25 April 2019

News Flash

डेनिम्सचा सेमी कॅज्युअल फंडा

डेनिमच्या एकाच जीन्सवर अनेक वेगवेगळे टॉप्स, कुर्ते, शर्ट, टी-शर्ट्स पेअर करता येतात.

बहुतेक सगळ्या तरुणाईच्या वॉर्डरोबमध्ये ‘डेनिम्स’ हा प्रकार दिसतोच. जीन्स हा सगळ्यात कम्फर्टेबल असणारा प्रकार, याबाबत जागतिक पातळीवर तरुणाईचं एकमत आहे, असं म्हणता येईल. डेनिमच्या एकाच जीन्सवर अनेक वेगवेगळे टॉप्स, कुर्ते, शर्ट, टी-शर्ट्स पेअर करता येतात. डेनिम्सचा वापर केवळ जीन्सपुरता राहिलेला नाही. डेनिमचं एकच जॅकेट अनेक कुर्त्यांवर घालता येतं. पण तरीही डेनिम्स हे कापड खूप साधं, कॅज्युअल वाटतं आणि फॉर्मल वेअर किंवा फेस्टिव्ह वेअरमध्ये याचा समावेश होत नाही. काही समारंभ असे असतात, जिथे अगदी नटूनथटूनही जाता येत नाही, अगदी फॉर्मल कपडेही फारच झाल्यासारखे वाटतील, असेही काही प्रसंग असतात. अशा वेळी आपल्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे ‘कपडे काय घालू?’ ऑफिसच्या मित्रांसोबतची धमाल डिनर पार्टी असो किंवा मैत्रिणीने प्लॅन केलेली रोमँटिक डेट असो. अशा वेळी पूर्ण फॉर्मल ड्रेसिंगने वातावरण अगदी कडक इस्त्रीसारखं होतं. आपोआपच फॉरमॅलिटी येत जाते. डेटसाठी तर फॉर्मल वेअर अजिबातच सुटेबल नाही. अशा ठिकाणी टी-शर्ट, टोन्र्ड जीन्ससारखं अगदी कॅज्युअल ड्रेसिंगही बरं दिसत नाही. ‘याला ड्रेसिंग सेन्स नाही’ किंवा ‘वेल ड्रेस्ड राहायची आवड दिसत नाही’ असं आपल्याबद्दलचं मत तयार होऊ  शकतं. त्यामुळे अशा प्रसंगी ड्रेसिंग कसं असावं, हा अनेकांपुढचा यक्षप्रश्न असतो.

हा प्रश्न चुटकीसरशी सोडवता येतो, सेमी फॉर्मल ड्रेसिंगने. डेनिम्ससोबत आपले इतर कपडे थोडय़ा स्मार्टली पेअर केले तर पूर्ण फॉर्मल आणि अगदीच इन्फॉर्मल ड्रेसिंग यांच्या मधली ड्रेसिंग स्टाइल आपल्याला सहज जमू शकते. सेमी फॉर्मल ड्रेसिंग कोणत्याही समारंभाला, ऑफिस पार्टीला, रोमँटिक डेटला सुटेबल ठरेल.

सेमी कॅज्युअल ड्रेसिंग टिप्स (मुलांसाठी) :

  • शक्यतो डेनिम्सचा रंग निवडताना गडद छटेकडे झुकणारा निवडा आणि डेनिम जीन्सचं फिटिंग आपल्या शरीराला फिट बसणारं असेल याची खबरदारी घ्या. ढगळ कपडय़ांपेक्षा व्यवस्थित फिटिंग असलेले कपडे कधीही आपल्या व्यक्तिमत्त्वाला खुलवणारे ठरतात. पण जीन्स अतिघट्ट नसेल याचीदेखील काळजी घेतली पाहिजे.
  • फिटिंगसोबतच जीन्सच्या लांबीकडेही लक्ष असू द्या. जीन्स केवळ शूजपर्यंत येईल एवढीच लांब असू दे. त्यापेक्षा जास्त लांब जीन्स भोंगळ दिसते आणि त्यापेक्षा कमी लांबीची टांगेवाल्याप्रमाणे दिसते.
  • वॉर्डरोबमध्ये कधीही डेनिमची कमतरता असू देऊ नका. एक तरी डेनिम जीन्स आपल्याकडे वापरण्यायोग्य अवस्थेत असली पाहिजे.
  • शक्यतो फार फुलाफुलांची नक्षी, खडे, खूप जास्त प्रिंट असलेल्या डेनिम्स सेमी-कॅज्युअल लुकसाठी निवडू नका. शक्यतो प्लेन जीन्स अशा वेळी परफेक्ट ठरते. प्लेन जीन्स आणि त्यावर पोलो टी-शर्ट किंवा बटन डाऊन शर्ट्स हे स्मार्ट कॉम्बिनेशन ठरेल.
  • जीन्सप्रमाणेच शर्ट किंवा टी-शर्टचं कापड, टेक्स्चर, प्रिंट या सगळ्या गोष्टीसुद्धा लुकमध्ये खूप फरक पाडतात. फुलाफुलांचा बुशशर्ट, भडक रंग, अर्धी उघडी बटणं, नीट फोल्ड न केलेली कॉलर अशा गोष्टींनी तुमची ‘इमेज’च बदलू शकते. त्याचबरोबर कापडाची क्वालिटी चांगली नसेल तरीही इम्प्रेशन वाईट होऊ शकतं.
  • तुमच्या टी-शर्टवर काय लिहिलंय ते तुम्हाला स्वत:लाच वाचता येणार नाही अशा भाषेत असेल तर असे टीशर्ट्स घालायचे टाळा किंवा टी-शर्टवर अगदी रफ किंवा स्लँग भाषेत लिहिलेला मजकूर असेल असे टी-शर्ट्स घालू नका. केवळ मित्रामित्रांची पार्टी सोडता कोणत्याही इतर ठिकाणी अशा वाहय़ात शब्दात लिहिलेल्या टी शर्ट्समुळे तुमच्याबद्दल गैरसमज होऊ शकतो. त्यापेक्षा चांगल्या थिक कापडाचे सिंपल आणि प्लेन पोलो टी-शर्ट्स तुमच्या लुकला ‘सिंपल येट स्मार्ट’ बनवतील.
  • काही वेळा फिक्या रंगाच्या टी-शर्टवर ब्लेझर आणि डार्क शेडची डेनिम जीन्स हटके स्टायलिश लुक देऊन जाईल. मात्र टी-शर्टसोबत विंडचीटर पेअर करणं जाणीवपूर्वक टाळा.

डेनिम जीन्ससोबत योग्य टॉपवेअर मॅच केलं आणि योग्य अ‍ॅक्सेसरीज निवडल्या की लुकला ग्रेस येते. केवळ कोणते कपडे घालतो यावर लुक अवलंबून नसतो तर तो कोण कसा कॅरी करतं आणि त्यावर निवडलेल्या अ‍ॅक्सेसरीज यामुळेही लुकमध्ये खूप फरक पडतो. इम्प्रेसिव्ह लुकसाठी कपडय़ांसोबतच तुमची शूजची निवडही महत्त्वाची ठरते. सेमी-कॅज्युअल लुकसाठी डेनिमसोबत लेस-अप कॅनव्हास स्नीकर्स किंवा लोफर्स उठून दिसतील.

सेमी कॅज्युअल कूल स्टायलिंग (मुलींसाठी)

  • वेल फिटेड जीन्स आणि टी-शर्टवर ब्लेझर हे कॉम्बिनेशन सहजपणे सेमी-कॅज्युअल लुक देईल. जीन्सवर फिटेड आणि प्रिंटेड ब्लाउज, बटन डाऊन शर्ट, नीटेड टॉप्स यांना प्राधान्य द्या. नीटेड टॉप्सचं कापड निवडताना ते आपल्याला कसं दिसेल याचाही विचार जरूर करा. विणलेले गर्ली टॉप्स किंवा टेलर कॉलर शर्ट्ससुद्धा जीन्सवर स्मार्ट लुक देऊ शकतात. अजून फ्रेश लुकसाठी फिटेड जॅकेट पेअर करून बघा.
  • शक्यतो जीन्सवर नुसते टी-शर्ट वापरू नका. त्यावर जॅकेट घातलं तरच त्याला सेमी-कॅज्युअल टच येऊ शकेल. पण शक्यतो नुसती जीन्स आणि टी-शर्ट हे कॉम्बिनेशन टाळा. ते पूर्णपणे कॅज्युअल दिसतं.
  • साध्या प्लेन जीन्सपेक्षा खडय़ांचं हलकं वर्क असलेल्या, थोडीशी डिझाइन असलेल्या जीन्स लुकला स्मार्ट टच देऊ शकतात. बेल्ट, प्लॅटफॉर्म पम्प्स किंवा स्टीलेटोज जीन्सला अजून शोभा देतील.

या स्टायलिंग टिप्स तुम्हाला वर्क प्लेस, डेट, मीटिंग्ज, डिनर, मूव्ही प्लॅन, शॉपिंग, कॅज्युअल पार्टी, गर्ल्स डे आउट अशा अनेक वेगवेगळ्या ओकेजन्सना उपयोगी पडतील. वेगवेगळी पेअरिंग्ज ट्राय करा मात्र स्वत:ला सिंपल ठेवा. तुमच्या मूडला आणि तुमच्या ऑकेजनच्या मूडला मॅच होतील अशी पेअरिंग्ज आणि अ‍ॅक्सेसरीज निवडा. खूप ओव्हरड्रेसिंगही करू नका किंवा खूपच गबाळेपणाही करू नका; दोन्हींचा परिणाम तुमच्या फर्स्ट इम्प्रेशनवर वाईटच होणार आहे. एक लक्षात असू द्या, तुम्ही कपडे कितीही स्टायलिश घातलेत तरीही व्हॉट मॅटर्स इज युअर अ‍ॅटिटय़ूड. सो गाईज अ‍ॅण्ड गर्ल्स, वेअर युअर अ‍ॅटिटय़ूड!

(स्पायकर जीन्सच्या डिझाइन डिपार्टमेंटचे प्रमुख अमित सिंग यांनी या लेखासाठी माहिती दिली.)

वेदवती चिपळूणकर

First Published on September 23, 2016 1:05 am

Web Title: denim jeans fashion trends