मेकअप- ब्युटी प्रॉडक्ट्स आणि पुरुष यांचा दूरदूर काही संबंध नाही, अशीच आपली समजूत असते. ही समजूत मोडीत काढण्याचे प्रयत्न काही ब्रॅण्ड्सकडून सुरू आहेत. आता मुलांनी थेट मेकअप केला नाही तरी आपल्या स्टायलिंगकडे लक्ष द्यायला हवं.. कसं? त्यासाठीच्या टिप्स..

मागच्या महिन्यात एका प्रसिद्ध ब्युटी ब्रॅण्डने एक घोषणा केली. तसा हा ब्रॅण्ड भारतीय स्त्रियांचा आणि ब्युटी एक्स्पर्ट्सचा लाडका, त्यांनी एखाद्या नव्या लिपकलर किंवा नव्या उत्पादनाची घोषणा केली असती, तर पेपरचे रकाने भरून गेले असते. पण या घोषणेकडे भारतीय माध्यमांनी काहीसं दुर्लक्षच केलं. या ब्रॅण्डने पहिल्यांदा त्यांच्या एका उत्पादनासाठी एका पुरुषाची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली. मस्कारा विकण्यासाठी पुरुष मॉडेल्स आता पुढे येत आहेत. इन्स्टाग्रामवर ३२ लाख फॉलोअर्स असलेल्या ब्युटी व्लॉगर मॅनी गुतुरेझचं प्रोफाइल पाहिलं की, ही निवड किती योग्य आहे, हे पटतं. असा प्रयोग करणारा हा ब्रॅण्ड काही पहिला नाही. याच सुमारास अजून दोन ब्युटी ब्रॅण्ड्सनी अनुक्रमे गॅब्रियल झमोरा, जेम्स चार्ल्स या दोघांची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवड केली. हे सगळं वाचताना डोक्यात एक विचारचक्र सुरू होतं. मुळात सौंदर्य आणि पुरुष यांना आपण मनोमन इतकं दूर नेऊन ठेवतो की, मेकअप- ब्युटी प्रॉडक्ट्स आणि पुरुष यांचा दूरदूर काही संबंध नाही, अशीच समजूत असते. ही समजूत या ब्रॅण्ड्सना मोडून काढायची होती. मेकअपला लिंगाचं बंधन नाही, मुलींप्रमाणे मुलंही मेकअप वापरू शकतात, हे त्यांना सांगायचं होतं. आपल्याकडे मुलानं घरी पावडर जरी लावली, तरी त्याला हसलं जायचं. हळूहळू पुरुषांसाठी वेगळी क्रीम, शॉवर जेल यांचं प्रमाण वाढलं. पण मुलांना मेकअपची गरज का आहे? ही समजूत काही केल्या जात नव्हती. या कुतूहलापोटी या मेकअपची जाहिरात करणाऱ्या पुरुष मॉडेल्सविषयी ‘गुगल’बाबांकडून माहिती घेतल्यावर लक्षात आलं की, त्यांच्या प्रत्येक मुलाखतीत ते ठामपणे सांगतात, ‘आम्ही पुरुष असलो, तरी आम्हाला मेकअपची आवड आहे. जसं मेकअपमुळे मुलींच्या चेहऱ्याला उठाव मिळतो, त्यांना आत्मविश्वास मिळतो, तसं आम्हालाही सुंदर दिसावंसं वाटतं.’ हे इतकं सहज आणि सुंदर आहे म्हणूनच कदाचित मुलीही यांना फॉलो करतात आणि त्यांच्याकडून ब्युटी टिप्स घेतात. ‘ब्युटी बॉइज’ नावाचा त्यांच्यासारखाच जगभरातील असंख्य मेकअपप्रेमी मुलांचा एक अख्खा गट त्यांच्यामुळे तयार झालाय.

आता थोडं जवळ येऊ या. नुकत्याच झालेल्या फॅशन वीकमध्ये डिझायनर नरेंद्र कुमारच्या शोदरम्यान पुरुष मॉडेल्सनी केलेला मेकअप उठून दिसणारा होता, त्यांनी ब्राइट, पेस्टल शेडचं लिपस्टिक लावलं होतं. लुकसोबत नेहमीच प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता रणवीर सिंगनेही एका कार्यक्रमादरम्यान डोळ्यांना काजळ लावलं होतं. सध्या तो अल्लाउद्दीन खिल्जीच्या भूमिकेची तयारी करतोय. त्यामुळे पीळदार बॉडी, रुबाबदार दाढी आणि केस या सगळ्यात काजळ लावलेले डोळे इतके उठून दिसत होते की, त्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. स्टायलिंगच्या बाबतीत रणवीरने स्वत:वर घेतलेल्या मेहनतीची दखल घेतलीच पाहिजे. सूट आणि फॉर्मल्सच्या चक्रात अडकलेल्या बॉलीवूड नायकांच्या प्रतिमेतून बाहेर पडत त्याने कधी घागरा घालून तर कधी नथनी लावून ठोकताळे तोडायचा प्रयत्न केलाय. मुळात आपल्याकडे मुलांनी असे नटण्यामुरडण्याचे सोहळे केले की, त्यांच्या ‘मर्दानी’ प्रतिमेला धक्का पोहचतो, अशी समजूत केली जाते. त्यामुळे बहुतेक मुलं स्टायलिंग, नीटनेटकं दिसणं याकडे लक्षच देत नाहीत. अगदी सोप्पं उदाहरण द्यायचं, तर सध्या लांब केस आणि वाढलेली दाढी- मिशी मिरविण्याची स्टाइल आहे. पण दाढी किंवा केस एका विशिष्ट वळणात वाढविण्यासाठी त्यांना व्यवस्थित कापायची, आकार द्यायची गरज असते, हे मात्र ते विसरतात. परिणामी, झुडूप वाढलेले चेहरे पाहायला मिळतात.

थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की, तमाम पुरुषजनहो, अजूनही कपाटातील हातात येईल ते टी-शर्ट आणि एक जीन्स घालून ‘की फर्क पेंदा है?’ म्हणत खांदे उडविणाऱ्यांनो आता फरक पडतो, हे लक्षात घ्यायची वेळ आली आहे. अगदी थेट मेकअपवर उडी घेणं तसं धाडसच ठरू शकत, पण रोजच्या पेहरावातील स्टायलिंगकडे लक्ष देण्यापासून नक्कीच सुरुवात करता येईल. अर्थात, मेकअपमध्येही डोळ्यात काजळ, स्किनटोन एकसारखा दिसायला फाऊंडेशन अशा छोटय़ा बाबींचा विचार नक्कीच करता येईल.

या परिस्थितीला काही प्रमाणात बाजारपेठेतील पुरुषांच्या कपडय़ांमधील मर्यादित पर्याय हे कारणसुद्धा होतं, पण आता परिस्थिती बदलते आहे. नेहमीच्या जीन्स, टी-शर्ट्सना वेगवेगळे पर्याय उपलब्ध होत आहेत. मुलंही बदलांकडे सकारात्मक नजरेने पाहू लागली आहेत. मागच्या वर्षांपासून आतापर्यंत ‘मुलींचा रंग’ म्हणून दुर्लक्षित गुलाबी रंग पुरुषांच्या वॉडरोबमध्ये शिरला आहे. अगदी फॉर्मल शर्ट्स, जीन्स, ट्राउझर्समध्ये गुलाबी रंग पाहायला मिळतोय. पँट्ससोबत धोती पँट, सलवार, पटियाला हे प्रकारही मुलांनी स्वीकारले. जॅकेट, स्कार्फ, श्रग यांच्या मदतीने स्टायलिंगच्या वेगवेगळ्या पद्धतींचे प्रयोग केले गेले. प्रिंट्स, रंग यांच्यात पर्याय मिळाले. हेअरस्टाइल्स, अ‍ॅक्सेसरीजचे कित्येक प्रकार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे हळूहळू पुरुषांच्या ड्रेसिंगमध्येही सध्या खूप सुंदर पर्याय निर्माण झाले आहेत. गंमत म्हणजे हल्ली मुलं आवर्जून फॅशन ब्लॉगर्स म्हणून पुढे येऊ  लागली आहेत. त्यामुळे गरज आहे आता फक्त थोडं धाडस करून हे बदल स्वीकारायची.

अर्थात, यासाठी काही वेगळे प्रयोग, नवे खर्च करायची गरज नाही. फक्त आपल्या कपाटाकडे नीट लक्ष देत, तुमच्या सध्याच्या कपडय़ांमधूनच स्टायलिंगचे प्रयोग करून बघा. आपल्यावर कोणता रंग साजेसा दिसतोय, कोणतं प्रिंट छान दिसतंय, याचा अंदाज घ्या. आपला बॉडीटाइप लक्षात घेऊन कपडय़ांची निवड केली की लुकमध्ये बराच फरक पडतो. उदाहरणच घायचं झालं, तर प्रिंटेड टी-शर्टवर एखादं बोल्ड शेडच समर जॅकेट किंवा लूझ शर्ट आणि क्रीम, सफेद अशा फिकट रंगाची स्ट्रेट जीन्स घातल्यास बारीक आणि उंच दिसू शकता. जॅकेटऐवजी सेमी-फॉर्मल ब्लेझर घातलं की हा लुक ऑफिसमध्येही कॅरी करता येईल. नेहमीच्या जीन्सऐवजी शॉर्ट कुर्त्यांवर धोती पँट आणि स्कार्फ घेऊन बघा. फक्त सणांच्या दिवशीच कशाला एरवीही कॉलेजमध्ये हा लुक मस्त दिसेल. कार्गो पँटवर लांब टी-शर्ट आणि श्रग घालता येईल. हे कपडे तुमच्या कपाटात असतीलही, फक्त त्यांना वेगळ्या स्वरूपात वापरणं सुरू करायला हवं.

लुक्समध्ये बदल करायचे असतील तर नव्या ट्रेण्ड्सचं अंधानुकरण करण्यापेक्षा आपल्या पद्धतीने त्यांना वळवणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्या काही पद्धती पाहू या.

१. गळ्याभोवती रुमाल बांधणं मवालीपणा समजला जायचा. पण एखादा छान फिकट टी-शर्ट आणि जीन्ससोबत सुंदर प्रिंट असलेला बोल्ड कलरचा छोटा स्कार्फ गळ्याला बांधून बघा. उन्हाळा आहेच, त्यामुळे सनग्लासेस चुकवू नका. एक छान टोपीही वापरता येईल.

२. सध्या मुलांच्या कलेक्शन्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीची विशेषत: फ्लोरल प्रिंट्स पाहायला मिळतात. तुम्हाला अगदी फ्लोरल टी-शर्ट किंवा शर्ट घालायला वेगळं वाटत असेल, तर सुरुवात छोटय़ा गोष्टींपासून करा. फ्लोरल टाय, टोपी, स्कार्फ अर्दी टोन्ससोबत सहज वापरू शकता. नंतर मोर्चा टी-शर्ट्सकडे वळवा. नेव्ही, कोबाल्ट ब्लू, ब्राऊन, बेज, बिस्कीट रंग अशा बेसिक शेड्सच्या ट्राउझरसोबत हे टी-शर्ट छान दिसतात.

३. कपाटात आता थोडे रंग आणायला हरकत नाही. सुरुवात अर्दी टोन्सनी (मातकट रंगांनी) करा. या छटा काहीशा मातकट असतात. त्यामुळे लुक भडक दिसत नाही. पण कलर ब्लॉकिंग म्हणजेच परस्परविरोधी दोन किंवा तीन रंग एकत्र आणून लुकचा समतोल सांभाळता येतो. लाल टी-शर्टवर रॉयल ब्लू (प्रिंटेड असेल तर उत्तम) टी-शर्टसोबत मस्टड यल्लो ट्राउझर एकत्रित करता येईल. यातील तिन्ही रंग एकमेकांचा भडकपणा कमी करत समतोल साधतात.

४. पेंडंट, ब्रेसलेट, सनग्लासेस, घडय़ाळ, फंकी सॉक्स, स्टायलिश स्नीकर्स हे प्रकार कपाटात असू द्या. या छोटय़ा गोष्टींमुळे लुकवर खूप प्रभाव पडतो.

viva.loksatta@gmail.com