12 December 2017

News Flash

दसऱ्याचं खाऊपुराण

दसऱ्याला कित्येक घरात श्रीखंड-पुरी, बासुंदी अशा ठरावीक पदार्थाची हजेरी असते.

मितेश जोशी | Updated: September 29, 2017 12:31 AM

दसरा आणि गोडाचे अतूट समीकरण आहे. आनंदाला नाही तोटा म्हणत येणाऱ्या या सणासाठी गोडधोड हवंच. दसऱ्याला कित्येक घरात श्रीखंड-पुरी, बासुंदी अशा ठरावीक पदार्थाची हजेरी असते. या वेळी आपला फिटनेसही सांभाळत दसऱ्याचा गोडवा टिकवण्यासाठी म्हणून या काही खास थोडय़ाशा वेगळ्या तिखट-गोड रेसिपीज.

खजुराचे पुडिंग

साहित्य :  खजूर   २५० ग्रॅम, साखर   २५ ग्रॅम, साईसकट दूध  १ कप, व्हॅनिला इसेन्स १ चमचा, जिलेटिन पावडर १ चमचा

पाककृती : २५० ग्रॅम खजूर सर्वप्रथम धुवावेत व गरम पाण्यात रात्रभर भिजत घालावेत. जेणेकरून खजूर मऊ  होतील. त्यानंतर खजुराच्या बिया वेगळ्या कराव्यात. व खजूर मिक्सरमधून बारीक करावा. जिलेटिन कोमट पाण्यात विरघळून घेऊ न गाळणीतून गाळावे. नंतर वाटलेला खजूर, साखर, साईचे दूध व जिलेटिन एकत्र करून ते चमच्याच्या आधारे एकजीव करावे. त्यानंतर त्यात एक चमचा व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण पुन्हा एकजीव करावे. तयार पुडिंग काही काळ फ्रीजमध्ये ठेवून थंडगार खजुराचे पुडिंग सव्‍‌र्ह करावे.

अ‍ॅपल टिक्का

साहित्य : चक्का – १ वाटी, सफरचंद – ३ नग, मीठ – १ चमचा, चिली फ्लेक्स – १ चमचा,  आलं-लसूण पेस्ट – २ चमचे, हळद – पाव चमचा, चाट मसाला – १ चमचा, सरसो तेल – १ चमचा

किसमिस चटणी : किसमिस अर्धी वाटी, तिखट चवीनुसार, अध्र्या लिंबाचा रस, मीठ सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करा.

पाककृती : सफरचंदाचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. अर्धा सफरचंद, दही, आलं-लसूण पेस्ट, हळद, मीठ, चिली फ्लेक्स मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट करा. त्यात उर्वरित अडीच सफरचंदाचे तुकडे बुडवून ठेवा. त्यानंतर एका सळईला लावून तंदूरवर भाजून घ्या. भाजताना त्यावर सरसोचे तेल लावा. वरून चाटमसाला लावून किसमिस चटणीबरोबर सव्‍‌र्ह करा.

कोजागिरीचे दूध

साहित्य : ४ लिटर म्हशीचे दूध, १ वाटी साखर, १ टीस्पून जायफळ पूड, १५-१६ काजू, ८-१० बदाम, पाव वाटी चारोळी

कृती : सर्वप्रथम चार लिटर दूध आटवून घेणे. तसेच काजू-बदामाची मिक्सरमध्ये जाडसर भरड पूड तयार करणे. आटवलेल्या दुधात साखर, जायफळ पूड, काजू-बदामाची भरड पूड घाला व दूध नीट हलवून घ्या. सगळ्यात शेवटी चारोळी घाला व मंद आचेवर दूध पुन्हा पाच मिनिटं उकळत ठेवा. नंतर दूध सव्‍‌र्ह करा.

पीयूष

साहित्य : ४ वाटय़ा गोड ताजे दही, १०० ग्रॅम साखर, १ चमचा श्रीखंड, जायफळ पूड, केशर

पाककृती : प्रथम दही, श्रीखंड व साखर मिक्सरमधून घुसळून घ्यावे. त्यात जायफळाची पूड व केशर घालून चांगले घुसळून घ्यावे. सव्‍‌र्ह करताना त्यात बर्फाचा खडा टाकावा.

सफरचंदाचा हलवा                                  

साहित्य : वेलची ७-८, २५ ग्रॅम बदाम, पिस्ते, चारोळी, सफरचंद ४, खवा २५० ग्रॅम, साखर १५० ग्रॅम

कृती : सफरचंदाची साले व बिया काढून घ्याव्यात व किसणीने किसून घ्यावी. साखरेत थोडे पाणी घालून पाक करीत ठेवावा. पाक दोन तारी झाला की त्यात किसलेले सफरचंद घालून मंद आचेवर ढवळत राहावे. मिश्रण घट्ट झाले की त्यात खवा घालून मंद आचेवर सतत ढवळत राहावे. मिश्रण चांगले झाले की वेलचीची पूड, बदामाचे काप करून घालावे. मिश्रण चांगले घट्ट झाले की त्यात पिस्त्याचे काप व चारोळी घालून सफरचंदाचा हलवा सव्‍‌र्ह करावा.

First Published on September 29, 2017 12:31 am

Web Title: dasara 2017 dasara special food sweet food on dasara