हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेऊ या या नव्या सदरातून.

काही ब्रँड्स आठवणींच्या कप्प्यात कायम बंदिस्त राहतात. त्यांचं प्रत्यक्ष अस्तित्व दिसत नसलं तरी ग्राहकांना त्या ब्रॅण्डची सातत्याने येणारी आठवण त्या ब्रॅण्डला चिर:काल स्मरणात ठेवते. भारतीयांच्या मनात गोल्डस्पॉट सॉफ्टड्रिंकच्या ऑरेंजी आठवणी आजही ताज्या आहेत त्या याच न्यायाने. १९६०-७०च्या दशकातील लग्नांचे आल्बम पाहताना एका बाटलीत दोन स्ट्रॉ घालून डोक्याला डोकं लावून गोल्डस्पॉट पिणारी जोडपी हा एक ट्रेडमार्क होता. आईस्क्रीम भरवाभरवीच्या आधीचा हा रोमँटिक ज्युसी स्वाद भारतीय विसरूच शकत नाही. पण कॉर्पोरेट युद्धात एखाद्या यशस्वी ब्रॅण्डचा कसा बळी जातो याचंही गोल्डस्पॉट उत्तम उदाहरण ठरावे.

पार्ले कंपनी ग्लुको बिस्किटांमुळे यशस्वी घोडदौड करत असताना याच कंपनीने शीतपेयांच्या उत्पादनाचा निर्णय घेतला. थम्सअप, लिम्का आणि गोल्डस्पॉट ही तीन शीतपेयं साधारण थोडय़ाबहुत अंतराने कंपनीनं बाजारात आणली. १९५२ साली ऑरेंज स्वादातील गोल्डस्पॉट आलं आणि काहीच दिवसात लोकांच्या पसंतीस उतरलं. पार्लेचंच प्रसिद्ध पेपरमिंट ‘पार्ले गोल्डस्टार’ वरून हे नाव प्रेरित होतं. गोल्डस्पॉट यशस्वी होण्याचं कारण म्हणजे ऑरेंजची चव मुलांच्या आवडीची होती. (आठवा -ऑरेंज स्वादाचं शीतपेय प्यायल्यावर केशरी झालेल्या जिभा एकमेकांना दाखवण्यातील गंमत) शिवाय शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) फारसा प्रसार नसताना थोडंसं गार करूनही गोल्डस्पॉट चवीला मस्त लागत असे. अनेक विक्रेते थर्माकोलच्या बॉक्समध्ये बर्फ ठेवून समुद्रकिनारी, पिकनिक स्पॉटपाशी गोल्डस्पॉट विकत. त्यांचा छान खप होत असे. अल्पावधीत गोल्डस्पॉट लोकप्रिय झालं. आणि जागतिक पातळीवर प्रचंड खपाचं कोकाकोला त्याचवेळी भारतात दाखल झालं. कोक आणि पार्लेची तिन्ही शीतपेयं यांच्यात जबरदस्त स्पर्धा सुरू झाली. एकप्रकारे स्वदेशी विरुद्ध विदेशी असाच हा सामना होता. या दरम्यान गोल्डस्पॉटचं मार्केटिंग तंत्र बदलण्यात आलं. लहान मुलांचं आवडतं सॉफ्टड्रिंक ही प्रतिमा बदलण्यासाठी गोल्डस्पॉटने प्रिंट जाहिरातींचा छान वापर केला. ‘गोल्डस्पॉट ऑरेंज..फ्लेवर यू कॅन हिअर’ असं म्हणत त्यातला ताजेपणा दाखवला गेला. जाहिरातीसाठी नवी मॉडेल म्हणून एका दाक्षिणात्य मॉडेलची निवड केली गेली. ‘लिव्ह अ लिटिल हॉट..सिप अ गोल्डस्पॉट’ असं म्हणत गोल्डस्पॉटचा हॉट सिप घेणारी ती मॉडेल दुसरी तिसरी कुणी नव्हे तर कालांतराने बॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री रेखा होती. ही जाहिरात विलक्षण गाजली.

१९७७ च्या दरम्यान जॉर्ज फर्नाडिस यांच्या नेतृत्वाखाली स्वदेशीचा जागर पुन्हा सुरू झाला आणि त्या दरम्यान कोका कोला कंपनीला भारतातील गाशा गुंडाळावा लागला. अर्थातच पार्ले कंपनीच्या शीतपेयांना याचा फायदा झाला. १९८० मध्ये गोल्डस्पॉटची नवी टॅगलाइन आली, ‘द झिंग थिंग’. गोल्डस्पॉट पिणं ही क्रेझी गोष्ट ठरली. अनेकांना ‘द झिंग थिंग’ची जिंगल आणि जावेद जाफरीची जाहिरात आठवत असेल. गोल्डस्पॉटचा हा चढता आलेख उल्लेखनीय होता. सर्व काही उत्तम चालू होतं. पण १९९३ मध्ये उदारीकरणाच्या वाऱ्यांसह कोकाकोला कंपनी भारतात परत दाखल झाली. जोडीला प्रतिस्पर्धी कंपनी पेप्सीही आली. कोकाकोला कंपनीने मार्केटिंगचा झंझावात निर्माण केला. जागतिक दर्जाची व्यवस्था, तंत्र त्यांच्या सोबतीला होतं आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम कोकाकोला कंपनीने पार्ले कंपनीचे शीतपेयांचे ब्रॅण्ड विकत घेण्यात झाला. आता कोकाकोला कंपनीपुढे वेगळाच पेच निर्माण झाला. कोणत्या उत्पादनांना प्राधान्य द्यायचं? स्वतची उत्पादने की विकत घेतलेले ब्रँड्स? साहजिकच थम्सअप विरुद्ध कोकाकोला, गोल्डस्पॉट विरुद्ध फँटा आणि लिम्का विरुद्ध स्प्राइट असं युद्ध जुंपलं. अर्थात आपला तो बाब्या या न्यायाने पार्ले कंपनीकडून विकत घेतलेल्या शीतपेयांना दुय्यम दर्जा मिळाला. सुरुवातीला कोकाकोलाने थम्सअपचं उत्पादन कमी करून पाहिलं पण थम्सअपची लोकप्रियता विलक्षण होती. ते कमी केल्यावर लोक पेप्सीकडे वळू लागले. हे लक्षात आल्यावर कंपनीने थम्सअपकडे नव्याने लक्ष दिलं. लिम्काही दीर्घ विश्रांतीवर गेलं. पण पुन्हा परत आलं. गोल्डस्पॉटला मात्र ते भाग्य लाभलं नाही. २०००सालीच ते बंद झालं. गोल्डस्पॉटची झिंग फँटात नाहीच. पण त्या कॉर्पोरेट युद्धात गोल्डस्पॉटचा हकनाक बळी गेला. गोल्डस्पॉट जरी काळाच्या पडद्याआड गेलं असलं तरी त्याची झिंग आजही चाहत्यांच्या मनात जागी आहे. अर्थात लिम्काप्रमाणेच गोल्डस्पॉटही भविष्यात कधीतरी नव्या जोमाने अवतरेल, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे. या आठवणीतल्या ब्रँडकडे पाहून काही ओळी जरूर आठवतात.

कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे हेम..देवा घरचे ज्ञात कुणाला?

viva@expressindia.com