News Flash

व्हायरलची साथ : ‘हॅशटॅग’चा दहावा वाढदिवस

आजघडीला सोशल मीडियावर दररोज १२५ दशलक्ष हॅशटॅग वापरले जातात.

आजघडीला सोशल मीडियावर दररोज १२५ दशलक्ष हॅशटॅग वापरले जातात.

सोशल मीडिया ही अन्न, वस्त्र आणि निवाराइतकीच मूलभूत गरज झालेली आहे. अनेकांचा दिवस सुरू होतो तोच सोशल मीडियावरील नोटिफिकेशन्स वाचून आणि तिथेच ‘गुड नाईट’चे संदेश टाकून दिवस संपतो. १९९७ साली आलेलं ‘सिक्स डिग्री’ हे सर्वात पहिलं मॉडर्न सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ मानलं जातं. त्यानंतर फ्रेंडस्टर (२००२), हाय ५ (२००३), लिंक्डइन (२००३), मायस्पेस (२००३) ही २००६ पर्यंत सर्वात प्रभावी सोशल नेटवर्किंग संकेतस्थळं झाली होती. यापैकी सुरुवातीची संकेतस्थळं बाद झाल्यानंतर फेसबुक (२००४), यूटय़ूब (२००५) आणि ट्विटर (२००६), इन्स्टाग्राम (२०१२) ही सध्याच्या काळातील सर्वात लोकप्रिय संकेतस्थळं ठरली आहेत. सगळेच जण हल्ली जवळपास प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करीत असताना आपल्याला नेमकं काय हवंय हे शोधणं कदाचित जिकिरीचं काम होऊ  शकलं असतं. पण या महाजालात गोष्टींचं वर्गीकरण करण्याचा शोध लावला गेला नसता तर ते आश्चर्यच मानलं गेलं असतं.

सोशल मीडियावरील गोष्टी खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हातभार लावणारा ‘हॅशटॅग’ म्हणजेच आपल्या लॅपटॉप किंवा मोबाइलच्या कीबोर्डवरील इंग्रजीतील पाऊं ड हे चिन्ह मागील आठवडय़ात दहा वर्षांचं झालं. #TheHashtagIsX आणि #Hashtag10 हे दोन हॅशटॅग मागील आठवडय़ात ट्रेंडमध्ये होते. ख्रिस मेस्सिना या अमेरिकन डिझाईनर आणि सोशल मीडिया तज्ज्ञाने २४ ऑगस्ट २००७ रोजी पहिल्यांदा आपल्या ट्वीटमध्ये #barcamp हा हॅशटॅग वापरला होता. तंत्रज्ञान आणि वेबसंदर्भात होणाऱ्या परिषदेतील लोकांना जोडण्यासाठी म्हणून हा हॅशटॅग वापरण्याची सूचना ख्रिसने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये केली होती. खरं तर ट्विटरने त्याची तेव्हा फार दखलही घेतली नाही. दूरदृष्टी असलेल्यांची कधी ना कधी दखल घ्यावीच लागते, पण त्यासाठी २०११ हे साल उजाडावं लागलं. प्रत्येक सोशल मीडिया एव्हाना वर येऊ  पाहत होता आणि ट्विटरनेही लोकांवर आपलं गारूड घालायला सुरुवात केली होती.

आजघडीला सोशल मीडियावर दररोज १२५ दशलक्ष हॅशटॅग वापरले जातात. ट्विटरने २०११ साली हॅशटॅगची दखल घेतल्यानंतर तर या हॅशटॅगने क्रांती घडवून आणल्या आहेत. अलीकडच्या काळात जगातील अनेक महत्त्वाच्या घटनांमध्ये हॅशटॅगचा मोलाचा वाटा राहिला आहे. चांगल्या गोष्टींबरोबरच वाईट कृत्यांचा निषेध नोंदवणं असो किंवा एखाद्या गोष्टीबद्दल सहानभूती व्यक्त करणं असो, हॅशटॅगने जगातील लोकांना एकत्र आणल्याची अनेक उदाहरणं आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि टम्बलरवर येण्याच्या कैक वर्षे आधीच ट्विटरवर हॅशटॅगने आपली सत्ता गाजवायला आणि त्याचे निकाल द्यायला सुरुवात केली होती. कीबोर्डवरील हॅशटॅग (#) या चिन्हाचा वापर पूर्वी केवळ सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच करीत असत, इतरांना नक्की या बटणाचा वापर माहीतच नव्हता. पण हल्ली मोबाइल वापरणारा प्रत्येक जण हे बटण वापरू लागला आहे. खरं तर ते वापरणं आवश्यक झालं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण जोपर्यंत तुम्ही हॅशटॅग टाकत नाहीत तोपर्यंत तुमची पोस्ट सर्च इंजिनमध्ये येत नाही आणि त्याला सध्याची सर्वात मोठी गरज असलेले लाइक्स किंवा शेअर मिळत नाहीत. एखादी खासगी गोष्ट असो वा सार्वजनिक, ताजी घटना तुम्ही काय म्हणताय हे जर लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर हॅशटॅग हे अतिशय महत्त्वाचे झाले आहेत. शब्द, फोटो, व्हिडीओ यापैकी कुठल्याही माध्यमाद्वारे व्यक्त होताना ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हॅशटॅग हा आजघडीला सर्वात प्रभावी पर्याय आहे.

एप्रिल २०१४ मध्ये २७६ शालेय मुलींचं बोको हराम यांनी अपहरण केल्यानंतर त्यांना परत आणण्यासाठी मोठय़ा प्रमाणात आवाज उठवला होता आणि त्याचं नेतृत्व #BringBackOurGirls या हॅशटॅगने केलं होतं. चार्ली हेब्दो, पॅरिसमधील हल्ला, आईस बकेट चॅलेंज, रिओ ऑलिम्पिक, अमेरिकन अध्यक्षपद निवडणूक अशा जागतिक घटनांसोबतच भारतातील २०१४ सालची निवडणूक असो किंवा अगदी अलीकडे तिहेरी तलाक आणि राम रहिम रिंगबाबतचे निर्णय असोत, सोशल मीडियावर या सर्व लढाया हॅशटॅगमार्फतच लढवल्या जात आहेत.

काय व्हायरल होतंय हेदेखील हॅशटॅगच सांगत असतं. खरं तर काय व्हायरल करायचंय हे हॅशटॅगच ठरवत असतात. ताज्या घडामोडींबाबत ज्या कहाण्या व्हायरल करायच्या आहेत त्यांचे हॅशटॅग तयार करा आणि त्याबद्दल जास्तीत जास्त लोकांना भाष्य करायला लावून संबंधित हॅशटॅगचा वापर करायला सांगा, अशी सध्याची रणनीती आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या पटलावर आपल्याला काय पाहिजे ते शोधून काढण्यासाठी हॅशटॅगची मदत होत असली तरी त्याचा गैरवापरही होतो आहेच. कारण सोशल मीडियावरील प्रत्येक सामान्य वापरकर्ता त्याचा ग्राहक आहे. या सामान्य ग्राहकाने मोठय़ा हुशारीने या हॅशटॅगचा वापर करायला शिकलं पाहिजे. तरच वाईट गोष्टी कमी व चांगल्या गोष्टी मोठय़ा प्रमाणात व्हायरल होतील आणि हॅशटॅगचा शोध सत्कारणी लागेल.

प्रशांत ननावरे viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 4:57 am

Web Title: hashtag celebrates its 10th birthday
Next Stories
1 ‘ताण’लेल्या गोष्टी : गरज सेक्स एज्युकेशनची
2 नैवेद्याचे पान
3 # गणेशा @ सातासमुद्रापार..
Just Now!
X