पुनीत कर्णिक-थोरात हेलसिंगबॉरी, स्वीडन

स्वीडन देश प्रसिद्ध आहे तो नोबेल पुरस्कारामुळे. ‘स्टॉकहोम’ या स्वीडनच्या राजधानीत ‘स्टॉकहोम सिटीहॉल’च्या वास्तूत ‘ब्लू हॉल’मध्ये दरवर्षी नोबेल पारितोषिक वितरणाचा समारंभ साजरा होतो. स्वीडनमधील आमचं हेलसिंगबॉरी शहर खूप छान आहे. एकूणच युरोपमध्ये पहिल्यांदा पाऊ ल ठेवल्यावर जे ‘वॉव’वालं फीलिंग येतं, तेच या शहरात आल्यावर आलं होतं. सध्या इथे सिरियन निर्वासितांना निवारा देण्यात आला आहे. इथे स्वीडिश, सिरियन आणि भारतीय लोक जास्ती दिसतात. भारतीय लोक अधिकांशी आयटीमधले असून ते बंगलोर, मुंबईहून येत आहेत. इथली जीवनशैली स्वीडिश आणि सिरियन या दोन्ही लोकांच्या पद्धतीची आहे. इथली ‘लून्थ युनिव्हर्सिटी’ स्कँडिनेव्हियातील उच्च शिक्षणासाठीच्या नामवंत युनिव्हर्सिटीपैकी एक गणली जाते. तिथे परदेशी विद्यार्थी शिकायला येतात. तिथे जागा मिळायला थोडंसं मुश्किल जातं, पण प्रवासात वेळ घालवायची तयारी असेल तर थोडी लांब जागा मिळू शकते. त्यामुळे आमच्या शहरात तिथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.

इथले लोक समोर आल्यावर हसतमुखाने भेटल्याशिवाय पुढे जात नाहीत. त्यासाठी ओळखदेख लागत नाही. ती सवय आम्हालाही लागली आहे. भारताबद्दल त्यांना भरपूर कौतुक आणि कुतूहल वाटतं. ‘तुमच्याकडे लोकसंख्या भरपूर’, असा बोलण्यात एक सूर जाणवतो. त्यांचं त्यांच्या भाषेवर प्रचंड प्रेम आहे. फार कमी लोक इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतात. सुरुवातीला आम्हाला या गोष्टीचं नवल वाटलं होतं. इतकंच नाही तर काहींनी आम्हाला विचारलं की, भारतात तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम का राहिला नाहीत? इंग्रजांनी तुमच्यावर राज्य केलं आणि तुम्ही त्यांचीच भाषा आत्मसात केलीत.. भाषेवरचं हे प्रेम संपूर्ण युरोपभर दिसतं. ज्यांना इंग्लिश कळत नाही, ते इंग्लिश जाणून घ्यायचा प्रयत्नही करत नाहीत. विशेषत: ज्येष्ठांमध्ये हे भाषाप्रेम अधिककरून दिसतं. तरुणाईला इंग्रजी कळतं. त्यासाठी सोशल मीडियासारखी माध्यमं आहेतच. पण शाळा, व्यावहारिक गोष्टींसह संवादही स्वीडिशमध्ये होतो. त्यामुळे स्वीडिशेतर लोकांना नोकरी मिळणं प्रचंड कठीण आहे. इथे सोशल सिक्युरिटी नंबर मिळतो. त्यानंतर तुम्ही स्वीडिश भाषा शिकू शकता. सगळे व्यवहार स्वीडिश भाषेतच होत असल्याने ट्रान्सलेटर वापरण्यावर मर्यादा येतात. मी सध्या स्वीडिश भाषा शिकते आहे. आम्हाला काही सिरियन शिक्षकही शिकवतात. एक नवीन भाषा शिकण्याचं समाधान मला मिळतं आहे. स्वीडिश शिकायला लागल्यापासून स्वत:मध्येही फरक जाणवतो आहे. मला भोवतालच्या लोकांचं बोलणं थोडंथोडं कळायला लागलं आहे. अगदीच नाईलाज असल्यावर इंग्लिशचा वापर केला जातो. सुरुवातीला आम्ही काही शब्द शिकून घेतले होते, माझा नवरा आयटीमध्ये असल्याने त्यांचं काम भाषेमुळे अडत नाही.

इथली मुलं करिअर ओरिएंटेड आहेतच. कोणत्याही कामाला कमी लेखलं जात नाही. काम करणाऱ्या प्रत्येकाचा आदर केला जातो. या गोष्टी आपण शिकण्यासारख्या आहेत. तरुणाई मोठय़ा हौसेने टॅटू काढून घेते. प्रत्येकाच्या कानात हेडफोन असतातच. स्वीडनमधल्या परंपरेनुसार ‘सेंट लुसीया डे’ हा दर १३ डिसेंबरला साजरा केला जातो. त्यात तरुणाई विशेषत: मुलींचा सहभाग लक्षणीय असतो. या समारंभात दरवर्षी एकीची लुसीया म्हणून निवड केली जाते, तिला मुकूट घातला जातो. इथल्या प्रत्येक शहरात एक इंटरनॅशनल स्कूल आहे. तिथे इंग्लिशमध्ये शिकवलं जातं. शाळांमध्ये छान वातावरण असतं. ०-६ वर्षे वयोगटासाठी प्रीस्कूल असतं. आऊ टडोअर अ‍ॅक्टिव्हिटीजवर अधिक भर असतो. अगदी खराब हवामान असेल तरच त्यांना वर्गात बसवतात.

सुरुवातीला इथल्या वातावरणात रुळायला वेळ लागला. आमचे पहिले काही महिने कपडे खरेदीतच गेले. विंटरमध्ये शूज, स्कार्फ , कोट आणि जॅकेट्स घातली जातात. त्यात प्रचंड फॅशन आहे. समर म्हणजे सेलिब्रेशन टाइम मानलं जातं. तेव्हा पहाटे चार वाजल्यापासूनचा उजेड रात्री पावणेनऊ-दहापर्यंत असतो. ‘मिडसमर इव्ह’चा फेस्टिव्हल असतो. समरमध्ये इथले मूळचे राहाणारे दोन महिने सुट्टी घेऊ न बाहेर जातात. उन्हात बीचवर एन्जॉय करतात. बार्बेक्यू होतात. फ्लोरल ड्रेसेस, वनपीस, शॉर्ट्स, हलकं जॅकेट आणि रीप् जीन्स असा पेहराव असतो. व्हाइट शूज वापरले जातात. काळा, राखाडी, निळा, जांभळा, गुलाबी आदी इंग्लिश रंगांचा वापर अधिकांशी केला जातो. ही रंगसंगती पेहरावापासून बेडशीटपर्यंत अनेक गोष्टींत परावर्तित झालेली दिसते. सुरुवातीला भोवतालातून रंग हरवलेत की काय, असं अनेकदा मनात यायचं. इथे काळा आणि पांढरा रंग अत्यंत प्रिय आहेत सगळ्यांना. सिरियन मुली फारशी फॅ शन करत नाहीत. खाण्याच्या बाबतीत सांगायचं तर बीफ, पोर्क आणि फिश आवडीने खाल्ले जातात. सलाड खाण्यावर जास्ती भर दिला जातो. आपल्यासारखं सगळं साग्रसंगीत जेवण नसल्याने आम्ही घरीच पोळी-भाजी वगैरे स्वयंपाक करतो. सेम्लॉर हे डेझर्ट सगळ्या स्वीडिश कॅ फेमध्ये मिळतं आणि ते तरुणाई आवडीने खाते. सगळे फास्टफूड ब्रँण्ड्स इथे आहेत. कॉफीप्रेमींची संख्या खूप आहे. ते बिनसाखरेची ब्लॅक कॉफी पितात. प्रत्येकाच्या हातात कॉफीचा ग्लास असतोच. ‘झोएगा’ ब्रॅण्डची कॉफी इथे खूप प्रसिद्ध असून त्यांचे कॉफीशॉप्स सगळीकडे आहेत. शिवाय दूध आणि दुधाच्या पदार्थाचं उत्पादन खूप होतं त्यामुळे विविध प्रकारचं चीज, बटर अमाप मिळतं. शिवाय इथे प्रचंड प्रमाणात दारू प्यायली जाते.

स्टॉकहोम आणि आमच्या शहरात जमीन-अस्मानाचा फरक आहे. स्टॉकहोमला गेल्यावर राजधानीचा फील येतोच. प्रसिद्ध अभिनेत्री इनग्रिड बर्गमन याच भूमीतली. इथे चित्र आणि नाटय़सृष्टी आहे. ऑपेराला खूप महत्त्व दिलं जातं. भाषा समजत नसल्यामुळे आम्ही अद्याप फारसं काही पाहिलेलं नाही. कधीतरी लागणारे बॉलीवूड चित्रपट बघतो. मराठी चित्रपट इथे आणायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. मराठी लोक एकत्र यावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘आम्ही मराठी मंडळा’तर्फे गणेशोत्सव साजरा केला. घरापासून लांब राहिल्यावर संस्कृती जपणं, सणवार साजरे करणं या गोष्टी कराव्याशा वाटतात. मुंबई आणि आसपासचे लोक भेटत असून त्यांच्या ओळखी होत आहेत. नुकताच आम्ही गुढीपाडवाही साजरा केला. लोकांच्या रसिकतेची झलक त्यांच्या चर्चेस, आर्किटेक्चरवरून दिसते. इथेच नाही तर युरोपातच बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यातल्या काही पाहिल्या आणि भारावून गेल्यासारखं झालं. स्वीडनमधल्या प्रत्येक शहरात चर्च, कॅथड्रिल, म्युझियम्स इत्यादी मोठाल्या वास्तू आहेत. त्या प्रत्येकाला एक इतिहास आहे. गुस्ताव अँडॉल्फ चर्च शहराच्या मध्यभागी आहे. ‘करनान’ हा मध्ययुगीन डॅनिश गढीतला मनोरा (टॉवर) असून त्या काळातला तो एकमेव साक्षीदार उरला आहे. सोफिएरो कॅसल ही स्वीडिश राजघराण्याची गढी १८७६ मध्ये बांधली गेली. आता तिथे म्युझिक कॉन्सर्ट होतात. नोरा जोन्स, बॉब डिलन, ब्रायन अँडम्ससारख्या कलाकारांनी तिथे परफॉर्म केलं आहे.  इथले लोक कुटुंबाला पहिले प्राधान्य देतात. इस्टर, ख्रिसमसला सगळे कुटुंबीय एकत्र जमतात. अख्खं मार्केट बंद असतं आणि प्रत्येकजण फॅमिली टाइम एन्जॉय करायला प्राधान्य देतात. ऑफिसची ८ ते ५ वेळ असेल आणि त्यापुढंही थांबलात तर ते ओव्हरटाइम मानलं जातं. सध्या कामाचे तास कमी करायचा विचार सुरू आहे. आपल्या देशावर, झेंडय़ावर ही मंडळी नितांत प्रेम करतात. ही मंडळी एकदम फिट असतात. जिममध्ये खूप गर्दी असते. शहरात बऱ्याच मॅरेथॉन आयोजित केल्या जातात. त्यात लोक उत्साहाने सहभागी होतात. मीही या दीड वर्षांतली माझी पहिली मॅरेथॉन धावले होते. योगासनं करणं तरुणाईला भावतं. बरेच योग स्टुडिओ आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेबाबतीत अनेक गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत. पोलीस सर्रास रस्त्यावर दिसत नसले तरी त्यांचा धाक आहे. मध्यंतरी गरिबी, बेरोजगारीमुळे चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं दिसलं. इन्फ्रास्ट्रक्चर हा इथला यूएसपी आहे. सार्वजनिक वाहतूक वक्तशीरच आहे. तिकिटाशिवाय प्रवास करताच येत नाही. अपंग, ज्येष्ठांना वावरण्यासाठी सोईचं म्हणून इलेक्ट्रिक कारची सोय केली जाते. बसमध्येही त्यांच्यासाठी योग्य ती सोय केली आहे. मोठाल्या ब्रॅण्डेड गाडय़ा लोक रोजच चालवतात. एकूणच वर्तनात शिस्तबद्धता आहे. अत्याधुनिक सुविधा असणारा हा कॅशलेस देश आहे. आपली लोकसंख्या आणि अन्य समस्या लक्षात घेतल्या तरी या सगळ्या गोष्टींतून आपण खूप काही शिकण्यासारखं आहे.