16 January 2019

News Flash

‘जग’ते रहो : आपली माणसं

सुरुवातीच्या काळात इथल्या वातावरणात मिसळायला आणि त्याची सवय व्हायला थोडा वेळ लागला.

डॉ. सुखदा बिडकर बॉन, जर्मनी

सात डोंगरांच्या कुशीत, भव्य ऱ्हाईन नदीच्या किनारी वसलेल्या बीथोवेनच्या संगीतमय बॉनमधून तुम्हा सर्वाना गुटन टाग. २०१२ मध्ये उच्च शिक्षणासाठी मी पुण्याहून बॉनला आले. जर्मनीतील या पुण्याने माझं स्वागत केलं. नामांकित विद्यापीठ, तिथं जगभरातून शिकायला आलेले विद्यार्थी आणि तितकाच मोठा सांस्कृतिक आणि राजकीय वारसा लाभलेलं असं बॉन शहर मला खूपच आवडलं. एकूणच परदेशाशी आणि जर्मनीशी माझी पहिली ओळख. आमची ‘बॉन युनिव्हर्सिटी २०० र्वष जुनी आहे. २०१८ मध्ये इथं चार हजार विद्यार्थी शिकत आहेत. इथल्या वुल्फगंग पॉल (फिजिक्स १९८९) आणि रिनहार्ड सेल्टन (इकॉनॉमिक्स १९९४) यांना नोबेल पारितोषिक मिळालं आहे.

सुरुवातीच्या काळात इथल्या वातावरणात मिसळायला आणि त्याची सवय व्हायला थोडा वेळ लागला. शांत रस्ते, कमी लोक, रविवारी दुकान बंद हे सगळं नवीनच होतं. विद्यापीठात आंतरराष्ट्रीय वातावरण असल्याने अनेक देशांतील मित्रमैत्रिणी झाले आणि परदेशातील सांस्कृतिक विविधतेचा अनुभव मिळाला. बॉनमधले अनेक पब्ज विद्यर्थ्यांनी गजबजलेले असतात. शुक्रवारी आणि शनिवारी घरी किंवा बाहेर एकत्र जमून विद्यार्थी धमाल करतात आणि तरीही सगळ्यांच्या संस्कृतीचा व मतांचा आदर करत जबाबदारीने वागतात. यावरून आठवलेला प्रसंग म्हणजे २०१४ मधला फुटबॉल वर्ल्ड कप. ज्या दिवशी जर्मनीने हा वर्ल्ड कप जिंकला, त्या दिवशी नेहमी शिस्तबद्धता पाळणारे जर्मन्स रस्त्यांवर जमून खूप मनापासून आनंद साजरा करत होते. रात्रभर लोकांनी जागून, नाचून, गाणी म्हणून खूप उत्साहात त्यांचा विजय साजरा केला. त्या रात्री रस्त्यावर खूप कचरा दिसला, पण आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी विद्यापीठात जाताना तेच रस्ते चकचकीत दिसले.

इथं प्रकर्षांने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे अभ्यासाबरोबरच विद्यार्थी व्यायामाला, स्वत:च्या आरोग्याला तसेच स्वत:च्या छंदांना खूप महत्त्व देतात. सुट्टीच्या दिवशी डोंगर चढतात. मनसोक्त सायकल चालवतात. विद्यार्थी आपल्या कुटुंबाला, नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना भेटतात. लोकांना व्यायामाची प्रचंड आवड असून अनेक जण पळायला जातात. फिट राहायला आणि चांगल्या खाण्याला महत्त्व देतात. वीकएण्डला अजिबात काम करत नाहीत. शुक्रवार दुपारपासून वीकएण्ड सुरू होतो. इथली मुलं त्यांच्या आवडीनुसार शिकतात. त्यांना भरपूर फिरायची आवड आहे. छंदांबद्दल ते खरंच खूप पॅशनेट असतात. खेळण्यात त्यांना खूप रस असतो. हायकिंग, सायकलिंग, स्विमिंग आणि फुटबॉल प्रचंड आवडतो. लोकांना मॉल वगैरेमध्ये खरेदी करण्यासारख्या गोष्टींपेक्षा निसर्गसान्निध्यात राहायला अधिक आवडतं. लोक कायदे आणि नियम व्यवस्थितपणे पाळतात.

मुलांना लहानपणापासून स्वत:ची मतं आणि विचार मोकळेपणाने मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. शैक्षणिक वातावरणात किती गुण मिळाले यापेक्षा मुलांच्या ज्ञानाला आणि कौशल्याला महत्त्व दिलं जातं. विद्यार्थ्यांच्या कौशल्यानुसार प्राध्यापकही त्यांना संशोधनासाठी प्रोत्साहन देतात. याचमुळे मलाही अभ्यासक्रमामध्ये संशोधनाची आवड निर्माण झाली आणि पुढे मी पीएचडी करण्याचा निर्णय घेतला. पीएचडी करताना माझ्या प्राध्यापिकेने मला संशोधनासाठीच नव्हे तर व्यक्तिमत्त्व विकासासाठीसुद्धा खूप संधी दिली. दोन वर्षांपूर्वी मला त्यांच्यासोबत ब्रसेल्सला जाऊ न युरोपियन कमिशनच्या अधिकाऱ्यांसमोर माझं संशोधन सादर करून त्यांच्याशी चर्चा करायची संधी मिळाली. पीएचडीसाठी माझा ‘टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड इनोव्हेशन मॅनेजमेंट इन अ‍ॅग्रीबिझनेस’ हा अभ्यासविषय होता. पीएचडी संपल्यावर मी बॉन विद्यापीठातच पोस्ट डॉक्टरल रिसर्चर म्हणून नोकरीला लागले. त्यामुळे वर्क कल्चरचाही अनुभव मिळतो आहे. सकाळी आठ वाजता ऑफिसमध्ये येऊन सलग काम करून संध्याकाळी लवकर घरी जाणारे जर्मन्स वर्क -लाइफ बॅलन्सला महत्त्व देतात. करिअर हा आपल्या आयुष्याचा एक भाग आहे, असं ते मानतात. विशेषत: ईस्टर आणि ख्रिसमससारखे मोठे सण नातलगांबरोबर साजरे करतात. इथं व्यक्तिस्वातंत्र्य आहे. आपलं मत, आवडीनिवडी जपताना त्यामुळे समाजाला काही त्रास होत नाही ना, हेही पाहतात.

जर्मन लोकांच्या खाण्यामध्ये इथल्या हवामानाला अनुसरून मांसाहाराचे प्रमाण जास्त आहे. तरीही शाकाहारी पर्याय खूप उपलब्ध आहेत. मोठय़ा शहरांमधल्या भारतीय रेस्तराँमध्ये इथले लोकही अतिशय चवीने आपल्या पदार्थाचा आस्वाद घेताना दिसतात. माझ्या पीएच.डी. ग्रॅज्युएशनच्या वेळी माझ्या सहकाऱ्याने मला आवर्जून सामोसे आणायला लावले, हे मी कधीच विसरणार नाही. ब्रेड आणि केक ही जर्मनीतील बेकरीज आणि कॅ फेजची खासियत. आपल्या आवडीचा मेन्यू काफे उंड कूखेन (कॉफी आणि केक). आपल्या आवडीचा केक आणि गरम कॉफी घेऊन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कॅ फेमध्ये बसून आजूबाजूची गर्दी बघत गप्पा मारणं हा एक टिपिकल जर्मन विरंगुळा. अशाच एका काफे उंड कूखेनच्या संध्याकाळी सर्वेशने मला लग्नासाठी विचारलं. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे.

गेल्या काही वर्षांत प्रकर्षांने जाणवलेली गोष्ट म्हणजे जर्मन भाषा येत असल्याने मला खूप स्थानिक गोष्टी अनुभवायला मिळाल्या. इथल्या लोकांचं जर्मन भाषेवर प्रेम असल्यामुळे आपण त्यांच्याशी जर्मनमध्ये बोलण्याचा नुसता प्रयत्न केला तरी त्यांना खूप कौतुक वाटतं आणि ते तुम्हाला जर्मन भाषा आणि संस्कृती शिकायला अधिकाधिक उत्साहाने मदत करतात. मी इथं नवीन असताना एका आजींना जर्मन भाषेत बोलून रस्ता विचारला तर त्यांनी मला मदत तर केलीच, पण मी जर्मन बोलते म्हणून खूश होऊन चॉकलेट दिलं. आतापर्यंत बर्लिन, म्युनिक, अ‍ॅमस्टरडॅम, झुरिच, मिलान, फ्लोरेन्स, साल्झबर्ग, व्हिएन्ना, ब्रसेल्स आदी ठिकाणी मनसोक्त फिरण्याचा योग आला आहे.

माझं गेल्या वर्षी लग्न ठरल्यावर आता भारतीय लग्न समारंभाविषयी कळणार, ऐकायला आणि पाहायला मिळणार, अशी उत्सुकता माझ्या सहकाऱ्यांना वाटली होती. माझ्या खास मैत्रिणी माझ्या लग्नासाठी पुण्यात आल्या होत्या. त्यांनी खूप एन्जॉय केलं. अगदी साडय़ा विकत घेऊ न हौसेने नेसल्या. सगळ्या समारंभांना हजेरी लावली. त्यांना आपलं जेवण प्रचंड आवडलं आणि एरवीही त्यांना आपले पदार्थ आवडतात. सुरुवातीच्या काळातली गोष्ट आठवते आहे की, आईने पाठवलेला दिवाळीचा फराळ मी त्यांनाही द्यायचे. त्यातल्या मिठाईवरचा वर्ख ही कल्पना त्यांना माहिती नव्हती. त्याची मला मज्जा वाटायची. तेव्हा त्या विचारायच्या की हा वर्ख खाऊ  शकतो का? वगैरे वगैरे. आमच्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांना पेढे, काजुकतली इतकी आवडते की विचारूच नका. पावभाजीही आवडते त्यांना. फक्त आपले गुलाबजाम, लाडू हे पदार्थ त्यांना जास्तीच गोड लागतात. आम्ही एकेकाच्या घरी जमतो तेव्हा घरून एकेक पदार्थ घेऊ न येतो. त्यांनी माझ्या लग्नाच्या निमित्ताने लास्ट मिनिट सरप्राईज पार्टी केली होती. तेव्हा त्यांनी ‘कल हो ना हो’मधल्या गाण्यावर डान्स बसवला होता. एक निरीक्षण असं आहे की, शाहरुख खान म्हातारा झाल्यापासून जर्मनीतल्या मुलींची बॉलीवूडची क्रेझ खूप कमी झाली. सुदैवाने माझी मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांना भारताविषयी व्यवस्थित माहिती आहे आणि त्यामुळे आमच्या गप्पा रंगतात. दर वर्षी आम्ही ऑफिसमधले सहकारी ख्रिसमस साजरा करतो. हॉस्टेलमध्ये असताना माझ्या शेजारपाजारच्या मैत्रिणींना कधी छोटंसं गिफ्ट किंवा कार्ड द्यायचे. इथले लोक खूप फ्रें डली आणि ओपन आहेत. आपली भारतीय संस्कृती जपून इथल्या समाजात सामील होत माझ्या व्यक्तिमत्त्वाला विस्तृत करण्याची छान संधी मला जर्मनीने दिली. एकूणच इथं वेळोवेळी भेटलेल्या लोकांनी आणि विविध अनुभवांमुळे जर्मनीने मला अगदी आपलंसं केलं आहे.

viva@expressindia.com

First Published on June 8, 2018 12:37 am

Web Title: germany travel experience