21 January 2019

News Flash

‘जग’ते रहो : मस्त फिरस्ती

इथले बहुतांशी विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करतात.

अनुराधा धोंड, कॉव्हेंट्री, इंग्लंड

कॉव्हेंट्री हे औद्योगिक शहर असून ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचं केंद्रस्थान मानलं जातं. या परगण्यात आशियायी लोकांचं प्रमाण लक्षणीय आहे. मी आतापर्यंत ज्या शहरांत राहिले आणि राहते आहे तिथे सर्वाना सामावून घेणारे लोक आहेत. कॉव्हेंट्रीपासून अध्र्या तासावर शेक्सपिअरचं जन्मगाव स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-अ‍ॅव्हन अर्थात अ‍ॅव्हन नदीच्या काठी स्ट्रॅटफोर्ड गाव आहे.

सध्या मी कॉव्हेंट्री शहरात राहते, पण या सदराच्या निमित्ताने विचार करताना आठवणींच्या राज्यात कधी शिरले ते कळलंच नाही. आठवतंय की, मी शिक्षणासाठी बारावीनंतर न्यूकॅसल अपॉन टाइन (टाइन नदीकाठचं न्यूकॅसल) या युनिव्हर्सिटीच्या शहरात राहत होते. इथल्या तीन वर्र्षांच्या पदवी शिक्षणात पूर्णवेळ नोकरी करायची संधीही मिळाली  त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि लगेच नोकरीही लागली. माझ्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात बहुतांशी विद्यार्थी चिनी, काही भारतीय, काही मध्य-पूर्वेतील आणि यूकेमधील काही विद्यार्थी होते. नोकरीतील सहकारी स्थानिक होते. त्या भागातील लोकांच्या बोली भाषेतील उच्चार विशिष्ट पद्धतीचे असून त्याला जॉर्डी अ‍ॅक्सेंट म्हणतात. ते समजायला काही महिने गेले. आपण दक्षिणेकडून उत्तरकडे जायला लागतो, तसतसा अ‍ॅक्सेंट एकदम स्ट्राँग होत जातो

न्यूकॅसल हे शहर तरुणाईचं मानता येईल कारण तिथे न्यूकॅसल आणि नर्ॉथब्रिया या दोन युनिव्हर्सिटीज आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वावर इथे सतत असल्यामुळे वातावरण एकदम गजबजलेलं आणि ऊर्जात्मक असतं. यूकेमधील अनेक युनिव्हर्सिटीजचे कॅम्पस शहरापासून थोडेसे लांब आहेत. पण आमचा कॅम्पस शहराच्या मध्यभागी असल्याने सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध होत्या. विद्यार्थी आणि नाइटलाइफ हे तसं अविभाज्य समीकरण. यूकेतील टॉप नाइटलाइफपैकी एक नाइटलाइफ म्हणून न्यूकॅसलमधलं नाइटलाइफ गणलं जातं. इथे सोशलायझेशनसाठी अनेक पर्याय आहेत. केवळ विद्यार्थीच नाही तर जॉब करणारेही अनेकदा वीकएण्डची आतुरतेने वाट पाहत असतात. मग जवळच्यांना भेटणं, भटकंती करणं वगैरे गोष्टींनी वीकएण्ड एन्जॉय केला जातो. या फुटबॉलप्रेमी शहरातला ‘न्यू कॅ सल युनायटेड’ हा प्रसिद्ध क्लब आहे. जीवघेण्या थंडीतही तिथले खमके लोक प्रसंगी विनाजॅकेटही बाहेर पडतात. अजूनही आठवतो आहे २०११चा क्रिकेट वर्ल्डकप.. तो फारच अद्वितीय अनुभव होता. तेव्हा आम्ही युनिव्हर्सिटीतच होतो. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आदी वेगवेगळ्या देशांमधील विद्यार्थ्यांसोबत मॅच बघणं आणि फायनल मॅच भारत-श्रीलंकेची असणं.. एक मोठ्ठा स्क्रीन आणि त्याकडे आशेने बघणारे आम्ही.. आणि आपण जिंकल्यावरचं सेलिब्रेशन..

सहा र्वष न्यूकॅसलमध्ये राहिल्यानंतर नोकरी बदलून दक्षिणेकडे जायचा विचार मी करू लागले. त्यामुळे न्यूकॅसलनंतर मी सोलिहल्ल, मग नॉर्थाम्पटोनमध्ये आणि गेलं वर्षभर कॉव्हेंट्री शहरात स्थायिक झाले आहे. मी वेस्ट मिडलंड्स परगण्यातील ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये काम करते. कॉव्हेंट्री हे औद्योगिक शहर असून ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचं केंद्रस्थान मानलं जातं. या परगण्यात आशियायी लोकांचं प्रमाण लक्षणीय आहे. मी आतापर्यंत ज्या शहरांत राहिले आणि राहाते आहे तिथे सर्वाना सामावून घेणारे लोक आहेत. कॉव्हेंट्रीमधून बाहेर पडल्यावर काही मिनिटांचा ड्राइव्ह केल्यावर छोटी गावं, घरं, नदी दिसायला लागते आणि शहरातले ताणतणाव मागं पडून मन प्रसन्न होतं. इथून अध्र्या तासावर शेक्सपिअरचं जन्मगाव स्ट्रॅटफोर्ड गाव आहे. तिथली टुमदार घरं, बगिचे पाहून फारच भुरळ पडते. मग या साऱ्याचं प्रतिबिंब साहित्यात न पडलं तर नवल.. या तत्कालीन स्मृतींचं जतन इथे अतिशय चांगल्या पद्धतीने करून ठेवलं आहे. केवळ स्ट्रॅटफोर्डच नव्हे तर एकूणच यूकेभर अशा अनेक गोष्टींचं जतन चांगल्या प्रकारे केलेलं पाहायला मिळतं. दुसऱ्या महायुद्धाच्या बॉम्बहल्ल्यामध्ये लक्ष्य ठरलेले कॉव्हेंट्री कॅ थड्रिलचे अवशेष अजूनही जतन करून ठेवलेले आहेत. बाजूला नवीन कॅथड्रिल उभारलं आहे.

इथली तरुणाई एन्जॉयमेंटइतकीच फिटनेसबद्दल जागरूक आहे. मग ते जिमला जाणं असो किंवा एखादा खेळ खेळणं असो. अर्थात नियमाला अपवाद असतो, तसे काही जण आहेतही. ओबेसिटीसारख्या समस्या आहेत. पण बहुतांशी तरुणाईचा कल फिट राहण्याकडेच अधिक आहे. युनिव्हर्सिटीत शिकताना माझ्यासोबतचे विद्यार्थी त्यांनी स्वत: घेतलेल्या निर्णयामुळे पदवी अभ्यासक्रम शिकण्यासाठी आले होते. आपल्याकडची जीवघेणी स्पर्धा आणि लोकसंख्या हे प्रश्न अपरिहार्यपणे शिक्षणाशीही निगडित आहेत, त्यामुळे पदवी घेणं हे करिअरसाठी अनिवार्य ठरतं. इथे बारावीपर्यंत बरेच जण शिकतात. पुढचं शिक्षण घ्यायचं की नाही, हा निर्णय त्यांचा स्वत:चा असतो. त्यात त्यांना अनेकविध पर्याय उपलब्ध असल्यामुळे स्वत:चा कल ओळखून तसा अभ्यासक्रम निवडला जातो. इथले विद्यार्थी पदवी घेण्यासाठी कर्ज घेऊ  शकतात आणि पुढे पहिली नोकरी लागल्यावर ठरावीक काळाने रक्कम कापली जाते. मात्र गेल्या काही वर्षांत भोवतालची परिस्थिती बदलते आहे. अर्थकारण, समाजकारण आदी घडामोडी आणि त्यांच्या परिणामांमुळे कोणती पदवी घेतल्याने अधिक पगार, बढती मिळेल असा व्यावहारिक विचार केला जाऊ  लागला आहे; हे चित्र थोडंसं निराशाजनक वाटतं आहे. इथली तरुणाई आपली मतं आणि विचार मोकळेपणाने मांडते. ब्रेग्झिटसाठी लोकांनी मत दिलं होतं. त्याचे परिणाम स्वीकारायला ते तयार आहेत. फंडिंगमधली गुंतवणूक त्यांच्या कामात दिसून येते. त्यातही दक्षिणेकडे जास्ती विकास होतो, असा एक आक्षेप बऱ्याचदा घेतला जातो. तसं ते दिसतंही. एकुणात व्यवस्था आणि कारभार, सार्वजनिक वाहतूक चांगली आहे. शिस्त आणि नियमपालन ही त्यांची संस्कृतीच आहे. लोक सभ्य, सुसंस्कृत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. कमी लोकसंख्येमुळे या गोष्टी अमलात आणणं शक्य होतं.

इथले बहुतांशी विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करतात. स्वतंत्र राहतात. या गोष्टीचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे परिणाम पाहायला मिळतात. आपल्याकडे आपल्या कुटुंबाचा कायमच खंबीर पाठिंबा आपल्याला मिळतो. इथल्या मुलांवर फॅमिली प्रेशर असं नाहीये. प्रेशर नाही, पण प्रेझेन्सही नसला तर.. मला वाटतं, या दोन्हीचा सुवर्णमध्य साधायला हवा. तरुणाईला देवधर्माविषयी फारसं काही वाटत नाही पण नीतिमत्ता, तत्त्व वगैरे मानतात. स्वयंसेवक होणं, समाजोपयोगी काम करणं, गरजूंसाठी लोकांकडून मदत गोळा करणं यात ते स्वेच्छेनं सहभागी होतात. यूकेमध्ये बहुसांस्कृतिकता आहे. विविध प्रकारची प्रार्थनास्थळं आहेत. त्यामुळे इथल्या तरुणाईची मानसिकता ओघानेच मोठय़ा मनाची आणि सर्वाना सामावून घेणारी झाली आहे. त्यामुळे इतरांच्या संस्कृतीविषयी त्यांना कुतूहल वाटतं. माझे सहकारी भारतात जाणार-येणार असले की आमच्या गप्पा होतातच. भारतातले फोटो दाखवून त्यांचे अनुभव ते माझ्याशी शेअर करतात. इथे मराठी मित्र मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो. लेस्टरमध्ये मोठय़ा प्रमाणात दिवाळी साजरी केली जाते. गुजराती लोक खूप असल्याने इनडोअर गरबा खेळला जातो.  या सणावारांना स्थानिकही कुतूहलाने हजेरी लावतात. समरमध्ये इथे खूप म्युझिक फेस्टिव्हल्स होतात. दिवसभर म्युझिक मनसोक्त ऐकणं, मित्रमंडळींसोबत त्याचा आस्वाद घेणं हे सर्रास केलं जातं. लाइव्ह म्युझिक मोठय़ा आवडीनं ऐकतात. मी पियानो आणि कीबोर्ड शिकले आहे. या कॉन्सर्टना आवर्जून जाते. अनेक मोठय़ा आर्टिस्टना ऐकायला मिळालं. माझ्या वडिलांनाही संगीत आवडतं. आईबाबा इथं आले होते तेव्हा आम्ही ‘कोल्ड प्ले’ कॉन्सर्टला गेलो होतो. तरुणाईला प्रवासाची- विशेषत: बॅगपॅकिंगची आवड  असते. त्यासाठी प्रसंगी पदवीनंतर शिक्षणात ब्रेक घेतात. नोकरीत असणारेही आठवडाभर सुट्टी घेऊ न फिरायला जातात. मग ते यूकेतच असो, युरोपमध्ये किंवा मग आशियायी देश किंवा भारतातही येतात. या फिरस्तीत खूप गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळतात. आणि महत्त्वाचं म्हणजे शिक्षण, करिअर, कामाचं प्रेशर आपल्याइतकं इथे नाही. मीही यूकेमध्ये आणि फ्रान्स, जर्मन वगैरे देशांत फिरायला गेले आहे. सुदैवाने हवामान चांगलं असलं, विशेषत: समरमध्ये फिरण्याची संधी मिळते. भरपूर ऊ न आणि निळसर आकाश असा फोटोत टिपण्याजोगा नजारा अनुभवायला मिळाला की, फिरायला अधिकच हुरूप येतो. जवळच्याच एखाद्या ठिकाणी, वॉकिंग, क्लाइम्बिंग, हायकिंगला जायला अनेकांना आवडतं आणि तो एक शिरस्ताच होऊ न गेला आहे.

First Published on April 6, 2018 12:33 am

Web Title: experience about coventry england