13 August 2020

News Flash

बाईमाणूस आणि भाईमाणूस

चिम्याच्या घरी पंगती एकापाठोपाठ उठू लागल्या.

चिम्या तसा नाजूक, हळव्या हृदयाचा इसम. समाजातील कुठल्याही घटनेला चटकन मनावर घेणारा आणि उगीच तासन्तास त्या घटनेच्या कुशीत स्वत:ला गुरफटून घेणारा चिम्या. चित्रपटगृहात अजूनही टिकलेला ‘की अ‍ॅण्ड का’ चित्रपट काल बघून आला. या चित्रपटाची ‘किक’ सावकाश उतरत असतानाच, घरी आल्यावर टेलिव्हिजनवर स्त्रियांच्या मंदिर प्रवेशावरून हाणामारी सुरू झालेली दिसली. तेव्हा सकाळचं वृत्तपत्र संध्याकाळी उघडून वाचलं त्यानं.. महिला समानतेच्या ताज्या लढय़ातील हिंसक दृश्यांनी, या फुलापाखराचं काळीज असलेल्या माणसाला पछाडून टाकलं आणि आता तो त्याच दुनियेत वावरू लागला. या घटनेचा परिणाम म्हणून की काय, चिम्या दर दिवशी एका नव्या स्वप्नासह अंथरूणातून उठायचा..

स्वप्न १
चिम्याच्या घरी पंगती एकापाठोपाठ उठू लागल्या. प्रथम स्त्रियांनी जेवून घेतल्यावरच पुरुषांनी पोटं भरायची असा वर्षांनुर्वष चालत आलेला रिवाज आजही सुरळीत पार पडला. नंतर बसलेल्या पुरुषांच्या पंगतीत एकच कुजबुज ऐकू येऊ लागली, ‘काय हो बिरडय़ाचं वाटण जरा जास्तच पातळ झालं का? अक्का काही बोलल्या नाहीत म्हणून विचारतोय..’ तेवढय़ात तृप्तीचा ढेकर देत अक्का नुकत्याच सुरू झालेल्या पुरुषांच्या पंगतीत, ‘काही हवं नको’ पाहायला आल्या. त्या येताच सर्व पुरुषांनी आदराने आपापली शरीरं आक्रसून घेतली. आपल्या येण्याने आलेला हा अबोल ताण अक्कांच्या नजरेतून सुटला नाही आणि म्हणून अक्का आल्या तशाच परतही गेल्या. फक्त जाताना माडीवर दात कोरत बसलेल्या रखमाला, ‘अगं एऽऽ विडा घेऊन ये ऽऽ.’ असा आदेश आपल्या हुकमी आवाजात त्यांनी धाडला. एकंदर सर्व पुरुषांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. अक्कांनी विडा मागितला म्हणजे जेवणावर स्वारी खूश दिसतेय, असा गोड समज साऱ्यांच्या मनाला आनंद देऊन गेला.

स्वप्न २
जमाना पूर्वीसारखा राहिला नाही. काही वर्षांपूर्वी अगदी सुरक्षित असलेल्या ‘झाशीची राणी लक्ष्मीबाई’ चौकात, आज एकटय़ादुकटय़ा पुरुषानं संध्याकाळी सातनंतर बाहेर पडणं म्हणजे घरातल्यांच्या मनाला, तो परत येईपर्यंत घोर लावण्याचा प्रकार आहे. अगदी परवाचीच घटना, चिम्याचा अगदी जवळचा मित्र-रमेश सातपुते याला कॉलेजमधून घरी येताना याच विभागातल्या काही टारगट मुलींनी घेराव घातला आणि चक्क त्याच्याकडून लावणी नाचून, गाऊन घेतली. या सर्व घटनांचा पुरुष संघटनांकडून तीव्र निषेध होताना दिसत आहे. या प्रभागात जास्तीत जास्त महिला पोलीस तैनात करावेत यासारख्या मागण्या या विभागाच्या नगरसेविका उमा गायकवाड यांनी महानगरपालिकेसमोर मांडल्या आहेत. एकूणच पुरुष सबलीकरण करण्याची आवश्यकता आजच्या तारखेला तीव्रतेने भासत आहे आणि सरकारने याबाबत लवकरात लवकर पावलं उचलावीत अशी आशा सर्व विरोधी पक्ष नेत्यांनी व्यक्त केली आहे.

स्वप्न ३
सतत येणाऱ्या नकारांमुळे चिम्या खचत चालला होता. अनेक स्थळं चिम्याला सांगून आली, परंतु त्यातली काही त्याने नापसंत केली तर काहींनी चिम्याला सरळ नकार कळवला होता. आज सौ. आणि श्री. भोसले यांच्या स्मिताचं स्थळ सांगून आलं होतं. मुलगी आपल्याला बघायला येणार या भावनेने वाटणारी हुरहूर देखील चिम्याच्या मनातून बोथट झाली होती. योग्य शिक्षण, चांगला पगार, उत्तम भूतकाळ असूनही आपल्या नशिबात हे अखंड एकटेपण का? याचा विचार चिम्या वेळ मिळेल तेव्हा करत असे.
ठरलेल्या वेळेत भोसले कुटुंबीय सावंतांच्या दारात होते. पाहुणे अगदीच वेळ पाळणारे आहेत हे बघून श्रीयुत सावंतांची जरा धावपळच झाली. सौ. सावंत, भोसले कुटुंबीयांचं स्वागत करण्यास पुढे गेल्या. चिम्या मात्र अजून तयार नाही हे पाहून श्रीयुत सावंत जरा चिडलेच. शेवटी मुलाच्या बापाला वाटणारी हुरहूर, ही फक्त त्या बापालाच समजू शकते.
बघण्याचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. भोसले कुटुंबीयांना चिम्या मनापासून आवडला. स्मिताशी बोलताना चिम्या थोडासा कावराबावरा झाला खरा, परंतु एकंदर सारे देवाच्या कृपेने सुखुरूप पार पडले.
सावंत कुटुंबीय भोसल्यांकडून येणाऱ्या उत्तराच्या प्रतीक्षेत असतानाच सौ. सावंतांचा फोन खणाणला आणि बातमी कळताच उमटलेल्या सकारात्मक हास्याने घरभर उत्सव साजरा झाला. चिम्याला भोसल्यांनी आपलंसं केलं यापेक्षा आनंदाचा क्षण कुठला असू शकतो या विचाराने श्रीयुत सावंतांच्या डोळ्यांत टचकन पाणी आलं, परंतु त्या पाण्याला आनंदाचा ओलावा होता.

चिम्याला अशी अनेक स्वप्नं पडली, त्यातली ही काही मोजकीच त्याने शेअर केलेली आपल्यासमोर मांडता आली. याही घटनेच्या कुशीत चिम्या अधिक काळ रमला आणि ‘आपण स्त्रियांना समान वागणूक देतो ना?’ याचं उत्तर ‘हो’ असणाऱ्या प्रश्नाभोवती तो परत परत मनानेच येरझारा घालू लागला. त्या दिवसापासून एखादी मुलगी चिम्यापाशी कामाचं जरी बोलायला आली, तरी स्वत:च्याही नकळत तो मनातल्या मनात ‘भीमरूपी’ पुटपुटू लागला.
अशाच एका रात्री विचार करत असताना त्याला उमगले, स्त्रीला आपण ‘बाईमाणूस’ म्हणत असू तर समानतेच्या या जगात पुरुषाला ‘भाईमाणूस’ का म्हणू नये? आणि हे आपल्याला काही जबरदस्त सुचले असा समज त्याने स्वत:नेच करून घेतला. एक नवे स्वप्न त्याच्या डोळ्यांवर रेंगाळू लागले आणि तो झोपेच्या अलगद स्वाधीनही झाला..!

– आदित्य दवणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2016 1:14 am

Web Title: social dreams of local boy
Next Stories
1 मंदिर प्रवेशाच्या गाभाऱ्यात..
2 विदेशिनी: वास्तूंच्या जतन-संवर्धनाचा वसा
3 पर्यावरणपूरक कलात्मकता
Just Now!
X