वेदवती चिपळूणकर

आपल्या मराठी भाषेने फार्सी, संस्कृत, अरबी या आणि अशा अनेक भाषांकडून शब्द घेऊन स्वत:ला समृद्ध केलं आहे. तसंच हिंदीनेही आपल्याला अनेक शब्दांची देणगी दिली आहे. सुरुवातीला केवळ काही हिंदी शब्द वापरणाऱ्या मराठी भाषेने बॉलीवूड चित्रपटांपासून प्रेरणा घेत आणि त्यांना सामावून घेत अनेक शब्द, म्हणी आपल्याशा केल्या आहेत. बरं हे नव्याने हिंदीमधून आलेले शब्द म्हणजे तरी अगदी शुद्ध हिंदीमधले आहेत का? तर तसंही नाही. जिला बम्बईया हिंदी म्हटलं जातं त्यातले हे शब्द मराठीत येऊन आता त्यांनी मराठीचंही रूप बदललं आहे.

ज्याला इंग्रजीत ‘आऊट ऑफ द बॉक्स’ म्हटलं जातं ते चौकटीच्या बाहेरचे विचार, इतर लोकांपेक्षा वेगळे विचार यांना हिंदीत ‘हटके’ म्हटलं जातं. हिंदी भाषेतून आलेला शब्द असला तरी तो मराठीत आता इतका रुळला आहे की सहजपणे त्याचा वापर मराठी वाक्यांमध्ये होतो. आला तेव्हा केवळ तरुण पिढीपुरता मर्यादित असणारा हा शब्द हळूहळू सगळ्याच वयोगटातल्या सर्वाच्या तोंडी सर्रास येऊ  लागला. आता तो मराठीतला असल्यासारखाच आपल्यात मिसळून गेला आहे. नेहमीच्या सरधोपट वाटेपेक्षा वेगळी वाट चोखाळणाऱ्या पर्यायांना ‘हटके’ म्हटलं जातं. एखाद्या वेळी आजूबाजूचे सगळेजण एखादी गोष्ट एका ठरावीक पद्धतीने करत असतात आणि त्या सगळ्यांच्यात एखादीच व्यक्ती काहीसा वेगळा विचार करणारी असते. त्या व्यक्तीचा विचार, वागणूक, निर्णय, कृती या सगळ्यातच वेगळेपणा असतो. त्या व्यक्तीची इतरांवर पडणारी छापही त्यामुळेच चार लोकांपेक्षा ‘हटके’ असते.

‘हटके’ हा केवळ एखादा शब्द नाही, ती एक स्वतंत्र संकल्पना आहे. फक्त विचारच नाही तर अनेक गोष्टींमध्ये हा ‘हटके’पणा अस्तित्वात असतो. कपडय़ांची फॅशन, वागण्याची पद्धत, आवडत्या वस्तू, छंद, आवडीची ठिकाणं, निर्णय घेण्याचे मापदंड या आणि अशा अनेक गोष्टींमधला ‘हटके’पणा या व्यक्ती जपून असतात. फक्त व्यक्तीच नाही तर अनेक संस्था, अनेक प्रकाशनं आपल्या कार्यात हा ‘हटके’पणा राखून असतात. आपल्या हटके कल्पनांनी आणि हटके लेखनाने तुम्हाला सर्वाना आवडणाऱ्या आपल्या ‘व्हिवा’च्या वर्धापन दिनानिमित्त या ‘हटके’ शब्दाची चाहूल आपण घेतली. लेखनातल्या हटके प्रयोगांना वाचकांच्या लाभलेल्या साथीने हा वाढदिवस ‘हटके’ ही थीम घेऊनच आपण सेलिब्रेट करतो आहोत. या निमित्ताने आपण सगळ्यांनीच एखादी ‘हटके’ गोष्ट करायचा विचार घेऊ न किंवा संकल्प करून हा वाढदिवस साजरा करायचा प्रयत्न करूया!

viva@expressindia.com