• अमेरिकेत मुलाला ‘गाय’ म्हणतात तर भारतात गवत खाणाऱ्या प्राण्याला ‘गाय’ म्हणतात.
  • भारतात काही बोलीभाषांमध्ये स्त्रीला प्रेमाने ‘बाय’ अशी हाक मारतात.
  • भारतीय वंशाच्या गाई या ‘बॉस इंडिकस’ या वंशाच्या आहेत. त्यात हरयाणी, साहिवाल, गीर, गौळाउ, देवणी, खिल्लारी, डांगी, कांकरेज, कंधारी, थारपारकर, गुंतुर, अंगोला, गावठी इत्यादी प्रकारच्या गाईंचा समावेश होतो.
  • भारतीय वंशाच्या अधिकतम स्त्रिया या ‘सोशिक सती-सावित्री’ या वंशाच्या आहेत. त्यात कोणत्या प्रकारच्या (त्यांना वापरली जाणारी विशेषणं) स्त्रियांचा समावेश होतो हे लिहिणं उचित होणार नाही.
  • गाय हा एक सस्तन प्राणी आहे.
  • बाय (स्त्री) ही मनुष्यप्राणी आहे.
  • हिंदू धर्मात गाय हे पावित्र्याचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे.
  • विशिष्ट धर्मामध्येच नाही तर सबंध मनुष्यजातीसाठी स्त्री पावित्र्याचे, संपन्नतेचे, मांगल्याचे प्रतीक आहे.
  • जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेद’ आहे. त्यात गाईचे स्थान उच्च आहे असे सांगणारा एक मंत्र आहे.
  • पृथ्वीवर अवतरलेल्या पहिल्या मानवाची गोष्ट सांगताना ‘अ‍ॅडम’ इतकेच महत्त्वाचे स्थान ‘इव्ह’ला देखील दिले जाते.
  • ऋग्वेदात प्रत्येक विचारशील पुरुषास निर्देश केला आहे की तुम्ही गाईस माता, बहीण व कन्या या समान समजा. त्यांना केव्हाही मारू नका. गाय निर्दोष व निरपराध आहे.
  • जगातील कोणत्या ग्रंथात असे म्हटले आहे की स्त्री-भ्रूण हत्या करा, तिला वाईट वागणूक द्या, पुरुषांच्या नजरेत कमी लेखा, तिच्यासाठी अपशब्द वापरा, स्त्रीला मारहाण करा?

‘गाय आणि स्त्री’ यांच्याबद्दल हा फरक स्पष्ट करण्यामागचे कारण म्हणजे सध्या देशात गाईला महिलांपेक्षा अधिक महत्त्व आणि सुरक्षितता प्राप्त झाल्याचे चित्र आहे. भारतात दर पंधरा मिनिटाला एका बलात्काराची नोंद होते, असे सरकारी आकडेवारीच सांगते. याबाबत देशात लोक  पेटून उठत नाहीत. परंतु, एखाद्याने गाईचे मांसदेखील बाळगले असल्याचा संशय आला तर त्या व्यक्तीला आपला सहिष्णू समाज चांगलाच धडा शिकवतो. गेल्या दोन-तीन वर्षांत अशा घटना वरचेवर घडत आहेत आणि त्यांच्या या  हिंसक  वागण्याचे समर्थन होताना दिसतेय. मानसिक आणि शारीरिक अत्याचारांना बळी पडणाऱ्या महिलांबाबत उघडपणे बोलणे मागासपणाचे लक्षण समजले जाते. त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणीही खुलेआम अत्याचार होत असताना केवळ धर्माच्या आणि संस्कृतीच्या नावाखाली मूग गिळून बसणेच पसंत केले जाते.

मूळच्या कोलकाताच्या असलेल्या सुजात्रो घोष या तरुण छायाचित्रकारालाही अनेक दिवस या गोष्टी खुपत होत्या. दादरी हत्याकांडाने तर सुजात्रोला आणखीनच चिंतेत टाकले. गेल्या दोन वर्षांत उजव्या विचारसणीच्या लोकांनी विशिष्ट समाजाच्या जवळपास दोन डझन लोकांना लक्ष्य केले आहे. गाईच्या बाबतील इतका आक्रमक होणारा समाज स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत मात्र गप्प बसतो. हा विषय लोकांपर्यंत कसा पोहोचवायचा याबाबत सुजात्रो विचार करीत होता. कारण हा विषय म्हणजे धर्म आणि राजकारणाचे धोकादायक मिश्रण आहे. पण या संवेदनशील छायाचित्रकाराला एक कल्पना सुचली. अलिकडेच अमेरिकावारीवर गेलेल्या सुजात्रोने तिथून येताना  एक गाईचा मुखवटा विकत आणला. महिलांच्या डोक्यावर तो मुखवटा चढवून त्याने पर्यटकांची गर्दी असलेली ठिकाणं, सरकारी इमारती असलेले रस्ते, घरात,  बोटीत, ट्रेनमध्ये अशा ठिकाणी छायाचित्रे घेतली आणि सोशल मीडिया हॅण्डलवर (मुख्यत: इन्स्टाग्रामवर) पोस्ट केली. कारण या प्रत्येक ठिकाणी स्त्री असुरक्षित आहे. हे अभियान म्हणजे मूक निषेधाचा एक प्रकार असून त्याने नक्कीच योग्य तो परिणाम साधला जाईल, असा विश्वास सुजात्रोला होता आणि तसेच झाले. ही छायाचित्रे गेले काही दिवस सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतायेत. जगभरातील प्रसारमाध्यमांनीसुद्धा हा विषय चांगलाच उचलून धरलाय. दिल्ली, कोलकाता येथून कॅम्पेनला सुरुवात केल्यानंतर  त्याला मुंबई, गोवा आणि बंगळूरुमध्येही त्याला कोम करायचे आहे. त्यासाठी त्याने क्राऊड फंडिंग कॅम्पेन सुरू केले असून मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे.

या मोहिमेला एकीकडे लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय तर दुसरीकडे धमक्याही येत आहेत. ट्विटरवर ट्रोलिंग सुरू झालंय. ‘तुला आणि तुझ्या मॉडेल्सना दिल्लीतील जामा मशिदीच्या इथे नेऊन कत्तल केली पाहिजे आणि ते मांस राष्ट्रवादाचा तिरस्कार करणाऱ्या महिला आणि महिला पत्रकारांना खाऊ  घातले पाहिजे,’ अशा धमक्या त्याला दिल्या जात आहेत. या ट्रोल्सची आणखी एक विकृत इच्छा आहे, ‘त्यांना माझ्या मृतदेहाच्या शेजारी बसून माझ्या आईला रडताना पाहायचे आहे,’ असे सुजात्रो सांगतो.

प्राणी असो वा मनुष्यप्राणी, मतभेद असणारच पण ते कोणत्या बाबतीत असावेत यालादेखील काही अपवाद आहेत. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या वाईट गोष्टींकडेही लिंग, धर्म, जात, भाषा याच चष्म्यातून पाहिले जात असेल तर समाज म्हणून आपण कुठे तरी चुकतोय हे नक्की. सुजात्रोने मांडलेला विषय काही नवीन नाही पण त्याची संकल्पना मात्र अभिनव आहे. ती प्रभावी ठरत्येय म्हणूनच त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय आणि विरोधही होतोय. पण त्याच्या कॅम्पेनमधील छायाचित्रे किती व्हायरल होतायत यापेक्षा त्यामागचा संदेश किती लोकांपर्यंत पोहोचतोय हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरणार आहे.

viva@expressindia.com