भाजपच्या सत्तेतील पुण्याच्या पहिल्या महापौर होण्याची संधी ‘मुक्ता टिळक’ यांना मिळाली. टिळकांची पणत सून म्हणून त्यांनी वैवाहिक जीवनाचा शुभारंभ केला तेव्हापासून त्या नावाचा वारसा आणि दबदबा दोन्ही गोष्टी त्यांच्याशी जोडल्या गेल्या. मात्र ‘टिळक’ या नावाच्या लोकप्रियतेमुळे सगळ्या गोष्टी सहजपणे मिळाल्या नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं. राजकीय पक्षप्रवेशापासून ते राजकारणात आपले स्थान निर्माण करण्यापर्यंतच्या प्रवासात आपल्यालाही संघर्ष करावा लागला, असं त्यांनी मोकळेपणाने सांगितलं. पुण्यात रंगलेल्या ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’च्या व्यासपीठावरून आपली राजकीय प्रवासाची ही वळणवाट, महापौर म्हणून काम करताना शहर विकासासाठी सातत्याने सुरू असलेले त्यांचे प्रयत्न, त्यामागची तळमळ, महिलांच्या समस्यांकडे पाहण्याचा सजग दृष्टिकोन, त्यांच्या समस्यांचा पाठपुरावा याचबरोबर स्वत:च्या आवडीनिवडी, राजकारणाबरोबरच घरची आघाडी सांभाळतानाचे अनुभव या सगळ्याबद्दल त्यांनी भरभरून गप्पा मारल्या. ‘लोकसत्ता’चे अविनाश कवठेकर आणि भक्ती बिसुरे यांनी मुक्ता टिळक यांना बोलतं केलं.

टिळकांच्या नावाचं दडपण

माझं लग्न हे अगदी पारंपरिक पद्धतीने बघण्याचा कार्यक्रम वगैरे करून झालेलं आहे. त्यामुळेही असेल पण मुळातच टिळकांच्या घरात सून म्हणून जायचं या गोष्टीचं त्या वेळी दडपण आलं होतंच. एक तर माझे सासरे जयंतराव टिळक यांचा खूप दबदबा होता आणि टिळकांच्या नावापेक्षाही त्यांच्या दबदब्याचं अधिक दडपण मला आलं होतं. मात्र लग्न झाल्यानंतर जयंतरावांनी मला खूप सांभाळून घेतलं. माझी निसर्गाची आवड लक्षात घेऊन त्यांनी मला पुण्यातील ‘एम्प्रेस गार्डन्स’ दाखवलं आणि माझ्या बागकामालाही प्रोत्साहन दिलं.

काँग्रेसी घरात भाजपप्रवेश

टिळक कुटुंबातून राजकारणात उतरले म्हणून मला इथे पक्षप्रवेशापासून सर्व गोष्टी काही सहज मिळाल्या नाहीत. जयंतराव टिळक हे काँग्रेसशी जोडलेले होते. त्यामुळे घरात काँग्रेस पक्षाचे विचार असताना मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सर्वस्वी माझा होता. याबद्दल मी कुटुंबातील सर्वाना जेव्हा कल्पना दिली तेव्हा मला कोणाकडूनही विरोध झाला नाही. उलट हा निर्णय सांगितल्यानंतर जयंतरावांनी मला मोलाचे सल्ले तर दिलेच, पण राजकारणातील धोक्याची जाणीवही करून दिली. त्यांनी जे जे सांगितले त्याचा मला आजही फायदा होतो आहे.

टिळकांच्या कुटुंबाचं वेगळेपण

‘टिळक’ या नावाची किमया काय आहे ते मला लग्न व्हायच्या आधीच जाणवायला लागलं होतं. ज्या दिवशी आई टिळकांच्या घरी चौकशी करून आली त्या वेळी सगळ्यात पहिले तिने आजीला ही गोष्ट सांगितली. आजीला बरं नसतानाही तिने धडपडत उठून जमिनीला हात लावून नमस्कार केला आणि त्या घरात मुलगी जात असेल तर आपण धन्य झालो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तिथूनच खरं म्हणजे टिळकांच्या नावाबद्दलचा आदर जाणवायला सुरुवात झाली. लोकांच्या मनात टिळकांच्या घराबद्दल असलेल्या अनेक गैरसमजुती मला दूर कराव्याशा वाटतात. टिळकांचं घर म्हणजे खूप काही कर्मकांडं, रीतीभाती यांचा पगडा असेल असं अनेकांना वाटत असतं; मात्र ते अजिबातच तसं नव्हतं. टिळकांच्या सुनेने स्वत:च्या मुलांना वाढवण्यासाठी जे अपार कष्ट घेतले त्यांचा म्हणजे माझ्या सासूबाईंचा प्रभाव माझ्या आयुष्यावर आहे असं म्हणायला हरकत नाही. पदरात चार मुलांना घेऊन राहतं घर सोडावं लागणं आणि मुलांची जबाबदारी संपूर्णपणे एकटीने पेलणं, तेही वयाच्या २८-२९व्या वर्षी ही अजिबात सोपी गोष्ट नव्हती. त्या काळी त्यांनी हे आव्हान अत्यंत सक्षमपणे पेललं. मुलांना शिकवायला पैसे नाहीत म्हणून त्या स्वत: हिंदी, इंग्लिश भाषा शिकल्या. सायकलिंगपासून ते पोहण्यापर्यंत सर्व काही त्या शिकल्या आणि त्यांनी स्वत: मुलांना शिकवलं.

मतदारांशी बोलताना..

राजकारणासारख्या क्षेत्रात पाऊल टाकले तेव्हा मी नवीन होते. या क्षेत्राची काहीच तोंडओळख नसल्याने लोकांचे प्रश्न काय असतात इथपासून माहिती घ्यायला सुरुवात केली होती. सामाजिक काम मी त्याआधी काही र्वष करत होते; मात्र सामाजिक कार्यकर्ता म्हणून समस्यांकडे बघणं आणि राजकारणाच्या नजरेतून त्यांच्याकडे बघणं यातला फरक मला हळूहळू जाणवायला लागला. पहिल्यांदा मतदारांशी बोलायला जागोजागी जाताना ‘नक्की काय बोलायचं’ हा मला पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न होता. मुळात मी मितभाषी आणि राजकारणात तसं असून चालणार नाही हे मला सारखं जाणवत होतं. घरात पाणी नाही, वीज नाही अशा समस्या ऐकून घेणं सोपं होतं, मात्र ‘नवऱ्याशी पटत नाही’ असं एखादीने सांगितल्यावर त्यावर काय भाष्य करणार? असे अनेक प्रश्न मला त्या वेळी पडले होते. मात्र महापौर झाल्यापासून मी एक गोष्ट अगदी कटाक्षाने पाळली. दररोज थोडा वेळ का होईना मतदारांशी बोलायचं हे मी ठरवलं त्यामुळे आजही मतदारांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी काही वेळ हा राखीव ठेवलेला असतो.

समानतेचा धागा

माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या वयात जेमतेम दीड वर्षांचं अंतर असल्याने असेल कदाचित, पण आमच्यात मित्रत्वाचं नातं निर्माण व्हायला फार वेळ लागला नाही. लग्न जरी ठरवून, पाहून, पारंपरिक पद्धतीने केलेलं असलं तरीही टिळकांच्या घरातलं वातावरण खेळीमेळीचं असल्याने मला त्यात सामावून जायला फार कष्ट पडले नाहीत. आमच्यातील वयाच्या कमी अंतरामुळे आमच्या मित्रमैत्रिणींचे ग्रुपही एकमेकांत सहज मिसळले गेले. जो समानतेचा धागा टिळकांच्या घरातल्यांनी सांधला होता, तो आमच्यातही हळूहळू निर्माण होत गेला.

जळमटं दूर होतील

तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे. त्यांच्या मनात राजकारणाबद्दल जे काही गैरसमज असतील ते आपोआप दूर होतील. अनेकांना आज स्वत:च्या समस्या प्रचंड मोठय़ा वाटतात, मात्र जेव्हा आपण इतरांच्या समस्या ऐकतो त्या वेळी या गोष्टीची जाणीव होते की त्यांच्यापेक्षा आपल्या समस्या या कैक पटींनी कमी तीव्र आहेत. अनेकांच्या जगण्याचा, दोन वेळच्या जेवणाखाण्याचा प्रश्न असतो. त्या वेळी आपल्या हे लक्षात येतं की आपण अनेकदा ज्याला ‘माझ्या समस्या’ म्हणतो, त्या मुळात समस्या नसतातच. आपल्या देशात राजकारण्यांवर अजूनही लोकांचा विश्वास टिकून आहे. हा माणूस तिथे आहे म्हणजे काही तरी काम नक्की करेल, या विश्वासावर लोक निवडून देतात आणि त्याच अपेक्षेने समस्याही सांगतात. त्यांच्या समस्या सोडवण्याची, काही तरी वेगळे करून दाखवण्याची संधी राजकारणात मिळते. त्यामुळे या क्षेत्रात तरुणांना अनेक बाजूंनी वाव आहे.

महिलांना डावलणे सुरूच..

महिलांना कामं करता येऊ  नयेत यासाठी अजूनही गावागावांतून अनेक क्लृप्त्या लढवल्या जातात. अनेक वेळा महिला सरपंच असूनही महिलेने झेंडावंदन करू नये म्हणून त्यांना त्यापासून लांब ठेवण्याचे प्रयत्न केले जातात. काही गावांत त्याच वेळी पाणी सोडलं जातं, जेणेकरून सरपंचांसहित गावच्या सर्व महिला पाणी भरण्याच्या कामात व्यग्र राहतात. मग सोयीने झेंडावंदन गावातील इतर वयस्कर, ज्येष्ठ वगैरे पुरुषांकडून केलं जातं. राजकारणी म्हणून काम करताना हे अनुभव ठिकठिकाणी आले मात्र इतर देशांतील महिलांचे अनुभव पाहता आपल्याकडे कमी प्रमाणात या गोष्टी होतात, असं म्हणायला हरकत नाही.

राजकारण आणि मी

महिलांना संविधानातील ७३ आणि ७४ व्या घटनादुरुस्तीमुळे राजकारणात काम करण्याची संधी मिळाली. याच कारणामुळे माझाही राजकारणात प्रवेश झाला. राजकारणात काम करताना अनेक गोष्टी मला अनुभवता आल्या. सन २००२मध्ये पहिल्यांदा महापालिका निवडणुकीसाठी संधी मिळाली. निवडणूक लढवायची तर दिवसरात्र प्रचार करावाच लागतो, मात्र संध्याकाळी प्रचार करताना कायम घराची ओढ लागायची, मुलांची काळजी सातत्याने डोक्यात असायची. त्या परीक्षेच्या काळातही मला घरातून पूर्ण साथ मिळाली त्यामुळेच मी महापौरपदापर्यंतचा प्रवास करू शकले. राजकारणी आपलं काम करतील अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. आपलं काम, आपले प्रश्न खूप मोठे आहेत असं सगळ्यांनाच वाटत असतं. साहजिकच त्यांच्या अपेक्षाही मोठय़ा असतात. लोकांच्या समस्या ऐकल्या की त्या किती भयावह आहेत, याची जाणीव होते. ही जाणीव माझ्या मनात कायम राहिल्यामुळेच मी राजकारणात अधिकाधिक सक्रिय राहिले.