News Flash

‘जग’ते रहो : संस्कृती, संधी आणि बरंच काही..

मी ‘युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन’मध्ये फिल्ममेकिंगचा अभ्यासक्रम शिकतो आहे. हे शहर फार कॉम्पिटिटिव्ह आहे

(संग्रहित छायाचित्र)

असित कुलकर्णी लंडन, इंग्लंड

इथे प्रत्येकाला स्वत:ची स्पेस हवी असते. पालक आणि मुलांमधली स्पेस मित्र-मैत्रिणी किंवा अनोळखी लोकांमध्ये असते तेवढी आहे. ब्रिटिश कुटुंबांसह इथे १५-२० वर्ष स्थायिक झालेल्या भारतीय कुटुंबातही असंच वातावरण असतं.

मी ‘युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन’मध्ये फिल्ममेकिंगचा अभ्यासक्रम शिकतो आहे. हे शहर फार कॉम्पिटिटिव्ह आहे. इथलं राहणीमान खूप महाग असून त्यासाठी मेहनतीची तयारी असावी लागते. तितकंच हे शहर खूप वेलकमिंग आहे.  एका गोष्टीविषयी मला आधीच सांगण्यात आलं होतं, त्याची सवय करून घ्यावी लागेल, असं सुचवण्यात आलं होतं आणि आता काही महिन्यांतच इथे येणाऱ्या माझ्या ज्युनिअर्सनाही मी हाच सल्ला देतो आहे.. ती गोष्ट आहे ‘स्पेस आणि मॅनरिझम’! इथे प्रत्येकाला स्वत:ची स्पेस हवी असते. पालक आणि मुलांमधली स्पेस मित्र-मैत्रिणी किंवा अनोळखी लोकांमध्ये असते तेवढी आहे. ब्रिटिश कुटुंबांसह इथे १५-२० वर्ष स्थायिक झालेल्या भारतीय कुटुंबातही असंच वातावरण असतं. १४ ते १५ वर्षांच्या मुलांना ‘यंग अडल्ट्स’ म्हटलं जातं. ही मुलं स्वावलंबनाचे धडे गिरवतात. त्यांना युनिव्हर्सिटीतलं शिक्षण मोफत असलं तरी राहणीमान किंवा अन्य काही शिक्षणाचा खर्च ते स्वत: नोकरी करून भागवतात. या स्वतंत्र राहणीमानात कुटुंबाशी त्यांचा संपर्क खूपच कमी होतो. त्यात वाद, भांडण, राग वगैरे मुद्दे येतच नाहीत. एकमेकांची स्पेस जपली जाते, पण औपचारिकता येते आणि नात्यांचे धागे विलग होऊ  लागतात.. आपल्याकडे अगदी याउलट चित्र दिसतं. तरीही एक गोष्ट अशी की, एकदा आपण इथल्या लोकांशी कनेक्ट झाल्यावर अपार आदर आणि आपुलकी मिळते. त्यांच्या छोटय़ा-मोठय़ा कृतींतून ते जाणवतं. काही वेळा ते अगदी अनपेक्षितही ठरतं. त्यांच्या एरवीच्या चौकटीत राहाण्याच्या स्वभावात या गोष्टी बसत नाहीत, पण त्या घडतात, हेही तितकंच खरं.

इथे वावरताना लोकांशी थेट बोलणं होत नाही. प्रवासात अगदी जुजबीच बोललं जातं. माफक हसतात. जवळपास सगळ्यांनी हेडफोन लावलेले असतात. क्वचित संभाषण झालं तर ते टय़ूबमध्ये. तेही तिथे थोडा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आणि तेवढंच. मात्र काही वेळा या सगळ्याचा अतिरेक होतोय असं वाटतं.. बऱ्याच गोष्टी मी शिकलो इथे राहून. अगदी छोटय़ाशा आणि साध्या वाटणाऱ्या गोष्टींतही मॅनर्स पाळलेच जातात. मग ते मागून येणाऱ्यासाठी दार धरून ठेवणं असेल किंवा ‘थँक्यू’ म्हणणं असू देत. हे मॅनर्स लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांच्या अंगवळणी पडले आहेत. मात्र कुणाकडून अनवधानाने हे मॅनर्स पाळले गेले नाहीत तर हे लोक फार काही बोलत नाहीत, पण एक लुक मात्र नक्कीच देतात. कंट्रीसाइडला हे मॅनरिझम अधिकच कटाक्षाने पाळले जातात.

मी इंग्रजी माध्यमात शिकलो. शाळेत असताना केंब्रिज युनिव्हर्सिटीचे कोर्सेस केले होते. तरीही काही वेळा भाषेचा प्रश्न उभा ठाकतोच. लंडनकरांना आता सवय झाली आहे इतर देशांतल्या लोकांना समजून घेण्याची. त्यामुळे ते लोकांना समजेल अशा पद्धतीने बोलतात. कधी तरी त्यांना एखादा शब्द न कळल्याने विचारावा लागतोच, पण कंट्रीसाइडमधून आलेल्या आणि कामानिमित्त भेटणाऱ्या लोकांचं संभाषण (बोलणं) फारच जलद असतं. मग काही वेळा ते काय बोलले, हे पुन्हा विचारावं लागतं. लंडनमधल्या वाहतुकीसाठी आयकॉनिक बसेस, टय़ूब, ट्राम, बोटी इत्यादी साधनं आहेत. मात्र त्या अत्यंत महाग आहेत. बसेस अगदी चोवीस तास चालू असतात आणि त्यांची पोहोच सर्वदूर आहे. लोकसंख्या वाढली तरी टय़ूब नेटवर्क त्या पटीत वाढलेलं नाही. ऑफिस टाइमच्या ठरावीक वेळी तर चिक्कार गर्दी होते. ट्रेन लेट होतात. क्वचित बंदही होतात. त्या वेळी लगेच टीएफएल जादा बससेवा सुरू करते, पण हे अडकणं खूप वाईट असतं. माझ्या वाटय़ाला हा अनुभव सुरुवातीच्या काळात आला होता. त्यामुळे घरून वेळेआधीच निघण्याला मी प्राधान्य देतो.

इथे खूप पद्धतशीररीत्या कामं होतात. युनिव्हर्सिटीत यायच्या आधीच आठवडाभर मुंबईत मला वर्षभराचं टाइमटेबल मिळालं होतं. वर्ष संपत आलं तरी त्यातली एकही तारीख, वेळ बदललेली नाही. लेक्चर सुरू असताना वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांचं मोबाइल पाहाणं, खाणं किंवा कॉफी पिणं किंवा प्राध्यापक कॉफी घेत बोलणं हे बघून सुरुवातीला थोडासा धक्का बसला होता. त्यांना मात्र त्यात वेगळं वाटत नाही. युनिव्हर्सिटीच्या गाईडमध्ये सगळी माहिती व्यवस्थित दिलेली असते. ९९ टक्के गोष्टी इंटरनेटवर चालतात. त्यात सबमिशन, परीक्षा, निकालही आलाच. मी दोन सेमिस्टर्सची सबमिशन भारतात आलो असताना केली होती. युनिव्हर्सिटीतील सर्व स्तरांवरच्या व्यक्तींशी ईमेलवरून संपर्क साधता येतो. कामासाठी आवश्यक ती कागदपत्रं त्वरित उपलब्ध करून दिली जातात. प्राध्यापकही खूपच मदत करतात. सुट्टीच्या दिवशी केलेल्या ईमेलला ऑटो रिप्लाय आला तरी तो ईमेल तितकाच महत्त्वाचा असेल तर प्राध्यापकांचाही रिप्लाय येतोच. स्टुडंण्ट व्हिसाचे सगळे फायदे तुम्ही घ्या, असं आम्हाला कळकळीने सांगितलं जातं. माझ्या विविध कामांसाठी डॉ. डेव्हिड चॅम्पमन आणि डॉ. जिल डॅनिअल्स या टय़ूटर्सचं मोलाचं मार्गदर्शन मला लाभलं आहे.

‘क्रिकेटची पंढरी’ मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सची संस्कृती अनुभवण्यासाठी म्हणून मी ईमेल केला होता. ‘गेली ८ वर्षं मी फोटोग्राफी करत असून लॉर्ड्सवर फोटो काढायची संधी मला मिळावी’, असं त्या ईमेलमध्ये लिहिलं होतं. तिथे प्रवेश मिळणं ही गोष्ट तुलनेने दुर्मीळ आहे. आत्ता सांगतानाही पुन्हा आनंद वाटतोय की, त्यांचा दोन दिवसांत रिप्लाय आला. त्यात लिहिलं होतं, ‘तुला ही संधी देताना आनंद होतो आहे, फक्त युनिव्हर्सिटीतर्फे इन्शुरन्स पॉलिसी आणि तू तिथला विद्यार्थी असल्याचं पत्र सादर कर’. तोपर्यंत माझे टय़ूटर किंवा डिपार्टमेंटला याविषयी माहिती नव्हती. माझ्या ईमेलला लगेचच रिप्लाय करत टय़ूटरनी माझं अभिनंदन केलं आणि एक डॉक्युमेंट सोबत जोडून लिहिलं की, ‘त्यातला मजकूर योग्य आहे की नाही ते कळव, म्हणजे मी ते सही करून पाठवतो’. पुढचे सगळे सोपस्कार होऊ न मी तिथे गेलोही..

यूकेमधलं आमच्या युनिव्हर्सिटीचं स्पोर्ट्स सेंटर सर्वोत्तम सोयीसुविधांनी युक्त सेंटर मानलं जातं. या इनडोअर सेंटरमध्ये २०१२च्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी अमेरिकन टीम राहिली होती. एकही दिवस विनाटुर्नामेंटचा नसतो. जिम उत्तम आहे. सगळ्या खेळांचं प्रशिक्षण दिलं जातं. क्रिकेट, फुटबॉल आवडीने आणि आवर्जून पाहिलं जातं. सध्या फुटबॉल फीव्हर प्रचंड आहे. गाडय़ा-घरांवर झेंडे लावले जात आहेत.  इथे फुटबॉल वर्ल्डकप बघणं ही गोष्ट औरच. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सगळ्यांना खेळांबद्दल सगळी माहिती असते. कपडय़ांच्या दुकानात स्पोर्ट्स वेअरचा हमखास एक तरी विभाग असतोच. खेळाला कायमच प्रोत्साहन दिलं जातं. मी स्वत: बॅडमिंटन खेळतो आणि युनिव्हर्सिटीचं क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं. आमच्या युनिव्हर्सिटीत जवळपास शंभरहून अधिक स्पोर्ट्स स्कॉलर्स (त्यांचा खर्च युनिव्हर्सिटी करते) आहेत. त्यांना कुटुंबाचाही पाठिंबा मिळतो. युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांसाठीच्या वेलकम पार्टी आणि फ्रेशर्स पार्टीच्या निमित्ताने नाइट क्लब आणि पबमध्ये जाणं झालं. एकुणात इथे पार्टी कल्चर आहेच. विविध प्रश्नांवर समाजमाध्यमांवर व्यक्त होणं पुष्कळसं आपल्यासारखंच आहे. काही जण प्रत्यक्षात व्हिगन फूड, प्राण्यांविषयी चळवळ, मानवी हक्क, एलजीबीटी आदी चळवळींमध्ये सामील होतात. आपली मतं, विचार आदींची अभिव्यक्ती नृत्य, पेंटिंग, स्प्रे पेंटिंग, ग्राफिटी आदी माध्यमांतून व्यक्त करतात.

लंडनमधल्या ‘इम्पिरिअल वॉर म्युझिअम’मध्ये गेलो होतो, तो अनुभव फार लक्षात राहण्याजोगा होता. इंग्रज जगावर राज्य करत असतानाच्या काळात संग्रहित केलेल्या वस्तूंचा संग्रह इथे केला आहे. शिवाय ‘वर्ल्ड वॉर १ आणि २ गॅलरी’ही तिथे आहेत. त्या ठिकाणी होलोकास्ट सेक्शन पाहिल्याचंही आठवतं आहे. कारण हिटलर माझ्या आकर्षण आणि अभ्यासाचा विषय आहे. हे संग्रहालय बघणं हा माझ्या आठवणींतला एक महत्त्वाचा ठेवा ठरला आहे.

लंडनमधल्या जवळपास सगळ्या आर्ट गॅलरीज आणि म्युझियममध्ये विनाशुल्क जाता येतं. फोटोग्राफी आणि व्हिडीओ काढायला परवानगी आहे. नाटक, चित्रपट, संगीताची इथे क्रेझ असून जवळपास रोजच कॉन्सर्ट होतात. डान्स कल्चर आहे. इथे भारतीय सणवार साजरे केले जातात. उदाहरणार्थ, अलीकडेच रथयात्रेचं पन्नासावं वर्ष महापौरांच्या उपस्थितीत साजरं करण्यात आलं होतं. स्थानिकांना बरेचसे भारतीय पदार्थ आवडतात. आपली संस्कृती, सणांविषयी त्यांना कुतूहल वाटतं. आपणही आपल्या संस्कृतीचं महत्त्व ओळखायला हवं आणि ती जपायला हवी.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 3:22 am

Web Title: best of london london tourism london travel
Next Stories
1 ‘कट्टा’उवाच  : धडाकेबाज
2 ‘पॉप्यु’लिस्ट : कठिणोत्तम गाणी
3 कॅफे कल्चर : जिथे काळ थांबलाय!
Just Now!
X