नोव्हेंबर महिना म्हणजे नाटय़वेडय़ांसाठी सुगीचा काळ. कॉलेजमधला तरुणवर्ग या महिन्यामध्ये वेगवेगळ्या नाटकांच्या स्पर्धामध्ये रमलेला दिसून येतो. नाटकासाठी सुरुवातीला निवड प्रक्रिया करायची. मग टीम पाडून कामं वाटून घ्यायची. नाटक बसवायचं, तालमी करायच्या, सेट तयार करायचा.. या सगळ्या गोष्टी साहजिकच तालेवारपणे होत असल्या तरी या स्पर्धाचा खरा अंक हा पडद्यामागेच रंगत असतो. या स्पर्धामधून केवळ प्रवेश मिळवायचा तर कांटे की टक्कर असते आणि त्यासाठी नुसतीच मेहनत नाही तर हा एक वेगळाच जुगाड दरवर्षी आवडीने जमवला जातो.

काही कॉलेजमध्ये नाटकाची वर्षांनुवर्षे ठरलेली टीम असते. ज्या कॉलेजची टीम अनेक स्पर्धामधून जिंकते अशा कॉलेजमध्ये निव्वळ त्या टीममध्ये सहभागी होण्यासाठी अनेक मुले प्रवेश घेतात, तर काही कॉलेजमध्ये काही उत्साही कलाकार येऊन नाटकाची टीम बनवतात. नंतर ही निवड प्रक्रिया होते. यात सीनियर मिळून ज्युनियर्समधले नाटकवेडे शोधून काढतात आणि टीममध्ये नवीन उत्साह सळसळू लागतो आणि इथूनच खरी जुगाड प्रकिया सुरू होते. कोण कोणतं काम करणार, नाटकाच्या तालमीसाठी कुठे जागा मिळवायची, कोणत्या शिक्षकांना कसा मस्का लावायचा, बजेट कसं मिळवायचं.. अशा एक ना दोन अनेक गोष्टींची उत्तरं मिळवण्यासाठी तरुण वर्ग अनेक शक्कलं लढवतो. याबद्दल ‘व्ही.जे.टी.आय.’ कॉलेजचा विनायक चव्हाण सांगतो, ‘‘मला आधीपासून नाटकाची खूप आवड होती म्हणून मी कॉलेजमध्ये आल्या आल्या नाटकाचा ग्रुप शोधला. निवड प्रकिया झाली तेव्हा माझं काम सीनियर्सना खूप आवडलं आणि माझी निवड झाली. यंदा आम्ही ‘आयएनीटी’ स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. मी एकांकिकेचं दिग्दर्शन केलं होतं. आम्ही स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचल्यावर आमच्या शिक्षकांनी जास्त पाठिंबा दिला. तोपर्यंत त्यांना जास्त काही माहीत नव्हतं. आम्हाला कॉलेजमध्ये तालमीसाठी जास्त वेळ मिळालाच नाही. लेक्चर सोडून तर आम्ही कधीच तालीम केली नाही. रोजचे अवघे दोन तास मिळायचे. अशा परिस्थितीत आम्ही स्पर्धेची पहिली फेरी पार केली. त्यानंतर दुसऱ्या फेरीला आम्हाला सेट बनवण्यासाठी बजेट कमी पडत होतं. त्या वेळी जुगाड करून पासआऊ ट सीनियर्सची मदत घेऊ न आम्ही सेटसाठी बजेट उभं केलं. तिसऱ्या फेरीच्या वेळी तर मला दुसऱ्या कॉलेजमधल्या अनेक मुलांनी येऊन क ौतुकाची थाप दिली आणि त्या वेळी आमचा सरांनी आम्हाला न सांगता नाटक बघण्यासाठी हजेरी लावली होती हे पाहून खूप बरं वाटलं.’’ आयएनटी जिंकल्यानंतर आता कॉलेजमधली अनेक मुलं नाटकाच्या ग्रुपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत आणि ही आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असल्याचे विनायकने सांगितले. एक स्पर्धा जिंकली म्हणजे हे नाटय़वेडे तरुण शिलेदार थांबले असं होत नाही. खरं तर हा मोसमच या स्पर्धाच्या मोहिमेवर निघण्याचा असल्याने एक संपली की दुसरी, तिसरी अशी विद्यार्थ्यांची स्वारी एकापाठोपाठ एक मोहिमा जिंकण्यासाठी बाहेरच पडलेली असते.

महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाच्या विश्वात डोकावून पाहिल्यावर अशा अनेक गमतीजमती, गुपितं लक्षात येतात. या स्पर्धाच्या निमित्ताने रंगभूमीवर एक युद्ध रंगतंच, पण कित्येकदा पडद्यामागेही युद्धापेक्षा कमी अवघड स्थिती नसते. अनेकदा कॉलेजच्या पहिल्या वर्षांपासून नाटकाच्या ग्रुपशी जोडली गेलेली मुलं तिथलं शिक्षण संपवून बाहेर पडल्यावरही अनेकदा लेखक-दिग्दर्शक या भूमिकेतून त्यात अडकलेली असतात. त्यांची नाळ काही त्या नाटकापासून सुटत नाही हेच खरं.. असाच अजूनही कॉलेजच्या ग्रुपशी जोडलेला असणारा निनाद म्हैसळकर  सांगतो, ‘‘मी पासआऊ ट झालो तरी त्यानंतर जवळ जवळ सात वर्ष माझ्या कॉलेजच्या नाटकांच्या ग्रुपसाठी काम केलं. आपल्या कॉलेजने आपल्याला कळत-नकळत खूप काही दिलेलं असतं, अशा स्पर्धामधून आपण घडत असतो आणि म्हणूनच माझी पावलं पुन:पुन्हा माझ्या कॉलेजकडे वळतात.’’ निनादच्या मते या नाटय़स्पर्धामुळे कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतरही नाटकाचं तेच वेड, स्पर्धेचा तोच उत्साह, ती नशा पुन:पुन्हा अनुभवण्याची संधी मिळते जी त्यानेही अनुभवली. मात्र कधीकधी नाटकाच्या वेडाची हीच नशा सीनिअर-ज्युनिअर्समध्ये दीवार बनून राहते. अनेकदा सीनिअर्स त्यांचा नाटकावरचा ताबा सोडायला तयार नसतात आणि मग नव्याने येणाऱ्याला, स्वत:चं काही वेगळं करू पाहणाऱ्याला काही तरी क्रांती केल्याशिवाय बदल घडवून आणता येत नाही. नव्या-जुन्यांमधलं हे युद्ध कधी-कधी नको त्या थरालाही जातं, तर कधी खेळीमेळीने स्पर्धानुस्पर्धा रंगत वाढत राहते.

गेल्या पाच वर्षांमध्ये खरं म्हणजे या नाटय़-एकांकिका स्पर्धाचं स्वरूपसुद्धा कमालीचं बदललं आहे. दरवर्षी जातीने सहभाग घेणाऱ्या कॉलेजेसबरोबरच नवनवीन कॉलेजेससुद्धा या स्पर्धामध्ये सहभाग घेताना दिसतात. एकमेकांचे स्पर्धक असले तरी एकमेकांची तारीफ करणे, उत्साह वाढवण्यात कोणीही मागे-पुढे बघत नाही. त्यामुळे दरवर्षी या स्पर्धामधून एक नवा जोश, उत्साह पाहायला मिळतो. स्पर्धासाठीचे विषय- ते लिहिणारे लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार मंडळी जशी महत्त्वाची असतात. तसंच या स्पर्धासाठी कमीत कमी बजेटमध्ये चांगला सेट उभारून देण्याचं आव्हान स्वीकारणारेही अनेक जण असतात. कॉलेजपासूनच सेट डिझाईन करणारा सचिन गोताड सांगतो, ‘‘मी कॉलेजमध्ये असल्यापासूनच एकांकिकेसाठी सेट डिझाईन करायचो. कॉलेजमधून बाहेर पडल्यावरही मी अनेक वर्ष स्पर्धेसाठी सेट डिझाईन केले. मी शिकत असतानाच मला माहीत होतं की, सेटसाठी जास्त बजेट दिलं जात नाही. त्यामुळे एका वर्षी आम्ही एक कुरापती आयडिया करून सेट बनवला. आम्हाला ट्रेन बनवायची होती. त्यासाठी लाकडी पट्टय़ा लागणार होत्या. बजेट तर नव्हतं. त्या वेळी आम्ही सगळे रात्री भेटलो. छोटे-मोठे जुने बॅनर्स काढले आणि त्याच्या पट्टय़ा वापरल्या. आम्हाला कापडसुद्धा हवं होतं. त्या वेळी आम्ही परत रात्री भेटून भाजीवाल्यांकडचे गोणपाट लंपास केले होते. बजेट नसल्यामुळे आम्ही असे अनेक जुगाड अनेक वर्षे केले. या जुगाडामागे केवळ नाटक करण्याचं वेड असतं,’’ असं सांगणारा सचिन हे वेडच आयुष्यात पुढे जायला मदत करतं, असंही म्हणतो. त्यामुळे नाटक, एकांकिका स्पर्धाच्या निमित्ताने रंगणारा हा जुगाड नेहमीच वाईट असतो असं नाही; पण या जुगाडातून कित्येक सर्जनशील आयुष्यं घडली आहेत तशीच ती विस्कटलेलीही आहेत. अनेकांना या स्पर्धामधून मोठं होऊन पुढे टेलीव्हिजन-चित्रपट विश्वात नाव कमवायचं असतं; पण त्यांची एक चुकीची पद्धत त्यांना भलत्याच वाटेकडे घेऊन जाते. अनेकदा गुणवंत असूनही हवं तसं यश मिळत नाही म्हणून लाइमलाइटपासून दूर फेकले गेलेलेही चेहरे आहेत. तसेच कित्येक वर्ष या स्पर्धाचा अविभाज्य भाग बनून राहिलेलेही सर्जनशील कलाकार आहेत. अशा अनेक गोष्टींनी, जिवंत दंतकथांनी हे नाटय़स्पर्धाचं विश्व रंगलेलं असतं. यातला एक तरी रंग आपल्यावर चढावा म्हणून बेभान तरुणाई दरवर्षी त्याच उत्साहाने नवनवा जुगाड करताना दिसते.

तेजश्री गायकवाड  viva@expressindia.com