भारतीय आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही नृत्यशैलींतील अनेक नृत्यप्रकार तिला अवगत आहेत. तिच्या मनात नृत्याचा एक अविरत ताल सतत निनादत असतो. त्याचं प्रकटीकरण तिच्या नृत्यातून आणि नृत्यदिग्दर्शनातूनही होत. मिर्झिया ते संगीत मुघल-ए-आझम असा विविधरंगी प्रवास करणारी नृत्यवेडी म्हणजेच एक पॅशनेट कल्लाकार, मयूरी उपाध्या

नृत्यातच करिअर करायचं हे मयूरीनं कधी ठरवलं नव्हतं. ते अगदी आपसूकच घडलं. मयुरीच्या आईला नृत्याबद्दल विशेष आत्मीयता असल्यानं त्यांनी मुलीचं नाव मयूरी ठेवलं. तिनं नृत्य शिकावं, ही त्यांची मनीषा होती. छोटी मयुरी टीव्हीवरच्या कार्यक्रमांमध्ये पाहिलेले डान्स घरी आलेल्या पाहुण्यांसमोर सादर करत असे. लहानपणी ती जाडी होती. त्याचा न्यूनगंड येऊन शाळेच्या वर्गात ती स्वततच हरवलेली असे. काल्पनिक पात्रांशी हसत-बोलत असे. अगदी लाजाळूचं  झाडच जणू.. पुढं ती भरतनाटय़म शिकायला जाऊ  लागली. तिथलं शिस्तबद्ध वातावरण तिला फारसं मानवलं नाही. ती शिकली, पण एकच एक गोष्ट करण्यापेक्षा काही नवीन नि आव्हानात्मक गोष्टी शिकणं हा तिचा स्वभाव होता. ती आतापर्यंत कथ्थकसह भरतनाटय़म्, ओडिसी, पाश्चिमात्य आदी अनेक नृत्यप्रकार शिकली आहे. ती सांगते की, ‘‘कॉलेजला गेल्यावर मी इतर नृत्यप्रकार शिकले, नृत्यगटांसोबत काम करू लागले. तेव्हा मी वर्गात कमी आणि स्टेजवरच जास्त असायचे. ज्या आंतरमहाविद्यालयीन नृत्यस्पर्धामध्ये इतर विद्यार्थी सहभागी व्हायला कचरत त्यात मी बेधडक भाग घेऊ लागले. इतकी गती मी मिळवली. मग हळूहळू नृत्यदिग्दर्शनाकडे वळले. नृत्य हीच आपली आवड असल्याचं मला उमगलं.’’

आपल्या करिअरच्या कलाप्रवासातल्या प्रत्येत टप्प्यावरच्या नृत्यगुरू आणि आयुष्यातल्या गुरूंचा उल्लेख मयूरी आवर्जून करते. मीनल प्रभू यांच्याकडे ती भरतनाटय़म् शिकली तर माया राव यांच्याकडे कथ्थक आणि अनेक डान्स ग्रुप्समध्ये कंटेम्पररी डान्स शिकली आहे. नृत्य म्हणजेच ज्यांचं जगणं आहे, असे नृत्य कलाकार तिला प्रेरणा देतात. नृत्य क्षेत्रातलं अग्रगण्य नाव रुक्मिणी देवी अरुंदले, मायकल जॅक्सन आदी कलावंत मयूरीला कायमच स्फूर्ती देतात. नृत्यदिग्दर्शन करण्याचा कोणताही एक ठरावीक फॉम्र्यूला नाही, असं मयूरीचं मत आहे.

ती सांगते की, प्रत्येक क्षण हा चैतन्यदायी असतो. आपण सजग राहिलं पाहिजे. उदाहरणार्थ- सध्या मुघले आझमचे प्रयोग सुरू आहेत. त्यातल्या प्रत्येक गाण्याचं रंग-रूप विभिन्न होतं. ती कशी साकारावी याचा विचार मी केला नव्हता. मोठय़ा पडद्यावर साकारलेलं नृत्य आणि रंगमंचावर आकारणार होतं ते नृत्य, यात साम्य नव्हतं. ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणं अनेक परीनं परफॉर्म केलं जातं. पण मला त्यात वर्तमानकाळ प्रतिबिंबित करायचा होता. रोज सकाळी उठल्यावर मी ते गाणं ऐकत असे. एका क्षणी अनारकलीला समाजानं दिलेली वागणूक जाणवली.. ती रूपकात्मता गाण्यात उतरवायची असं ठरवलं. लगोलग स्टुडिओत जाऊन कलाकारांसोबत मी ते बोलले आणि ते आम्ही स्टेजवर मांडलं. याच नाटकातल्या कव्वालीचा पारंपरिक बाज  कायम राखला आहे. गाणं, ते सादर करणाऱ्या कलाकारांची बलस्थाने याचा विचार करून त्याची मांडणी केली आहे.  गेली १५ र्वष मयुरीची बंगलोरस्थित संस्था- ‘नृत्यऋत्या’ विविध नृत्यप्रयोग करते आहे. शास्त्रीय नृत्याचा पारंपरिक बाज आणि आब कायम राखून त्याला आधुनिकतेची आणि वर्तमानाची जोड देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.  जर्मनीमध्ये झालेला मेक इन इंडिया कार्यक्रम, मधुर मिलन, कथा पर्व, नवदुर्गा, प्रयोग यांसारख्या प्रायोगिक नृत्यसूत्री, नुकताच आलेला मिर्झिया हा सिनेमा अशा अनेक प्रकल्पांतून मयूरीने आपलं वेगळं काम सुरूच ठेवलं आहे. यातील ‘मेक इन इंडिया’ या कार्यक्रमात मयूरीच्या चमूने भारताचं प्रतिनिधित्व केलं. आणखी उल्लेखनीय बाब म्हणजे, हरिवंशराय बच्चन यांची अजरामर मधुशाला अत्यंत थोडक्या वेळात मयूरीने आपल्या नृत्यातून जिवंत केली ज्याला खुद्द अमिताभ यांची दाद मिळाली.

आता नृत्याला चांगले दिवस आले आहेत. हौसेच्या पलीकडे जाऊन त्याकडे करिअर म्हणून कला म्हणून लोक पाहात आहेत. नृत्याचा अधिकाधिक प्रसार होतो आहे. या सगळ्या गोष्टींमुळे नृत्यातील करिअर आणि भविष्य उज्ज्वल असल्याचं मयूरी म्हणते. ती म्हणते, इथे यायचं तर संघर्षांला पर्याय नाहीच. घरचे, मित्र-मैत्रिणी पाठीशी उभे राहिले तर ठीक. पण नसले तरीही कलेवर प्रेम असणारे लोक कलानंदापासून कधीच दूर जात नाहीत. मयूरीला नुकताच रापा या संस्थेतर्फे सवरेत्कृष्ट नृत्यदिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. यंग वुमन्स अचिव्हमेंट अवॉर्ड, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीसाठी मानव रत्न पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत. पण सध्या मात्र मयूरीने लक्ष केंद्रित केलं आहे, शाळांमधल्या ऑनलाइन नृत्यशिक्षणावर. ते कसं देता येईल, यासाठी तिचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय नृत्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा जो कायापालट होतो, त्या दिशेनेही काही करता येईल का, यावर तिचा शोध सुरू आहे. तिची ही नृत्यकला अशीच बहरण्यासाठी शुभेच्छा!

नृत्य करताना माझं सारं लक्ष केवळ नृत्यावर केंद्रित झालेलं असतं, बाकी आजूबाजूच्या भौतिक जगाचं भान मला उरत नाही. मी नृत्यदिग्दर्शन करते, तेव्हा प्रेक्षकांसाठी एक नवीन काल्पनिक जग निर्माण करते.

मयूरी उपाध्या

viva@expressindia.com