आपल्या आवडत्या खाद्यपदार्थाचं कूळ आणि मूळ शोधायचा प्रयत्न

सणांचं पदार्थाशी जोडलेलं नातं त्या सणाला खूप निराळं रूप देतं. मकरसंक्रांत तिळाच्या लाडवांशिवाय पूर्ण होत नाही. दिवाळीत फराळ हवाच तसंच ख्रिसमस जवळ आला की ख्रिसमस ट्रीइतकंच ख्रिसमस केकचं आकर्षण वाटतं. गल्लोगल्ली केकची दुकानं उघडण्याच्या पूर्वीच्या काळात केक ही एक चैन होती. केक सहजासहजी घरी येण्याइतपत यजमानाचं भाग्य थोर नसायचं. वाढदिवसाच्या मंगल दिनाची त्यासाठी वाट बघावी लागायची. आज वाढदिवस, बढतीपासून कुठल्याही आनंदाच्या उत्सवाचा केक साथीदार असतो आणि त्यामुळेच ख्रिसमस फीवरसोबत या केकची कहाणी जाणून घ्यायचा मोह होतो.

Civil Law in Constitution is equal or same
नागरी कायदा… समान की एकच?
Indian Railway facts
रेल्वे इंजिनवर लिहिलेल्या ‘या’ शब्दांच्या मदतीनं ओळखा गाडी कोणती आहे? कोडमध्ये दडलेली असते खास माहिती
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?

पाश्चात्त्य संस्कृतीत ‘केक’ हा अगदी महत्त्वपूर्ण पदार्थ असला तरी केक अमुक ठिकाणी तयार झाला असं ठासून सांगता येत नाही. मुळात ‘चला केक बनवू या’अशा आविर्भावात हा पदार्थ जन्माला आलेलाच नाही. प्राचीन, पाश्चात्त्य संस्कृतीत ब्रेडचा वापर फार पूर्वापार आहे; पण आपल्याकडे कसं, तीच तीच पोळी खाऊन कंटाळा आला की पुरणाची पोळी, गुळपोळी, सांजापोळी असं नटवणं सुरू होतं. तसंच या ब्रेडवर फार आधीपासून प्रयोग होत होते. त्यात मधाने गोड केल्या जाणाऱ्या ब्रेडचा उल्लेख होतो. हा लौकिकार्थाने केक नसला तरी ही कल्पना पुढे विस्तारून ‘केक’नामक वेगळा पदार्थ झाला. प्राचीन इजिप्शियन संस्कृतीकडे केकच्या मूळ रूपासाठी निर्देश केला जातो. संशोधकांच्या मते पंधराव्या शतकापर्यंत केकचा समावेश अत्यावश्यक पदार्थाच्या यादीत फारसा नव्हता, पण आइसिंगचं तंत्र विकसित होत गेलं. उष्णकटीबंधीय वसाहतीतून उसाचं उत्पादन वाढत जाऊन रिफाइंड साखर युरोपात रुळली तेव्हापासून खऱ्या अर्थाने केक हा एक अविभाज्य भाग होऊन बसला. याचा अर्थ वेगवेगळ्या रूपांत सर्वच संस्कृतींत तो अस्तित्वात होता, पण त्याला विशिष्ट पदार्थ म्हणून ओळख कालांतराने मिळाली. औद्योगिक क्रांतीनंतर बेकिंग पावडर व बेकिंग सोडय़ाच्या साथीने केकचा प्रवास अधिक सुकर झाला. अवनचा शोध लागल्यावर तर केकचं बेकिंग खूपच सोपं झालं. केक तयार होताना त्याच्याकडे पहात राहण्याचे, लक्ष ठेवण्याचे व्याप गायब झाले आणि केकच्या लोकप्रियतेची गाडी सुसाट धावू लागली.

केक या शब्दाचा संबंध सुरुवातीला कुकया शब्दाशी जोडला गेला, पण तो तसा नाही. ‘काका’ या जुन्या Norse  भाषेतील शब्दापासून तो तयार झालेला आहे. ग्रीक लोक पूर्वी या केकला flat या अर्थाने ‘प्लॅक्स’ म्हणत.

आजही आपण कोणासाठी केक घेऊन जातो? तर ज्या व्यक्तीविषयी आपल्याला खास काही वाटतं. अगदी पूर्वीपासून केक हे एखाद्या व्यक्तीला ती खास आहे हे दर्शवण्याचे प्रतीक आहे. प्राचीन काळी साखर किंवा सुकामेवा सहज उपलब्ध नसायचा, त्यामुळे या गोष्टींचा वापर करून एखाद्या व्यक्तीसाठी केक तयार करण्याला नातेसंबंधांच्या दृष्टीनेही खूप महत्त्व होते, किंबहुना उत्तम केक घरी बेक करणं हे एके काळी श्रीमंतीचं लक्षण ठरायचं. ज्याच्याकडील केकमध्ये अत्यंत दर्जेदार गोष्टी वापरल्या जायच्या तो इतरांच्या नजरेत खास स्टेटस बाळगून असायचा.

केक खूप वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्ताने आज सोबत करत असला तरी विविध संस्कृतींत विशिष्ट सणाला विशिष्ट प्रकारचा केक बेक करण्याला खास महत्त्व आहे. ख्रिसमससाठी बेक होणारा प्लम केक असाच खास ठरावा. पाश्चात्त्य देशातील शेतकरी वर्गासाठी ख्रिसमसच्या निमित्ताने होणारा हा केक म्हणजे नव्या पिकाचं स्वागत करण्याची एक पद्धत आहे. या प्लम केकमधील सुकामेवा थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता देत असल्याने या केकचं महत्त्व मोठं आहे. आजकाल अनेक पंचतारांकित हॉटेलमध्ये नाताळच्या आधी केक मिक्सिंग सेरेमनी खूप थाटात पार पडतो. ही पाश्चिमात्यांची सगळ्या कुटुंबाला एकत्र आणण्याची संकल्पना आहे. या केक मिक्सिंग विधीनिमित्त संपूर्ण घर एकत्र येत असतं. त्याच विधीला थोडं ग्लॅमराइज करत पंचतारांकित हॉटेल्स केक मिक्सिंग डे सेलीब्रेट करतात.

आज सगळ्या जगभरात केकचे म्हणाल तितके प्रकार उपलब्ध आहेत. भारतीयांच्या आयुष्यातही केकने स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. बाजारात रेडीमेड मिळणाऱ्या केकपासून हौशी गृहिणींच्या तव्यावर बेक केलेल्या केकपर्यंत प्रत्येकाला केक करून बघावासा वाटतो. अनेकांना ती पाककौशल्याची पोचपावती वाटते; पण केक म्हणजे एक गंमत आहे. ख्रिसमसच्या दिवसांतल्या उबदार थंडाव्यात जी गूढ गंमत आहे तीच केकच्या येण्यात असते. आणणाऱ्याशिवाय बाकीच्यांसाठी केक नेहमीच सरप्राइज असतो. कसा दिसत असेल, कशी चव असेल या उत्सुकतेने त्याच्या आगमनाबरोबर सगळे त्याच्याभोवती जमा होतात. पुठ्ठय़ाचे झाकण दूर झालं रे झालं की, मुखातून उमटणाऱ्या वॉव किंवा ‘वाह’ने या महाशयांचं स्वागत होतं. केक हा पदार्थ तोच, पण नव्या डिझाइनसह, स्वादासह प्रत्येक वेळी नवं द्यायची त्याची ताकद हे त्याचं सगळ्यात मोठं बलस्थान. केक भरवायला गेल्यावर नको म्हणणारे त्याचे काही टीकाकारही आहेतच म्हणा.

मऊपणा, गोडवा, क्रीमचा स्निग्धभाव या सगळ्या रसायनातून केकचा तुकडा मुखात शिरल्यावर एक आनंदाचं गोड कारंजं उगीचच आत थुईथुई करायला लागतं. काही विशेष नसतानाही एक सेलिब्रेशन मूड तयार होतो. उदास असताना केक, पेस्ट्री खाणाऱ्यांची संख्या यामुळेच मोठी असावी. केक हा पदार्थ त्याच्या अनेक थरांमध्ये अनेक गोष्टी दडवून असतो. या आनंद, उत्साह, मस्तीच्या थरात मन गुंततं ते उगीच नाही!