News Flash

सुर्रर्र के पियो!

या वेळी गरमागरम ‘पावसाळी लज्जतदार सूप’च्या रेसिपी आणल्या आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

मितेश जोशी

सरासरीच्या तुलनेत जुलै महिन्यात पावसाळ्याची ‘धारदार’ बॅटिंग यंदा मुंबई उपनगरांत झाली आहे. पावसाळ्यात अनेक सहलप्रेमी कर्जत-खोपोलीच्या धबधब्यांकडे कूच करतात, परंतु यंदाच्या वर्षी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हे धबधबे बंद करण्यात आल्याने अनेक तरुण टोळी पावसाळी सहलीच्या ऐवजी पावसाळी खाबूगिरी करताना दिसत आहेत. कोण्या एका मित्राच्या घरी जमून त्याच्या किचनमध्ये सर्व मित्रांच्या साहाय्याने पदार्थाना फोडणी देऊन गप्पा, गाणी व धमाल केली जाते आहे. पावसाळी खाबूगिरीमध्ये भजी व चहाला अग्रस्थान आहे. गेल्या लेखात आम्ही ‘व्हिवा’च्या वाचकांसाठी त्याच्या रेसिपी दिल्या होत्या. या वेळी गरमागरम ‘पावसाळी लज्जतदार सूप’च्या रेसिपी आणल्या आहेत. मातीच्या सुगंधाबरोबर गारेगार वाऱ्याच्या साथीला, चटकमटक सूपाचे चटके जिभेवर अनुभवण्यासाठी शेफ प्रसन्न घवी यांनी लज्जतदार आणि पौष्टिक सूपच्या रेसिपीज दिल्या आहेत.

तमिळ स्पेशल मुलीगटानी सूप

साहित्य : १/४ कप बटर किंवा ऑलिव्ह ऑइल, १ कप बारीक चिरलेला कांदा, १ कप जाड किसलेलं गाजर, ४ हिरव्या मिरच्या, बारीक किसलेले आलं ३, लसणाची पेस्ट २ चमचे, किसलेलं सफरचंद १, २ टोमॅटोचे काप, मद्रास करी मसाला १ चमचा, जिरेपूड १ चमचा, लाल तिखट अर्धा चमचा, दालचिनी पूड अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, मिरेपूड अर्धा चमचा, वेलची पूड, शिजवलेली तूर डाळ पाव वाटी, मसूरची डाळ अर्धा वाटी, व्हेजिटेबल ब्रॉथ ३ कप, नारळाचं दूध पाव कप, मीठ चवीनुसार, काळीमिरी चवीनुसार, भाजलेले काजू , सजावटीसाठी कोथिंबीर

कृती : एका मोठय़ा कढईत मध्यम आचेवर ऑलिव्ह ऑइल गरम करा अथवा बटर वितळवून घ्या. गरम बटर अथवा तेलात १ कप बारीक चिरलेला कांदा, १ कप जाड किसलेलं गाजर, ४ चिरलेल्या हिरव्या मिरच्या व अर्धा वाटी मसूरची डाळ घालून परतून घ्या. कांदा गुलाबी रंगाचा झाला की, त्यात बारीक किसलेले आलं, दोन चमचे लसणाची पेस्ट, किसलेलं सफरचंद व टोमॅटोचे काप एकजीव करून घ्या. त्यानंतर या मिश्रणात १ चमचा मद्रास करी मसाला, १ चमचा जिरेपूड, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा दालचिनी पूड, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरेपूड, अर्धा चमचा वेलची पूड व पाव वाटी शिजवलेली तूर डाळ घालून मंद आचेवर मिश्रण एकजीव करून घ्या. २० मिनिटं हे मिश्रण शिजवून घ्या. तयार गरम मिश्रण काही काळ थंड करून मिक्सरमधून फिरवून घ्या. हे मिश्रण एका सवर्हिंग बाऊलमध्ये काढून त्यात चवीनुसार नारळाचं दूध, चवीनुसार मीठ, चवीनुसार काळीमिरी, भाजलेले काजू व कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करा तमिळ स्पेशल मुलीगटानी सूप.

लालभोपळ्याचं सूप

साहित्य : ऑलिव्ह ऑइल, बारीक चिरलेला कांदा १, बटाटय़ाचे काप १ कप, चिकन ब्रॉथ २ कप, लाल भोपळ्याचा गर, मीठ चवीनुसार, जायफळ चिमूटभर, २ चमचे फ्रेश क्रीम, कोथिंबीर

कृती :  एका मोठय़ा कढईत मध्यम आचेवर तेल गरम करून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, १ कप बटाटय़ाचे काप व लाल भोपळ्याचा गर परतून घ्या. कांद्याचा रंग गुलाबी झाल्यावर त्यात २ कप चिकन ब्रॉथ घाला. तयार मिश्रण काही वेळ थंड करून मिक्सरमधून फिरवून त्याची पातळ प्युरी करून घ्या. ही ग्रेव्ही कढईत घेऊ न उकळवा. त्यात चवीनुसार मीठ घाला. सवर्हिंग बाऊलमध्ये हे सूप घेऊन त्यात चिमूटभर जायफळ, २ चमचे फ्रेश क्रीम व कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करा गरमागरम लाल भोपळ्याचं सूप..

बटाटा बीट सूप

साहित्य : बीट २, बटाटा १, बारीक चिरलेला कांदा १, लसणाच्या पाकळ्या ३ ते ४, १/४ कप बटर किंवा ऑलिव्ह ऑइल, मीठ चवीनुसार, काळीमिरी चवीनुसार, शेपूची पानं, २ चमचे फ्रेश क्रीम

कृती : सुरुवातीला कुकरमध्ये सोललेले बीट व बटाटा तीन शिट्टय़ा काढून उकडवून घ्या. त्याचं पाणी फेकून न देता ते बाजूला काढून ठेवा. या पाण्याला बटाटा-बीट ब्रॉथ असे म्हणतात. तयार उकडलेलं बीट व बटाटा मिक्सरमध्ये फिरवून त्याची प्युरी तयार करून घ्या. ही प्युरी गाळण्याने गाळून घ्या. त्याचं उरलेलं पाणी एका बाऊ लमध्ये बाजूला काढून ठेवा. एका मोठय़ा कढईत मध्यम आचेवर ऑलिव्ह ऑइल गरम करा अथवा बटर वितळवून घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा व लसणाच्या पाकळ्या घाला. त्यानंतर त्यात गाळलेलं ग्रेव्हीचं पाणी व बटाटा-बीट ब्रॉथ एकजीव करून घ्या. मिश्रण उकळवून घ्या, त्यात चवीनुसार मीठ व काळीमिरी घाला. सवर्हिंग बाऊ लमध्ये सूप सव्‍‌र्ह करताना त्यात वरून २ चमचे फ्रेश क्रीम व शेपूची पानं घाला. गरमागरम बटाटा बीट सूप तयार आहे.

पौष्टिक आलं रताळं सूप

साहित्य : २ रताळी, शेंगदाणे तेल, व्हेजिटेबल ब्रॉथ, लाल तिखट, आल्याची पेस्ट, हळद, काळीमिरी, नारळाचं दूध

कृती : दोन्ही रताळ्याची सालं काढून घ्या आणि रताळी गॅसवर भाजून घ्या. भाजलेलं रताळं हाताला अतिशय मऊ  लागेल. या रताळ्याचे बारीक तुकडे करा आणि हे तुकडे अर्ध्या वाटी पाण्यात मिक्सरमधून फिरवा. एका कढईत शेंगदाण्याचं तेल गरम करून घ्या. गरम तेलात तयार रताळ्याची प्युरी, व्हेजिटेबल ब्रॉथ, नारळाचं दूध, लाल तिखट, आल्याची पेस्ट, हळद घालून मिश्रण एकजीव करून घ्या व सवर्हिंग बाऊ लमध्ये सूपवर चिली फ्लेक्स घालून सव्‍‌र्ह करा.

ब्रोकोली चीज सूप

साहित्य : १ टेबलस्पून बटर, चिरलेला कांदा १, गाजराचे काप १, ब्रोकोलीचे काप ३ कप, थाईम अर्धा चमचा, लसणाच्या पाकळ्या ३ ते ४, मीठ चवीनुसार, काळीमिरी चवीनुसार, २ मोठे चमचे मैदा, २ चमचे फ्रेश क्रीम, १५० ग्रॅम अमूल चीज, चिकन ब्रॉथ २ कप, दूध

कृती : एका मोठय़ा कढईत मध्यम आचेवर बटर वितळवून घ्या. त्यात कांदा व गाजर परतून घ्या. त्यात दोन कप चिकन ब्रॉथ, तीन कप ब्रोकोली, चवीनुसार मीठ व काळीमिरी घालून मिश्रण ८ मिनिटं उकळून घ्या. ब्रोकोली शिजल्याचा अंदाज घेऊन गॅस बंद करून मिश्रण काही वेळ थंड करून घ्या. हे मिश्रण मिक्सरमध्ये पातळ करून घ्या. दुसऱ्या बाजूला एका कढईत मध्यम आचेवर बटर वितळवून घेऊ न त्यात २ मोठे चमचे मैदा घाला. मैदा ब्राऊ न रंगाचा झाला की त्यात २ चमचे क्रीम व थोडं दूध घालून फेटून घ्या. तयार झालेलं मिश्रण हे घरगुती व्हाइट सॉस आहे. या व्हाइट सॉसमध्ये मिक्सरमध्ये पातळ केलेलं मिश्रण घाला. त्यावर १५० ग्रॅम अमूल चीज घालून मिश्रणाच्या गुठळ्या होणार नाहीत याची खबरदारी घेऊ न फेटून घ्या. एका सवर्हिंग बाऊ लमध्ये हे मिश्रण काढून त्यावर २ चमचे क्रीम घाला व सव्‍‌र्ह करा.

कॅरेट रस्सम

साहित्य : उकडलेली केशरी गाजरं २, टोमॅटो काप, लसणाच्या पाकळ्या, चिंचेचा कोळ ३ टेबलस्पून, रस्सम पावडर १ टेबलस्पून, जिरेपूड, हळद, पाणी ३०० मिली, मीठ, मथानीया मिरची, मोहरी, हिंग, कडीपत्ता, ऑलिव्ह ऑइल

कृती : उकडलेल्या गाजराची मिक्सरच्या साहाय्याने प्युरी  करा. ती प्युरी गाळून घ्या. त्याचं उरलेलं पाणी एका बाऊ लमध्ये बाजूला काढा. त्यात चिंचेचा कोळ घालून ते पाणी एकसंध करा. एका कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता, लसणाच्या पाकळ्या, मथानीया मिरची याची फोडणी तयार करा. त्या फोडणीत बाऊलमध्ये बाजूला काढलेलं गाजर-चिंचेचं पाणी, रस्सम पावडर, टोमॅटो काप घालून मिश्रण एकजीव करून घ्या. त्यानंतर या मिश्रणात मीठ व काळीमिरी चवीनुसार घालून १० मिनिटं उकळवून घ्या. सवर्हिंग बाऊ लमध्ये सूप काढून त्यात वरून कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करा कॅरेट रस्सम..

टीप : सर्व रेसिपींच्या साहित्यामध्ये ‘व्हेजिटेबल ब्रॉथ’ हा जिन्नस आहे. व्हेजिटेबल ब्रॉथ सुपर मार्केटमध्ये सहज उपलब्ध असते. व्हेजिटेबल ब्रॉथ म्हणजे उकडलेल्या मिक्स भाज्यांचं पाणी. हे पाणी घरी तयार करण्यासाठी टोमॅटो, फ्लॉवर, श्रावणी घेवडा, सिमला मिरची, या भाज्या कुकरमध्ये एकत्र करून त्याला दोन शिट्टय़ा काढून उकडून घ्या आणि त्याचं पाणी कृतीत वापरा. त्याचबरोबर ब्रोकोली चीज सूपच्या साहित्यात असलेलं चिकन ब्रॉथ तयार करण्यासाठी चिकन व त्याची हाडं कुकरमध्ये चार शिट्टय़ा काढून शिजवा आणि त्याचं पाणी सूप तयार करताना वापरा.  viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 3:09 am

Web Title: delicious and nutritious soup recipes by chef prasanna ghavi
Next Stories
1 क्लिक : संतुष्टी शिंदे
2 स्टार ब्रॅण्ड
3 फॅशन ‘प्ले’
Just Now!
X