फॅशन ट्रेण्ड कोणते, याची माहिती तर हल्ली अनेक माध्यमांतून आपल्यापर्यंत पोचत असते; पण बडे स्टाइल गुरू सांगतात – ट्रेण्ड फॉलो करू नका, ट्रेण्ड निर्माण करा.. आंधळेपणाने फॅशन ट्रेण्ड फॉलो करण्यापेक्षा स्वत:ची खास फॅशन शैली निर्माण करण्यासाठी थोडं आऊट ऑफ फॅशनजावं लागतं. त्यासाठीच हे सदर.. तुमची स्वत:ची फॅशन शोधण्याच्या टिप्स देण्यासाठी! पहिल्या भागात फ्युचरिस्टिक फॅशनविषयी.

मागच्या वर्षी पँटोनने ‘कलर ऑफ द इयर’ म्हणून फिकट गुलाबी ‘रोझ स्कॉझ’ आणि फिकट आकाशी ‘सेरेनिटी’ या दोन रंगांची निवड केली, तेव्हा त्यांना या निवडीमधूनही स्त्री-पुरुष समानता अपेक्षित होतीच.. पण वर्षभरात यातील गुलाबी रंगाने जगावर अशी काही मोहिनी घातली की फक्त कपडय़ांवरच नाही, तर दागिने, आर्टेक्चर, फíनचर, केक्स, स्वीट्स, पेंटिंग, मेकअप, हेअर कलर असा सगळीकडेच हा गुलाबी रंग सहज उतरला. एकाच वेळी अनेक ठिकाणी या गुलाबी रंगाची मक्तेदारी स्पष्ट दिसून आली. गुलाबी रंगाचं हे प्रमाण इतकं अधिक होतं की जगभरातील मीडियाला गुलाबी रंगाची तरुणाईच्या भाषेत सांगायचं झाल्यास, ‘मिलेनियल पिंक’ची दखल घ्यावी लागली.

गुलाबी रंग हा तसा प्रामुख्याने मुलींशी जोडला जातो. ‘गर्ली कलर’ म्हणत त्याला चाकोरीत बांधायचा प्रयत्नही अख्ख्या जगाने केला. पण एखाद्या व्हायरसप्रमाणे या रंगाने हळूहळू आपला प्रभाव तुमच्या आमच्या नकळत जगावर सोडायचा प्रयत्न केला आणि हा प्रभाव फक्त मुलींपर्यंत मर्यादित राहिलाच नाही. कपाटातल्या काळा, लाल, निळ्या अशा उठावदार रंगांची जागा कधी या फिकट रंगाने घेतली आणि त्यातून एक नवी संस्कृती जन्माला आली, हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. अगदी आतापर्यंत गुलाबी रंग मुलंही कधी तरी कसा वापरू शकतील, याची उदाहरणं देत केवळ दखल घेण्याइतपतच आपली तयारी होती. त्यातच आपण अडक लो होतो. मात्र ‘मिलेनियल पिंक’चं गारुड अख्ख्या जगावर सहजपणे पसरत गेलं. तसा हा रंग आहे तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाचा. उत्कट प्रेमाच्या लालीचा अनुभव घेण्यापूर्वीच्या नाजूक, हळव्या जाणिवेचा. शांत प्रवाहाचा, असा हा रंग आहे. पण कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत एकदा चाकोरी तोडली की जगाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा बदलतो, हे या रंगाने सिद्ध केलं. आज हा रंग एका वेगळ्याच भावनेशी जोडला गेला आहे. सशक्तीकरणाच्या भावनेशी, विचाराशी गुलाबी रंग जोडला गेला आहे तो गर्दीत उठून दिसण्याच्या त्याच्या गुणधर्मामुळे.. आजवर हळव्या भावनेशी जोडल्या गेलेल्या या रंगाबद्दल इतका वेगळा विचार कोणीही केला नव्हता मात्र फॅ शन जगतात या करामती असाही बदल घडवून आणतात.

एरवी रंगाच्या ट्रेंडबद्दल बोलताना पहिल्यांदा उल्लेख होतो त्याच्या शेडचा. पण ‘मिलेनियल पिंक’ ही गुलाबी रंगाची कोणती एक छटा नाही. या रंगाच्या छटेपेक्षा त्याच्यामागची भावना लोकांना जास्त आकर्षति करते आहे. फिकट काहीशी न्यूड गुलाबी छटा यात प्रामुख्याने येते. याची खासियत म्हणजे बहुतेक सगळ्या रंगांसोबत ती जुळून येते. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी हा रंग वापरू शकता, त्याला वेळेचं बंधन नाही. वापरातील वेळेची सहजता हा त्याचा व्यावहारिक गुणधर्म झाला. पण याहीपेक्षा या रंगाचा तरुणाईला सगळ्यात भावलेला गुणधर्म म्हणजे यात स्त्री-पुरुष भेदाभेद सहज गळून पडले. स्त्रियांच्या कपडय़ांमध्ये गुलाबी रंगाचं परतणं यात कदाचित कोणाला फारसं अप्रूप वाटणार नाही. पण हा रंग पुरुषांच्या कपाटातही ज्या सहजतेने शिरला त्याचं कौतुकच आगळं होतंय. त्यामुळे हा रंग स्त्री-पुरुष समानतेच्या चळवळीचा एक भाग बनला आहे. अर्थात तरुणींच्या कपडय़ांमध्ये हा गुलाबी रंग युथफुल म्हणून पसंत केला गेलाच पण त्यासोबत फॉर्मल ड्रेसिंगमध्येसुद्धा त्याच्यामुळे मिळणाऱ्या फ्रेश आणि क्लीन लुकमुळे तो पसंत केला गेला. गुलाबी रंग म्हटल्यावर डोळ्यासमोर येणारा बार्बी पिंकचा गडदपणा या गुलाबी रंगात नाही. त्यामुळे त्याचा भडकपणा डोळ्यांना टोचत नाही. दोन वर्षांपूर्वी आलेल्या नियॉन रंगाच्या लाटेमध्ये फ्लोरोसंट पिंकचा गडदपणा भाव खाऊन गेला होता. पण नव्या गुलाबी छटेमध्ये आणि फ्लोरोसंट पिंकमध्ये बराच फरक आहे. फ्लोरोसंट रंगातील उद्रेक यात नाही. पांढऱ्या रंगाप्रमाणेच या रंगाचा बोल्डनेस चटकन डोळ्यात भरतो. त्यामुळे तो परिधान करणाऱ्या व्यक्तीमधील बोल्डनेसही सहज जाणवतो, ती व्यक्ती चारचौघात उठून दिसते. अगदी रनवे गाऊनपासून ते लेहेंग्यापर्यंत वेगवेगळ्या ड्रेसिंगमध्ये हा रंग डिझायनर्सनी यंदा आवर्जून वापरला आहे.

कपडे हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहेतच आणि केवळ ‘कपडे घालणे’ या पलीकडे त्यांच्यातून आपली संस्कृती, विचारसरणी याचे पडसाद सहज उमटतात, हे आता जगमान्य आहे. पण यातील एक गंमत म्हणजे कपडय़ांमधील बदल स्वीकारण्यासाठी जगाच्या पाठीवर फारसे बंड कोणाला करावे लागले नाहीत. हे बदल काळानुरूप सहज स्वीकारले गेले. अगदी साडीपासून सलवार सूट ते जीन्सपर्यंतचं परिवर्तन सहजपणे पिढीगणिक होत गेलं. गुलाबी रंगाचं पुरुषांच्या कपाटात जाणं, हेदेखील त्यामुळे तितक्याच सहजतेने घडलं. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे फेमिनिझमच्या चळवळीचा हेतू हा स्त्रियांचे श्रेष्ठत्व दाखवण्यापेक्षा समानतेकडे नेण्याचा आहे. अशा वेळी पुरुषांच्या कपाटातील गुलाबी रंग हा या चळवळीतील समानतेचा विचार व्यवहारातही उतरला असल्याचे अधोरेखित करतो. अर्थात हे जाणूनबुजून आणलेलं लोढणं नाही. हा बदल अगदी सहज कपाटात शिरला आणि तो तितकोच सहज स्वीकारला गेला. त्यामुळे यंदाच्या या गुलाबी नशेला तुम्हीही आपलंसं करून बघाच!

viva@expressindia.com