आजकाल सोशल मीडियावर आपल्याला पेट्सचे फोटो आणि व्हिडीयो हमखास दिसतात. पेट्सची सोशल मीडिया अकाऊंट्सदेखील येऊ लागली आहेत आणि ती हिट होताहेत. सोशल नेटवìकगवरच्या अशाच काही पॉवसम गोष्टींविषयी..

‘आय लव्ह माय पेट्स’ असं सांगणारी आजची तरुणाई आपल्या लाडक्या पेट्सच्या बाबतीत अक्षरश: क्रेझी असते. हे पेट्स आता केवळ स्ट्रेसबस्टर राहिलेले नाहीत तर ते आता फॅमिली मेंबर झाले आहेत. आता फॅमिली मेंबर म्हटलं की त्यांचे लाड पुरवणं तर आलंच. त्यांना घेऊन फिरणं, त्यांच्यासाठी कपडे, अ‍ॅक्सेसरीजची खरेदी करणं, त्यांच्या  छोटय़ाछोटय़ा हरकतींचे फोटो शेअर करणं आलंच. या आवडत्या फॅमिली मेंबर्सचं आवर्जून बर्थडे सेलिब्रेशनही होतं. याचे अपडेट सोशल मीडियावर त्यांचे फॅमिली मेंबर आवर्जून देत असतात. अनेक सेलेब्रिटीदेखील आपल्या पेटसोबत फोटो शेअर करताना दिसतात. आपल्या पेटबद्दल असे अपडेट देणाऱ्यांची संख्या आता वाढत असल्याचं दिसतं.

प्राणी आपले मित्र असतात असं आपण म्हणतो. पण ते केवळ खऱ्या आयुष्यातच नाही तर आता सोशल नेटवìकग साइट्सवरदेखील आपल्या अकाऊंटमध्ये हे चार पायांचे फ्रेंड अ‍ॅड होताना दिसतायत. ट्विटर, इन्स्टाग्रामवर अशाच ऑसम पेट्सची पॉसम अकाऊंट पाहायला मिळत आहेत. यामुळे लाडके मनी माऊ नि पपी दादा आता सोशल नेटवìकग साइट्सवर लॉग इन झाले आहेत आणि त्यांना फॉलो करणाऱ्यांची संख्यादेखील बरीच आहे. केवळ फोटोजपुरतं हे मर्यादित नाही तर काही जण आपल्या पेट्सच्या नावाने असंच एखादं अकाऊंट उघडून मतप्रदर्शनही करतात. खासकरून ट्विटरवरून आपल्या सटायरिकल वनलायनर्स टाकण्यासाठी अनेक जण आपल्या पेटचा चेहरा पुढे करतात. राजकीय, सामाजिक परिस्थितीवर ट्विप्पणी करण्यासाठी याचा वापर होत आहे. परदेशात हा ट्रेण्ड आधी रुजला नि आता आपल्याकडेही अशी अकाऊंट दिसू लागली आहेत.

‘निमो बॅण्डी बिगल’ हे असंच एका गोंडस कुत्र्याचं इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे, एवढंच नाही तर त्याला दोन हजारांहून जास्त फॉलोअर्सदेखील आहेत. हे अकाऊंट निमोचे फॅमिली मेंबर म्हणजे बांदिवडेकर बहीण-भाऊ चालवतात. जणू काही निमो स्वतचं ते अकाऊंट चालवतोय अशा थाटात सगळ्या पोस्ट केलेल्या असतात. याबद्दल सांगताना नेहा बांदिवडेकर म्हणाली, ‘आम्ही निमोला घरी आणून आता दोन र्वष झाली. निमोने काही नवीन केलं की आम्ही ते फेसबुकवर, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅटवर टाकत असू. परदेशातल्या काही पेट्सची आम्ही इन्स्टाग्राम अकाऊंट पाहिली आणि त्यावरून मग आम्ही निमोचंदेखील अकाऊंट सुरू केलं. निमो तसा खूप कॅमेरा कॉन्शस आहे. तो लगेच पोज देतोच असं नाही. त्यामुळे त्याचे फोटो घेणं एक टास्क असतं. पण तरीही त्याच्या पोस्ट्स लगेच हिट होतात. आता आमच्यापेक्षा त्याच्या अकाऊंटलाच जास्त फॉलोअर्स आहेत.’

सोशल मीडियावरच्या िभती आजकाल अशाच प्राणिप्रेमाच्या फोटोंनी भरभरून वाहत असतात. पेटलव्हर्सची अनेक पेज आपल्याला पाहायला मिळतात. यामधून कधी कधी प्राण्यांना माणसांहून जास्त महत्त्व दिल्याचंदेखील आढळतं. ‘माणसं तुमच्यावर प्रेम करतीलच असं नाही, पण तुमचा कुत्रा तुम्हाला कधी निराश करणार नाही’, अशा आशयाच्या पोस्ट अनेक जण शेअर करताना दिसतात. याबद्दल सांगताना एक पेटलव्हर दर्शना आरुर म्हणाली, ‘जेव्हा मी अशा पेट रिलेटेड पोस्ट, व्हिडीयो शेअर करते तेव्हा माझ्या आणि टफीच्या- माझ्या कुत्र्याच्या नात्याशी ते रिलेट करते. पेट्स आपल्यावर निरपेक्षपणे प्रेम करतात. ते कोणत्याही मटेरिअलिस्टिक गोष्टी पाहून प्रेम करीत नसतात आणि प्रेमाच्या बदल्यात त्यांना केवळ प्रेम, वेळ नि थोडंसं अटेन्शन हवं असतं.’

सोशल नेटवर्किंगमुळे पेट्सच्या पालकांबरोबर नेटवर्किंग सोपं झालंय. त्याचा फायदा होतो, असंही अनेक जण सांगतात. विशेषत परदेशी किंवा दुर्मीळ ब्रीडचे पेट्स असतील तर एकमेकांच्या अनुभवावरून आणखी चांगलं संगोपन करता येऊ शकतं. काय करावं, काय टाळावं या गोष्टी समजतात आणि मेटिंगच्या वेळीदेखील अशा नेटवर्किंगचा फायदा होतो, असंही पेटलव्हर्स सांगतात.

थोडक्यात काय, तर ही पेट लव्हस्टोरी आपल्याला आता सगळीकडे दिसतेय. थोडय़ा दिवसांनी फेसबुक रिलेटिव्ह्ज लिस्टमध्ये एखाद्या पपी किंवा माऊचं अकाऊंट दिसलं तर त्यात काही वावगं वाटून घ्यायला नको.