गुगलइतक्याच महत्त्वाच्या बनलेल्या यूटय़ूब या माध्यम समुद्रातले वॉचलेले काही कण अर्थात काही मस्ट वॉचव्हिडीओ.

दोन दशकांपूर्वी डिस्कव्हरी चॅनलवर ‘लोन्ली प्लानेट’ (नंतरचे नाव ग्लोब ट्रेकर) नावाचा एक झकास कार्यक्रम लागायचा. साधारणत: तासाभराच्या कालावधीमध्ये  इयन राइट, जस्टिन शेपीरो किंवा मेगन मॅककॉर्क हे निवेदक एका संपूर्ण देशातील भागाची सफर दाखवायचे. बॅकपॅक घेऊन देश पाहायला फिरणाऱ्यांचा काळ लोकप्रिय असताना या कार्यक्रमाला महत्त्व होते. कारण त्या त्या देशाने पर्यटनस्थळ म्हणून घोषित केलेल्या गोष्टींसह ते आणखीही काही पाहणीय आणि अनुभवणीय जागांचा समावेश करून प्रेक्षकांसमोर सुंदर दृश्यांची मेजवानी ठेवायचे. या कार्यक्रमाचा प्रभाव आज सर्वच ट्रॅव्हल आणि चैन दाखविणाऱ्या वाहिन्यांवर आहे. फॉक्स ट्रॅव्हलर किंवा तत्सम वाहिन्या आज खूप आहेत. काही देशी-विदेशी चोवीस तास वृत्तवाहिन्यादेखील अध्र्या एक तासाचे भटकंती कार्यक्रम दाखवितात. यूटय़ूब वाहिन्यांवर ट्रॅव्हल व्हिडीओ प्रसारित झाले तेव्हा ते अगदीच बाळबोध होते. आपल्याकडे कुणी परदेशी किंवा गेलाबाजार कुल्लू-मनाली, लडाखला जाऊन आले की पुढले काही दिवस तिथले फोटो नातेवाईकांना दाखविण्याची त्यांची हौस दांडगी असते. म्हणजे प्रसिद्ध पर्यटनस्थळांपुढे आपणच आपण हसताना-तोंड वाकडेतिकडे करताना, मुरडताना वा हरखून जाताना नातेवाईकांना पाहण्याची सक्ती करण्याचा प्रकार जसा त्यात होता, तसेच पर्यटन व्हिडीओ सुरुवातीला सादर झाले. २००५-६ च्या काळात ब्लॉग लिहिणाऱ्या लेखकांचा सुकाळ होता. त्या वेळी ब्लॉग्जवर आपले पर्यटनानुभव खिळवून ठेवणाऱ्या भाषेत मांडून उत्तम ट्रॅव्हल ब्लॉगर्सही तयार झाले होते. या ट्रॅव्हल ब्लॉगर्सच्या पुढय़ात जेव्हा डिजिटल कॅमेराचे जग आवाक्यात आले, तेव्हा त्यांनी व्हिडीओ ब्लॉग म्हणजेच व्लॉग सुरू केले. सध्या असा एकही सुंदर देश सापडणार नाही, ज्या भूभागवरचे चित्रीकरण यूटय़ूबवरच्या ट्रॅव्हल व्लॉगवर  पाहायला मिळत नाही. घरात बसून कोणत्याही ठिकाणाचे वैशिष्टय़ जाणून घेणे सोपे आहे. तुमचा टीव्ही मोठा असेल, तर या यूटय़ूब क्लिप्स तेथे सुरू करून अनुभव जिवंत करता येणेही शक्य आहे. काही खास ट्रॅव्हल व्लॉग करणारे चेहरे आहेत. तर काही नुसतेच हौशी पण व्लॉग करण्यात तरबेज झालेले समंजस पर्यटक आहेत. प्रिसिला ली नावाच्या एका तरुणीने आपल्या बाली बेटांवरच्या काही दिवसांच्या प्रवासातला फापटपसारा कमी करून व्लॉग डायरी बनविली आहे. परदेशात जाताना आपण काय पाहतो, तर पर्यटनाची स्थळे, तिथली हॉटेल्स आणि त्यातल्या उंची सुविधा, रस्ते, भोजनाची लज्जत आणि भेटणाऱ्या माणसांचे बरे-वाईट नमुने. हे सारे परत घरी आल्यानंतर आपल्याला किती जणांना परत परत सांगावे लागत असेल. ते सारे अनुभव शब्दांत मांडणे आणि समोरच्याला जाणवू देणेही अशक्य असते. हे ट्रॅव्हल व्लॉग अशा वेळी समोरच्याला दाखविल्यास आपले बोलण्याचे किती कष्ट दूर होऊ शकतील आणि आपल्याला दिसलेल्या दृश्यांशी आपण इतरांनाही एकरूप करू शकू. ट्रॅव्हल व्लॉगचा उद्देश सुरुवातीला हाच होता. मात्र एखाद्या निष्णात व्हिडीओग्राफरसारखी शूटिंग आणि एडिटिंग करून आता भटकंतीवेडी मंडळी आपल्या छोटय़ा छोटय़ा प्रवासांना चित्रित करून यूटय़ूबवर पसरवू लागली आहेत. पिसीला ली हिचा व्हिडीओ या सगळ्या बाबींमध्ये सरस आहे.

या ट्रॅव्हल व्लॉगचा सर्वात मोठा फायदा हा त्या ठिकाणी येऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी मोठा होतो. शिवाय ज्यांना आर्थिक अडचणींमुळे जगपर्यटन करता येत नाही, त्यांना इंटरनेटच्या तुटपुंज्या प्लानमध्ये देशाटन करता येते. भूगोल या विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या किंवा पर्यटन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना केसस्टडी करण्यासाठी या व्लॉग्जचा मोठा आधार होतो.

लोन्ली प्लानेट आणि फॉक्स ट्रॅव्हलरसारख्या अनेक वाहिन्यांवरील गाजलेल्या मालिकांचे एपिसोड्स उपलब्ध आहेतच. त्याशिवाय हौशी पर्यटकांनी एखादी वेगळी माहिती, सूचना येथे उपलब्ध होईल. सुंदर ठिकाणांचे व्हिडीओदेखील सुंदर येतात. बाली बेट, थायलंड, व्हेनिस या पर्यटनप्रेमी ठिकाणांसोबत आता विकसित होत असलेल्या आफ्रिकेतील पर्यटनकेंद्रांचे व्लॉग आवर्जून पाहावेत असे आहेत. पर्यटनाला कोणत्याही देशात किंवा सांगण्यासारख्या ठिकाणी जाण्यापूर्वी हे व्लॉग जरूर पाहा. तेथे गेल्यानंतर त्यापेक्षा चांगला व्लॉग निर्माण करण्याचा संकल्प करा. ते लवकर होणार नसल्यास आपल्या आनंदाला लोक जगासोबत कसे वाटतात, याचा अनुभव व्लॉग पर्यटनातून घ्या.

viva@expressindia.com