‘करिअर मंत्र’ म्हणून बायोटेक्नॉलॉजीची वाट चोखाळल्यावरही परक्या देशात जाऊन स्वत:च्या सर्जनशीलतेला तिनं जपलं, वाढवलं नि फुलवलं. हे कसं काय घडलं, ते सांगतेय, स्वीडनची दीप्ती सामंत.

हेय, गोद मोरोन, हुर मोर दी? देत अर एन फिन्त दग. हाय फ्रेण्ड्स, असं बावचळून जाऊ नका. ही आहे स्वीडिश भाषा. त्याचा अर्थ होतो -Hi good morning how are you? its a lovely day today. सध्या इथं उजाडतंय साडेआठच्या सुमारास नि काळोखतंय दुपारी तीन वाजताच. एवढय़ा छोटय़ाशा दिवसाचा अनुभव रात्रंदिवस चहलपहल असणाऱ्या मुंबईत कुठून मिळणार? त्यामुळं सुरुवातीला हा वेळ आणि हवामानातला बदल थोडासा डिप्रेसिंग वाटला होता खरा.. मग अनुभवली ती पहिलीवहिली बर्फवृष्टी आणि तेव्हा छान वाटलं होतं. विशेषत: सनी डे असल्यावर फारच बरं वाटतं.
रुईया कॉलेजमधून बायोटेक्नॉलॉजीमध्ये एमएससी केल्यानंतर मी मुंबईत जॉब करत होते. त्यानंतर २०१३ मध्ये लग्न होऊन स्वीडनला आले. सुरुवातीला नवऱ्याच्या मित्रांशीच ओळख असल्यानं त्यांच्याशी संवाद व्हायचा. नंतर एका डान्स कार्निव्हलमध्ये भाग घेतला. तिथं भांगडा आणि गरबा डान्सची प्रॅक्टिस करताना आमचा मोठा ग्रुप तयार झाला आणि ‘माझे’ फ्रेण्ड्स झाले. डान्स ही आमची समान आवड होती. वेगवेगळे परफॉरमन्सेस आणि स्पर्धामध्ये आम्ही भाग घेतो. हा ग्रुप जणू आता एक्सटेंडेड फॅमिलीच झालाय. त्यात केवळ भारतीयच नाहीत तर स्विडिशही आहेत. त्यांना इंडियन – बॉलिवूड डान्सची आवड आहे. मी इथं भरतनाटय़मही शिकतेय आणि ते शिकणाऱ्यांमध्येही स्विडिशांची संख्या जास्त आहे. स्विडिश लोक खूपच शांत असतात. मला स्वत:ला लोकांशी संवाद साधायला खूप आवडतं. पण हे लोकं तेवढय़ा पटकन फ्रेण्डस् होत नाहीत. ओळख झाल्यावर बोलतात. इथं भारतीयांचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. इंडिया पॉइंट ग्रुपतर्फे दिवाळी, होळी फेस्टिव्हल साजरे केले जातात.
सायन्स स्टुडंट असले तरी, क्रिएटिव्हिटीची आवड मला पहिल्यापासूनच आहे. मी पेंटिंग्ज- क्राफ्ट अ‍ॅक्टिव्हिटीज करायचे भरपूर. अ‍ॅनिमेशन शिकायचंच- साईड बाय साईड असा माझा प्लॅन होता. पण अभ्यासामुळं ते मागंच पडलं. नंतर जॉब मिळाला नि त्यातच गुंतले. स्वीडनला आल्यावर जाणवलं की, स्विडिश भाषा यायलाच हवी. मास्टर्स-पीएचडी कोर्सेससाठी इंग्रजी चालते, पण इतर सगळ्या कोर्सेससाठी किंवा जॉबच्या दृष्टीनंही स्विडिश भाषा येणं गरजेचं होतं. ती शिकतानाच छोटासा जॉब मिळाला. लहान मुलांना पेंटिंग नि आर्ट – क्राफ्ट शिकवायचा. या छोटय़ांना आठेक महिने आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट शिकवता शिकवता मी स्वीडिश शिकले. लहान मुलांसोबतच्या अ‍ॅक्टिव्हिटी करताना, ते कोणतीही भीडभाड ठेवत नाहीत. निरागसपणं आपली चूक दाखवतात नि आवडत्या गोष्टींबद्दल भरभरून बोलतात. माझ्या बोलण्यावरून त्यांना कळायचं की मला स्विडिश नीट येत नाहीये. त्यामुळं या छोटय़ा गुरूंकडून मी स्विडिश शिकले. ते करता करता मला वाटू लागलं की, आर्टच का कंटिन्यू करू नये. त्यासाठी नवरा आणि भोवतालच्यांनी सपोर्ट केला. मग इथे छोटे ग्राफिक डिझाईनिंगचे कोर्सेस केले. ते स्वीडिशमधूनच होते.

स्विडिश लोक खूपच अ‍ॅप्रिशिएट करतात सगळ्या गोष्टींना.. छोटय़ाश्या गोष्टीलाही. मलाही तू किती हुशार आहेस, असं म्हणायचे. पण खरंतर ते सगळ्यांनाच असं म्हणतात, एक प्रकारे हुरुप यायला. कुठचीही वाईट गोष्ट सांगायची असेल, तर आधी कौतुक करून, मग हे वाईट झालंय, असं सांगितलं जातं. तो फरक आता कळायला लागलाय. मी मात्र माझ्या टिचरना सांगितलंय की, मला थेट सांगा माझं कधी चुकलं असेल तर.. फॅड, RGO,  yrkeshögskoleutbildning या कॉलेजमध्ये सध्या मी थ्रीडी ग्राफिक्स शिकतेय. त्यासाठीच्या टेस्टमध्ये मॅथ्स, स्विडिश, इंग्लिश आणि स्पेस आदी विषय होते. निवडकांचा इंटरव्ह्य़ू स्विडिशमध्ये झाला. पोर्टफोलिओही पाहिला गेला. १६०पैकी ३०जणांची निवड झाली. वर्गात स्विडिशांखेरीज एकेक इंग्लिश नि चायनीज विद्यार्थी आहेत. ओघानंच आम्ही एकमेकांशी जास्त इंग्लिशमध्ये बोलतो. सगळेच क्लासमेट खूप चांगले आहेत. आम्हांला भाषिकदृष्टय़ा काही समजत नसेल, तर ते समजावून सांगतात.

इथं आपल्यासारखंच कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. स्त्री -पुरुष समानता असून मॅटर्नल आणि पॅटर्नल लिव्ह असते. सुरक्षेच्या दृष्टीनं इथं सेफ वाटतं. प्रोग्रॅम्स किंवा डान्स प्रॅक्टिसहून प्रसंगी रात्री मी एकटीही घरी येते. यंदा मी मुंबईत आले होते, तेव्हा मला सेफ वाटलं होतं. स्वीडनमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट खूपच चांगलं आहे. मोबाईल अ‍ॅप्सवर त्याचे अपडेटस् मिळत राहातात. बेसिक लेव्हलवर करप्शन अजिबात नाहीये. सगळ्या गोष्टी कार्डवर होतात. कॅश शक्यतो कुणी घेत नाहीत. थोडय़ा वर्षांत सगळं कॅशफ्री होईल. फूड आपल्यापेक्षा वेगळं आहे. त्यात अजिबात स्पाईसेस नाही वापरत. अगदी इंडियन रेस्तरॉंमध्येही तसंच जेवण देतात. त्यांना सांगावं लागतं की, आम्ही भारतीय असल्यानं तिखट चालेल अजून. आपल्याकडच्या भाज्या फ्रोझन मिळतात. त्यामुळं इथं मिळणाऱ्या बटाटे, कोबी, भोपळी मिरची वगैरे बेसिक भाज्या पटकन मिळतात. फिशला आपल्यासारखी चव बिल्कुलच येत नाही, ती मिस करतो. आमचे आईबाबा इथं आलेले नसल्यानं त्यांना स्काईपवर घर दाखवतो. व्हॉटस् अ‍ॅपचा वापरही खूप होतो. सणावारांखेरीजही अनेकदा घरची आठवण येते. विशेषत: आम्ही फिरायला गेल्यावर वाटतं की, आत्ता इथं सगळेजण हवे होते.. मग फोन करून ती कसर भरून काढते.. इथं आल्यापासून मी जास्ती इंडिपेण्डट झालेय. सगळ्याच गोष्टी स्वत: करायला लागतात. अगदी वडापाव करण्यापासून ते फर्निचर असेंबल करण्यापर्यंत त्या गोष्टी स्वत:च्या स्वत: करण्याशिवाय ऑप्शन नसतो. मध्यंतरी एका प्रोग्रॅममध्ये मी लावणी परफॉर्म केली. तेव्हा डान्स बसवण्याव्यतिरिक्त स्वत:ची स्वत: नऊवारी नेसण्याची वेळ माझ्यावर आली. मग यू टय़ूबचा सहारा घेतला होता.. अशा वेळी क्वचित वाटतं की, अरे, घरीच असतो तर.. अर्थात वेगवेगळ्या गोष्टी शिकून घेऊन त्यासाठी ‘फिलिंग प्राऊड’ वाटण्यातही तेवढीच मजा येते.

गेल्या तीन महिन्यांत खूप काही शिकायला मिळालंय. वर्षअखेरीस आमच्या प्रोफेसर्सनी आमच्या पॉझिटिव्ह-निगेटिव्ह गोष्टींबद्दल सांगितलं. तेव्हा ते म्हणाले की, आतापर्यंतच्या कोणत्याही बॅचमध्ये न पाहिलेली गोष्ट तुमच्यात आहे. तुम्ही सगळे एकमेकांना खूपच मदत करता. हे अगदी खरंए. कारण आम्ही सगळे एकाच लेव्हलवर नाहीयोत. काही अधिक अनुभवीही आहेत. आपापलं नॉलेज शेअर केलं जातं. या एकूण दोन वर्षांच्या कोर्समध्ये वर्षभर शिकून त्यानंतर एन्ट्रन्सशिप करायची आहे. त्यानंतर जॉब करायचा विचार आहे. माझ्या पेंटिंगमध्ये क्वचित स्वीडन डोकावायला लागलंय. अजूनही डोक्यात इंडियन आयडियाज पटकन येतात. डिझाईन्समध्येही इंडियन कलर्स येतात आणि त्यांना ते तेवढे रुचत नाहीत. त्यांना खूप सटल कलर्स आवडतात. इथल्या स्नोची भरपूर चित्रं काढलेत. पण एक कलाकार म्हणून खूप ड्रास्टिक चेंज झालेला नाहीये माझ्यात. युरोपात लुव्र वगैरेला गेलो असलो, तरी इथल्या आर्ट गॅलरीज, म्युझियम्समध्ये आम्ही अजून गेलेलो नाहीयोत. तोही बेत कधी तरी आखेन.. खूप सारी सर्जनशील स्वप्न आकारायचेत भविष्यात.. त्यांना सध्या रंगवणं चाललंय मनात..

दीप्ती सामंत,
गोथेनबर्ग सिटी
(शब्दांकन – राधिका कुंटे)

‘ती’चं विश्व, ‘ती’चं अवकाश, ‘ती’चं करिअर, ‘ती’चा ध्यास.. त्यासाठी तिला घरापासून दूर जावं लागतं. देशी-परदेशी.. आपल्या अनुभवांची टिपिकल चौकट ओलांडताना कोणकोणते अनुभव बांधते ती गाठीशी? कशी वावरते, राहते परक्या प्रांतात.. कशी अ‍ॅडजस्ट करते त्या संस्कृतीत स्वत:ला.. काय काय जाणवतं तिला.. ते या सदरातून वाचायला मिळणार आहे.
तुम्ही स्वत: किंवा तुमच्या आसपासच्या १८ ते ३० वयोगटातल्या, वेगळी वाट निवडून शिक्षण, जॉबच्या निमित्तानं दुसऱ्या राज्यात किंवा परदेशात राहणाऱ्या मुलींची किमान बेसिक माहिती तिच्या संपर्क क्रमांकासह आम्हाला नक्की पाठवा. ई-मेल लिहिताना विषय म्हणून ‘विदेशिनी’ कॉलमसाठी असा उल्लेख जरूर करा. त्यासाठी आमचा ई-मेल आहे – viva.loksatta@gmail.com