18 January 2019

News Flash

‘पॉप्यु’लिस्ट : आपली हिटलिस्ट!

यू टय़ुब पर्वात गायक किंवा स्टार्स बिलबोर्ड लिस्टांच्या पारंपरिक मार्गाऐवजी व्हायरलमुळे निपजू लागली.

तरुणाईच्या प्लेलिस्टमध्ये बॉलीवूडी गाण्यांची जत्रा असतेच. या लिस्टमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजणारी गाणीही असतातच. यातली खरोखर ऐकायलाच हवीत अशा पॉप्युलिस्ट गाण्यांची तुमची यादी अपडेट करणारं हे सदर..

कॅसेटपर्व संपण्याचा काळ हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या संक्रमणाचा होता. म्हणजे आदल्या पाचेक पिढय़ा तरी संगीताबाबत ‘अजरामर’, ‘दैवी सूर’, ‘अलौकिक’ असल्या विशेषणांमधून बाहेर यायला मागत नव्हत्या. गाण्यातले शब्द महत्त्वाचे-अर्थ महत्त्वाचा असली काहीच्या बाही विधाने करीत सुरावटीला कमी लेखणारा एक वर्ग होता, तर ताल-सुरांमधील प्रयोग रचित कानांना चकवणारे संगीत महत्त्वाचे मानणारा दुसरा वर्ग होता. ‘दिल’, ‘प्यार’, ‘इश्क’, ‘तेरा चेहरा’, ‘तेरी आँखे’, ‘शाम’, आदी मर्यादित शब्दभांडवलावरची हिंदूी गाणी आपल्या रक्तात शिरली. कारण भवताली रेडिओपासून ते सर्वच साधनांनी कानावर पडत राहणाऱ्या संगीतामध्ये ऐकणाऱ्याला पर्याय नव्हता. वॉकमनने कानसेनांना सुविधा पुरवली आणि वॉकमन वापरणारी पहिली भारतीय पिढी १९८० ते ९०च्या दशकात इंग्रजी संगीत काही प्रमाणात ऐकू लागली. मायकेल जॅक्सन ते डॉ. अल्बनचे ‘इट्स माय लाईफ’ आणि फार फार तर खलीदचे ‘दीदी’ यापर्यंत असलेली श्रोतेगिरीची मजल ‘एमटीव्ही’ आणि ‘व्ही चॅनेल’च्या आगमनानंतर वाढली. ‘टायटॅनिक’चे ‘माय हार्ट विल गो ऑन’ आले, त्यादरम्यान एमटीव्हीची पाश्चात्त्य संगीत साक्षरता वाढली होती. ‘वेंगाबॉय’चे ब्राझिल-शालालाला, ‘विगफिल्ड’चे सॅटरडे नाईट, ‘अ‍ॅक्वा’चे बार्बी गर्ल हे डान्स नंबर्स शहरगावांतील सार्वजनिक उत्सवांत लाऊडस्पीकर्सवर लागत होती. पण बिलबोर्ड लिस्टांची शिडी चढून हिट होणाऱ्या शकिरा, रिकी मार्टिन, ब्रायन अ‍ॅडम्स, बॅकस्ट्रीट बॉय, बॉयझोन, निली फुर्टाडो, शनाया ट्विन, शेरील क्रो हे बॅण्ड किंवा कलाकार भारतीय संगीत श्रोत्यांच्या पिढीने पहिल्यांदा स्वीकारले.

यू टय़ुब पर्वात गायक किंवा स्टार्स बिलबोर्ड लिस्टांच्या पारंपरिक मार्गाऐवजी व्हायरलमुळे निपजू लागली. जस्टिन बिबर, दक्षिण कोरियाचा साय यांची निर्मितीच मुळी यू टय़ुबने केली. भारतात आपण रिक्षा-टॅक्सी आणि सण-समारंभांत भोजपुरी ते सर्वभाषिक उडत्या चालीची गाणी ऐकतो. अरिजित सिंगच्या प्रेमपुराण्या धुनींवर मान डोलावतो. संगीतातील धोपटपण टाळणाऱ्या अमित त्रिवेदीच्या लोकसंगीत-पाश्चात्त्य शैली यांच्या मिश्रणातून तयार झालेल्या फ्युजनचे आवडीने कौतुक करतो. आपल्या कानांवर डम्पिंग ग्राऊंडसारखा संगीत कचरा सातत्याने कोंबला जातो. त्यातून काही महिने सातत्याने ऐकले जाणारे गाणे पुढल्या काही महिन्यांतून आपल्या म्युझिक लिस्टमधूनच नाही, तर आपल्या डोक्यातूनही बाद झालेले असते. इंग्रजी गाणी नव्या पिढीने सुरुवातीला ऐकली ती त्यातील ध्वनी गुणवत्तेमुळे. प्रत्येक वाद्याचा, कॉर्ड्सचा कानांना सुखावणारा आवाज शब्दांहून अधिक गाण्यांतील भाव पोहोचवत होता. त्यातील प्रयोग नंतर रुचायला लागले. ‘टायटॅनिक’मधील बासरी वगळून ते गाणे जसे कुणी ऐकू शकणार नाही, तसेच जॉन मेयरच्या ‘युवर बॉडी इज वंडरलॅण्ड’ गाण्यात गिटार विशिष्ट पद्धतीने टय़ून करून काढण्यात आलेला आवाज नसता, तर ते गाणे ऐकणीय स्थितीत पोहोचलेच नसते. अल्पावधीतही चांगलेच सूर ऐकायचे असतील तर बिलबोर्ड यादीला हात घालणे सोपे असते. जग काय ऐकते आहे, याचा पत्ता लागतो आणि ग्लोबल संगीताचे निकष हळूहळू उमगायला लागतात. सध्या एड शिरन आणि बियॉन्से यांचे ‘परफेक्ट’ हे युगुल गीत बिलबोर्ड यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये काही महिन्यांपूर्वीच शो करून गेलेल्या या कलाकाराने सुरुवातीच्या काळामध्ये टेलर स्वीफ्टची काही गाणी लिहिली होती. त्याचे ‘शेप ऑफ यू’ आणि सिया या गायिकेचे ‘चिप थ्रिल्स’ ही गाणी कधी तरी सलग ऐकावीत. अलीकडे व्हर्शन्स आणि कव्हर्सचे (मूळ गाण्यासारखी वाद्यजुळवणी आणि रेकॉर्डिग्ज) इतके पीक आले आहे की ओरिजनल्सहून ती छान वाटतात. ‘शेप ऑफ यू’ आणि ‘चिप थ्रिल्स’ची अशी भरपूर गाणी ऐकायला मिळतात. बिलबोर्ड यादीमध्ये यंदा कमीला कबायो हिचे ‘हवाना’ हे गाणे प्रचंड मोठी उडी मारून तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. टीव्ही टॅलेंट शोमधून गायिका म्हणून पुढे आलेल्या आणि जराही इंग्रजी येत नसतानाही अमेरिकेमध्ये संगीतस्वप्न पूर्ण करायला आलेल्या या क्युबामधील कलावतीचे ‘नेव्हर बी सेम’ हे आणखी एक गाणे आवर्जून ऐकावे. गाण्याची सुरुवात आणि मध्य यांच्यामध्ये टोकाचा फरक असणारी गाणी तयार करण्याचा ट्रेण्ड प्रचंड मोठा आहे. या आठवडय़ाची बिलबोर्ड यादी सोडून बाहेर गेल्यास लायगो आणि सेलिना गोमेझ यांचे एकत्रित ‘इट एण्ट मी’ आणि सेलिना गोमेझ-मार्शमेलो यांचे ‘वुल्व्ज’ ही गाणी ऐकली तर हा प्रकार लक्षात येईल. नॉर्वेमधील डीजे आणि ध्वनिसंकलक असलेल्या लायगोची गाणी डोक्यामध्ये प्रचंड सुंदर तरंग निर्माण करतात. ‘इट एण्ट मी’ आणि ‘इमॅजिन ड्रॅगन्स’ या रॉक बॅण्डचे ‘थंडर’ हे गाणे एकदा ऐकून पाहा. कोणतेही गाणे त्यातील ध्वनिनियोजनातून स्वप्नांच्या प्रदेशात घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. एमआयएच्या ‘पेपर प्लेन’ (जे स्लमडॉग मिलिऑनेरमध्येही ऐकायला मिळते.) आणि एकॉनच्या ‘लोन्ली’ या गाण्याची आठवण करून देणारे आहे. कानाला हेडफोन असला तर आपली आठवडय़ाची यादी आपल्याला नक्कीच करता येईल. तूर्त या आठवडय़ातच इंग्रजी गाणी ऐकायला सुरुवात करायची असेल, तर त्यांच्यासाठी एक ताजी टॉप सेव्हन यादी. शोध घेतलात तर प्रत्येक जण आपली यादी तयार करू शकतो.

म्युझिक बॉक्स

1) Kygo, Selena Gomez – It Ain’t Me

2) Camila Cabello – Never Be the Same

3) Imagine dragons – Thunder

4) Selena Gomez, Marshmello – Wolves

5) Dua Lipa – New Rules

6) Ed Sheeran – I See Fire (Kygo Remix)

7) Kygo – Firestone ft. Conrad Sewell

viva@expressindia.com

First Published on January 12, 2018 12:23 am

Web Title: hit list songs hindi songs bollywood songs hollywood songs