News Flash

मै पौवा चढाके आयी..

मुळात दारू पिणं शरीरासाठी वाईट हे सर्वज्ञात आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मुलींच्या दारूपिण्याच्या प्रमाणावर काहीतरी बोलले आणि सगळ्यांनीच या वक्तव्याला उचलून धरत त्यावर साधारण आठवडाभर आपलं दुकान चालवलं. बरं ते काय बोलले आणि काय नाही यात न शिरता या संपूर्ण गोष्टीतली महत्त्वाची ठरलेली बाब होती ती म्हणजे मुलींचं दारूचं वाढतं सेवन.

गोष्ट साधारण फेब्रुवारी महिन्यातली. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर मुलींच्या ‘दारू’ पिण्याच्या प्रमाणावर काहीतरी बोलले आणि सगळ्यांनीच या वक्तव्याला उचलून धरत त्यावर साधारण आठवडाभर आपलं दुकान चालवलं. बरं ते काय बोलले आणि काय नाही यात न शिरता या संपूर्ण गोष्टीतली महत्त्वाची ठरलेली बाब होती ती म्हणजे मुलींचं ‘दारू’चं वाढतं सेवन. म्हणजे पूर्वी दारू किंवा दारूचं सेवन करणारं कोणी म्हटलं की डोळ्यासमोर पटकन एखादा पुरुष येई, पण आता ते चित्र झपाटय़ाने बदलू लागलंय. म्हणजे सगळ्या क्षेत्रात जशा स्त्रिया मागे नाहीत तशा इथेही नाहीत. अभिव्यक्तिस्वातंत्र्य असणाऱ्या आणि पाश्चिमात्य संस्कृतीचा बऱ्यापैकी पगडा असल्याने अशा अनेक गोष्टी भारताने आत्मसात केल्या आहेत. त्यातलीच ही सुद्धा एक असे म्हणता येईल.

मुळात दारू पिणं शरीरासाठी वाईट हे सर्वज्ञात आहे. (आता त्यातसुद्धा दारूचं अतिसेवन वाईट, थोडीशी चालते, हृदयासाठी चांगली वगैरे वगैरे दररोज नव्याने येणारे तथाकथित अभ्यासू निष्कर्ष आपण बाजूला ठेवू या.) दारू पिणं चांगलं की वाईट? हा इथे विचाराचा मुद्दाच नाही. त्याचे अतिसेवन वाईट यात कुठलीही शंका असण्याचे कारण नाही. मात्र कधीकाळी पुरुषी विश्वाभोवतीच फिरणारी ही दारू मुलींचं पिण्याचं प्रमाण वाढलंय या मुद्दय़ावर येऊन ठेपावी इतक्या वेगाने हा प्रवास झाला आहे. मुली-स्त्रिया दारु पितच नव्हत्या असं सरसकट विधान करणं चुकीचं ठरेल. मात्र आता वाईन, बीअर, व्होडका हे जसं संस्कृती बदलाचं लक्षण म्हणून पुरुषांनी स्वीकारलं आहे तसंच ते स्त्रियांनीही स्विकारलं आहे. मेट्रो शहरांमध्ये ठिकठिकाणी उभे राहिलेले बीअर कॅफेज हे याचं बोलकं उदाहरण ठरावं. इथे जसा स्त्री-पुरूष हा भेदोभेद उरलेला नाही तसंच वयाचंही बंधन राहिलेलं नाही. त्यामुळे केवळ मोठमोठय़ा कॉर्पोरेट कंपन्यांच्या पार्टीजमधून ड्रिंक केलं जातं असं नाही. हल्ली कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांसाठीच नाही तर मुलींसाठीसुद्धा वोडका, बीअर, वाईन किंवा त्याही पुढे जाऊन रम आणि व्हिस्की पिणं म्हणजे ‘कॅज्युअल’ गोष्ट झाली आहे.

महाराष्ट्रातील अनेक शहरांच्या ठिकाणी कमी जास्त प्रमाणात मुलींचं दारू पिण्याचं प्रमाण दिसून येतं. अनेकदा आपापल्या मित्रमैत्रिणींबरोबर एन्जॉय करण्यासाठी म्हणूनच त्याची सुरुवात होते. पूर्वी हिंदी चित्रपटांच्या नायिकांची जगण्याची एक रुढ चौकट होती. त्यामुळे पडद्यावर नायिका शालीन असायच्या. क्वचितच एखादी मीनाकुमारी दारूच्या नशेत सैय्याची आळवणी करताना दिसे. आता मात्र जे अवतीभोवती आहे तेच हिंदी चित्रपटांमधूनही उमटू लागलं आहे. त्यामुळे ‘कॉकटेल’मधली दीपिका पदुकोणने साकारलेली वेरोनिका असेल किंवा ‘चिकनी चमेली, पौवा चढाके आयी’ म्हणत नाचणारी कतरिना कैफ असेल. हिंदी चित्रपटांमधून ही लपवाछपवी बंद झाली आहे. मराठी चित्रपटांनीही आता कात टाकली आहे. तिथेही तरुण नायक-नायिका जशा आजूबाजूला वावरताना दिसतात तसेच दिसू लागले असल्याने तिथेही आता मुलींचं ड्रिंक करणं ही लपवण्याची गोष्ट राहिलेली नाही. चित्रपटांचा थेट परिणाम तरुण पिढीवर होत असल्याने आत्ताच्याही पिढीला तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवावासा वाटणं साहजिक आहे. यासाठी चित्रपट किंवा टीव्ही माध्यमांना दोष देण्यात अर्थ नाही. मात्र सोशली किंवा अन्य कोणत्याही कारणाने ड्रिंक घ्यायची सुरूवात करताना आपली संगत कशी आहे, याचाही विचार तरुण मुला-मुलींनी करायला हवा.

केवळ मुलींच्या ड्रिंक घेण्याचा विचार करता साधारणत: त्यांची सुरुवात कशी होते आणि त्यांच्या आवडी कशा बदलत जातात याविषयी ऋचा वालावलकर सांगते की, ‘साधारण पिण्याची सुरूवात असते तेव्हा  वोडका आणि ब्रीझरला पसंती दिली जाते. वोडका ज्यूससोबत छान लागत असल्याने त्याला पसंती जास्त असते. मात्र काळ सरत गेला की आवडी निवडी बदलत जातात. थोडंसं ‘टिप्सी’ वाटावं म्हणून हळूहळू बीअर, रम आणि व्हिस्कीकडे मोर्चा वळवला जातो. सगळ्यांनाच बीअरचा वास किंवा चव आवडत नाही म्हणून त्यातल्या त्यात व्हिस्कीला जास्त पसंती मिळते पण तरीही बिअरची किंमत बाकीच्यांपेक्षा कमी असल्याने बीअरच्या सेवनाचं प्रमाण मुलींमध्येही त्यामानाने जास्त आहे. त्यातही हल्ली अनेक वीकएंड ऑफर्स आणि डिस्काउंट कुपन्समुळे किमतीत सूट मिळत असल्याने पिण्याचं प्रमाण वाढतं आहे’, असं ती म्हणते.

आता या मुलींच्या पिण्याच्या सवयीतही दोन प्रकार आहेत. एक म्हणजे अगदीच कधीतरी घेणं आणि दुसरं म्हणजे ‘तल्लफ’ आली म्हणून पिणं. ‘ओकेजनली’ म्हणजे कधीतरी मित्रांसोबत जाऊ न असं मैत्री सेलिब्रेट करणं वगैरे वेगळं पण काहीच करायला नाही म्हणून चला प्यायला बसू असं म्हणणाऱ्या मुलींचं प्रमाणदेखील वाढीस लागत आहे यात दुमत नाही. याला जबाबदार जितक्या मुली आहेत तितकेच पालकही. बरं असं असलं तरी हल्ली घरी ‘सोबर’ दिसावं म्हणूनसुद्धा अनेक शकली लढवल्या जातात त्यामुळे पालकांनाही थांगपत्ता लागण्याचे मार्ग फार कमी झाले आहेत. तसंच मुलींसोबत होणारे वाढते गैरप्रकार बघता नशेच्या अवस्थेत असणाऱ्या मुलींना जास्त धोका आहे हे लक्षात घेणंही तितकंच महत्वाचं. त्यामुळे मुली सुद्धा हल्ली हौस आणि सुरक्षितता या दोन्हीचा विचार करता एखाद्या ‘स्टॅंडर्ड’ ठिकाणी जाऊ न पिणं पसंत करतात. हौस, मजा मस्ती करतानासुद्धा मुलींनी आपली सोबत, काळ, वेळ या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. अनेकदा किटी पार्टी किंवा रियुनियन असे अनेक प्रसंग हे पिण्यासाठीचं निमित्त ठरू लागले आहेत. दारू पिणं किंवा न पिणं याचे कितीही तोटे असले तरी ते करणं किंवा न करणं हा ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. ज्यावर कोणीही बंधन आणू शकत नाही, मात्र मजेसाठी किंवा आवड म्हणून ड्रिंक करता करता आपण त्याच्या आहारी जाणार नाही ना?, याची काळजी प्रत्येकानेच घ्यायला हवी. इथे स्त्री-पुरुषांसाठी वेगळे नियम नाहीत. त्यामुळे आपल्या शरीराचं नुकसान न करता आपली आवड पूर्ण करायला हवी ही गोष्ट मनाशी पक्की करायला हवी!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 1:11 am

Web Title: increasing use of alcohol by girls manohar parrikar daughter
Next Stories
1 डेनिमचा ‘कूल’ अवतार
2 ‘तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव जास्त आहे..’
3 ‘बुक’ वॉल