25 November 2017

News Flash

पाऊले चालती ‘ट्रेक’ची वाट

फेबुपासून ते इन्स्टापर्यंत सगळीकडे ट्रेकचे हिरवेगार फोटो पडायला सुरुवात झालेली असते.

तेजश्री गायकवाड | Updated: July 7, 2017 12:39 AM

गेल्या काही वर्षांपासून ट्रेकिंग आणि पावसाळा हे अविभाज्य समीकरण झालं आहे. पावसाला सुरुवात व्हायची खोटी की ट्रेकिंगच्या टूर निघतात. नव्याने ट्रेकिंगला जाणाऱ्यांची संख्याही आता वाढत चालली आहे. हेच हेरून ट्रेकिंगमध्येसुद्धा आता कंपन्या आणि संस्था येऊ पाहत आहेत. निरनिराळे ट्रेक, कॅम्प त्यांच्यातर्फे आयोजित केले जातात.

‘अरे काय मस्त पाऊस पडतोय, कुठेतरी डोंगरमाथ्यावर जायला हवं.’ ‘काय मस्त हवा आहे, एक ट्रेक तो बनता है’ अशा चर्चा आता सहज ऐकू येतात. उन्हाळ्याच्या तापाने हैराण झाल्यानंतर आलेला पाऊस नेहमीच गारेगार वाटतो. त्याची खरी मजा घ्यायची तर ट्रेक हवाच. पूर्वी ट्रेकिंग म्हणजे रिकामटेकडय़ांचे उद्योग अशी हेटाळणीयुक्त चर्चा ऐकू येत असे, पण आता ट्रेकिंग सगळ्यांनाच करायचं असतं. लहानपणी आपण सहकुटुंब सहलींना जायचो. आता सहकुटुंब ट्रेकिंगला जातात.

फेबुपासून ते इन्स्टापर्यंत सगळीकडे ट्रेकचे हिरवेगार फोटो पडायला सुरुवात झालेली असते. कुणाकुणाच्या व्हॉट्सअप डीपीमधूनही ते दिसतं. मग ते पाहून आपल्यालाही ट्रेक करायचा मोह होतो. मोहापर्यंत ठीक आहे, पण प्रत्यक्षात ट्रेक करायचा म्हणजे कसं जायचं? कुठे जायचं? किती जण येणार? असे अनेक प्रश्न येतात. त्याच्या माहितीसाठी गुगल असतंच. पण तरीही ट्रेकिंगमधले नवखे हल्ली संस्थांमार्फत नेले जाणारे ट्रेक्स, कॅम्प यांचा पर्याय निवडताना दिसतात. पहिल्या ट्रेकला शक्यतो, सोप्या चढणीच्या जागा निवडल्या जातात. जे ट्रेक तुलनेने सोपे असतात तिथे जाण्यासाठी भीतीही कमी वाटते, जोखीम कमी असते मग घरच्यांना पटवायला सोपं जातं.

यंदा पहिल्यांदाच ट्रेकिंगला गेलेला विवेक सावंत म्हणतो, आमचा ग्रूप पहिल्यांदाच ट्रेकला गेला. त्यामुळे आम्ही एखाद्या संस्थेमार्फतच ट्रेकला जायचं ठरवलं होतं. त्यानुसार ती संस्था निवडून आम्ही पैसे भरले. त्यानंतर कोणताच खर्च नव्हता. ठरलेल्या दिवशी बसने कळसुबाईला गेलो. तिथे नाश्ता वगैरे झाला. इतर सहकाऱ्यांची ओळख झाली. ट्रेकची रूपरेषा समजावली गेली. अडचणीच्या वेळी उपयोगी पडेल म्हणून बिल्लाही दिला. आमच्या आयोजकांनी वॉकी टॉकी, रोप आदीसुद्धा आणले होते, जेणे करून काही अडचण आलीच तर बरे पडेल. हातात हात घालून एक साखळी करून आम्ही कळसुबाईचे शिखर गाठले. या ट्रेकमध्ये आम्हाला कळसुबाईची आणि एकूणच ट्रेकिंग प्रकाराचीही छान माहिती मिळाली. त्यामुळे त्रास झाला नाही. हा अनुभव भन्नाट होता. आम्ही आमचे आमचे गेलो असतो तर इतका मस्त अनुभव मिळाला असता की नाही, कोण जाणे.

कायम ट्रेकिंगला जाणारीही अनेक मुलं अशा व्यवस्थित नियोजित ट्रेकला जातात. याबद्दल सांगलीचा नीलेश रोखडे सांगतो, अशा संस्थांसोबत किंवा चांगल्या ग्रूपसोबत ट्रेक करण्याने वेळ आणि पैशाची बचत होते. वेळापत्रक पक्कं असल्याने गोंधळ होत नाही. आयोजक जेवण, नाश्ता, राहण्यासाठी तंबू, औषधोपचार, सुरक्षेची साधनं अशा सगळ्याच गोष्टींची काळजी घेतात. त्यामुळे आपल्या डोक्याला त्रास राहत नाही. तसेच पैसेही वाचतात. आयोजक मात्र अनुभवी आणि माहीतगार हवेत नाहीतर बट्टय़ाबोळ होऊ शकतो. अनेक मुलीही आता बिनधास्त ट्रेकला जातात. पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या माहितीच्या, ओळखीच्या ट्रेक ग्रुपबरोबर  जाणं पसंत करतात. अशा ट्रेकमध्ये जास्त पैसे जातात पण एकटे गेलो तरी सुरक्षेच्या कारणांसाठी किंवा कोणी गाईड घ्यावा लागतो, त्यासाठी आपले जास्त पैसेही खर्च होऊ शकतात, असं युगंधरा रहाटे ही ट्रेकप्रेमी सांगते.

अशाप्रकारे ट्रेकचे नियोजन करणाऱ्या क्रेझी यात्रा या ग्रूपचे मकरंद चोथे यांना ‘विवा’ने बोलतं केलं. ते म्हणतात, ट्रेकिंगला पहिल्यांदाच येणारी मुलं खूप उत्साही असतात. त्यांचा उत्साह टिकेल पण त्याला उधाण येणार नाही, अशा ठिकाणी आम्ही ट्रेक आखतो. नाहीतर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. उदा. कळसूबाई. अशा ठिकाणी सुरक्षित ट्रेकही होतो आणि धम्मालही. शिवाय मुलांना स्वतला बॅगशिवाय काहीच आणावं लागत नाही. त्यामुळे तेही खूश असतात. याच गोष्टींमुळे लोकं आमच्यासारख्या संस्थांना प्राधान्य देतात. ट्रेकसाठी शुल्क आकारताना आम्ही ते माफकच आकारतो. पण लोकांना ते कधीकधी जास्त वाटतं. त्यामुळे अनेकदा माहिती नसताही लोकं बेधडक कुठल्या तरी कठीण ट्रेकला जातात. असं करू नये. एकटं जाण्यात काहीच गैर नाही, पण जायच्या आधी पूर्ण माहिती घेऊन जावे.

viva@expressindia.com

First Published on July 7, 2017 12:38 am

Web Title: monsoon trekking expedition monsoon trek trekking organization