डॉ. चारुता कुळकर्णी, न्यूयॉर्क, यूएसए

न्यूयॉर्क ! अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर उण्यापुऱ्या ४०० वर्षांपासून वसत-वाढत आलेलं, जगावर आर्थिक अधिराज्य गाजवणारं एक अतिशय वेगवान, निर्भीड, नखरेल आणि विलक्षण मनस्वी महानगर! कुणीही या, कधीही या, कष्ट करायची तयारी असेल तर उदरात घेणारं, आपलंसं करणारं, जगण्याच्या जीवघेण्या शर्यतीतही तुम्हाला हवंतसं जगू देणारं. म्हणूनच न्यूयॉर्क शहराच्या अवघ्या ८०० चौ.किमीच्या क्षेत्रफळात जगातल्या अनेक संस्कृती एकावेळी नांदत असतात.

न्यूयॉर्क! अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर उण्यापुऱ्या ४०० वर्षांपासून वसत-वाढत आलेलं, जगावर आर्थिक अधिराज्य गाजवणारं एक अतिशय वेगवान, निर्भीड, नखरेल आणि विलक्षण मनस्वी महानगर! कुणीही या, कधीही या, कष्ट करायची तयारी असेल तर उदरात घेणारं, आपलंसं करणारं, जगण्याच्या जीवघेण्या शर्यतीतही तुम्हाला हवंतसं जगू देणारं. म्हणूनच न्यूयॉर्क शहराच्या अवघ्या ८००चौ. किमीच्या क्षेत्रफळात जगातल्या अनेक संस्कृती एकावेळी नांदत असतात. थोडय़ाथोडक्या नाही तर जवळपास ८०० भाषा बोलल्या जातात. दर चार रस्त्याला शहराचा नूर वेगळा असतो, कारण ‘लिटल इटली’ आणि ‘चायना टाऊ न’सारखे भाग शेजारीशेजारी वसलेले असतात! खऱ्या अर्थाने एकाचवेळी ‘हॉटस्पॉट’ आणि ‘मेल्टिंगपॉट’ म्हणावं असं हे शहर!

जशी प्रत्येक व्यक्तीची सांस्कृतिक पाश्र्वभूमी तिचा स्वभाव-विचार घडवत असते, तसंच लाखो भिन्न आचारविचारांच्या माणसांना सांभाळणाऱ्या न्यूयॉर्कसारख्या शहराच्या वेगाचा आणि मनस्वितेचा उगम कुठेतरी त्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत आहे. अटलांटिकवरच्या या लहानग्या बेटांच्या समूहाने मूळ आदिवासींच्या टोळक्यांपासून ‘नवे जग’ उभारणाऱ्या डचांच्या छोटय़ा वस्ती, त्यामागोमागचे प्रोटेस्टंट ब्रिटिशांचे जथ्थे, त्यातून उभा राहिलेला अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा, पाठोपाठ न्यूयॉर्क  स्टॉक एक्स्चेंज, बँका आणि त्याभोवतीची जागतिक भांडवलशाहीची पायाभरणी, पहिल्या-दुसऱ्या महायुद्धादरम्यान जगाच्या कानाकोपऱ्यातून या नव्या जगात आयुष्य आजमावायला हजारो बोटींनी आणून सोडलेले लाखो लोक आणि त्यांनीच कष्टाने रेखलेल्या टोलेजंग इमारतींनिशी दिमाखात उभं असलेलं आजचं महानगर एवढा प्रदीर्घ प्रवास फक्त चार शतकांत उरकला! या साऱ्या घडामोडींत या शहराच्या आचारविचारात एक विलक्षण वेग, आवेग, मनस्विता मुरलेली आहे. थांबणं कसं ते माहीतच नाही, इथे सतत कुणीतरी कुठून तरी आलेलं आहे, त्याला कुठे तरी जायचं आहे. मन म्हणेल तिकडे पळायचं आहे. त्यामुळे शहराचे मुख्य भाग पाच फूट पाण्यात बुडवणाऱ्या सुपरस्टॉर्म सँडीसारखा नैसर्गिक तडाखा असो नाही तर वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या दहशतवादी हल्लय़ासारखा मानवनिर्मित तडाखा; लोक शक्यतो पुढच्या काही तासांतच आणि ते जमले नाहीच तर (डोक्यावरून पाणी) पुढच्या दिवशी पुन्हा जगायला, पळायला सुरुवात करतात.. ‘बसून कुणाचं बरं झालंय का!’ हा मुख्य विचार सदैव मनाशी असतो, कुणी ‘दुसरा काही पर्याय आहे का?’, म्हणत करतं तर कुणी तो ‘रोज मरे..’ म्हणतं, तर कुणी अजून काही.. त्यामुळे तशी ही अगदी मुंबई, हिला झाकावं न तिला काढावं!

रोजीरोटीसाठी उर फुटेपर्यंत धावायला लावणाऱ्या मनस्वी न्यूयॉर्क चे प्रतिबिंब इथल्या तरुणाईत बघता येते. मन मानेल तसं करण्याची मुभा असली तरी काही अंशी गोंधळलेली आणि सतत काहीतरी नवे शोधत राहण्याचा, करून बघण्याचा ध्यास असलेली अशी इथली तरुणाई आहे. आयुष्यात काय मिळवायचे आहे माहिती नाही, तर मग सगळेच मिळवायचे, तेही शक्य तेवढे लवकर मिळवायचे म्हणजे आपल्याला कळेल तरी नक्की कशाने सुख मिळेल असा खास आग्रह धरणारी आहे. पण ते जे जे काही आहे ते मिळवण्यासाठी ते इतरांवर अवलंबून राहात नाहीत. उलट अगदी घरचे असले तरी त्यांच्यापुढेही हात पसरून मदत मिळवण्यापेक्षा शक्य तितके स्वावलंबी आयुष्य जगायचा प्रयत्न करतात. स्वत: कष्ट करतात. अगदी वयाच्या सोळाव्या वर्षीपासून मिळेल ते काम करून स्वतंत्र आयुष्याचा विचार करायला लागतात. न्यूयॉर्कसारख्या खूप महागडय़ा शहरात आर्थिक गणिते सांभाळणे हे कायमच महाकठीण, पण इथली तरुण पिढी ‘किमान वेतन’ नियमाच्या बळावर सुपरमार्केटपासून ते रेस्टॉरंट-बारपर्यंत विविध ठिकाणी नोकरी करून आपलं आयुष्य उभं करताना दिसते. इथल्या मुक्त पण अतिशय महाग शिक्षणव्यवस्थेत बारावी किंवा बॅचलर्स शिकायचे का? आणि असल्यास नक्की काय शिकायचे, याचा विचार कसोशीने करावा लागतो. या प्रक्रियेत पुरेसा वेळ घेताना इथली मुले-मुली कोणताही विधिनिषेध न बाळगता हातात असलेले काम, काम म्हणून चोख करताना दिसतात. सोबत संगीत, नृत्य, चित्रकला, अभिनय वगैरे ज्या कुठल्या कलेत रस असेल, त्याच्या थोडय़ा तयारीनिशी न्यूयॉर्कच्या सबवे(ट्रेन)मध्ये किंवा तिथल्या स्थानकांवर सादरीकरण करतात. फेसबुक, ट्विटरवर त्याबद्दल अभिप्राय नोंदवायला सांगतात. सबवेच्या प्रवासात त्यांचे डोके सतत मोबाईलमध्ये खुपसून बसलेले दिसले म्हणून ‘सारखे नुसते चॅटिंग नाहीतर गेम्स खेळत असतील’, असं उगाच जजमेंटल व्हायचं काम नाही! त्या रोजच्या तुफान गर्दीच्या प्रवासात जाडजूड पुस्तके नेहमीच जवळ बाळगता येतात असे नाही, त्यामुळे मोबाईल-किंडल वगैरेवर कॉमिक्सपासून ते कथा-कादंबऱ्यांपर्यंत विविध गोष्टी वाचण्याकडे त्यांचा कल दिसतो. शेवटी विचारांती एखादा विषय घेऊ न त्यात किंवा छंदाचेच करियर करायला आवडेल असे त्यांनी ठरवले की स्वत: पैसे जोडून-प्रसंगी घरच्यांची आर्थिक मदत घेऊन किंवा अगदी कर्ज काढून निकराने पुढे शिकण्याचा प्रयत्न करतात. त्या वाटेवर क्वचितच उततात, माततात, घेतलेले वसे कधी टाकतातही, पण मनस्वितेला अनुसरून पुन्हा नवी स्वप्नं तयार करतात. ती पूर्ण करण्यासाठी त्यांच्या त्यांच्या परीने लढतात. यशस्वी झाले की चिक्कार मज्जा लुटतात, नाही झाले तरी लुटतात. आजचा दिवस शेवटचा असेल तर माणूस काय काय करेल, असा विचार करूनच दररोजचा दिवस जगतात. उद्याची चिंता उद्या उगवला तर करायची, आज नाही!

अशा मनमुराद जगण्याची मजा लुटण्याचा इथल्या तरुणाईचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे या शहरात करता येणारी खानपानातली चंगळ! इथले लोक विशेषत: तरुण पिढी जगभरातले खाद्यपदार्थ मटकावत हिंडत असते. मुळात या शहरात रेस्टॉरंट जितके ‘ऑथेन्टिक’ तितके टिकाऊ. उगाच स्थानिक लोकांना मूळची चव चालणार नाही वगैरे विचार करून चव उतरवलीत, तर तुमच्या रेस्टॉरंटला वाईट रीव्हिव देऊ न त्याचं रेटिंग खाली गेलंच समजा! तेव्हा इथल्या ‘रीव्हिव-सॅवी’ तरुणाईला भिऊन जॅपनीज सुशी, कोरियन चिकन विंग्स, मध्यपूर्वेतून आलेले फलाफल, इटलीच्या विविध भागातून अवतरलेले असंख्य पिझ्झे-पास्ते, मेक्सिकन टाकोज-बरिटो असे अगणित खाद्यप्रकार कायम त्या त्या खास शैलीत खायला मिळतात. थाई फूड इथे सर्वात जास्त आवडीने खाल्ले जाते. रात्रीच्या जेवणाला बऱ्याचदा चायनीज पुडके हातात दिसतात आणि भारतीय जेवण घेणार असले तर ‘चिकन टिक्का मसाल्या’चा नंबर अगदी वरचा! खाण्याच्या बाबतीत अजून एका ठिकाणी तरुण-तरुणींची वर्दळ असते, ती म्हणजे जागोजागी असलेल्या खाद्यपदार्थाच्या टपऱ्यांवर. मुंबई शहराशी असणारे हे आणखी एक साधम्र्य. फक्त इथली सहा महिने चालणारी थंडी बघता हातगाडय़ा थोडय़ा बंदिस्त असतात हाच काय तो फरक. अशा टपऱ्यांवरून सकाळी आपापल्या कॉलेज-कचेऱ्यांकडे धावताधावता पटकन उचलायचा आवडीचा नाश्ता म्हणजे कॉफी, डोनट आणि बेगल-क्रीमचीज. अर्थात सगळेच सरसकट चीज-प्रेमी असतात असे नाही. उलट हल्लीच्या युवक-युवतींमध्ये (काही अंशी पर्यावरणाच्या चळवळीचा परिणाम म्हणून) ‘व्हेगन डाएट’चे प्रमाण लक्षणीय आहे. घरीसुद्धा खूप निरनिराळे पदार्थ करून बघतात. कधी ‘पॉटलक’ करून ते खायला एकत्र भेटतात. उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत इथल्या विविध पार्कमध्ये बार्बेक्यू करण्याची सोय असते तेव्हा त्याची यथेच्छ मजा घेतात. अर्थात जे जे काही खातात ते विभागून, दिवसांतून चार वेळा थोडे थोडे. एकूणातच इथले लोक स्वत:च्या तब्येतीबद्दल अतिशय जागरूक आहेत. त्यामुळे सकाळचे जॉगिंग-व्यायाम करतातच, पण ते जमणार नसेल तर कामावर निघताना सोबत कपडय़ांचे आणि बुटांचे जोड सोबत ठेवतात. कामातून विरंगुळा म्हणून किंवा अगदी त्यातून वेळ काढूनसुद्धा ऑफिसमधल्याच किंवा त्याच्या आसपास एखादे जिम शोधून व्यायाम करून येतात, नाहीतर निदान थोडे पळून येतात. गंमत म्हणजे या पळण्याला वेळकाळाचे बंधन क्वचितच असते. अतिथंडीचे दिवस वगळता दिवसाच्या कोणत्याही प्रहरी लोक उत्साहाने पळायला जातात! योगासनांना दिनक्रमात वेळ देतातच आणि वर्षभरातून एकदा ‘योगा अ‍ॅट टाइम्स स्क्वेअर’सारखे कार्यक्रम आयोजित करून त्यात उत्साहाने सहभाग घेतात. बेसबॉल, आईस हॉकी, बास्केटबॉल आदी खेळांवर तर इथल्या तरुणाईचे विशेष प्रेम आहे, त्यामुळे शनिवार-रविवार सेन्ट्रल पार्कात पडीक राहून त्या त्या खेळांच्या मैदानावर हजेरी लावतात. यांकीज, मेट्स, रेंजर, ब्रुकलीन नेट्स या त्या त्या खेळाच्या खास न्यूयॉर्कर संघांचे सामने आवर्जून जाऊ न बघतात. त्यासाठी सहा सहा महिने आधीपासून तिकिटे काढून तयारी करतात आणि प्रत्यक्ष जाणे जमले नाही तर ठरलेल्या स्पोर्ट्स बारमध्ये मोठ्ठाल्या पडद्यावर मित्र-मैत्रिणींसोबत बीअर घेत खेळ एन्जॉय करतात. न्यूयॉर्कच्या तरुणाईचे अजून एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांना मिळालेल्या बहुसांस्कृतिक वारशामुळे त्यांच्यात आलेली व्यापक दृष्टी. मुळात हे शहर भलतेच डेमोक्रॅटिक. उदाहरणार्थ, दररोज लाखोंची जनसंख्या पोटात घेऊन धावणाऱ्या इथल्या शंभर वर्षे जुन्या सबवेचे सर्व डबे सारखे; त्यात पुरुषांचा-स्त्रियांचा डबा वेगळा नाही; फर्स्ट क्लास नाही की सेकंड क्लास नाही. तुम्ही वॉलस्ट्रीटवरचे राजे असाल नाही तर भांडवलशाहीने जेरीस आणलेले रंक, सबवेने प्रवास करायचा असेल तर दोघांनी एकाच डब्यात बसायचे. तरीही वंश-लिंग-आर्थिक उत्पन्न यामुळे विभागली गेलेली सामाजिक व्यवस्था आणि त्यातले भेद-विषमता नाकारण्याचा प्रयत्न तरुण पिढी करत नाही. नुसतेच ‘पॉलिटिकली करेक्ट’ वागण्या-बोलण्यात धन्यता मानण्यापेक्षा, स्त्री-पुरुष समानता, आंतरवंशीय (इंटररेशियल) नातेसंबंध, समलिंगी संबंध इत्यादी विषयांवर कधी शहराच्या विविध भागांमधून चालणाऱ्या ‘टाऊन हॉल’मधून तर कधी कॉमेडी क्लबच्या माध्यमातून विनोदाच्या स्वरूपात स्वत:चे विचार बोलून दाखवतात. न्यूयॉर्क हा मुळातच अनेक महत्त्वाच्या उदारमतवादी राजकीय आणि सामाजिक चळवळीचा केंद्रबिंदू; मग ती २०व्या शतकाच्या सुरुवातीची स्त्रीवादी चळवळ असो, सत्तरच्या दशकातली पर्यावरणीय चळवळ असो किंवा कृष्णवर्णीयांवरच्या हिंसाचाराच्या विरोधात उभी राहिलेली अलीकडची ‘ब्लॅक लाइव्स मॅटर’सारखी चळवळ. ‘विचार मांडण्याचे स्वातंत्र्य’ या सर्व चळवळींच्या केंद्रस्थानी असल्याने त्यात तरुणाईचा मोठाच सहभाग असतो. अगदी अलीकडचेच उदाहरण द्यायचे झाल्यास ट्रम्प सरकारच्या कार्यपद्धतीच्या विरोधात झालेल्या ‘मार्च फॉर सायन्स’ आणि ‘क्लायमेट मार्च’ अशा दोन्ही मोर्चामध्ये तरुण पिढीने आपल्या मुलाबाळांसकट हिरिरीने भाग घेतला होता. एकूणात, स्वत:ला सतत बदलत राहण्याच्या आणि बदल घडवत राहण्याच्या न्यूयॉर्कच्या गुणधर्माची पाईक आलेली इथली तरुणाई त्याच्याइतकीच विलक्षण मनस्वी जगताना दिसते!

viva@expressindia.com