हा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी

एका नामांकित उद्योगसमूहाने दुसऱ्या समूहाला खरेदी करणं हे उद्योगजगतात सहज होत असतं; पण अगदी अलीकडे एक प्रसिद्ध ब्रॅण्ड विकला गेल्याचं वाचून बऱ्याच जणांनी हळहळ व्यक्त केली. तो ब्रॅण्ड म्हणजे निर्लेप. या ब्रॅण्डचं आद्यत्व आणि मराठी नातं लक्षात घेता अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याच ब्रॅण्डची ही कहाणी.

special helmets for soldiers
कुतूहल : सैनिकांसाठी खास हेल्मेट..
What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’

नॉनस्टिक भांडी भारतीयांसाठी पहिल्याने उपलब्ध करणारा ब्रॅण्ड म्हणून निर्लेप विशेष आहे. कोटिंग तंत्रज्ञान पहिल्याने वापरणारा हा ब्रॅण्ड १९६८ साली औरंगाबादमध्ये जन्माला आला. त्या काळी स्टीलचा तुटवडा होता. स्टीलचा भाव चढा असायचा. अशा वेळी नॉनस्टिक, पण कमी खर्चात तयार होतील अशी भांडी निर्माण करण्याचा निर्णय निळकंठ भोगले या मराठी उद्योजकाने घेतला. पॉलीटेट्राफ्लुओरोथिन या घटकाचा (पीटीएफई) वापर करत त्यांनी हाताळायला सोपी आणि स्वच्छ करायला सहज, अशी नॉनस्टिक भांडी तयार केली. या भांडय़ांचं वैशिष्टय़ त्यांच्या नावात सामावलेलं होतं. तोच हा ब्रॅण्ड निर्लेप.

निर्लेपचं पहिलं उत्पादन होतं एफ.पी.२४. हा अनोखा फ्राय पॅन सर्वात आधी मुंबईकरांच्या भेटीला आला. कोणतंही नवं उत्पादन बाजारात आणताना उत्पादकाच्या मनात धाकधूक असतेच, पण नॉनस्टिक ही पूर्णपणे नवी कल्पना होती. त्याआधी तसं काहीच वापरण्यात आलं नव्हतं. त्यामुळे हा ब्रॅण्ड कसा स्वीकारला जाईल याची शंका जास्त मोठी होती; पण निर्लेप बाजारात आलं आणि भांडीजगतातील अनेक गोष्टी मुळापासून बदलल्या. निर्लेपचं रूप, उपयोग सगळं वेगळंच होतं. स्त्रीवर्गाने हा ब्रॅण्ड उचलून धरला. नॉनस्टिक संकल्पना रुजवण्याचा मान या ब्रॅण्डकडे असल्याने नॉनस्टिक या संकल्पनेला ‘निर्लेप’ हा पर्यायी शब्द निर्माण झाला. तुमच्याकडे नॉनस्टिक भांडी आहेत का, या प्रश्नाऐवजी निर्लेप नाही का? ही विचारणा या भांडय़ांचं यशच दाखवते. पुढे नॉनस्टिक भांडय़ांचे अनेक ब्रॅण्ड निर्माण झाले, पण त्यांचं दुर्दैव असं की, नाव कोणतंही असो, त्यांच्यावर शिक्का नेहमी निर्लेपचाच बसत राहिला. भारतात विविध प्रांतांत अन्न शिजवण्याच्या पद्धतीतलं वैविध्य अचूक हेरत निर्लेप तवा, हंडी, फ्रायपॅन अशी अनेक भांडी बाजारात उपलब्ध होत गेली आणि त्यांना तितकाच प्रतिसाद मिळत गेला. ८५ वितरक आणि ९५०० आऊटलेटमधून निर्लेप घराघरांत पोहोचलं. एका प्रसिद्ध इटालियन बेकवेअर कंपनीला आपल्या भांडय़ांना एसबीएस कोटिंग पद्धती उपलब्ध करून देणारे अ‍ॅप्लिकेटर हवे होते. जगभरातून त्यांनी अनुभवाच्या जोरावर निर्लेपची निवड केली. जागतिक पातळीवरही निर्लेपने आपला ठसा उमटवला. सौदी अरेबिया, दुबई, मालदीव, श्रीलंका, युरोपियन देशांमध्ये निर्लेप निर्यात होत होते. तशा जागतिक दर्जाचे उत्पादन त्यांनी प्राप्त केलेआहे. दर वर्षी १.२ लाख किचनपॅन निर्लेप तयार करतं.

निळकंठ भोगलेंनंतर राम, मुकुंद आणि नित्यानंद भोगलेंनी निर्लेपची जबाबदारी काळाची पावलं ओळखून स्वीकारली; पण व्यवसाय म्हटला की काही वेळा काही गणितं मनासारखी जुळत नाहीत तसंच काहीसं निर्लेपच्या बाबतीत घडलं. ५०व्या वर्षांत पदार्पण केल्यावर सुवर्णमहोत्सवी वर्षांत कंपनी बजाज इलेक्ट्रिकल्सला विकावी लागणं दुर्दैवी असलं तरी बजाज उद्योगसमूहाच्या समर्थ छत्रछायेत हा ब्रॅण्ड अधिक मोठा होत राहील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. नव्या समीकरणांसह निर्लेप आपल्याला भेटत राहणार आहे.

काही ब्रॅण्ड म्हणजे परंपरा होऊन जातात. एके काळी निर्लेपची भांडी स्वयंपाकघरात विराजमान असणं ही घरोघरीची परंपरा होती. ‘डोसे चांगले होत नाही? निर्लेपवर करून बघ’ किंवा ‘या दिवाळीत काही झालं तरी निर्लेप हंडी घ्यायचीच आहे’ ही केवळ वाक्यं नाहीत. त्यात त्या ब्रॅण्डबद्दलचा विश्वास, प्रेम सारं काही आहे. मालकी बदलली तरी ते खचितच बदलणार नाही. प्रेम, विश्वासाचं हे कोटिंग कायम राहील. कोणत्याही उणिवेच्या लेपाशिवाय.. अगदी निर्लेप..

रश्मि वारंग viva@expressindia.com