एखाद्या शब्दाच्या नेमक्या उच्चाराबाबत मनात अनेकदा गोंधळ होतो. इंग्रजी किंवा इतर परकीय शब्दांचा उच्चार चुकीचा केला की, इम्प्रेशन एकदम डाऊन. कुठल्या शब्दाचा उच्चार, कुठल्या ठिकाणी, कसा करावा यासाठीच हा कॉलम..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नामसाधम्र्यामुळे काही गोष्टींबाबत गोंधळ होणं अगदी स्वाभाविकच असतं. मी स्वत: हा अनुभव अनेकदा घेतला आहे. रश्मी असं नाव सांगितल्यावर लक्ष्मीपासून रेश्मापर्यंत कोणताही उच्चार केला जाऊ शकतो हे मी एव्हाना पूर्ण समजून चुकले आहे. त्यामुळेच काही शब्दांचा उच्चार हा गोंधळात टाकणार, चुकणार हे देखील गृहीत धरावं लागतं.
पाण्याने वेढलेला भूप्रदेश म्हणजे आयलंडबाबतीत हा गोंधळ प्रकर्षांने जाणवतो. आइसलँड, आर्यलड,आइसलँड अशा वेगवेगळ्या गोष्टी या उच्चाराचा परीघ वाढवतात. पण खरं तर आइसलँड ही बर्फाच्छादित प्रदेशाशी निगडित संकल्पना आहे. आर्यलड हा तर एक देश आहे. आपण ज्या पाण्याने वेढलेल्या प्रदेशासाठी हा उच्चार करतो, तो नेमका उच्चार आहे आयलंड. या शब्दाच्या स्पेलिंगमधल्या silent ‘s’ ने ही गुगली टाकली आहे. त्या ‘ s ‘ चा उच्चार करावा यात एतद्देशीयांचाच नव्हे तर इंग्रजसाहेबांचाही गोंधळ उडालेला दिसतो. त्यामागे तसं कारणही आहे. १६ व्या शतकापूर्वीपर्यंत या आयलंडचं स्पेलिंग iland असंच होतं. आता या ‘s ‘ entry त्यानंतर का झाली हा त्या आयलंडइतकाच गूढ भाग म्हणावा लागेल. इंग्रजांनी जर्मन भाषेतून हा आयलंड शब्द घेतला आहे. पण फ्रेंच भाषेत isle असा एक शब्द आहे त्याचाशी गोंधळ होऊन मूळच्या iland मध्ये island अशी भर पडली असावी. ते काही असलं तरी उच्चारात ‘s’ ला गप्प बसवून आयलंड हा मूळ स्पेलिंगबरप्रमाणे उच्चार निश्चित करण्यात आला आहे.
मुळात या शब्दाला स्वत:चेच एक सौंदर्य आहे. आयलंड म्हटलं की पाण्याने वेढलेला सुंदर, रमणीय भूभाग लगेच आपल्या नजरेसमोर येतो. या आयलंडचेही दोन प्रकार आहेत. sea island आणि continental island. समुद्री बेटं तर आपण जाणतोच. पण continental island म्हणजे मूळचा जमिनीचाच असणारा भाग पाण्याच्या प्रवाहामुळे मूळ भूभागापासून थोडा विलग होतो असा भूप्रदेश. हे सारं काही वाचताना भूगोलाच्या अभ्यासाचा फील आला तर ते अगदी स्वाभाविक आहे. एकमेकांना अगदी जवळ असणाऱ्या आइसलँड,आर्यलडमधून आपल्याला हवं ते आयलंड निवडणं मात्र महत्त्वाचं.
आपल्या नियमित वाचक स्मिता नाईक यांनी ‘शब्दसखा’बद्दल प्रतिक्रिया देताना या शब्दाची शोधमोहीम हाती घेण्याविषयी लिहिलं होतं. सध्याच्या काळात माणूस स्वत:च एक बेट होऊन जगताना दिसतो. तरीही त्यातून बाहेर येऊन एखाद्या शब्दाचा त्याला असा मागोवा घ्यावासा वाटणं छानच नाही का? परिचित शब्दाच्या उच्चाराचं अज्ञात आयलंड शोधावंसं वाटलं ते याकरिताच!
रश्मी वारंग – viva.loksatta@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on english pronunciation
First published on: 05-11-2015 at 02:56 IST