स्वप्न खरी होण्यासाठी आधी ती बघावी लागतात. त्यासाठी वयाचं, वेळेचं, जागेचं, विशिष्ट वर्गातील, समाजातीलच असायला हवं असं नाही. स्वप्न कोणीही पाहू शकतं आणि इच्छाशक्ती असेल तर ती पूर्णही करता येतात. लहानपणी कुठल्याही नातेवाईकांकडे गेलो की निघताना आपल्याला जवळच्या दुकानात घेऊन जाऊन काय हवं म्हणून विचारत. त्या वयातही महागडयाच गोष्टी आपल्यल दिसत पण मग आपलं लक्ष जाई ते आई-बाबांकडे,  तेव्हा त्यांचे डोळे मोठे झालेले दिसत. मग आपसूकच त्या पाहिजे असलेल्या वस्तूंवरचं बोट लहान गोष्टींकडे सरके. आतासुध्दा कुठलीही गोष्ट खरेदी करताना कधी किमतीसाठी तर कधी किती वापर होणार म्हणून अनेकदा हात आखडताच घेतला जातो. त्यामुळे हव्याहव्याशा वाटल्या तरी आवडत्या गोष्टींना स्थान केवळ स्वप्नातच.

आपल्यातील प्रत्येक जण जगावेगळी स्वप्न पाहत असतात. चित्रपटांमधील सुपरहिरोंसारखं आपल्यालाही आकाशात उंच उडता यावं, अ‍ॅस्ट्रोनॉट बनून परग्रहावर जावं, चॉकलेट किंवा आइसक्रीमची एखादी गुहा असावी.. अशी आपली सर्वच स्वप्न पूर्ण होतील असं नाही, पण स्वप्नवत वाटणाऱ्या अशा गोष्टी  कुणी तरी ध्येयवेडी माणसं प्रत्यक्षात अस्तित्वात आणतात. जे. के. रोिलगसारखी लेखिका हॅरी पॉटरला जन्माला घालते, स्पीलबर्गसारखा दिग्दर्शक ‘ज्युरासिक पार्क’  बनवतो. वर्तमान आणि इतिहासातील ज्या अनेक गोष्टींबाबतही आपल्याला कायम उत्सुकता असते, जगाच्या कानाकोपऱ्यात विविध पद्धतीने, विविध कालखंडात बनवलेल्या  गोष्टी एकाच ठिकाणी संग्रहित केलेल्या असतात ते सर्व पाहता, अनुभवता येणारी आणि आपली स्वप्न काही प्रमाणात पूर्ण करणारी हमखास जागा म्हणजे म्युझियम.

सर्वज्ञात असलेले विषय आणि वस्तूंच्या म्युझियमसोबतच जगाच्या कानाकोपऱ्यात नाव ऐकूनच अचंबित व्हायला होतं अशी म्युझियम्सही आहेत. ‘कंडोम म्युझियम’-थायलंड, ‘सुलभ इंटरनॅशनल टॉयलेट म्युझियम’-भारत, ‘सेक्स म्युझियम’-नेदरलँड, ‘इंटरनॅशनल स्पाय म्युझियम’-वॉिशग्टन, ‘सर्कस वर्ल्ड म्युझियम’-अमेरिका, ‘अंडरवॉटर म्युझियम’-मेक्सिको, ‘नॅशनल मस्टर्ड म्युझियम’-अमेरिका, ‘द लंचबॉक्स म्युझियम’-अमेरिका, ‘हेअर म्युझियम’-टर्की, ‘शिन योकोहामा नूडल्स म्युझियम’-जपान, ही त्यातील काही बोलकी उदाहरणं. या यादीमध्ये आता आणखी एक अनोखं म्युझियम सामील झालं आहे. ‘म्युझियम ऑफ आइसक्रीम’.. नाव ऐकूनच आपण एखाद्या स्वप्नवत गोष्टीबद्दल बोलत आहोत असं वाटत नाही? पण कॅलिफोíनयाच्या लगुना बीच येथील मूळ रहिवासी असणारी मेरेलिस बन्न या २५ वर्षीय तरुणीने या कल्पनेला मूर्त रूप दिलं आहे. न्यूयॉर्कमधील ‘लाइट बॉक्स’ या जागेचा मालक मनीष वोरा याच्या सहकार्याने मेरेलिसने हे म्युझियम सुरू केले होते. त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. न्यूयॉर्क शहरात प्रायोगिक तत्त्वावर उन्हाळ्यातील केवळ ४५ दिवस हे म्युझियम खुले होते, पण त्यालाही दोन लाख नागरिकांनी भेट दिली. या म्युझियमची तिकिटं केवळ ऑनलाइन बुकिंगद्वारेच काढता येत असल्याने गेले काही दिवस त्याची इंटरनेटवर जोरदार चर्चा आहे. आता १५ ऑगस्टपर्यंत लॉस एंजेलिसमधील लोकांना हे म्युझियम पाहता येणार आहे. परंतु त्याचीही सर्व तिकिटं विकली गेलेली आहेत. अल्पावधीतच इतकं लोकप्रिय झालेल्या म्युझियमची कल्पना कशी सुचली याचंही उत्तर भन्नाट आहे. मेरेलिसच्या मते न्यूयॉर्कसारख्या शहरात काही नवीन करण्यासारखे राहिलेले नाही. मला स्वत:ला लहानपणापासूनच आइसक्रीम प्रचंड आवडतं आणि त्यातूनच ही स्वप्नवत दुनिया उभी राहिल्याचं ती सांगते.

‘म्युझियम ऑफ आइसक्रीम्स’मधील सर्व रूम्स वेगळ्या पद्धतीने डिझाइन करण्यात आलेल्या आहेत. आइसक्रीमचे जे काही निरनिराळे प्रकार तुम्हाला ठाऊक आहेत ते सर्व तुम्हाला लाइफ साइज आकारात तिथे पाहायला मिळतात. येथे आइसक्रीमचे झोपाळे, वॉल पेंटिंग्ज, छताला लटकणारी फळं, मनसोक्त डुंबू शकता असा िस्प्रकल्सने भरलेला स्वििमग पूल, आइसक्रीमचे कोन लावलेली िभत, आइसक्रीमचं आकाश, किनारा, छताला लटकणाऱ्या आइसक्रीम कोनमध्ये लावलेले बल्ब, आइसक्रीमच्या मशिन्स, टेबल्स, िभतीवर फेकून मारलेली आणि चिकटलेली आइसक्रीम्स, डबे, ज्यावर आइसक्रीम विकली जात अशा गाडय़ांची मॉडेल्स, आइसक्रीम स्कूपचा सीसॉ, विरघळणाऱ्या आइसक्रीमचा आभास निर्माण करणाऱ्या रंगीबेरंगी िभती, सेल्फी पॉइंट, आईसक्रीमच्या थीमवर आधारित बेडरूम, आइसक्रीम हॉटलाइन टेलिफोन, भित्तीचित्र, आइसक्रीम बनविण्याचे साचे, आइसक्रीमचे विविध आकार, प्रकार अशा अगणित आणि कल्पनेपलीकडील गोष्टी तुम्हाला या म्युझियमध्ये पाहायला मिळतात.

लहान मुलांसाठी तर ही पर्वणीच आहे पण मोठय़ांचा आनंदही म्युझियम पाहताना गगनात मावत नसतो. सध्या लॉस एंजेलिसनंतर सॅन फ्रॅन्सिस्को आणि मियामी येथे हे म्युझियम सुरू करण्याचं प्रयोजन आहे. तसंच लास वेगास येथे हॉटेल सुरू करून त्याला आइसक्रीम म्युझियममध्ये रूपांतरित करण्याचा मेरेलिसचा मानस आहे. नुकत्याच होऊन गेलेल्या ‘मदर्स डे’ला बियॉन्से आणि केटी पेरीसारख्या कलाकारांनी म्युझियमला भेट दिल्याने जगभर या म्युझियमची चर्चा झाली. त्यातूनच आता अबूधाबी आणि जपानमध्येही हे म्युझियम उभारण्याबाबत विचारणा झाली आहे. काय गंमत आहे बघा ना, कोटय़ावधी लोकांना आजवर स्वप्नवत वाटणारी गोष्ट प्रत्यक्षात अस्तित्वात आली आहे. स्वप्नातील गोष्ट डोळ्यासमोर पाहतानाचा आनंद काय असू शकतो त्याची प्रचीती या म्युझियमच्या निमित्ताने येतेय. स्वप्न पाहत राहणं आणि त्याला कृतीची जोड देणं गरजेचं आहे. म्हणूनच अशा स्वप्नपूर्तीसाठी अवलियांना सलाम!

viva@expressindia.com