02 June 2020

News Flash

फूडी ख्रिसमस

ख्रिसमस डिनरसाठी वेगवेगळ्या देशांतून बनणाऱ्या पाककृतींची ओळख

गेलं वर्षभर बारा शेफ आपल्याला जगभरातील खाद्यभ्रमंतीवर घेऊन गेले. शेफनामा सदराचा शेवट एका शेफच्या लेखानं करण्याऐवजी शेफ घडवण्याचं काम करणाऱ्या शिक्षकाकडून करत आहोत. अर्चना जंजाळ या हॉटेल मॅनेजमेंट ट्रेनिंगच्या क्षेत्रात गेली अनेक र्वष कार्यरत आहेत. अमेरिकन हॉटेल आणि लॉजिंग असोसिएशनकडून हॉस्पिटॅलिटी एज्युकेटर असं प्रमाणपत्रही त्यांनी मिळवलंय. हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट क्षेत्रात त्यांनी एम.टेक पदवी मिळवली असून मुंबईतील अनेक नामांकित हॉटेल मॅनेजमेंट इन्सिटय़ूट्समध्ये त्या लेक्चरर म्हणून कार्यरत आहेत. देशोदेशीच्या ख्रिसमस फूडबद्दल त्या आजच्या लेखातून सांगत आहेत. सोबत ख्रिसमस स्पेशल रेसिपी आहेतच.

बघता बघता २०१५ चा शेवटचा महिना संपत आलासुद्धा! वर्षअखेरच्या या दिवसात कसं वेगळंच उत्साही, उत्सवी वातावरण असतं. ख्रिसमसचा सण आणि त्यासाठी मिळणाऱ्या सुट्टय़ा.. पार्टीचे प्लॅन्स यामुळे मनात एक आगळीच प्रसन्नता असते. जणूकाही आपल्या मनातही डिसेंबरचा हा उत्सवी सोहळा सुरू असतो.
खरं तर ख्रिसमस २५ डिसेंबरलाच का साजरा होतो, यामागे बऱ्याच कथा, आख्यायिका आहेत. प्राचीन कथेप्रमाणे, ज्या पवित्र दिवशी, मदर मेरीला तिच्या पोटी एक दिव्यात्मा अर्थात जीझस जन्म घेणार आहे ही शुभवार्ता समजली होती, तो दिवस होता २५ मार्च. त्या दिवसापासून नऊ महिन्यांनी येणारा दिवस म्हणजे २५ डिसेंबर. मुळातच मनुष्यप्राणी उत्सवप्रिय असल्याने सण कोणत्याही धर्माचा असो, त्यानिमित्ताने मिळणारी सुट्टी मात्र सर्व जण तितक्याच आनंदात घालवतात. ख्रिसमसचा सण साजरा करताना घराची सजावट, विविध भेटवस्तूंची खरेदी हे सर्व होतच असते, पण या सणाला तऱ्हेतऱ्हेच्या खाद्यपदार्थाचीही रेलचेल असते. जगाच्या कानाकोपऱ्यात ख्रिसमसचा सण साजरा केला जातो. प्रत्येक देशातून, ख्रिसमससाठी खास पारंपरिक पाककृतीही केल्या जातात. सर्वच देशांतील ख्रिस्ती संस्कृतींमध्ये या सणाप्रीत्यर्थ स्पेशल ख्रिसमस डिनर बनवलं जातं. काही ठिकाणी हे ख्रिसमस डिनर ख्रिसमस इव्हला म्हणजे सणाच्या आदल्या संध्याकाळीच घेतले जाते, तर काही ठिकाणी ते ख्रिसमसच्या दिवशी घेतले जाते. या सणाशी निगडित अशा देशोदेशीच्या अनेक खाद्यपरंपरांची ओळख आपल्याला यानिमित्ताने करून देते.
इंग्रजी भाषिक देशांतून, ख्रिसमस प्लम पुडिंग किंवा ख्रिसमस पुडिंग ही पारंपरिक पाककृती बनवली जाते. हे बनवण्याची पद्धत खूपच वेळखाऊ आणि किचकट आहे, पण तितकीच इंटरेस्टिंग आहे. आजकाल हे पदार्थ बेकरीतूनच विकत आणले जात असले, तरी बऱ्याच घरांतून ही पाककृती पारंपरिक पद्धतीने बनवली जाते. या पारंपरिक पुडिंग बनवण्याच्या पद्धतीत घरातल्या सगळ्यांना सामील करून घेतलं जातं. हे पुडिंग बनवणं आणि ख्रिसमसच्या दिवशी खाणं हा एक सोहळाच होऊन जातो. तसं पाहायचं झालं तर, या पाककृतीचा उगम मध्ययुगीन कालखंडात फळं टिकवून ठेवण्यासाठीच्या पद्धतीतून झाला. पारंपरिक पुडिंग रेसिपी ख्रिसमसच्या आधी सहा आठवडे तयार केली जाते. हे पुडिंग एका कपडय़ात बांधून, थंड जागी ठेवलं जातं. या पुडिंगसाठी लागणारं मिश्रण बरंच आधी बनवलं जातं आणि ख्रिसमसच्या सहा आठवडय़ांपूर्वीच्या रविवारी, हे मिश्रण एका विशिष्ट पद्धतीने (लाकडी चमच्याच्या साहाय्याने क्लॉकवाइज डायरेक्शनने पूर्व पश्चिम दिशेनं) ढवळलं जातं. या वेळी घरातील सर्व सदस्य डोळे बंद करून मनात काही इच्छा धरतात. ती पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे. पुडिंग मिक्स हलवायची ही पद्धत म्हणजे जणू काही जीझस बाळाला पाळण्यात ठेवून आंदुळले जात आहे या कृतीचे प्रतीक मानण्यात आलेली आहे. ही परंपरा खूप शुभकारक मानली जाते. तर असा हा रेसिपी बनवण्याचा रविवार ‘स्टर अप संडे’ म्हणून ओळखला जातो. हे सगळ्यांनी हलवलेलं मिश्रण आधी आठ तास डबल बॉयलर पद्धतीनं उकडणं आवश्यक असते. असं तयार पुडिंग थंड ठिकाणी वरून कापड अंथरून ठेवलं जातं. ख्रिसमस डिनरच्या वेळी पुडिंगवरचं कापड काढलं जातं आणि सव्‍‌र्ह करण्याआधी पुडिंगवर ब्रॅण्डी ओतून पेटवलं जातं. रात्रीच्या अंधारात या जळत्या पुडिंगचा सोहळा सुरेख दिसतो आणि चवही छान खरपूस लागते.

ख्रिसमस डिनरसाठी वेगवेगळ्या देशांतून बनणाऱ्या पाककृतींची ओळख:
मेन कोर्स
अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांतून ख्रिसमस डिनरमध्ये ‘टर्की’ ही पाककृती प्रमुख मानली जाते. ऑस्ट्रिया आणि डेन्मार्कमध्ये ‘गूज’, चेक रिपब्लिकमध्ये ख्रिसमस डिनरसाठी फ्राइड कार्प (गोडय़ा पाण्यातला मासा) असतो, तर स्वीडन आणि फिनलंड येथे ‘हॅम’ बनवलं जातं. हॉन्डूरासमध्ये ‘रोस्ट पोर्क’, फिलिपाइन्समध्ये ख्रिसमस इव्हला फ्राइड ईल (एक प्रकारचा मासा) सव्‍‌र्ह केला जातो. दक्षिण इटलीत लॅम्ब किंवा फिश बनवलं जातं. नॉर्वेमध्ये पोर्क बेली किंवा मटण रिब्ज हे पदार्थ सव्‍‌र्ह केले जातात. तर पोर्तुगालमध्ये मिठाच्या पाण्यात शिजवलेले कॉडफिश. पूर्व युरोपातील देशांमध्ये मात्र या दिवशी उपास पाळला जातो, त्यामुळे संपूर्ण शाकाहारी बारा पदार्थ ख्रिसमस डिनरसाठी बनवले जातात. ‘टमालेज’ हा पदार्थ मेक्सिकोमध्ये बनवला जातो.

ख्रिसमससाठीची खास पेयं
ख्रिसमसच्या सणासाठी डेन्मार्कमध्ये स्पेशालिटी ख्रिसमस बीअर, स्वीडनमध्ये श्नॅप्स, ऑस्ट्रिया, जर्मनी आणि स्कँडेनॅव्हिया येथे म्यूल्ड वाइन, तर अमेरिका, कॅनडामध्ये एग नॉग सव्‍‌र्ह केली जाते.

ख्रिसमस स्पेशल ब्रेड
स्लोव्हाकियात पोटिका, फ्रान्समध्ये बच द नोएल, इटलीत पॅनाटोन असे खास ख्रिसमस ब्रेड बनवले जातात.

ख्रिसमससाठीची पक्वान्नं
फ्रान्समध्ये जिंजर ब्रेड, पेस्ट्री बिस्किट, तर स्कॉटलंडमध्ये स्पाइस्ड कुकीज, जर्मनीत ख्रिसमस पुडिंग, फ्रुट केक, यूल लॉग (एक प्रकारचा केक), मिन्स पाय (सुकवलेली फळे घालून केलेली पेस्ट्री हे पदार्थ ब्रिटनमध्ये ख्रिसमसनिमित्त बनवले जातात. तर अमेरिका आणि कॅनडामध्ये कँडी केन्स फार लोकप्रिय आहेत.

रोस्ट चिकन विथ ब्रेड स्टफिंग
साहित्य : शिळ्या ब्रेडचे तुकडे ५०० ग्रॅ, भाजलेले अक्रोड २०० ग्रॅ, सेलरीे (दांडे चिरलेले) १ जुडी, चिरलेले कांदे २, बटर १०० ग्रॅम, 15सफरचंद (सोलून चिरलेलं) १, बेदाणे १०० ग्रॅम, हिरवे ऑलिव्ह ५ ते १०, चिकन स्टॉक १ ते २ कप, चिरलेली पार्सली ३० ग्रॅम तमालपत्र, मिरी पावडर, मीठ, चिकन दीड किलो, कांदे, गाजर प्रत्येकी २, लसणीचा गड्डा १, सेलरी २ काडय़ा, लिंबू १, मिक्स हर्ब्स (थाइम, रोझमेरी, तमालपत्र) किंवा यांची पावडर, ऑलिव्ह ऑइल, मिरी पावडर.
कृती : ऑलिव्ह ऑइल, मीठ, लिंबू रस, मिरी पावडर, आणि चिरलेले ताजे हब्र्ज एकत्र करा. हे तयार मिश्रण, चिकनला चोळून मॅरिनेट करण्यासाठी फ्रीजमध्ये कमीत कमी १ तासासाठी ठेवून द्या.
स्टफिंग : ब्रेडचे तुकडे, बटरमध्ये कुरकुरीत भाजून घ्या. त्याच कढईत कांदे आणि सेलरी परतून घ्या. त्यात ब्रेड तुकडे, अक्रोड, सफरचंद, बेदाणे, ऑलिव्ह आणि पार्सले, १ कप स्टॉक किंवा पाणी, मीठ, मिरी, तमालपत्र हे सर्व घालून, झाकण घालून, मंद आचेवर, सफरचंदे मऊ होईपर्यंत ठेवून द्या.
ओव्हन २४० डिग्रीला प्रीहीट करा. बेकिंग ट्रेला आतून बटर/ तेल लावून त्यात भाज्यांचे मोठे तुकडे घाला, फ्रीजमध्ये ठेवलेल्या चिकनच्या आत तयार स्टफिंग भरा आणि चिकनच्या ब्रेस्टची बाजू खाली असेल या प्रकारे, बेकिंग ट्रेतील भाज्यांवर ठेवा आणि २०० डिग्रीवर १५ मिनिटांसाठी बेक करा. चिकन किंवा भाज्या करपू नयेत यासाठी थोडे पाणी चिकन स्टॉक बेकिंग ट्रेमध्ये घाला.
सॉस : २ कप स्टॉक, ५ मिली वाइन, १०० मिली टोमॅटो प्युरी, १ टेबलस्पून मैदा, हे सर्व भाजलेल्या भाज्यांवर घालून १० मिनिटांसाठी उकळा व नंतर गाळून घ्या. तयार चिकन, स्टफिंग आणि सॉसबरोबर सव्‍‌र्ह करा.

16
स्पेशल ख्रिसमस ट्रिफल

पूर्व तयारी : २० मिनिटे, पाककृती बनवण्याचा वेळ : १० मिनिटे, प्रमाण – सहा ते आठ जणांसाठी)
साहित्य : कस्टर्डसाठी -अंडय़ाचा पिवळा बलक ३, साखर २ टेबलस्पून, कॉर्नफ्लोर १ टेबलस्पून, दूध ३७५ मिली., व्हॅनिला इसेन्स- अर्धा टेबलस्पून.
इतर साहित्य : ब्रँडी/ शेरी/ रम – १८५ मिली, सुकवलेल्या फळांचे तुकडे २०० ग्रॅम, (बेदाणे, खजूर, अंजीर, संत्रे, लिंबू, सल्तानाज (छोटे बेदाणे), मनुका- बेदाणे जातीची फळे), ग्लेस्ड चेरीज (पाकातल्या) आणि ग्लेस जिंजर ६० ग्रॅम, सजावटीसाठी व्हिप्ड क्रीम २५० मिली.
कृती : साखर आणि कॉनफ्लॉर घालून दूध उकळावे, दूध थोडे थंड झाल्यावर त्यात अंडय़ाचे मिश्रण घालून मध्यम आचेवर सतत हलवत शिजवावे. व्हॅनिला इसेन्स घालून थंड करण्यास ठेवावे. १२५ मिली ब्रँडी/ शेरी/ रम पॅनमध्ये घ्यावी. त्यात सुकवलेली फळे घालून मध्यम आचेवर शिजवून घ्यावी.
काचेच्या एका मोठय़ा बाऊलमध्ये किंवा छोटय़ा छोटय़ा बाऊसमध्ये खाली केकचा चुरा घालून, वर उरलेलं मद्य आणि फळं घालावीत. आलं घालून ढवळून थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावं. बाऊलमधील थंड झालेल्या मिश्रणावर कस्टर्ड ओतून, वरून व्हिप्ड क्रीम आणि ग्लेस्ड चेरीज आणि इतर फळांनी सजवून सव्‍‌र्ह करा.
(अनुवाद – गीता सोनी )
viva.loksatta@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2015 1:47 am

Web Title: christmas special recipes
टॅग Viva
Next Stories
1 पार्टी मूड
2 फॅशन फ्लॅशबॅक
3 डिजिटल गोळाबेरीज
Just Now!
X