आमची पिढी एकूणातच तशी गोंधळखोर पिढीए. आम्हाला चक्क केऑस आवडतो! पिढीपिढीची काही तिरसट वैशिष्ट्यं असतात तसलंच हे आमचं एक. आणि आम्ही या वैशिष्ट्याला जागणारी केऑटिक पात्रं ! तसं पाहीलं तर प्रेम आणि मत्री या गोष्टींमधलं वेगळेपण समजून उमजून त्या त्या गोष्टी त्या त्या ठराविक फ्रेम्समध्ये अनुभवायला आवडतात आम्हाला.. म्हणजे अमुक एकाशी माझी फक्त आणि फक्त निखळ मत्री आहे आणि तमुक एक माझा प्रियकर आहे हा फरक आजची कुठलीही सेन्सिबल मुलगी बिनदिक्कत मान्य करते. निखळ मत्रीवर संशय घेणाऱ्यांना सरसकट फाट्यावर मारते, पण तीच किंवा तिच्याचसारखी एखादी मुलगी ‘आपलं तर काय सगळंच सोर्टेड.’ असं म्हणता म्हणता कधी नकळतपणे तिचं तिला काही कळायच्या आत एखाद्या मुलाकडे ओढली जात असते तेव्हा ते जे काही तिला वाटत असतं ते सॉल्लिड चक्रावून टाकणारं असतं. अशा प्रकारची वाटणी डबक्यांसारखी असतात. काहीतरी अनेक दिवस तुंबत तुंबत साचून राहिलेलं असतं. गढूळ झालेलं असतं. सुरुवातीला हवंहवंसं वाटणारं ते असह्य़ व्हायला लागलेलं असतं. त्यात ज्या मुलाबद्दल मुलीला किंवा ज्या मुलीबद्दल मुलाला हे जे काहीतरी वाटत असतं त्याच्या किंवा तिच्या आयुष्यात आधीच कुणीतरी असेल तर वाटणाऱ्या असहाय्यतेचं, हतबलतेचं सॉर्टेड नशिबवानाने काही विचारूच नये.

रिलेशनशिपमध्ये असलेल्या एखाद्या मुलाला रिलेशनशीपमध्ये असलेल्या एखाद्या मुलीबद्दल किंवा मुलीला मुलाबद्दल असं एकमेकांकडे आकर्षून घेणारं जबरदस्त काहीतरी वाटत असेल तर निदान आमच्या पिढीतल्यांनातरी या वाटण्याला नेमकं काय म्हणायचं हे सुस्पष्ट, नीटसं सांगता येत नाही. आमच्या आधीच्या पिढीतले कदाचित या गोष्टीला सरळसोट फालतूपणाचं लेबल लावून मोकळे होतीलंही पण ते त्यांनी करून घेतलेल्या गरसमजूतीसारखं चीप किंवा वरवरचं असेलच असं नाही! अशा ऑलरेडी नात्यात असूनही नकळत दुसऱ्याकडे तीव्रतेने ओढल्या जाणाऱ्या आजच्या तरुणांमध्ये एक चांगलं व्हर्जनही आहे. तूर्तास आपण त्याला क्वालिटेटीव्ह व्हर्जन म्हणूया ! समोरच्याबद्दल वाटणारं काहीतरी हे स्थल-काल-परिस्थितीवर अवलंबून नसलेलं, त्या बाहेरंचं आणि स्वनियंत्रणाबाहेरचंही असतं. ते खूप जेन्यूइन, खूप खरंखूरं काहीतरी असूच शकतं. कदाचित आपल्याला काय हवंय हे नेमकं ठाऊक नसताना अचानक ते काहीतरी एखाद्या व्यक्तीस्वरूपात आपल्या समोर उभं ठाकतं तेव्हा आपल्याला आपल्या बाहेरच्या आपल्याशी कनेक्ट होऊ पाहणार्या नव्या धाग्याचा शोध लागलेला असतो आणि कशाचंही समर्थन न करता, कुणालाही कसलीही स्पष्टीकरणं न देता नात्यात असूनसुद्धा दुसरं कुणीतरी आपल्याला आवडतंय हे स्वत:शीही मान्य करायला धाडस लागतं. मग सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतरही आपल्या वाटण्याशी प्रामाणिक राहणाऱ्या कुणालाही फक्त मी आणि माझा प्रियकर, मी आणि माझी प्रेयसी असं पूर्वीइतकं सोर्टेड होता आलं नाही तरी समोर निर्माण झालेल्या पेचातली तीव्रता काही अंशी कमी करण्यात तरी ती व्यक्ती नक्कीच यशस्वी होऊ शकते.

स्वत:शी असं पराकोटीचं प्रामाणिक राहणं कठीण असलं तरी दोन माणसांच्या या अशा एकमेकांकडे ओढले जाण्याच्या विशुद्ध वाटण्यात कुठेतरी मुक्ततेला भिडण्याची ताकद असावी. आधीच्या सॉर्डेड असण्यातलं नेमकेपण आपण गमावलेलं असलं तरी त्या गोंधळातूनच आपल्याला इतर कुणाहीपेक्षा वेगळी. एका अनकन्वेंशनल आशयाची जी शिदोरी मिळालेली असते, तिचं मोल काही वेगळंच! निदान आमच्या पिढीला तरी असंच वाटतं.