दिवाळी.. चार दिवसांच्या या सणाचं होतं तितकंच मोठ्ठं सेलिब्रेशन.. आनंद नि उत्साही वातावरणात आपले कुटुंबीय नि मित्रमंडळी सामील होतात. तसंच या सेलिब्रेशन मूडमध्ये आपलं घरही सामील होतं ते त्याच्या सजावटीसह. किंबहुना घराच्या सजावटीची जबाबदारी अनेकदा यंगस्टर्स आपणहून घेतात नि घराचा थोडासा मेकओव्हर होऊन जातो. दर वेळी या मेकओव्हरसाठी खूप कष्ट किंवा पैसे खर्च करण्याची गरज असते, असंही नाही. अगदी छोटे छोटे बदल केले तरीही घराचा पालटलेला सेलिब्रेशन मूड हमखास कळतो. होम डेकोरसाठी लागते ती एक कलात्मक दृष्टी नि थोडेसे वेगळे प्रयोग करून बघण्याची जिद्द. कधी त्याची सुरुवात होते ती घरात असलेल्या वस्तूंचा वापर करून किंवा मग कधी ‘ओम गुगलाय नम:’ म्हणत यूटय़ूबसारख्या साधनांच्या साहाय्यानं क्रिएटिव्ह गोष्टी शिकल्या जातात. तर कधी रीतसर कलाशिक्षण घेतलेल्यांना नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळी वाट चोखाळाविशी वाटल्यानं वेगवेगळ्या फॉम्र्समधून कलेची अभिव्यक्ती होते.

रचना संसदमधील ‘एफवाय’च्या चिन्मय जोसुलकर, अव्दैत जाधव, अंकित गांधी, सिद्दांत चौधरी, विष्णू नायर, आदित्य दहिवडकर नि मोनीश चिटणीस या विद्यार्थ्यांचा प्रीझम ग्रुप. कॉलेजमध्ये ओळख होऊन फॉर्म झालेला हा ग्रुप वॉल पेंटिंग, ग्राफिक्स, फोटोग्राफी, मखर, पेंटिंग, पोट्र्रेट, लोगो तयार करणं असं क्रिएटिव्ह वर्क करतोय. केवळ असाइनमेंट नि प्रोजेक्टव्यतिरिक्त आपल्या कल्पनाशक्तीला वाव
मिळून अनुभव मिळवण्याच्या हेतूने ते हे काम करताहेत. त्यामुळं त्यांच्या कलादृष्टीला व्यापक अवकाश मिळू शकेल असं त्यांना वाटतंय. काम हाती आल्यावर इंटरनेटपासून चार हात लांब राहून ते विचारशक्तीला चालना देत आपापल्या कल्पना मांडतात. चर्चा करतात.

ते पेपरवर्क क्लाएंटला दिलं जातं. त्यातून सिलेक्शन होऊन काम पूर्ण होतं. त्यांच्या पहिल्याच वॉलपेंटिंगला अनेकांची दाद मिळाली असून काही ऑर्डर्सही मिळाल्यात. कामाच्या वेळी नाही पण काम झाल्यावर ते फेसबुकवर अपोलोड केल्यानं अनेकांपर्यंत पोहोचतंय. त्यातून नि ओळखीपाळखीतून त्यांना ऑर्डर्स मिळताहेत. अधिकाधिक कौशल्यं शिकून घेऊन, ग्रुप वाढवणं आणि कलासाधना चालू
ठेवणं हे या ग्रुपचं ध्येय आहे. लक्ष्मी शिवरामननं स्वत:चा लहानपणापासूनचा छंद जोपासण्यासाठी क्रिएटिव्ह फिल्ड निवडलं नि मग तिच्या हातून घडू लागल्या कलाकृती. कल्पना नि कलेच्या बळावर ती या छंदाचं रूपांतर व्यवसायात करतेय. गेली तीन र्वष ती डिझाइनर पर्यावरणस्नेही पणत्या तयार करतेय. या एथनिक लुकच्या पणत्या कुंदन, रंगीत स्टोन्स वापरून सजवल्या आहेत. यंदा तिनं सिक्वीन्स वर्क केलेले डिझाइनर प्लेटसहित दिवे तयार केलेत. त्यात मेण नसल्यानं ते करंडा म्हणूनही वापरता येतील. शिवाय सिक्वीन्स वर्कची एन्व्हलप्सही आहेत. व्यवस्थित काळजी घेऊनही सिक्वेन्स वर्कमधला एखादा स्टोन पडला वगैरे तर ती त्यात सशुल्क स्टोनवर्क किंवा मॉडिफिकेशन करून देते. बर्थ डे रिटर्न गिफ्ट किंवा कॉर्पोरेट गिफ्ट म्हणूनही ते देता येऊ शकतात. आपल्या आवडत्या रंगछटांसह हे गिफ्ट रॅप करून मिळतं. तिचं फेसबुक पेज असून त्यासह तिनं व्हॉट्स अ‍ॅपचाही वापर सुरू केलाय. सोशल मीडियावर प्रॉडक्ट्सचं चांगलं प्रमोशन करता येऊ शकतं असं तिला वाटतं.

आईच्या कलागुणांचा वारसा चालवणारी दिव्या वर्तक रमतेय ती मोती-मण्यांच्या दुनियेत. खालसा कॉलेजमध्ये टीवाय बी.एस्सी.ला असणारी दिव्या आईचं बघून कलावस्तू करायला शिकलेय. दिवाळीतल्या टिपिकल कंदिलांपेक्षा मोती-मणी वापरून तयार केलेले छोटे-मोठे कंदील अनेकांच्या आकर्षणाचा विषय ठरलेत. ते करतानाच कंदिलांच्या तोरणाची कल्पना सुचली नि त्यालाही दाद मिळाली. सणावारांच्या दिवसांत तोरणं, महिरप, स्वस्तिकांना मोठी मागणी असते. निळा, गुलाबी, हिरवा, जांभळा, आकाशी रंगीत मणी आणि पिवळा-पांढऱ्या मोत्यांच्या कॉम्बिनेशननं या वस्तू आपल्या आवडीच्या रंगसंगतीत करून घेता येतात. या वॉशेबल वस्तूंच्या प्रमोशनसाठी तिनं व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा वापर सुरू केला असून त्यावरून चांगला प्रतिसाद मिळतोय. अनेकांना घरगुती टच असणाऱ्या वस्तूंची आवड असून त्यावरचा विश्वास अजूनही कायम आहे, असं ती सांगते.
राधिका कुंटे  viva.loksatta@gmail.com