‘सेल्फी निषिद्ध क्षेत्र’, ‘येथे सेल्फी काढण्यास सक्त मनाई आहे’, ‘येथे सेल्फी काढल्यास दंड आकरण्यात येईल’ अशा पाटय़ा आता तुमच्या फेवरेट सेल्फी पॉइंटवर दिसायला लागल्या तर नवल वाटण्याचं काही कारण नाही. एक मज्जा म्हणून सुरू झालेलं सेल्फी काढणं आता मात्र जिवावर बेतताना दिसतंय. मुंबईच्या बांद्रा बॅण्ड स्टँडच्या खडकाळ किनाऱ्यावर असाच सेल्फी काढताना एका मुलीचा समुद्रात बुडून मृत्यू झाला.

तिला वाचवायला गेलेले रमेश वाळुंजदेखील या अपघातात दगावले. नवीन वर्षांतील दुसऱ्याच रविवारी ही घटना घडली आणि त्यानंतर मुंबईत १५ ठिकाणी ‘नो सेल्फी झोन’ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीने असे निर्णय घ्यावे लागताहेत, म्हणजे त्या गोष्टीच्या आपण किती आहारी जात आहेत याचं दर्शन घडतंय. या सेल्फीचं इतकं वेड लागलंय की, स्वत:च्या जिवाच्या काळजीपेक्षा सेल्फी कसा चांगला येईल याला प्राधान्य दिलं जातंय ही चिंतेची बाब आहे.
ना फोटोग्राफरची गरज, ना कॅमेऱ्याची, स्टुडिओत जाण्याचा तर प्रश्नच नाही. स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा सेल्फीसाठी पुरेसा असतो. एका हातात धरलेला फोन, एक भुवई उंचवलेली किंवा मग ओठांचा पाऊट करून केलेलं क्लिक म्हणजे सेल्फीची लोकप्रिय पोज. हे सेल्फी प्रामुख्याने सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी काढले जातात. सोशल मीडियाचं जसं प्रस्थ वाढतंय तसंच सेल्फीलासुद्धा डिमांड वाढत गेली. आपण कुठे गेलो, काय केलं, काय करतोय, आपण कसे दिसत होतो हे जगाला सांगायचं असतं. त्यामुळे प्रत्येक क्षणी सेल्फीचा मोह आवरणं कठीण होतं.

हातात सहज उपलब्ध झालेले स्मार्टफोन, त्यांचे अद्ययावत कॅमेरे त्याला लाभलेली सेल्फी स्टिकची जोड आणि हम भी किसीसे कम नही हे दाखवण्याचा अट्टहास आता इतका विकोपाला गेलाय की आपला तोल ढळत चाललाय. मग मनासारखा फोटो येईपर्यंत ते काढले जातात आणि फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅटवर उपलोड केले जातात. त्याला येणारे लाइक्स आणि कमेंट म्हणजे त्या फोटोचं प्रगतीपुस्तक! जर त्यात मनासारखे लाइक्स, कमेंट मिळाले नाहीत म्हणून निराश होणारे देखील कमी नाही.

अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनच्या मानसोपचारतज्ज्ञांनी दिवसातून तीनपेक्षा जास्त सेल्फी काढणं हे मानसिक आजाराचं (याला सेल्फीटीस (२ी’ऋ्र३्र२) किंवा सेल्फी सिंड्रोम म्हटलं जातं.) लक्षण मानलं जातं असं सांगितलंय. सेल्फीच्या आहारी गेलेली व्यक्ती ही आत्मकेंद्री आणि स्वत:वर प्रेम करणारी असते असं मानलं जातं. त्यामुळे सेल्फीच्या नादात लोक सेल्फिश कधी बनत जातात हे त्यांचं त्यांनादेखील कळत नसावं.

या सेल्फी काढण्याच्या क्रेझबद्दल सांगताना मानसोपचारतज्ज्ञ वैशाली देशमुख म्हणाल्या, ‘सेल्फी काढण्यामागे बॉडी इमेज, सेल्फ इंडलजन्स, पिअर प्रेशर या गोष्टीदेखील असतात. त्यासोबत सगळे करतात मग आपणच कसं मागे राहायचं हा विचारही असतो.

सुपर फिशियल गोष्टींना महत्त्व देण्याचा जो ट्रेण्ड झालाय तोच आपण बदलून मुलांना खऱ्या महत्त्वाच्या आणि टिकाऊ गोष्टी कोणत्या आहेत हे सांगितलं. तर ते या सुपर फिशियल आणि तात्पुरत्या गोष्टींवर जास्त वेळ घालवणार नाहीत. त्यांनी आपला छंद, ध्येय, आवड, समाजसेवा या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सेल्फी काढणं हे केवळ मानसिक नाही तर त्यात टेक्नोलॉजी, सोशल स्टेटस, थोडं अॅडव्हेंचर अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे तितकंच महत्त्वाचं आहे.

मानसोपचार राजेंद्र बर्वे म्हणाले, ‘सेल्फी काढणं हे केवळ मानसिक नाही. पूर्वी फोटो काढून ते प्रिंट करून मिळेपर्यंत बराचसा वेळ जायचा. मोबाइलमुळे कॅमेरा सहज उपलब्ध झाला आणि फोटो काढण्यासाठी फारसं कौशल्य लागत नाही. सोशल मीडियावरून लगेच ते फोटो सगळ्यांना दाखवता येतात, त्यामुळे लोकांकडे पॉवर आलीये. नवीन टेक्नोलॉजीकडे आकर्षित होणं स्वाभाविक आहे. पण फोटो काढताना आपण जोखीम घेत नाही आहोत ना याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.’
एखादी गोष्ट करणं आणि त्यातून आनंद उपभोगणं केव्हाही चांगलं, पण एखाद्या गोष्टीचा अतिरेक हा केव्हाही वाईटच! आपण सेल्फीच्या आहारी तर जात नाही आहोत ना? आणि खरंच प्रत्येक क्षण अनुभवण्यापेक्षा तो सेल्फीबंद करण्याची गरज आहे का? हा विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे टेक अ सेल्फी बट टेक इट सेफली!

2सेल्फी काढणं माझ्यासाठी एक रुटीन बनलंय. म्हणजे कोणतीही नवी गोष्ट करताना सेल्फी इज मस्ट. मज्जा येते सेल्फी काढायला. आता मोबाईलवर वेगवेगळे अॅप्स असल्यामुळे सेल्फीला छान इफेक्ट देऊन लगेच पोस्ट करता येतो. हल्ली कॅन्डीड फोटोपेक्षा आय गो फॉर सेल्फी. डीएसएलआर ची गुंतागुंत सावरण्यापेक्षा मोबाइलचा फ्रंट कॅमेरा माझ्या जास्त जवळचा आहे. मला आवडतं सेल्फी काढायला.
– तेजल गावडे

 

3पाउट, क्लिक अॅण्ड पोस्ट, ये आज का फंडा है.. हे खरं. आम्हीही असंच म्हणत सेल्फीप्रेमी झालोय. सेल्फीच्या नादात अपघात झाल्याची घटना मला माहिती आहे. आम्हाला या प्रसंगानं वेगळं भान दिलं आहे. ते भान ठेवूनच आम्ही सेल्फी काढतो. आमच्या तरुणाईच्या जगात नवीन डीपी आणि लाइक्सला महत्त्व आहे आणि त्यासाठी सेल्फी मस्ट आहे. सेल्फी हे व्यसन म्हणण्यापेक्षा माझी आवड आहे.
– प्रियांका आचरेकर