19 April 2019

News Flash

नफ्यापेक्षा विस्तार महत्त्वाचा

जितक्या वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलेले लोक येतील तितकं  ते बिझनेससाठी उपयोगी ठरतं.

अदिती कारे-पाणंदीकर

औषधनिर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणजे ‘इंडोको रेमेडीज’. व्यावसायिक म्हणून करियर करण्याचं पाहिलेलं स्वप्न आणि त्यासाठी घेतलेली मेहनत यांचं उदाहरण म्हणजे ‘इंडोको रेमेडीज’च्या व्यवस्थापकीय संचालक अदिती कारे-पाणंदीकर. वडिलोपार्जित व्यवसायाचा विस्तार करत २०१८ मध्ये ११०० कोटींच्या उलाढालीपर्यंत कंपनीला घेऊन जाणाऱ्या अदिती यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली आहे. व्यवसायात करिअरचा विचार करणाऱ्या तरुणाईला प्रेरणा ठरेल अशा अदिती कारे यांनी ‘व्हिवा लाऊंज’च्या माध्यमातून तरुणाईशी संवाद साधला. त्यांची मुलाखत घेतली ‘लोकसत्ता’च्या रेश्मा राईकवार आणि वीरेंद्र तळेगावकर यांनी..

भारतीय संशोधक जगभर

प्रत्यक्ष संशोधन किंवा रिसर्च करण्यासाठी खूप फंड्स असावे लागतात. रिसर्च हा प्रकार अत्यंत खर्चीक असतो. त्यात खूप जास्त काळ घालवावा लागतो आणि प्रचंड प्रमाणात पैसाही गुंतवावा लागतो. या सगळ्या गोष्टी अनेकदा भारतीय कंपन्यांना परवडण्यासारख्या नसतात. औषधांची किंमत कमी ठेवून मास प्रॉडक्शन करणं हे भारतीय कंपन्यांचं मुख्य उद्दिष्ट असतं. त्यामुळे भारतीय कंपन्यांमध्ये संशोधन अनेकदा होतच नाही. उलट बाहेरच्या देशात एखादं औषध बाजारात आलं की त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते भारतात स्वस्तात उपलब्ध करून द्यायचं हा अनेकदा भारतीय कंपन्यांचा प्रयत्न असतो आणि तसं त्या करतातही! आंतरराष्ट्रीय बाजारात भारत चौदाव्या क्रमांकावर आहे, मात्र ‘युनिट क न्झम्प्शन’च्या क्रमवारीत भारत तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करणं ही भारतीय कंपन्यांची पहिली गरज असते. मात्र जगभरातील बहुतांशी मल्टिनॅशनल फार्मा कंपन्यांच्या ‘रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’मध्ये जगभर भारतीय माणसंच दिसतात. भारतीय लोक संशोधन करत नाहीत हा समज चुकीचा आहे. भारतीय कंपन्यांना मात्र संशोधन आर्थिकदृष्टय़ा परवडणं अवघड जातं.

करिअरच्या भरपूर संधी

फार्मा कंपन्यांमध्ये नोकरी करण्यासाठी केवळ फार्मसीच्या क्षेत्रातलं शिक्षण असलं पाहिजे असं आता काही उरलेलं नाही. जितक्या वेगळ्या प्रकारचं शिक्षण घेतलेले लोक येतील तितकं  ते बिझनेससाठी उपयोगी ठरतं. आजकाल तरुण मुलं स्वत:चे लहान-लहान स्टार्टअप सुरू करतात. सव्‍‌र्हिसेस देणाऱ्या स्टार्टअप्सना त्यांचा उद्योग वाढवण्याची संधी आता मिळू शकते. आजकाल फार्मा इंडस्ट्रीमध्येही मोठय़ा प्रमाणावर कामं आऊटसोर्स व्हायला लागली आहेत. आऊटसोर्सिग हा नवीन ट्रेण्ड आहे. आऊटसोर्सिग हे कंपन्यांनाही स्वस्त पडतं आणि लहान स्टार्टअप्सनाही बिझनेस मिळतो. त्यामुळे यात दोघांचाही फायदा आहे. मॅन्युफॅक्चिरगसाठी फिक्स्ड अ‍ॅसेट्समध्ये पैसे गुंतवून ठेवण्यापेक्षा छोटय़ा छोटय़ा गोष्टींचं मॅन्युफॅक्चिरगआऊटसोर्स करणं हे आर्थिकदृष्टय़ा फायद्याचं ठरतं. कंपन्यांमध्येच नोकरी करून पुढे जायचं असेल तर रिसर्च, रेग्युलेटरी कंट्रोल, क्वालिटी अ‍ॅश्युरन्स या क्षेत्रांमध्ये नवीन संधी आहेत.

नफ्यापेक्षा विस्तार हेच उद्दिष्ट

बिझनेस करताना ‘रिस्क’ ही गोष्ट अटळ असते. कोणत्याही वेळेला रिस्क घेणं आणि आलेल्या गोष्टीला धडाडीने सामोरं जाणं या दोन गोष्टी बिझनेसमध्ये प्रामुख्याने गरजेच्या असतात. जेव्हा तुम्हाला बिझनेसच्या आर्थिक उलाढालीमध्ये ‘डबल डिजिट ग्रोथ’ करायची असते तेव्हा खूप पुढचा आणि मोठय़ा प्रमाणातल्या कामाचा विचार करावाच लागतो. आधी सुरू असलेला बिझनेस नुसताच चालू ठेवणं आणि त्याला प्रचंड प्रमाणावर वाढवणं यात फरक असतो. नफा हे उद्दिष्ट नसून वाढ किंवा विस्तार हे उद्दिष्ट असलं पाहिजे. तुमचे केवळ आकडेच तुमची वाढ दाखवत नाहीत, तर तुमचं नाव, तुमचं गुडविल, तुमच्या प्रॉडक्ट्सचा दर्जा, तुमच्या कंपनीत काम करणाऱ्या माणसांचं समाधान इत्यादी अनेक गोष्टी या तुमच्या ‘वाढी’तच गृहीत धरल्या गेल्या पाहिजेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमच्या कंपनीचं स्थान बळकट होत जाणं आणि जागतिक क्रमवारीत तुमचं स्थान उंचावत जाणं याला नफ्यापेक्षा जास्त महत्त्व असतं.

कंपनी वाढवणं सोपी गोष्ट नव्हती..

घरचा असलेला बिझनेस सांभाळायचा हे माझ्या मनात अगदी पक्कं होतं. मग तो कोणताही बिझनेस असता तरी मी सांभाळला असता आणि त्यासाठी आवश्यक ते शिक्षणही घेतलं असतं. मला याचीही पूर्ण कल्पना होती की मी बिझनेसमध्ये लक्ष घालायला सुरुवात केली की बाबांशी माझी तुलना नक्कीच आणि आपोआपच होणार. त्यामुळे बाबांनीही मला सांगितलं होतं की चुका करायची परवानगी त्यांना होती, पण मला ती नसणार आहे. बिझनेस उभा करताना असणारी आव्हानं वेगळी असतात आणि असलेला बिझनेस वाढवायला करावे लागणारे प्रयत्न आणि कष्ट वेगळे असतात. मेडिसीनच्या क्षेत्रात सतत नव्याने येणारी संशोधनं, करावे लागणारे बदल, नवनवीन येणारे नियम या सगळ्यांशी जमवून घेत बिझनेस विस्तारायचा असतो. मी सुरुवात केली तेव्हा ३५ कोटींची उलाढाल असणारी ‘इंडोको’ या वर्षी ११०० कोटींपर्यंत आम्ही पोहोचवू शकलो आहोत. संपूर्ण टीमची मेहनत त्यात आहे आणि सगळी आव्हानं सगळ्यांनी मिळून पेलली आहेत. मात्र नुकसान न होऊ  देता आणि मुख्य म्हणजे आतापर्यंतच्या नावाला धक्का न लागू देता कंपनी वाढवणं ही सोपी गोष्ट कधीच नव्हती.

इंडोकोमधली सुरुवात

कंपनीमध्ये सुरुवातीला रुजू झाले तेव्हा केमिस्ट म्हणून चार लोकांसारखीच कामं करत होते. वडिलांची कंपनी म्हणून सिनेमात दाखवतात तशी थेट केबिन कोणाला मिळत नाही. सुरुवातीला मीही ओपन क्युबिकलमध्येच काम केलं आहे. मी जेव्हा जॉइन झाले तेव्हा पहिल्यांदा कंपनीने एका एम. फार्म. असलेल्या व्यक्तीला अपॉइंट केलं. त्यानंतर मी बराच काळ एच.आर. डिपार्टमेंटला काम केलं. सगळ्या कर्मचारीवर्गाशी हळूहळू मला चांगलं जमवून घेता यायला लागलं. सुरुवातीला मी बाबांकडे तक्रारी घेऊन जायचे. मात्र बाबांनी ‘काढून टाकायचंय का मग त्याला’ असं विचारलं की मी परत जाऊन अ‍ॅडजस्ट करायला लागायचे. थेट वडिलांच्या केबिनमध्ये खुर्चीवर बसणं हे फक्त सिनेमात होतं.

वर्क लाइफ बॅलन्स

माझ्या आईवडिलांपेक्षा माझ्या सासरकडच्या माणसांनी मला नेहमीच जास्त सपोर्ट केला. लग्नाच्या आधीपर्यंत बाबांसोबत कॉफी घेत गप्पा मारायची माझी सवय होती. त्या सवयीत लग्नानंतरही बदल झालेला नाही, फक्त बाबांच्या जागी सासूबाई आल्या. घरात कामाच्या गोष्टी शक्यतो बोलायच्या नाहीत हे पथ्य आम्ही पाळतो. कारण बिझनेसमध्ये असल्यानंतर स्वत:ला पूर्णपणे त्यापासून वेगळं करणं हे कोणत्याच क्षणाला शक्य होत नाही. मात्र त्या गोष्टींना आपल्या कौटुंबिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू द्यायचा नाही हे मी जमवलं. आतापर्यंत मी माझ्या मुलांची एकही पालक सभा किंवा वार्षिक स्नेहसंमेलन चुकवलेलं नाही. दोन्हीच्या वेळा सांभाळत काम करणं तुम्हाला स्वत:ला जमलं पाहिजे.

कायदेशीर नियमावलींचा अभ्यास महत्त्वाचा..

वीस वर्षांपूर्वी रेग्युलेशन डिपार्टमेंटची गरज कंपनीला वाटली नव्हती. मात्र रेग्युलेशन्समध्ये वारंवार बदल व्हायला लागले. कंपनीही हळूहळू आंतरराष्ट्रीय बाजारात उतरायला लागली आणि प्रत्येक देशानुसार औषधांवर लागू होणाऱ्या नियमांत फरक पडायला लागला. त्यानुसार काळाची गरज म्हणून २०० स्क्वेअर फूट जागेत सुरू केलेल्या या डिपार्टमेंटला आता १७ हजार स्क्वेअर फूट इतकी स्वत:ची जागा आहे. अडीचशे शास्त्रज्ञांचा स्टाफ या डिपार्टमेंटमध्ये सध्या काम करतो.

चीनची मक्तेदारी मोडण्याची संधी

औषधांसाठी लागणारी फर्स्ट स्टार्टिग मटेरियल्स ही सगळी चीनमध्ये बनतात आणि त्यांच्याकडूनच संपूर्ण जग ती विकत घेतं. सगळ्या इतर उत्पादक देशांच्या अर्ध्या किमतीत ही स्टार्टिग मटेरियल्स उपलब्ध करून देऊन चीनने या क्षेत्रावर त्यांचं वर्चस्व आजपर्यंत राखलेलं आहे. मात्र आता चीनमधल्या वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी त्यांच्या सरकारने अनेक बंधनं आणली आहेत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून चीनमधल्या अनेक कारखान्यांना टाळं ठोकण्यात आलं आहे. अशा वेळीच खरं तर रिसर्च करणाऱ्या नवीन आणि लहान कंपन्यांना, धडपडणाऱ्या रिसर्चर्सना आपली मटेरियल्स तयार करून बाजारात उतरण्याची संधी आहे.

उद्योजकता वाढवण्यासाठी प्रोत्साहन गरजेचं

एखाद्याला व्यवसाय करायचा असेल तर त्याला घरून तसा पाठिंबा असणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. अनेकदा आपण व्यवसाय करू शकतो किंवा व्यवसाय करणं हेही करिअर असू शकतं हे लक्षात येण्यासाठी, त्याची कल्पना सुचण्यासाठीही तसं वातावरण आपल्या आजूबाजूला असावं लागतं. व्यवसाय करणं हा विचार सामान्य मराठी माणसाच्या गावीही नसतो. आसपासचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक या सगळ्यांनी यासाठी मदत करणं, प्रोत्साहन देणं, उत्साह वाढवणं अशा सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. आपला इगो बाजूला ठेवून नवीन गोष्टी शिकण्याची तयारी असावी लागते. सगळं काही आपल्यालाच येतंय आणि आपल्याला नवीन काही शिकण्याची गरज नाही अशा भावनेने ‘बिझनेस’ करता येत नाही. नवीन बिझनेस करणाऱ्यांना तर आर्थिक बाबींपासून सगळ्याचा विचार करावा लागतो आणि प्रस्थापित बिझनेस सांभाळणाऱ्यांना आधीच्या पिढय़ांच्या नावाचं आणि कामाचं ‘बॅगेज’ घेऊन ते सांभाळत पुढे जावं लागतं.

‘इंडोको’ नावामागची प्रेरणा इतिहासात!

‘इंडोको’ची सुरुवात माझ्या आजोबांनी केली. आजोबा सुरुवातीला गोव्याच्या गावात सायकलवरून औषधं विकायचे. आजोबांना बिझनेस करायचा होता म्हणून आजीने स्वत:चं स्त्रीधन विकून पैसे उभे केले होते. आजीही या बाबतीत खुल्या विचारांची होती. त्या वेळी गोव्यात पोर्तुगीज राज्य करत होते. त्या वेळी आजोबांची मेहनत पाहून एका परदेशी कंपनीने त्यांची एजन्सी घेण्याबद्दल आजोबांना विचारणा केली आणि आजोबांनीही एजन्सी घेतली. त्या वेळी त्या इम्पोर्ट करून इकडे औषधं विकणाऱ्या कंपनीचं नाव त्यांनी ‘इंडो-कॉन्टिनेन्टल ट्रेडिंग कंपनी’ असं ठेवलं होतं. ही कंपनी १९४५ साली स्थापन झाली आणि दोनच वर्षांंत भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्या वेळी भारतात मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी नवीन सरकारने प्रचंड प्रोत्साहन दिलं आणि इम्पोर्ट करण्यावर बंदी आणली. अशा आणीबाणीसारख्या परिस्थितीत अगदी एका आठवडय़ात निर्णय घेऊन आजोबांनी मॅन्युफॅक्चिरगला सुरुवात करायचं ठरवलं आणि २३ ऑगस्ट १९४७ रोजी आमच्या ‘इंडोको रेमेडीज’चं मॅन्युफॅक्चिरग कंपनी म्हणून रजिस्ट्रेशन केलं. तेव्हापासून आजपर्यंत आम्हांला आमच्या कंपनीच्या नावाने नव्हे, तर औषधांच्या ब्रॅण्ड्सनी ओळखलं जातं. लोकांना इंडोको माहिती नसेल पण त्यांना तुम्ही सायक्लोपॅम घेता का?, असं विचारल्यावर ते हसून होकार देतात. तेच आम्ही आहोत..हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे!

निर्णय थोडा कठीण

मी बी. फार्म. करायचा निर्णय घेतला तो अगदी सहज घेतला नव्हता. मी बिझनेसमध्ये येण्यासाठी घरच्यांची कोणतीच जबरदस्ती नव्हती, पण आग्रह मात्र होता. मला बारावीत मेडिकलला जाण्याइतके मार्क नक्की मिळाले होते. बरोबरच्या सगळ्या मैत्रिणीसुद्धा मेडिकलला जाणार होत्या. माझ्याही मनात द्वंद्व सुरू होतं. मेडिकलला जावंसंही वाटत होतं आणि बिझनेस सांभाळायची इच्छाही तितकीच तीव्र होती. बी.फार्मला प्रवेश घ्यायच्या आदल्या रात्री मला अजिबात झोप येत नव्हती. पण माझ्या आणि बाबांच्या चर्चेनंतर माझा निर्णय पक्का झाला. बी.फार्म. झाल्यानंतर मी यू.एस.ला फार्मसी अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आणि कंपनीसाठी लागणारी बेसिक तयारी पूर्ण करून परत आले.

लोकसत्ता व्हिवा लाऊंज हा कार्यक्रम तरुणाईला अनेक गोष्टी शिकवणारा आहे. अनेक मोठमोठय़ा व्यक्तींना भेटण्याची सुवर्णसंधी या कार्यक्रमामुळे मिळते. मला अदिती कारे यांच्याकडून व्यवसाय म्हणजे नक्की काय? तो कसा केला जातो, तो कसा करावा याबद्दल माहिती मिळाली. ही माहिती जुना व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीबरोबरच नवीन व्यवसाय करू पाहणाऱ्यांसाठीही उपयुक्त आहे.

दिशा काते

फार्मसी या क्षेत्राबद्दल खूप ज्ञान मिळालं. या क्षेत्राबद्दल मला फारच कमी माहिती होती. या क्षेत्रातील आताचे बदल, एखाद्याला यामध्ये करिअर करायचं असेल तर अदिती यांनी दिलेली माहिती खूप उपयुक्त आहे असं मला वाटतं. याशिवाय, रिसर्च आणि डेव्हलपमेंटला किती महत्त्व आहे हे सुद्धा पटलं.

संकेत सुभेदार

‘लोकसत्ता’च्या या नव्या पर्वातला ‘व्हिवा लाऊंज’चा कार्यक्रम खूप साधा आणि अर्थपूर्ण ठरला. मला अदिती कारे यांचे व्यक्तिमत्त्व फार भावले कारण त्या एवढय़ा मोठय़ा पदावर असूनदेखील स्वत:चे छंद जोपासतात व त्यासोबत घरासाठीही तितकाच वेळ काढतात. स्त्री म्हणून एवढी सकारात्मक भरारी घेणं आजच्या काळात फार गरजेचं आहे.

मुकेश चव्हाण

मी फार्माच्या क्षेत्रात असल्यामुळे मला हा कार्यक्रम खूप इंटरेस्टिंग वाटला. अदिती कारे यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी छान उत्तरं दिल्याने एक तर या क्षेत्राबद्दल माहितीही मिळाली आणि आपला देश या इंडस्ट्रीत नक्की कुठे उभा आहे, कोणत्या स्थानावर आहे हे समजलं.

अमेय सुभेदार

या कार्यक्रमातून फार सकारात्मक विचारांची देवाणघेवाण झाली. माझा स्वत:चा पुढे बिझनेस सुरू करायचा मानस आहे, त्यामुळे एखादा बिझनेस सुरू करायचा असल्यास त्यासाठी लागणाऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती मला मिळाली. आयुष्यात व कोणत्याही कामात लागणाऱ्या एथिक्सची गरज बिझनेसमध्येही किती महत्त्वाची ठरते हे जाणवले.

पवर्ज साळगावकर

हा कार्यक्रम खूप काही शिकवून गेला. अदिती कारे यांचा आत्मविश्वास भावला. त्यांच्या क्षेत्रात त्यांच्यावर एवढय़ा जबाबदाऱ्या असतानाही काम आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या यांचा समतोल राखत व्यवसायवृद्धीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत व चिकाटी किती महत्त्वाची असते हे समजले.

चैत्राली चौरीकर

अदिती कारे यांच्या विचारांतून खूप प्रेरणा मिळाली. एका स्त्रीला आपण कधीही कमी लेखू शकतच नाही याचा दाखला त्यांनी इतक्या वेगळ्या व अभ्यासपूर्ण क्षेत्रात गाठलेल्या यशातूनच मिळाला. या कार्यक्रमाबद्दल ‘लोकसत्ता’चे मन:पूर्वक आभार.

सुमेध मोहिते

संकलन : तेजश्री गायकवाड,

गायत्री हसबनीस

First Published on September 14, 2018 2:00 am

Web Title: discussion with aditi kare panandikar in loksatta viva lounge