20 March 2019

News Flash

कथा कृत्रिम अकलेची..

विज्ञान व तंत्रज्ञानाचा मोठा फायदा करून घेण्यासाठी आज रोबोटिक्सपर्यंत भारत पोहोतला आहे.

नवं तंत्रज्ञान विकसित होत जाईल तसा मानवी क्षमतेचा ऱ्हास होईल का? मानवाचे नैसर्गिक गुण कमी होऊन गरजा भागवण्यासाठी त्यांनी बनवलेल्या कृत्रिम उपकरणांमुळे यापुढे नुसते यांत्रिक जगच पाहावे लागेल की काय ही दाट शक्यता एकीकडे मनावर झाकोळ करते आहे. तर दुसरीकडे खरोखरच ही उपकरणं जर स्वतंत्रपणे विविध क्षेत्रात कामं करू लागली तर बेरोजगारी, आर्थिक मंदीच्या दुष्टचक्राची पुन्हा सुरुवात तर होणार नाही ना.. ही चिंता नव्याने सतावू लागली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात  विकसित झालेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सम्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही या चिंतेचं मूळ कारण ठरली आहे.

२०२० हे वर्ष पुरोगामी, स्वतंत्र आणि पुढारलेल्या औद्योगिक क्षेत्रात आणि व्यापारात अग्रेसर असेल त्यासाठी पंतप्रधानांपासून ते महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यापर्यंत सगळे नवी आश्वासनं आणि इच्छा प्रकट करताना दिसतायेत. विज्ञान व तंत्रज्ञानाचा मोठा फायदा करून घेण्यासाठी आज रोबोटिक्सपर्यंत भारत पोहोतला आहे. देशासाठी असे बरेच तरुण तंत्रज्ञानाद्वारे काम सोपं करण्याच्या मार्गावर आहेत. ‘आयआयटी’चा टेकफेस्ट पार पाडला त्यात ‘सोफिया’ या मानवी यंत्रामुळे मानवाची बुद्धिमत्ता तसेच भावनिक क्षमता विकसित होतेय याची प्रचीती सगळ्यांनी घेतली. कृत्रिम गोष्टींकडे कल वाढताना मानवी क्षमतांची गरज कमी होत जाते. तसंच जसजसं नवं तंत्रज्ञान विकसित होत जाईल त्याप्रमाणे मानवी क्षमतेचा ऱ्हास होईल का? मानवाचे नैसर्गिक गुण कमी होऊन आपल्या गरजा भागवण्यासाठी त्यांनी बनवलेल्या कृत्रिम उपकरणांमुळे यापुढे नुसते यांत्रिक जगच पाहावे लागले की काय ही दाट शक्यता एकीकडे मनावर झाकोळ करते आहे. तर दुसरीकडे खरोखरच ही उपकरणं जर स्वतंत्रपणे विविध क्षेत्रात कामं करू लागली तर बेरोजगारी, आर्थिक मंदीच्या दुष्टचक्राची पुन्हा सुरुवात तर होणार नाही ना.. ही चिंता नव्याने सतावू लागली आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात  विकसित झालेला ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ही या चिंतेचे मूळ कारण ठरली आहे. आणि तरीही सध्या तरुणांचा वाढता कल एआय प्रशिक्षणाकडे आहे. एआय म्हणजे काय?, त्याचा वापर कोणकोणत्या क्षेत्रात होतो आहे आणि त्यामुळे निर्माण झालेली आव्हाने याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न..

आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय?

आज जगात माणसापेक्षाही सर्वात बुद्धिमान अशी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ओळख आहे. माणूस संवाद करतो, ऐकतो, बोलतो, लिहितो, वाचतो पण इथेही एक मानवनिर्मित भाषाच आहे. ज्यातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याशी संवाद साधतो. त्यातून त्याला जे दिसतं, त्याची ओळख पटते आणि नंतर त्यावर तो जो विचार करतो या प्रक्रियेतून एक कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्यामुळे आपण जसं एखादी गोष्ट पाहून, ती लक्षात घेऊन त्यावर विचार करतो, माहिती-संदर्भाच्या आधारे ते ताडून पाहतो, समस्येवर तोडगा काढतो त्याच पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रूपात हे यंत्र काम करते. ज्यात हजारो अ‍ॅल्गॉरिदम्स सध्या मनुष्य तयार करतो आहे. त्यातूनच एआय (Artificial Intelligence) चा जन्म झाला आहे. सध्या सीसीटीव्ही कॅमेरा, इमेज प्रोसेसिंग, वाहने, घरगुती कामे, क्लीनिंग, स्मार्ट होम्स यात एआयचा वापर होतो. हा भाग आज माहिती तंत्रज्ञानापुरती मर्यादित न राहता रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास व भाषा यांच्या अभ्यासक्रमातही शिरला असल्याने सध्या याचे शिक्षण महत्त्वाचे ठरते आहे.

तरुणांपुढे आव्हानं

एआयमुळे वेगवेगळ्या क्षेत्रांतील हे सर्व पर्याय आता भारतातही उपलब्ध होत आहेत. एआयमुळे तरुणांना वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणं खूप सोपं होणार असलं तरी त्यामुळे काही मूलभूत समस्याही निर्माण होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता वापरून प्रत्येक क्षेत्रात नवनवीन संशोधन करणारा, नवनिर्मिती करणारा तरुण आता मोठय़ा प्रमाणावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपलं काम पुढे नेणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून राहण्याच्या या सवयीमुळे नैसर्गिक बुद्धिमत्तेचा वापर आणि त्याची क्षमता कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. आज तरुणांना प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ताच वापरायची सवय झाली तर कोणत्याच पद्धतीने तरुणांच्या कलागुणांचा विकास होणार नाही किंबहूना त्यांची बुद्धिमत्ताही विकसित होऊ  शकणार नाही. भविष्यात किंवा अगदी आजच्याच घडीला तंत्रज्ञान जसं झपाटय़ाने बदलत जाईल त्याप्रमाणे एआय विकसित व्हायला वेळ लागणार नाही. सध्या तरुण जसे मोबाइलवर अवलंबून आहेत तसेच ते पुढे कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून राहतील. मानवानेच मानवाच्या सोयीसाठी तयार केलेलं यंत्र आहे याचं भान ठेवणं हे तरुणांसमोरचं मोठं आव्हान आहे. सध्या एआय विकसित होण्यासाठी तरुणांची प्रत्येक क्षेत्रात गरज आहे मात्र एकदा सगळ्याच क्षेत्रात एआय विकसित झालं तर मनुष्यबळाची गरज नक्कीच कमी होईल आणि त्यातून भविष्यात अनेक प्रश्न उभे राहू शकतील, असा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञ देतात.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सगळ्याच क्षेत्रात वापरला जातो आहे. त्यामुळे एकीकडे एआयमुळे तरुणांना रोजगाराची नवी संधी प्राप्त झाली आहे त्याचप्रमाणे त्यांच्यासमोर नवी आव्हानंही उभी राहिली आहेत.

  • एआयद्वारे खूप मोठय़ा प्रमाणात तरुणांसाठी संधी उपलब्ध झाल्या आहेत. एआय डोमेनमध्ये आज बऱ्याच रिसर्च संस्थांमध्ये तसेच मोठय़ा इंडस्ट्रीत वेगवेगळ्या विषयांवर माहिती शोधण्यासाठी आणि त्यातून मानवी बळ कमी करण्यासाठी काही प्रोजेक्ट्स सुरू आहेत तिथे तरुणांसाठी जागा आहेत.
  • बी.एस्सी., बी.कॉम., इंजिनीअरिंग, आर्किटेक्ट, भाषा अशा नानाविध क्षेत्रांत असलेल्या विद्यार्थ्यांना एआय क्षेत्रात रिसर्चर म्हणून काम मिळते कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा एका यंत्राच्या स्वरूपात असतो. त्यामुळे हे एआय तंत्र आधी शिकून घ्यावं लागतं. त्या त्या क्षेत्रातील उपयुक्त असं ज्ञान या यंत्रात बसवावं लागतं जेणेकरून त्याचा वापर प्रत्येक क्षेत्रात होऊ शकेल. त्यामुळे विविध क्षेत्रांतील ज्ञान असलेले उच्चशिक्षित विद्यार्थीच एआय क्षेत्रात काम करू शकतात.
  • वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांना रोगाचं निदान करण्यासाठी जसं स्वत:चं शिक्षण व मेंदूचा वापर होतो, तसंच हीच माहिती आपण एआयच्या यंत्रात समाविष्ट केली तर त्यामार्फत आपल्याला रोगाचं निदान कळतं. त्यामुळे अर्थातच माणसाचा वेळ आणि काम वाचतं. वैद्यकीय क्षेत्रातील तरुणांना याचा बराच फायदा आहे. एआयचा उपयोग रोबोटिक्समध्येही होतो त्यामुळे पेशंटची काळजी कशी घ्यावी हे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे त्या यंत्रमानवात सूचना स्टोअर होतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग हृदयाच्या ठोक्यांचे आवाज तसंच इतर काही मेडिकल इमेज समजून घेण्यासाठी होतो. ज्याचा उपयोग तरुण मुलं मेडिकलच्या इंटर्नशिपला शिकण्यासाठी करू शकतात.
  • कॉस्मॅटिक इंडस्ट्रीतही याचा वापर होतो. ब्यूटी टेक्नॉलॉजी आणि कॉस्मॅटिक सर्जरी करण्यापूर्वी चेहरा किंवा त्वचेसंबंधित विकारांचं निदान होणं गरजेचं असतं त्यामुळे त्याबद्दलचं ज्ञान एआयच्या माध्यमात स्टोअर केलं असेल तर त्याचा या इंडस्ट्रीला फायदा होऊ शकतो. या क्षेत्रात एआय विकसित होण्यासाठी अजून भरपूर वेळ लागणार आहे मात्र तसं झालं तर फिल्म, मॉडेलिंग विश्वात मेकअप, कॉस्मॅटिक्स आणि सर्वसामान्य तरुणींची लाइफस्टाइल जी मेकअप, कॉस्मॅटिक्सशिवाय पूर्ण होत नाही त्यात नक्कीच अमूलाग्र बदल होईल.
  • संगीत क्षेत्रातही आज तरुणांचा दरारा आहे. तिथे ही कृत्रिम बुद्धिमत्ता कशी कामी येईल हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. २०१२ साली एआय लेमस या तंत्राच्या मदतीने शास्त्रीय संगीताचा अल्बम तयार करण्यात आला होता. २०१६ मध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स व्हिज्युअल आर्टिस्ट’ (एआयव्हीए) या नावाने जगातला पहिला शास्त्रीय व सिंफनी संगीतातील मास्टर गायक तयार केला गेला. आता ऑपेरा संगीतासाठीही एआयचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
  • शिक्षण क्षेत्रात मुलांना नवी शिक्षण पद्धत अवलंबता यावी म्हणून तसे रोबोट बनवण्यात आले आहेत. ज्याला ‘आयटीएस’ म्हणतात. असे काही क्लासेस तयार केले जातात जिथे त्या त्या तरुणांच्या शिक्षणशाखेच्या गरजेप्रमाणे एआयमध्ये ज्ञान साठवलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सद्वारे ते शिक्षण दिलं जातं.
  • ह्य़ुमन रिसोर्सेसमध्ये रेझ्यूमे तयार करणं, मुलांच्या क्षमतेनुसार रँक काढणं, ऑनलाइन टेलिफोन सव्‍‌र्हिस यातही एआयचा उपयोग होतो आहे.
  • आज शेअर मार्केटमध्ये मनुष्यबळ कमी करून एका दिवसाला काही लाखो ट्रेण्ड खालीवर होतात तिथे आता एआयच्या माध्यमातून करोडो ट्रेण्ड बनवणं सोपं होईल त्यामुळे याआधीही या क्षेत्रात नुसत्या संगणकावर होणाऱ्या शेअर्सच्या उलाढाली एआयमुळे दुपटीने वाढतील. त्यामुळे भविष्यात स्वयंनिर्मित ट्रेण्ड, इक्विटी, डेबिट्सची खरेदी-विक्री होईल. त्यासाठी आज मोठा तरुण वर्ग रिसर्च करतो आहे.
  • मनोरंजन क्षेत्रात आज मोठय़ा प्रमाणात एआयचा उपयोग होतो आहे. टीव्ही, चित्रपट, जाहिराती, सोशल मीडिया, व्हिडीओ, ब्लॉग, डिजिटल फोटो यातही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होतो आहे.

‘तरुणांना यापुढे खूप मोठय़ा आव्हानांना सामोरं जावं लागेल, पण आज तरुणांसाठी एआय क्षेत्रात रिसर्च फिल्डमध्ये फार संधी आहेत. तुम्ही ग्रॅज्युएशन करतानाच रिसर्चर म्हणून या इंडस्ट्रीत काम करू  शकता.’

सुजाता पाठक, प्रमुख, माहिती तंत्रज्ञान, के. जी. सोमय्या

‘आज आयटी क्षेत्रात खूप संघर्ष आहे, पण सायबर सिक्युरिटीत आज मनुष्यबळ कमी होत असताना एमआयटीच्या एआय२ तसेच आयबीएमच्या व्ॉट्सन या मशिन ट्रेनिंगमधून सायबर गुन्हे रोखण्यासाठी एआय तंत्रात प्रशिक्षित तरुणांचा उपयोग होतो आहे’.

डॉ. ग्रेषा भाटिया, डेप्युटी, व्ही. ई. एस. आयटी

viva@expressindia.com

First Published on June 8, 2018 12:40 am

Web Title: artificial intelligence new technology