कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी आणि केव्हा वापरावी? चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटिकेट.

टेबलवेअर म्हणजे जेवणाचं सेवन करायच्या वेळी लागणारी सर्व सामग्री. पाश्चात्त्य पद्धतीच्या जेवणात भरपूर क्रॉकरी, कटलरी आणि ग्लासवेअर आणि इतर सामग्रीचा उपयोग होतो. भोजनाची गणना ‘फाइन डाइन’मध्ये होत असेल, तर पदार्थाएवढंच महत्त्व, ते ज्यात वाढले जात आहेत त्या क्रॉकरीला, कटलरीला आणि ग्लासवेअरला आहे. तेवढंच महत्त्व टेबल सेटिंगला, सíव्हसला आणि आजूबाजूच्या वातावरणालापण आहे. नेहमीच्या जेवणाव्यतिरिक्त उच्च प्रतीच्या समारंभात भोजन आयोजिलं जातं किंवा उच्च प्रतीच्या ‘रेस्तरॉ’मध्ये जे सव्‍‌र्ह केलं जातं, त्याची गणना ‘फाइन डाइन’मध्ये होते. तर आपण थोडं याबद्दल जाणून घेऊ या.
क्रॉकरी म्हणजे चिनीमातीच्या प्लेट्स, कप-बश्या, बोल्स इत्यादी. ही सामग्री अगदी दणकट, रफ यूझसाठी असू शकते किंवा अगदी सुबक, कलात्मक, काळजीपूर्वक वापरावी लागणारी असू शकते. याला नुस्तं चायना किंवा चायनावेअर असंदेखील म्हटलं जातं. आजकाल न तुटणाऱ्या काचेच्या प्लेट्स, कप-बश्या, बोल्सनाही क्रॉकरीत धरलं जातं.
क्रॉकरी निरनिराळ्या दर्जाची मिळते. साधारण पण दणकट ‘स्टोनवेअर’पासून ते अगदी नाजूक, जवळजवळ तकलादू ‘बोनचायना’ पर्यंत. ‘फाइन डाइन’मध्ये अर्थातच फक्त ‘बोनचायना’चाच वापर होतो. ही क्रॉकरी सफेद, अर्धपारदर्शक आणि अतिशय सुबक असते. त्यावर सुंदर डिझाइन असतं आणि काही वेळा तर त्यावर सोनेरी/चंदेरी किनार किंवा नक्षीकामही असतं. पूर्वीचे काही बोनचायनाचे चहाचे कप इतके सुबक असायचे की चहा संपत आला की कपाच्या तळाशी त्या अर्धपारदर्शक काचेत बाईचा चेहरा कोरलेला दिसायचा! अर्थातच अशा प्रकारच्या क्रॉकरीसाठी खूप पसेही मोजावे लागतात! पाश्चात्त्य देशांत, पूर्वी तर ही क्रॉकरी एवढी महाग असायची, की ती एकप्रकारची मालमत्ता मानली जायची. ती कोणाला जाईल याची मृत्युपात्रातही नोंद असायची.. अगदी जणू इस्टेटीचा हिस्साच! ही क्रॉकरी ‘कस्टम मेड’पण केली जाते. म्हणजे आपलं डिझाईन, लोगो किंवा ‘क्रेस्ट’ देऊन, ती क्रॉकरी फक्त आपल्याचसाठी बनविली जाते. अर्थातच त्याचं वेगळं मूल्यही आकारलं जातं. पूर्वीच्या राजांकडे असे बोधचिन्ह असलेले, स्वतसाठी बनवून घेतलेले अनेक सेट्स असायचे. आजही अनेक देशांमध्ये शाही खान्यासाठी असे ‘कस्टमाइझ्ड’ सेट्स असतात. रॉयल डूलटन, रोसेन्थाल, स्पोड इत्यादी काही भारीतल्या क्रॉकारीचे ब्रॅण्ड्स आहेत.