त्या दिवशी घरातून निघताना आमचे तीर्थरूप पोटतिडकीने म्हणाले, ‘ ती १५ ठिकाणं ‘नो सेल्फी झोन’ म्हणून घोषित केलीयेत. आहे ना लक्षात? त्यामुळे हे असले उद्योग करताना जरा भान ठेवा. ’. बरं. म्हणजे आता पास घेतलास का? दिवसभर फोन सायलेंटवर ठेवू नकोस, चालत्या गाडीत चढू नकोस अशा सूचनावलीत या नव्या सूचनेची भर पडली तर! नुसती मान डोलवून घरातून बाहेर पडले. यातून एक लक्षात आलं. या सेल्फीने तरुणाईवर जसा कब्जा मिळवलाय तितकाच किंबहुना काही अंशी जास्तच कब्जा मिळवलाय तो या मधल्या पिढीवर. आई-वडिलांच्या! इतका की आता घरातून आपलं मूल बाहेर पडताना इतर अनेक काळज्या जशा पालकांच्या मनात थैमान घालतात त्यात आता ही सेल्फीची नवी धास्ती ! ते बिचारे तरी काय करतील म्हणा. सारखं हे असं पेपरात नाहक. क्षुल्लक गोष्टींपायी जीव जाणारे कोवळे जीव पाहिल्यावर त्यांना ही अशी काळजी वाटणं स्वाभाविक आणि रास्तच! काय ना म्हणजे. प्रत्येक वेळी गोष्टी थराला गेल्याशिवाय लक्षातच कसं येत नाही कुठे चुकतोय ते? कुठे वाहवत जातोय ते? असा स्वत:ला स्वत:चा योग्य ठिकाणी, योग्य वेळी बांध घालणं कधी जमायचं? परत हाही पिढीचाच मुद्दा. कशाचं मूळ शोधताच येत नाही. मग या सेल्फीच्या वेडाचं मूळ तरी कसं ठाऊक असणार! म्हणजे. एकेक विचित्र तोंडं करून. काही ठरावीक पोझेसमध्ये स्वत:चे फोटोज काढायचे. हे. हे असलं बिनडोक काहीतरी कधी अंगवळणी पडलं आपल्या. आणि का. कशाकरता?

कधी विचारच नाही केला याचा! मूर्खपणानं इतरांसारखंच ‘फॉलो’ करत राहिलो सगळंच! आला पाउट. करा फॉलो! ‘ओके, ही अशी पोझ असते का सेल्फीची ?’. मग अमकी एक आरशासमोर पुढच्या वेळी तशी उभी राहणार. तिरपी कशीतरी. आणि काढणार स्वत:चाच फोटो. करणार अपलोड. केवढा सेन्सलेस कारभार. तरी करतोच आम्ही. काही वेळा या साध्यासाध्या गोष्टींचा विचार करणं जमत नसेल तर मग या डिग््रया. ही शिक्षणं. या सगळ्याचा काय उपयोग ? जे अकरावीतलं नवखं पोर करणारे तेच वेडगळ काहीतरी ‘आयटी’तल्याने ऐटीत करायचं. यात आपली सेन्सिबिलीटी कुठे असते? आपली गेल्या काही वर्षांंपासून असलेली- नसलेली परिपक्वता कुठे दिसते? आपल्या रोजच्या जगण्या – वागण्यातून आपण आपली वैचारिक क्षमता, प्रगल्भता की काय म्हणतात ती प्रतिबिंबित करत असतो ना. मग ? हे असं आचरटासारखं काहीही फॉलो करण्याच्या नादात हा सारासारविचार कुठे हरवतो ?

थोडं अजून खोलात शिरून मूळ गाठायचा प्रयत्न केला आणि अजून एक गोष्ट लक्षात आली. आपल्याला कदाचित ‘त्रुटी’ झाकण्याचं स्वातंत्र्य हवंय. अर्थात, त्रुटींची आपलीच आपण एक सो कॉल्ड संकल्पना मनात पक्की करून ठेवलीये. कदाचित, आपल्याला आपलं ‘पर्फेक्ट पिक्चर’ पाहायचंय. मग असं वाटतं. मोठे झालोय नं.

थोडीफार अक्कल आलीये नं. मग स्वत:तले दोष लपवण्याचा इतका अट्टहास का? आहोत तसा का नाही करायचा स्वत:चा स्वीकार? सकाळी अगदी छान आवरून धावत ट्रेन पकडायची. लगेच अस्ताव्यस्त अवतार होतो तोवर (म्हणजे हे असं आपण स्वत:च समजतो ) मग मोबाइलचा फ्रंट कॅमेरा ओपन करायचा. त्यात बघायचं मी कशी दिसतेय ते. समोर बसलेली माझ्यासारखीच कुणीतरी मूर्ख मुलगीही तेच करत असते. हे असं स्वत: स्वत:त रमायचं.दिवसभर. स्वत:ला नको त्या बाबतीत इतकं महत्त्व का द्यायचं? म्हणजे. जर मी या क्षणाला सो कॉल्ड छान दिसत नसेन तर असा काय फरक पडणारे आयुष्यात? मग कुणाशी तरी समोरासमोर बोलत असताना आता या क्षणी हिच्याशी किंवा याच्याशी बोलताना मी कशी दिसतेय हा विचार बॅक ऑफ द माइण्ड का सुरू असतो? हो.म्हणजे प्रेझेंटेबल असायलाच पाहिजे. त्यात काहीच चुकीचं नाही. पण म्हणून सारखं सारखं हे असं स्वत: स्वत:त? हे असे कधीपासून झालोय आपण?. पूर्वी असे नव्हतो ना !

थोडं अजून खोलात जाऊ या. मग अजून एक गोष्ट लक्षात येतेय. आत पाहण्याचं भय. माझं दिसणं मला पाहता येतंय हो. पण मी कशी आहे. माझ्या मनात काय चाललंय हे पाहण्याचं धाडसच आपल्यात उरलेलं नाही. नुसते चेहऱ्याचे खंडीभर सेल्फीज काढले तरी माझा खराखुरा सेल्फी मला कधी काढता येणारच नाही का ? की मलाच तो जाणीवपूर्वक काढायचा नाहीये? म्हणजे मला माझा सेल्फ – इ (इलेक्ट्रॉनिक) दिसतोय. पण मग माझा खरा चेहरा. त्याचं काय करावं ? आपण आत्ममग्न झालोय म्हणून आत पाहायचं थांबवलंय का? वर डोकं काढून आजूबाजूला तरी काय बघायचं. ‘पर्पज’ सगळ्यांचच हरवलंय. आपल्यासारखंच! गोड क्षणांच्या अल्बमवर मऊशार हात फिरवण्याचा काळ खूप खूप मागे सरलाय कदाचित. हल्ली मेमरीज ‘शेअर’ होतात. आणि त्यातही सेल्फीज च्या ‘मेमरीज’ही (?) असतात. फेसबुक सांगतं नं तसं ! मेमरी शेअर करा म्हणून. आणि त्या वेडय़ाचं ऐकून आपण त्यालाही ‘फॉलो’च करतो. ज्याने कुणी फोटोग्राफीचा शोध लावला असेल तो या पृथ्वीवरच्या आम्हा ‘इलेक्ट्रॉनिक’ सेल्फमय बिनडोकांबद्दल काय विचार करत असेल बुवा?

– लीना दातार