नामांकित ब्रॅण्ड्सच्या जन्माची, साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी जाणून घेणारं हे सदर.

पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, ऋतू कोणताही असो, भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे चहा. चायपे चर्चा जितक्या यशस्वी होतात तितक्या अन्यत्र क्वचितच होत असतील.अशा या प्रेमाच्या विषयात अनेक वर्षांचा विश्वास कमावून असलेला ब्रँड म्हणजे ब्रुक बॉण्ड. नाम तो सुना होगा ! बॉण्ड. ब्रुक बॉण्ड.

भारतीयांच्या मनात घर करून असलेला हा चहा आपल्याकडे सायबाच्या देशातून आला; आणि पक्का देशी झाला. याचा जनक कोण वगैरे प्रश्न आपल्याला पडत नाही कारण असले प्रश्न त्या चहाच्या वाफेवर विरून जातात आणि उरतो तो निव्वळ एक डोळे मिटून घ्यायचा अनुभव. त्यामुळेच या ब्रँडबद्दल आवर्जून जाणून घ्यायचा प्रय करावासा वाटला.

इंग्लंडमध्ये राहणाऱ्या चार्ल्स ब्रुकला चार मुलगे आणि चार मुली. त्यातला आर्थर हा सगळ्यात धाकटा. साधारण १८७०च्या दरम्यानचा हा काळ होता. चहा पिणे म्हणजे श्रीमंती काम या समजुतीतून बाहेर आलेल्या समाजात चहा पिणं हे एक दैनंदिन कृत्य होऊ लागले होते. छोटा आर्थर अशा काळात दुकानांमध्ये चहा घेऊन जाण्याचे काम करत असे. खरेतर त्याच्या वडिलांनी त्या काळात फॅशनेबल समजले जाणारे काम त्याच्यासाठी पाहून ठेवले होते. आर्थरला एखाद्या कॉटनमिलमध्ये कामाला लावायचा त्यांचा विचार होता पण दरम्यानच्या काळात झालेल्या सिव्हिल वॉरमुळे मिल बंद पडली आणि आर्थरने लिव्हरपूल भागातल्या एका चहाकंपनीत नोकरी धरली. ही नोकरी करता करता स्वत:चा व्यवसाय आर्थरने सुरु केला. त्यातही किरकोळ चहाविक्री करण्याऐवजी घाऊक विक्री करण्याचा त्याचा निश्चय होता. त्यातून सुरु झालेल्या छोटय़ाश्या व्यवसायाला आर्थरने नाव दिले ब्रुक बॉण्ड अँड कंपनी. आर्थर ब्रुकच्या नावात हा बॉण्ड कुठून आला याचं नवल वाटणं स्वाभाविक आहे. पण हा बॉण्ड म्हणजे आर्थरने त्याच्या ग्राहकांशी केलेला करार म्हणजेच बॉण्ड होता. आयुष्यभर उत्तम चहा ग्राहकांना देण्याचा बॉण्ड. नावातला बॉण्ड खरंच या नावाबद्दल एक आपुलकी निर्माण करतो.

दिवसेंदिवस आर्थरचा व्यवसाय वाढत गेला. शिकागोमध्ये हा व्यवसाय विस्तारला होताच पण साहेबांची वसाहत असणाऱ्या भारतातही ब्रुकने व्यवसाय नेण्याचे ठरवले. १९०२ साली दिल्ली दरबारला ब्रुकबॉण्डचा चहा पाठवण्यात आल्याचा उल्लेख आढळतो. १९०३ साली ब्रुकने रेडलेबल हा ब्रँड भारतात आणला आणि ब्रुक बॉण्डच्या धाग्यात भारतीय बांधले गेले. तो लाल पिवळ्या रंगाचा चहाचा पुडा तेव्हापासून दुकानाच्या फळ्यांवर आपलं राज्य गाजवत आहे. १९५७पर्यंत ब्रुकबॉण्ड हा जगातील सर्वात मोठा ब्रँड झाला. ब्रिटन आणि भारतीय चहातील एकतृतीयांश भाग या ब्रॅण्डचा होता. १९६८ मध्ये ‘लिबिग’ या कंपनीत ब्रुकबॉण्ड समाविष्ट झाला. तर १९८४ मध्ये ब्रुक बॉण्ड लिबिग कंपनी युनिलिव्हरने आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर या नावातील ब्रुकबॉण्डचा वापर युनिलिव्हरने इतरत्र देशात हळूहळू कमी केला. भारतात मात्र आजही हे नाव कायम जोडलेले आहे. ब्रुकबॉण्ड रेड लेबल, ब्रुकबॉण्ड ताजा आणि ब्रुकबॉण्ड ताजमहल हे तीन ब्रँड भारतीयांनी उचलून धरले. १९८० च्या दशकात चहा पिणे या सामान्य गोष्टीला ताजमहलचहामुळे एक दर्जा प्राप्त झाला. ती एक प्रतिष्ठेची गोष्ट ठरण्याचा हा काळ ब्रुकबॉण्ड ताजमहलच्या जाहिरातीतून अधोरेखित झाला. तरुण तबला उस्ताद झाकीर हुसेन यांच्या ‘वाह ताज बोलिये’ ची खूप चर्चा झाली. या ताजमहालमध्ये ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील ठराविक भागातच लागवड झालेल्या चहाचा स्वाद होता. दरवर्षी पावसाळ्यात प्रचंड पूर घेऊन येणाऱ्या ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील सुपीक गाळावर आणि त्या वातावरणावर पोसलेला हा चहा खास होता. ताजमहालने चहा पिणाऱ्या मंडळींसाठी एक वरचा क्लास तयार केला. याशिवाय ब्रुक बॉण्ड ताजाने ताजगीभरी चाय, दिमाग खुल जाए हे आश्वासन दिलेच होते.या तीन ब्रँडनी भारतात स्वत:चा असा ग्राहक वर्ग,निर्माण केला.पाकिस्तानमध्ये ब्रुकबॉण्डचाच सुप्रीम ब्रँड खूप प्रसिद्ध आहे.

असा हा भारतीयांसाठी १९०३ सालापासून दरवळणारा ब्रँड ! आर्थर ब्रुकने केलेला बॉण्ड आजही या उत्पादनाने पाळला आहे. अन्य किती ही चहा उत्पादनं येत जात राहिली तरीही हा वाफाळता करार कायम राहिल! कारण  it ls a bond ! Brooke Bond!

viva@expressindia.com