकूंसारखा ‘होती दोन शिपुर्डी. बांधल्या हेऽऽऽ मुसक्या’ भाव. धाडसानं हाती घेतलेल्या कामातलं आव्हान कठीण आहे, हे कळूनही त्याच्या प्रसन्नतेला थकवा आला नव्हता. स्पर्धा संपत आली होती. गेला महिनाभर हा गडी माळामाळानं फिरत माणसं गोळा करीत होता. रात्रीचा दिवस करीत त्यांना उत्साह देत होता. ‘पान-टपऱ्यांचं गाव’ असा बहुमान मिळावा इतक्या पान-टपऱ्या या गावी. एरवी त्यांना लखडून असलेली तरुण पोरं इरफानबरोबर कामाची नशा चढल्यागत राबत होती. इतक्या रात्री तरुणांचं ते टोळकं उद्याच्या श्रमदानाच्या नियोजनाच्या चच्रेत रमलं होतं. प्रत्यक्ष पाहत होतो म्हणूनच खरं म्हणावं अशीच ही गोष्ट.

तो वर्णन करत असलेलं काम पाहायला मी उत्सुक होतो.

इरफाननं दुसऱ्या दिवशीचा प्रवास अन् कामाचं नियोजन सांगितलं. तोच शांत आत्मविश्वास अन् ओठी खटय़ाळ हसू. मला म्हणाला, ‘‘ झोपा आता. उद्या खड्डे खोदायचेत. कुदळ येती का हानता?’’

मी म्हटलं, ‘‘अहो, येणारी कामं कुणीही करील. न येणारं करण्यात तर मौज आहे. अडलं तर तू आहेसच की!’’

सत्या, डॉक्टर, इरफान.. तीन दिशांना राहणारी, एकमेकांहून खूप वेगळी माणसं ‘वॉटर कप’ स्पध्रेनं एकत्र आणली होती. आख्यायिकेत न जुळलेली सोयरीक जुळवीत होती. जलसंधारणाच्या कामातून मनं सांधण्याचा डाव साधत होती. पाणी तर आणूच आणू; पण माणसांची मनंही जोडून दाखवू, हेच तर सांगत  होती ती.

वेरूळ पाहताना ‘अनेक पिढय़ांनी घडवलेली कलाकृती’ असा उल्लेख ऐकला होता. ज्या मराठवाडय़ात हे घडलं, तिथंच हजारो हात एकत्र येऊन उभं करीत असलेलं श्रमशिल्प पाहायला मी आतुर झालो.

सुधीर मोघे या कलंदर कवीच्या या ओळी आहेत..

‘वैराण माळ उघडा बेचन तळमळे

मी दान आसवांचे फेकीत चाललो..’

माझ्या आजोळच्या उबदार कुशीत शिरतानाचा कोंबडा आरवण्यापूर्वीचा हा शेवटचा विचार!

कोणत्या कामासाठी किती गुण?

‘वॉटर कप’ या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या गावांना त्यांनी दिलेल्या योगदानानुसार मूल्यमापन करून १०० पैकी गुण दिले जातात. या गुणांची विभागणी पुढीलप्रमाणे केली जाते. शोषखड्डय़ांसाठी ५ गुण, नर्सरी/ रोपवाटिकेसाठी ५ गुण, श्रमदान/ मनुष्यबळाचा वापर करून बांधलेले बंधारे आणि जलसंधारण रचना यासाठी २० गुण, यंत्राचा वापर करून बांधलेले बंधारे आणि जलसंधारण रचना यासाठी २० गुण, एरिया ट्रीटमेंट आणि रिज (माथा) उपचारांवर योग्य भर यासाठी १० गुण, रचनांची/ कामांची गुणवत्ता यासाठी १० गुण, मूलस्थानी/ ‘इन सिटू’ मृदा-उपचार यासाठी १० गुण, पाणीबचत तंत्रज्ञानासाठी ५ गुण, वॉटर बजेटसाठी ५ गुण, अगोदरच अस्तित्वात असणाऱ्या रचनांची दुरुस्ती/ विहीर पुनर्भरण/ नावीन्यपूर्ण उपक्रम यासाठी १० गुण देण्यात येणार आहेत.

गिरीश कुलकर्णी

girishkulkarni1@gmail.com